Wednesday 27 March 2013

सोयीचा रस्ता.....


वेळ साधारण रात्री ९ च्या आसपासची ..... " बाईक " च्या वेगाशी जमेल तितके जुळवून घेत तिच्यात गुंतलेला तो आपल्या अंगावर गाडी घालणार नाही याची काळजी घेत टाकीवर कुटुंबातील बऱ्यापैकी मोठे अपत्य ,त्याच्या मागे स्वतः , आपल्या आणि आपल्याच ( याचा उल्लेख करावा लागतो हल्ली ) बायकोच्या सर्वार्थाने  मध्ये लहान पिल्लू घेऊन कडे कडेने जायची कसरत करणारा मध्यमवर्गी मध्यमवयी माणूस ( माणसे ) .... त्याला घासून आपल्या अल्टो पासून ते ऑडी पर्यंत "चार चाके " हा "सुदैवाने " एकमेव समान धागा असलेली वाहने चालवणारे उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय ,शेजारून आपल्या गर्ल फ्रेंड ला मिरवत आणि जरा अंधार आणि थोडासा मोकळा रस्ता ( पुण्यात रस्ते मोकळे नसतात त्यामुळे मागच्या आणि पुढच्या गाडीत ५ फुटाचे अंतर असेल तेव्हा रस्ता मोकळा असे अनौपचारिक  खोडकर समीकरण आहे ) दिसला की ....... असो !! ,यांच्या मागे  रस्त्या पेक्षा रस्त्याच्या आजूबाजूला कोण आहे , शेजारच्या गाडीत किंवा गाडीवर कोण आहे हे माझी गाडी गडगडू नये याची काळजी घेत निरीक्षण करणारा मी ...... सर्व एकाच रस्त्यावर पण वेगवेगळ्या मार्गावर ..... पहिले कुटुंब टू बाय फोर वाले , तरुण जोडपे वन बाय टू वाले , चारचाकी वाले वन बाय हाफ वाले ( अक्खी डिश अक्खी खाऊ नये ताटात थोडे शिल्लक ठेवावेच असा संकेत आहे म्हणे ) ......आणि मी ..... घरी जाऊन पोटभर खाणारा ..... माझे निरीक्षण आणि आपला समाज याच्या कल्पना -संकल्पना संपल्या ...नाहीतर आधीची पिढी ओरडतेच न कि तुम्ही पुढचा मागचा विचार करत नाही ?? मी करतो न ...पुढे मी कोणाला धडकणार नाही आणि मागून मला कोणी धडकणार नाही याचा किंवा माझ्या पुढे कोणी जाणार नाही याचा किंवा माझ्या मागून कोणी माझी मारणार नाही याचा ..... आजूबाजूलाही जग असते याचा बहुतेक वेळेला विसर पडणाऱ्या मोठ्या वर्गातील मी एक सामान्य घटक .....
                              मागची सीट रिकामी त्यामुळे कोणी टाकीवर - मध्ये बसायचा प्रश्नच नाही .... संगीत आपला सोबती या न्यायाने मोबाईल मधले गाणे बर्यापैकी मोठ्या आवाजात ऐकत मी पुढे सरकत होतो ... कान उघडे ठेवले की मन बंद होत नाही ... शेजारून जाणाऱ्या जोडप्याचे लडिवाळ बोलणे ऐकले की आयुष्यातील एकटेपणा अधिक गहिरा होतो , मुलाला /मुलीला शाळेतून घरी नेणारी आई सिग्नल वर थांबली असता प्रेमाने केसात हात फिरवून " आज डबा खाल्ला का ... तुझ्या आवडीची भाजी ...." असा संवाद ऐकला की सकाळपासून आपण डबा खाल्लाच नाही याची आठवण होते . आतापर्यंत न जाणवलेल्या  भरलेल्या डब्याचे  उगाचच ओझे  होते  आणि आईच्या आठवणीने डोळ्यांच्या कडाही नकळत जड होऊ लागतात . ऑफिस मधून घरी जाणाऱ्या नवरा बायकोचे बोलणे ऐकले की मन उगाचच गृहस्थी ची स्वप्ने रंगवू लागते आणि " आयला काय आहे राव " अशी दाद मिळवून जाणारी मुलगी .." हि गर्ल फ्रेंड म्हणून चांगली आहे पण बायको म्हणून नो वे " असे  बळच चिकित्सक विचार करायला लावते .... एकंदरीत काय ... कान उघडे असले की मी माझा अशा साध्या सोप्या  आयुष्यात मग माझे कोण ? असा कटकटीचा प्रश्न निर्माण होतो . विचारांचा वेग वाढतो आणि गाडीचा वेग कमी होतो . मागचा असा काही होर्न वाजवतो कि त्याला विचारावेसे वाटते .... " अरे का कावला आहेस इतका ? " म्हणून कान बंद ठेऊन पुढे सरकणेच उत्तम ...अशी परीक्षा रोज जरी घेत असला तरी हाच रस्ता सोयीचा वाटतो . कारण त्यात कोठेतरी प्रवाहात असल्याचे समाधान असते …. 
                               
पण या रस्त्याचीही कमाल असते ....... अनेकांना रस्त्यावर आणतो पण रस्त्यावर असलेल्यांना मात्र रस्त्यावरच ठेवतो ... इतका स्वार्थी सर्वसमावेशक भाव कदाचितच कोठे असेल . सर्वाना आपल्या बरोबर घेऊन जाणारा पण मोजक्याच लोकांना पुढे घेऊन जाणारा .....इतर पडतात आजू बाजूला .... ज्यांच्याकडे आपले कधी लक्षच जात नाही ... रस्त्याच्या आजूबाजूला एक वेगळेच विश्व असते आणि ते आपल्या जगाइतके संकुचित नसते . तोंडाला भडक रंग लाऊन आपल्या आयुष्यातील अंधार झाकणाऱ्या वारांगनेलाही एक आयुष्य असते . उन्हात डोक्यावर पदर घेऊन पोपया -कणसे विकणाऱ्या तात्यालाही संसार असतो , महागड्या आईस्क्रीम खायची चटक लागलेल्या आपल्या सोसायटीत प्रवेश नसलेल्या कुल्फी वाल्याच्या पोटातही "आग " लागली असते जी  कोणी "थंड " घेतल्या शिवाय विझणारी नसते .फाटक्या चड्डीला करकचून सुतळी बांधून  कळकट शर्टाच्या मळकट बाहीला शेंबूड पुसणाऱ्या पोराच्याही डोळ्यात काही स्वप्ने असतात . वचावचा भांडणाऱ्या बायकांच्या किंवा पुरुषांच्या भाषेलाही कोठेतरी समाजापासून दुरावल्याची किनार असते . पण हे सगळ पाहायला ,यावर विचार करायला आपल्याला वेळ आहे कोठे ? वेळही काढता येईल पण बाजूला काय जग आहे हे समजून उमजून घेण्याची नैतिकता आपल्यात उरली आहेच कोठे ....आपल्यात आहे केवळ इर्षा आणि हाव ...पुढे राहण्याची आणि पुढे असलेल्याला ओवर टेक करायची ....
                               इतकेच आपले आयुष्य मर्यादित आहे ..नाही आपण ते तितकेच मर्यादित ठेवले आहे . कारण आपल्यावर झालेल्या संस्काराला ,नैतिकतेला ,संवेदनांना आणि जाणीवांना आपण " मिनीमाईझ " केले आहे .आणि डिलीट करायच्या मार्गावर आहोत . म्हणूनच वारांगनेच्या छातीवरचे मांसल गोळे डोळ्याला दिसतात ,डोळ्यात भारतात , कामज्वर निर्माण करतात पण त्याच गोळ्याखाली असलेल्या मनातल्या अगतिकतेकडे ,असहाय्य्तेकडे  आपली नजर कधी जातच नाही .कुल्फी वाला असो वा फळे विकणारी बाई -तात्या त्याचा माल कसा आहे याहून " विकणारी व्यक्ती " कशी आहे याला महत्व आहे कारण , कोथिंबीर पेंडी च्या मुळालाही माती पहायची आणि सहन करायची सवय नसलेल्या आपल्याला उघड्यावरच्या माणसाचा उघडा माल कसा खपणार ?? शर्टला शेंबूड पुसणारा मुलगा पाहून " इक्स किंवा व्याक " वाटणाऱ्या आपल्याला किंवा चुकून आपल्या घरच्या छोट्या मुलाने तसे केले तर " रस्त्यावरचा /झोपडपट्टी " मधला आहेस का म्हणून उद्धार करणाऱ्या आपल्याला , त्या पोराला सर्दी सोबत तापही असेल का हा प्रश्न कधीच पडत नाही . भांडणाऱ्या व्यक्तीच्या असंस्कृत ,अश्लील शब्दामागची मजबुरी आपल्या कानी कधी पडतच नाही ..कारण ....
               आपण कधी रस्त्याच्या कडेला जातच नाही .... समोर जाताना वेग येतो तर बाजूला जात असताना जबाबदारी . वेगाची आवड प्रत्येकाला आहे कारण वेग हा प्रकाशझोतात येतो , वर्तमानपत्रात झळकतो आणि वाहिन्यांवर मिरवतो . जबाबदारीचे काय ? घरच्यांची नको असते तेथे यांची कोण घेणार ? आणि का घ्यावी ? मला तर पुढे जायचय ....कडेला अडकून बसलो तर पुढे कसे जाणार ? जहाज कितीही सुंदर असले , बलशाली असले तरी ते प्रवाहातच शोभून दिसते , कारण प्रवाहात लाटांशी लढण्याची महत्वाकांक्षा असते , कोठेतरी पोहोचण्याची जिद्द असते , निसर्गापासून ते मानवापर्यंत सर्वाना हरवण्याची इर्षा असते ...काठावर बसून काय ? काठावर तर हरलेले ,निराश आणि हताश बसतात , ज्यांच्यात काही जिंकण्याची जिद्द नसते ... अशा लोकात मी कशाला वेळ वाया घालवू ? ते का माझ्या बौद्धिक ,सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक बरोबरीचे आहेत ? आमचा रस्ता तेवढा मोठा करा ...कडेला पेविंग बसवा किंवा आणखी काही ..मला काय त्याचे ? आणि माझी गाडी मागे पाहायला आरसा पुरवते  आणि मेंदू डोळ्यांना पुढे पहायची आज्ञा देतो ....कडेच्याना काडीचीही किंमत नसते म्हणून इंडीकेटर आणि कान दिले आहेत .... सोयीनुसार बंद चालू करता येणारे .... जबाबदारी झटकण्याची संधी देणारे ... माणसाचे मातीशी आणि रस्त्याचे कडेशी नाती तोडणारे ...माझ्या सोयीचा रस्ता दाखवणारे आणि रस्त्याच्या कडेच्या जीवनाला कोनाड्यात टाकणारे ....