Saturday 27 April 2013

चाळीशीतील ''देव "

जसे सचिन देव बर्मन यांचे संगीत अजूनही आपल्याला मोहिनी घालते तसेच सचिनचा खेळ सुद्धा आपल्याला मोहिनी घालतच राहील . . अगदी त्याच्या निवृत्ती नंतरही ! 

देवाला वय नसते . तो अनादी , अनंत असतो . तारुण्य -वार्धक्य यासारख्या वयाच्या अवस्था त्याच्या कार्यास अडथळा ठरू शकत नाहीत . अवतारकार्य केव्हा सुरु करायचे आणि दैवी कार्याचा अंत कधी करायचा याचा निर्णय खुद्द देव घेतो . पण देव जेव्हा मनुष्ययोनीत जन्म घेतो तेव्हा त्यालाही पृथ्वीचे नियम लागू होतात . त्याचे अनादी ,अनंतत्व पंचमहाभूतात विलीन होऊन त्यास मर्त्य स्वरूप येते . त्याचे वय त्याच्या कर्तुत्वाचा आणी अस्तित्वाचा निर्णय घेते . आपले कार्य कधी सुरु करायचे किंवा कधी संपवायचे याचा निर्णय एखादी समिती किंवा भक्तांचा मोठा गट घेतो . वय वाढले की उत्साह कमी होतो , हातापायांच्या हालचाली मंदावतात , धडाडी कमी होऊन सौम्यपणा अंगी येतो , नाही म्हंटल तरी दृष्टी अधू होते , पंचपक्वानाचे ताट सुद्धा ' शुगर फ्री ' संस्कारातून पास होऊनच समोर येते , साठीची तरतूद करून ठेवा अशा सल्ल्यांची रांग लागू लागते . . . असे प्रत्येकाच्या बाबतीत होते का ?? 'हो ' कारण चाळीशी म्हंटल की या गोष्टी आल्याच . नाही आल्या तर ती चाळीशी कसली ? . . दिल कितीही जवान असले तरी अखेर शरीर थकतेच . . मग कामाचा ताण ,धावपळ कमी नको का करायला ? या गोष्टी नव नव्या वेष्टनात अजून काही वर्षे आपल्या समोर येतील . . कारण आपला देव चाळीशीत  आहे . . ! क्रिकेट हा धर्म मानला तर त्या धर्माचा देव सचिन रमेश तेंडूलकर याने  २४ एप्रिल  ०१  रोजी ' चाळीशीत ' पदार्पण केले !! 
                    
चाळीशी ! मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा , बदलांचा कारखाना , गोळ्यांच्या भडीमाराने घायाळ  होता आणि दररोज विविध कारणांसाठी अंगात घुसणाऱ्या सुयांची तमा  बाळगता आनंदी राहायचे , रडणाऱ्या बायकोचे सांत्वन करत . .आय चे आकडे बघत स्वतः रडायचे , चाळीशीनंतरचे काम , आरोग्य आणि जीवन यासारख्या  कार्यक्रमास  जोडीने आणि जातीने जायचे वय ! चाळीशीतील  एखादा माणूस आपला अंदाज चुकवतो म्हणजे काय ? बर चुकवावेत ते तरी किती प्रमाणात ? थेट मैदानं गाजवावीत ? धावतो काय , पळतो काय , विश्वविक्रम करतो काय ? वयाचे भान आहे का नाही या तेंडल्याला ? रोज बायको टोमणा मारते . . नुसते सचिनला 'बघू ' नका त्याचे जरा 'अनुकरण ' करा बघावं तेव्हा चाळीशीचे कौतुक . . असे दिवसातून चाळीस वेळा ऐकावे लागते . आता तर पोरं पण 'पोक ' करायला लागलीत .. आयला खरच देव आहे तो नाहीतर आपली झेप आहे का ?असे संवाद ' फोर्टी प्लस ' क्लब मध्ये नक्की सुरु असतील . त्यामुळे सचिनची निवृत्ती ही चाळीशीची गरज आहे . .. . 
                             
सचिन ने निवृत्ती कधी घ्यावी आणि तो का घेत नाही ? हे दोन प्रश्न चघळत विशीतली पिढी चाळीशीत गेली ,तर  तेंदुलकर म्हणत प्लास्टिकची बात जमिनीवर आपटणारी पिढी विशीत आली ! तरीही हा प्रश्न , सचिन नावाचे गारुड अजूनही सुरूच आहे . यशस्वी माणसाने यशाच्या सर्वोच्च बिंदूवर असताना निवृत्ती घ्यावी असा सामान्य नियम आहे . पण सामान्य नियम असामान्यांना लागू होतो का ? वय असेपर्यंत होत नाही पण वय झाल्यावर हा नियम लागू होतो . कारण देव मनुष्ययोनीत जन्माला आल्यावर त्याला पृथ्वीवरचे नियम लागू होतात . मनाचे  ऐकता लोकांचे ऐकावे लागते . वयाचा माझ्यावर परिणाम झाला नाही हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी कसरत आणि धडपड करावी लागते . आतापर्यंत टाळलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात . माझ्या वाढत्या वयाची मला जाणीव आहे याची जगाला जाणीव करून द्यावी लागते . म्हणूनच सचिन त्याच्या वाढदिनी म्हणाला "चाळीस आकडा पाहून थोडे दडपण आले  " . . यानेही अनेक तर्क वितर्क सुरु झाले आणि ते अपेक्षितच होते . सचिनला महान याच टीकांनी  केले आहे . वैयक्तिक यश पण सांघिक अपयश , सांघिक यश पण वैयक्तिक अपयश , दोहोंचे यश तेव्हा संघाचे श्रेय , दोहोंचे अपयश तेव्हा जागा अडवल्याचा ठपका ! या कौतुक -टीका मार्गावरून झालेला सचिनचा प्रवास स्तिमित करणारा आहे . त्याची कामगिरी आणि विश्वविक्रम प्रत्येक क्रिकेट वेड्यास जवळपास पाठ असल्याने ते पुन्हा मांडणे म्हणजे लोकांच्या स्मरणशक्तीवर शंका घेण्यासारखे आहे . ती चूक मी चुकुनही करणार नाही . थोडासा संदर्भ देतो - शतकांचे शतक ! हि कामगिरी सामान्य नाही . . सामान्य व्यक्तीचीसुद्धा नाही !! अनेक शतके खेळ सुरु असूनही असा पराक्रम करणे कोणाला जमले नाही . . म्हणूनच कदाचित त्याला ' देवत्व ' बहाल केले असेल .  हे देवत्व सचिन मी देव नाही म्हणत चाळीशीत सुद्धा आनंदाने मिरवतो आहे . 
                   
  सचिन ने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलीच आहे , २० -२० प्रकारात आय . पी . एल मधून खेळत आहे . पण कसोटीचा मोह सचिनला सुटत नाही की आयुष्याची कसोटी खेळायची सवय असलेल्या सचिनला २२ यार्डाची खेळपट्टी सोडवत नाही हे केवळ त्यालाच माहिती . . सचिन आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेणारच आहे पण ती कामगिरी खालावली म्हणून कि वय वाढले म्हणून याचा निर्णय लवकरच होईल . अर्थात त्याचे वय वाढले आहे ' अधिसारखे आता ' अशक्य आहे . . सूर्यास्त होत असताना संपूर्ण जग पहात आहे . त्याचे फटके अजूनही वाहवा मिळवत असले , मैदानातील त्याची उपस्थिती कामे सोडून टी .व्हि समोर खिळवून जरी  ठेवत असली , १० क्रमांकाच्या जर्सी मधून समालोचकाच्या सफेद -निळ्या शर्टात पाहणे कितीही दुक्ख्दायक असले तरी दिवस लवकरच येणार आहे . खासदार म्हणून सचिनची नवी इनिंग सुरु झाली आहे . खासदार निधी वापरून विदर्भात सौरदिवे बसवायची त्याची कल्पना स्तुत्य आहे .त्यामुळे समाजसेवेसाठी आणि आणखीन सचिन घडवण्यासाठी , आफ्रिकेत त्याने खणखणीत कामगिरी करून निवृत्ती घ्यावी अशी सर्वांप्रमाणे माझीही इच्छा आहे . माणसाचा स्वभावाच मुळात चंचल .  देव आता ओल्ड झाला म्हणून अनेकांनी पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे . आतापर्यंत भाटाची भूमिका करणारे अचानक टीकाकार बनले आहेत . आणि सर्वच चूक आहेत असे म्हणता येणार नाही . . कारण देव चाळीशीत आहे आणि चाळीशी म्हणजे …जसे सचिन देव बर्मन यांचे संगीत अजूनही आपल्याला मोहिनी घालते तसेच सचिनचा खेळ सुद्धा आपल्याला मोहिनी घालतच राहील . . अगदी त्याच्या निवृत्ती नंतरही ! असा विचार मनात आला की मुकेश चा आवाज कानात घुमू लागतो . . कल खेल मै हम हो ना हो गर्दिश मे तारे रहेंगे सदा . .भूलेंगे हम भूलोगे तुम पर हम तुम्हारे रहेंगे सदा . .रहेंगे यही इसके निशान इसके सिवा जाना कहा . . . येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील . . चाळीशीतील "देव " !!  

Saturday 20 April 2013

मादरचोद . . .


कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . 

" अबे मादरचोद दिखता नही क्या ?? "  एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे मादरचोद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला मादरचोद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . . 

Tuesday 16 April 2013

आशा. .

' हो आज ती उठून बसली ' , ' डोळ्याची पापणी हलवली ' , ' मला त्यांनी ओळखले ' , ' वाटीभर भात खाल्ला त्यांनी ' , ' होईल बरे . . डाक्टर म्हणत होते ' , ' आता रगद  तपसायला दिलया काय निघतंय बिरोबाला ठाव पर कौल आपल्याच बाजून लागनार ' आयुष्य आणि मृत्युच्या झोपाळ्यावर हेलकावे खाणाऱ्या जीवाच्या जीवाची काळजी करणारे अनेक जीव . असहाय्य , हतबल पण आशावादी . लहानसहान गोष्टीनी हुरळून जाणारे , आनंदी होणारे . आपण काहीतरी पुण्य कमावले याची खात्री बाळगून देवाला हात जोडणारे . पै पाहुण्यांना फोन करून खुशाली कळवणारे . निराशेलाही आशेची पालवी फुटायला लावणारे आणि त्या पालवीला जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे नातलग . . . दवाखान्यात एक मृत्यूसोबत झुंझत असतो तर दवाखान्याबाहेर अनेक जण आयुष्यासोबत लढत असतात . . केवळ एका आशेवर . . आयुष्य मृत्यूला हरवेल या आशावादावर . . 
                                    या नातलगांची एक वेगळीच मानसिकता असते , वेगळेच विश्व असते . लहान गोष्टींचे सुद्धा अप्रूप असते .यांची सुखाची बेटे आणि दुक्खाचे डोह वेगळेच असतात .ज्याची आपण सधन लोक कल्पनाही करू शकत नाही . एकीकडे आपण अडाणी असल्याची वेदना असते तर दुसरीकडे अडाणी असूनही आपण भारी दवाखान्यात दाखल केले आहे याचे समाधान असते . खिसा फाटका असताना " भारी औषधे द्या , हयगय करू नका ' म्हणण्याचे धारिष्ट्य केवळ त्यांनाच ठाऊक . शेत म्हणजे पॉलिसी आणि शेतीत पैसा ओतून शिल्लक राहिलेले सोने म्हणजे एफ . डी . असलेले लोक दवाखाना कसा पार पाडतात हे मला दीर्घ काळापासून पडलेले कोडे आहे . कोठून आणतात हे पैसा आणि कोठून आणतात आशा ? इंग्लिश ने फरक पडला नाही तर देशी , त्यानेही फरक पडला नाही तर गंडे -दोरे -नवस आणि यानेही फरक पडला नाही तर केवळ वेडी आशा . माझा दादला -मालक -बा -आजा -म्हातारा बरा होईल याची केवळ आशा . इंटरनेट वरून ५ मिनिटात काहीतरी वाचून डॉक्टरच्या ५-८  वर्षाच्या शिक्षणावर आणि कितेक वर्षाच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या इतके हे लोक शहाणे नसतात . किंबहुना दिल्ली -मुंबई -बेंगलोर -विदेश इथे आमचा अमुक तमुक डॉक्टर आहे त्याच्याशी बोला जरा म्हणून स्टेट्स मिरवणारेसुद्धा नसतात . त्यांची असते ती केवळ श्रद्धा डॉक्टरवर . ' डाक्टर काय बी करा पर मानुस वाचवा ' इतकीच काय ती अपेक्षा . .  . 
                                   मळकट टोपी , रफू केलेली विजार ,त्यातल्या त्यात बरा सदरा आणि खांद्यावर टॉवेल टाकून धावपळ करणारे हे नातलग म्हणजे अज्ञानात शहाणपण -सुख याचे उत्तम उदाहरण असतात . डाक्टरचा मेडिकल वाला फार कमिशन मारतो , सकाळी दिलेली dettol इतक्यात  कशी संपली असे व्यावहारिक प्रश्न यांना कधी पडत नाही . मेडिकल चे बिल जास्ती झाले म्हणून कपाळावर आठ्या न पडता हसू येते . कारण आशा असते की डाक्टर ने "भारी " औषध चालू केलय आता काळजीचे कारण नाही .  यांच्या  अंगी असतो तो केवळ सच्चेपण आणि आशा . म्हणूनच आतापर्यंत 'शहाळे ' म्हणजे काय हेही माहित नसलेला तात्या ३० रुपये मोजून नारूळ घेऊन येतो . का ? कारण गाडीतून उतरलेला साहेब घेऊन येतो म्हणजे नक्कीच आराम पडत असणार . आशेला वास्तवाचे बंधन नसते . शेवटचे कधी जेवलो हे वास्तव विसरून रुग्णाला घरचे खायला देण्यासाठी धडपडणारी माणसे बघून मन कासावीस होते . जो जे सांगेल ते करायचा प्रयत्न अंगावर काटा आणतो . इतक सगळ होऊनही रुग्ण दगवलाच तरीही आशा मनात असतेच . म्या किती झटलो पोरानं पाहिलं , त्यो माझबी असच करेल . कपाळावरच कुंकू पुसत बांगड्या फोडून दवाखान्यातच टाहो फोडणाऱ्या आक्कीला तिचा बा सांगतो ' आग का टिपूस गाळतेस , हे प्वार तुला काय बी कमी पडून देणार नाय , बापाच नाव काढेल ' . . पुन्हा एकदा आशा . . वर्तमानाला विसरण्यासाठी भविष्याकडून केलेली आशा . . 
                                 
का जपतो आपण हि आशा ? जी माणसाला वास्तवापासून दूर नेते , मृत्यूलाही जीवनाचे स्वप्न दाखवते , प्रयत्नांना जिद्दीचे बळ देते , तुटलेल्या मनाला आणि मोडलेल्या संसाराला सावरायचा प्रयत्न करते .या आशेवरच तर आपले आयुष्य झुलत असते . वास्तवाचे दाहक चटके सहन करत असते .हीच आशा तर आपल्याला जगवते ,वाढवते , यशस्वी करते आणि सपाटून हरल्यावर जगायचे एक कारण देते  . याखेरीज आपल्या हाती असतेच काय ? म्हणूनच रुग्णाने ओळख दाखवली , थोडे खाल्ले , हालचाल केली तर नातेवाईकांना ' आशा ' वाटते . . क्षणभंगुर पण सुखद . !म्हणूनच "आता सगळे प्रयत्न थकले … आता केवळ आशा आहे चमत्काराची " असा संवाद ऐकला की डोळ्याच्या कडा पाणावतात आणि जीवनाचे सत्य समोर येते , आपण  जगतोही आशेवर आणि मारतोही आशेवर . . पुन्हा जन्म घेण्याच्या , अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याच्या !!