Sunday 26 May 2013

असा राहुल होणे नाही !!

यश -अपयश कोणाच्या हाती नसते स्पर्धा म्हटले की ती निकोप असलीच पाहिजे असा आपला 'अट्टाहास ' असतो . तो असलाच पाहिजे . पण स्पर्धा हि विजयापेक्षा पैशासाठी खेळली जाते तेव्हा मैदानाचे नियम मागे पडतात आणि व्यवसायाचे नियम लागू होतात . नफा आणि तोट्याच्या गणितात 'खेळ ' मागेच रहातो पण 'स्पर्धा ' मात्र सुरूच राहते . यश -अपयश कोणाच्या हाती नसते आपण केवळ प्रयत्न करायचे हे कैक पिढ्यांनी वापरलेले वाक्य आताच्या पिढीने बदलले आहे .आयुष्य जगायला 'अर्थ ' लागतो त्यामुळे आयुष्यात अधिकाधिक 'अर्थ ' मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायचे बाकी यश -अपयश कोणाच्या हाती नसतेच  . बैलांच्या शर्यती , कोंबड्यांच्या झुन्झी बंद झाल्याने श्रीमंतांनी मन आणि पैसा गुंतवायचा कोठे ? या प्रश्नाला धनाढ्य बी.सी . सी . आय ने उत्तर दिले आणि क्रिकेट चा ३ तासांचा 'सिनेमा ' सुरु केला . गावच्या जत्रेत जसे  ट्रकवरच्या तमाशाचे फड असतात तसे प्रत्येक गावात आपले कलाकार ( मैदानापेक्षा जाहिरातीत जास्ती दिसणाऱ्या लोकांना काय म्हणावे ? ) आणि नृत्यांगना घेऊन धनिक हिंडत आहेत . 
         
 ख्रिस गेल च्या वादळाने गाजलेली आय . पि. एल . ६ आता स्पॉट फिक्सिंगच्या तडाख्याने (कदाचित ) लाजत आहे . गेल्या एक आठवड्या पासून श्रीशांत ,चंडीला ,विंदू , एक मराठी अभिनेत्री , श्रीनिवासन , मायाप्पन यांच्या नावाभोवती चर्चेचे फड रंगत आहेत . गल्ला भरण्यासाठीच जन्माला घातलेल्या स्पर्धेत नैतिकता असावी कि नसावी यावर राष्ट्रीय चिंतन सुरु आहे . सट्टा नियमित करावा यासाठी तमाम सट्टेबाज देव पैशात बुडवून बसले आहेत . श्रीनिवासन आयतेच अडकल्याने आपली डाळ शिजवण्यासाठी दालमिया सह सर्व मिया तयार होत आहेत असे वृत्त आहे . सट्टेबाजी विरोधात कायदा करण्यासाठी हालचाली सुरु आहेत . हे सगळे कशासाठी ? खेळात सभ्यता , नैतिकता राहावी म्हणूनच न ? पण जेव्हा क्रिकेट च्या मैदानावरील सभ्यता ,नैतिकता निवृत्ती घेते त्याची साधी दखलही कोणाला घ्यावी वाटत नाही हे खेळाचे दुर्दैव . कालच राहुल द्रविडने निवृत्ती जाहीर केली आणि आय पी एल मधला फ़ेअर प्ले संपला . राहुलच्या निवृत्तीची 'बातमी ' झालीच नाही . तो आय पी एल च्या मैदानावरुनही 'उपरा ' म्हणूनच बाहेर पडला . . . .