Sunday 29 September 2013

निर्णय

'' Dad it's final . . . you are shifting to hydrabad ''

सहा खोल्यांच्या ऐसपैस घरातील एका कोपऱ्यात सकाळपासून भांड्याला भांडी आपटत होती . लढत होती . पोचे येउन बाजूला पडत होती पण तरीही लढत होती . साठीपार झालेले माधवराव , संधीवाताने वेग मंदावल्याने साठीकडे हळू हळू वाटचाल करणारी मीना
आणि त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल यांच्यात राहत्या जागेवरून सुरु असलेला वाद . . .

' अरे कष्टाने घेतली हि जागा या जागेला काहीच किंमत नाही ? मी आयुष्यभर केलेल्या कष्टाचे प्रतिक आहे हे घर आणि ते सोडून जायचे ?? ' माधव
' oh come on dad , be practical . . काय हे प्रतिक वगिरे घेऊन बसलाय ? लोल  अहो तुमच्या प्रतीकाच्या रंगाचे पोपडे निघालेत , भिंतीना चिरा पडल्यात ''

Friday 20 September 2013

दाभोलकर - एक नवस . . . तुमच्यासाठी !

माणूस , माणूस म्हणून जगत असताना वर्तमानापेक्षा भूतकाळ अन भविष्यकाळाला जास्ती महत्व देतो . आज काय करायचे यावर कृती न करता काल काय केले आणि उद्या काय करावे लागेल या स्वप्नात रमण्यात आयुष्य खर्ची घालतो . भूत अन भविष्य समृद्ध असला तरी वर्तमानाच्या मुदलात दिवाळखोरी असते . . कारण माणसाला वास्तवापेक्षा भासमान गोष्टींचे आकर्षण आणि अप्रूप अधिक असते . . हा नियम केवळ माणसांना लागू नाही तर उर फुटेपर्यंत मृगजळाच्या पाठीमागे धावणाऱ्या हरणांना , अंत माहित असूनही आगीत झोकून देणाऱ्या पतंगाना सुद्धा लागू होतो . . कारण एकच, भासमान गोष्टींचे आकर्षण अन वास्तवापासून दूर सरकायची असलेली गडबड . . या गडबडीनेच माणूस हडबडतो अन मानसिक आधाराच्या शोधात मंदिरे -मशिदी -चर्च -आश्रम इत्यादीच्या वाटा चालू लागतो . ही ठिकाणे काहीबाही करून भूतकाळ विसरायला लावतात आणि 'तथास्तु ' म्हणून भविष्य समृद्ध करतात पण वर्तमान 'कोरडाच ' राहतो . . त्याची चिंता कोणालाच नसते . . अंध लोकांनी केलेल्या श्रद्धेच्या अतिरेकाला अंधश्रद्धा म्हणायचे नाही तर काय करायचे ?? लोकांचे भूतकाळ अन भविष्यकाळ सुलभ , सुखद , सुसह्य करणाऱ्या अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज महिना झाला . . त्यांच्या बंडखोरीमुळे मृत्युपूर्व भूतकाळात 'बदनाम ' झालेले दाभोलकर त्यांच्या मृत्यूपश्चातच्या भविष्यात 'हिरो 'झाले पण त्यांचे मारेकरी अजूनही फरार आहेत हे 'वर्तमान ' लक्षात घ्यायला कोणीही महत्व देत नाही . . कारण माणूस , माणूस म्हणून जगत असताना वर्तमानापेक्षा भूतकाळ अन भविष्यकाळाला जास्ती महत्व देतो . . . 
                           
डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळा , रक्ताळलेला डाग पडला आहे असे मी दाभोलकर गेल्या नंतरच्या आठ दिवसात प्रसारमाध्यमातून पाहिले -वाचले . पुरोगामित्व म्हणजे  काय ? यावर माझ्या मनाच्या दोन बाजूंवर बुद्धीच्या तिसऱ्या बाजूचा शिक्का लागायचा आहे पण दाभोलकर यांच्या खुनाने महाराष्ट्रावर एक डाग पडला हे नक्की . . . प्रत्येक राज्य डागाळलेल्या चादरी अन निर्लज्ज मने घेऊनच कारभार करत असतो त्यामुळे ' लागा चुनरी मै दाग ' सारखे सव्याचे दिवस आता संपले . पण नामुष्की क्वचितच वाट्याला येते . . दाभोलकर यांच्या खुनाचे 'राजकीय असूयेतून जन्माला घातलेले मारेकरी ' वगळता राज्य शासनाच्या हातात काही पडले आहे असे दिसत नाही . ते जाणून घ्यायची किंवा लोकांना जाणते करायची इच्छाही कोणाची नाही कारण एका महिन्यापूर्वी जो 'डाग ' होता त्याचा आता 'ठिपका ' झालाय . . निषेधाचे झेंडे , घोषणांचे फलक , मेणबत्त्या , तात्पुरत्या संवेदना दाखवणारी मने आता फडताळात पडली आहेत . . कारण विषय आता 'जुना ' झाला आहे . . . 
                          दरम्यान दाभोलकर यांच्यावर अनेक सुंदर लेख छापण्याचे पुण्यकर्म अनेक वृत्तपत्रांनी केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन . . हे लेख वाचून ' तुज आहे तुज पाशी परी तू जागा चुकलाशी ' याचा प्रत्यय अनेकदा आला . दाभोलकर लोकांना समजले नाहीत कारण त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कोणी केला नाही . मीही केला नाही . मरणा नंतरही दोन शब्द कोणी चांगले बोलावेत असे अनेकांचे नशीब नसते . . दाभोलकर त्या बाबतीत नशीबवान मानायला हवेत . त्यांचे 'स्वप्न ' असणारे विधेयक संमत करून सरकारने त्यांच्या 'मुक्तीचा ' मार्ग मोकळा करून आपली जबाबदारी झटकली . . ठरलेल्या पठडीतले आरोप , ठरलेले दाखले , आरोप प्रत्यारोप , एकमेकांना बोटे दाखवून बोटचेपे धोरण स्वीकारणे या माकड खेळातून ' स्कॉटलंड यार्ड ' म्हणून कधीकाळी फ़ेमस असलेल्या मुंबई पोलिस दलाच्या मर्यादा पुनश्च उघड झाल्या , मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी आमच्याच दुध संघातले हो . . असे म्हणून शोकसभेत पण आपलीच लाल जगाला निर्लज्ज पणे दाखवणाऱ्या राजकारणी लोकांचा नागवेपणा पुनश्च समोर आला . . 'हा महाराष्ट्राच्या आठ कोटी जनतेचा सवाल आहे ' म्हणत मनचे दामटणाऱ्या अन महाराष्ट्राच्या भविष्याचे उत्तरदायित्व आपल्याच दाढीच्या खुंटाला बांधले आहे असा आव आणत अव्वाच्या सव्वा बोलणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांच्या 'बिकता है तो दिखता है ' हा किळसवाण्या मानसिकतेचे पुनश्च दर्शन झाले . . 'शिष्टाचार ' म्हणून एक दोन दिवस 'बरे ' बोलणाऱ्या अन नंतर आयला पोराचे नाव 'हमीद ' ठेवणारा ** गेला ते बरेच झाले म्हणून दात काढणाऱ्या समाजातील संकुचित समाजाच्या आकुंचित मनोवृत्तीचे पुनश्च दर्शन झाले . . समाजासमोर पुनश्च प्रश्न उभा राहिला . . 
           ' हम तो तुम्हे इसी तरह मारेंगे बोलो तुम क्या करोगे ' . . . अ वेनस्डे मधला बिनतोड सवाल . . विचारांना विचाराने मारायची समृद्धता आता लोप पावत आहे याचे आणखी एक रक्ताळलेले उदाहरण . . एखादा नवस फेडण्यासाठी जो नरबळी दिला जातो त्याला विरोध करणाऱ्या दाभोलकरांना , आपला (नवस ) विधेयक संमत करून घ्यायला आपलाच बळी द्यावा लागतो याहून दुर्दैव ते काय ? दाभोलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्याचा -अभ्यासकाचा -साधकाचा खून होऊन एक महिना उलटला तरी पुणे -मुंबई व्हाया लंडन फिरणारा तपास प्रवास वेग घेत नसेल तर सामान्य माणसाच्या खुनाचे काय होणार ?? तपासातील अपयश हे अत्यंत निराशाजनक आहे . . जेवा वास्तवात वास्तव शिल्लक रहात नसेल तेव्हा माणूस अवास्तव गोष्टीना अतिरेकी महत्व द्यायला लागतो . . बोटे अंगठ्यानी , मनगटे दोऱ्यानी , गळे गंड्या -ताईतानी , मन नवसाने भरू लागते . . सुरु होतो निसरड्या वाटेवरचा प्रवास . . 
               
 दाभोलकर . . सिरिअलच्या एका भागात लागणारा खुनाचा तपास अन दहशतवाद्यांची अटक मला खरच सुख देते . . ते भासमान आहे मला मान्य आहे . पण एक महिना उलटूनही काही 'सुराग ' मिळू नये म्हणजे तुमचा भूतकाळ काही बरोबर नाही . पूर्वजन्मी तुम्ही  काहीतरी प्रचंड पाप केले आहे त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागली . . वर्तमानात वावरून काय मिळवले तुम्ही ?? भूतकाळ बाजूला सारला अन भविष्याला हद्दपार केले त्याचीच फळे आहेत ही . . जाऊदे जे झाले ते झाले . . मी तुमच्या साठी नवस बोलतो आज . . दाभोलकर यांच्या खुन्याचा तपास लागला तर खोदकाम न झालेल्या ज्या डोंगरावर केवळ एकच झाड शिल्लक असेल  अशा झाडाच्या ईशान्य दिशेला जर पाण्याचे निसर्गनिर्मित तळे असेल तर त्या तळ्यातील पाणी पिउन मोठा झालेला कोंबडा डोंगराच्या उत्तरेस साडेतीन फुट उंचीच्या दगडावर कापेन . . .या अटींची पूर्तता होणारा डोंगर नाही मिळाला तर अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या माणसालाच न्याय मिळावा म्हणून अंधश्रद्धा जन्माला घालण्याचे पातक माथी येणार नाही अन त्याचवेळी दाभोलकर यांचे विषयी ' कितीहो वाटते याला ' अशी फुकटची प्रसिद्धी सुद्धा वाट्याला येईल . . न्याय हवाय कोणाला ? दे टाळी . . असो दाभोलकर तुमच्या खुनाचा लवकर तपास व्हावा यासाठीच हा नवस . . कारण तुमचा लाल बहादूर शास्त्री किंवा सुभाषचंद्र बोस होऊ नये इतकीच इच्छा !! 

Tuesday 17 September 2013

एक लोहपुरूष . .

एक लोहपुरूष नरमल्याने
शरमले लोहत्व लोहातले
दुखावले पुरुषत्व पुरुषातले !

लावलेले बीज
पालकत्व नाकारू लागले
मागून आलेले द्विज
जेष्ठत्व अव्हेरु लागले
भिडले ओठ आपल्याच
दातांशी
जुंपले युद्ध आपल्याच
आप्तांशी
झाली करमणूक लोकांची
लोहपुरूष नरमल्याने !

Sunday 15 September 2013

अस्वस्थ करणारी : अनुमती

जुन्या तुळशी वृंदावनात ठेवलेली आशेची नवी वात . . . वात विझवायला कोसळणारा पाऊस . . सोसाट्याचा वारा . . निसर्गापुढे वाकलेली तुळस . . विजांचा खेळ पहात  झुलणारा एक झोका . . आशेतून निराशेत अन निराशेतून आशेत झोक्यासह हेलकावणारे मन . . दिव्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व हुडकणारे दोन डोळे . . . पावसासोबतच बरसणारे . . वाऱ्यासह भिरभिरणारे . . विजांसह कडाडणारे . . अस्तित्वाच्या संघर्षात वातीची साथ देणारे . . अनंत भावना आपल्यात सामाऊन समाजाला प्रश्न विचारणारे . .  अन सिनेमा संपल्यावरही माझी साथसोडायची 'अनुमती ' न देणारे . . . !  माणूस 'जगवण्यासाठी ' माणसाने केलेला प्रवास , संवेदनांना पाझर फोडणारा , आयुष्याची दोरी पैशाच्या वेठीला बांधले आहे हे वास्तव समोर आणणारा , एखादी व्यक्ती हवी असणे यासाठीची धडपड अन गरज प्रत्येकाची वेगळी असते  याची अनुभूती देणारा चित्रपट म्हणजे गजेंद्र अहिरे यांचा  'अनुमती ' . . . !!