Thursday 31 October 2013

मातीचा किल्ला : भाग एक

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

हिन्दु धर्मात पूजनीय असलेल्या भगवत गीतेत श्री कृष्णने पुन्हा अवतार केव्हा घेईन ते स्पष्ट केले आहे . सध्या देशातील आणि देशाबाहेरील स्थिती पाहता 'अवतार ' लवकरच जन्म घेणार असे राहून राहून वाटते . . असेच काहीसे वाटत असताना विचारांच्या तंद्रीत आकाशात साचत असलेल्या ढगांकडे सपशेल दुर्लक्ष करून मी बाहेर पडलो . . आल्फ्रेड हीचकॉक हयात असते तर ' अरे हाच तो रस्ता जो मी अनेक वर्षे शोधत होतो ' म्हणून एखाद्या भयपटाची निर्मिती करून टाकली असती .दुपारच्या ४ ला चक्क अंधार , सोसाट्याचा वारा , पानांपासून ते पदरा पर्यंत हवेत उडणाऱ्या अनेक गोष्टी , हेडफोन वरून कमाल आवाजात कमालीचा ठेका असलेले गाणे ऐकत असतानाही कानाच्या पदद्यावर आदळणारा वीजा फुटल्याचा आवाज , मधूनच कडमडत जाणारे कुत्रे , कावरे बावरे होऊन झिग झेग पाळणारे मांजर , माणसांची धावपळ पक्षांची फडफड . . . हे सगळे माझ्यासाठी नाही असे समजून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पचाक पचाक पावले टाकत , कपाळावर साचलेल्या पावसाच्या थेम्बाना बेफिकीरीने उडवत ,हाफ चड्डीतले एक पोट्टे फुल एटीट्युडने समोर सरकत होते . . कदाचित कोलंबस चे गर्वगीत वाचून आले असावे . . पोट्टेच ते त्यात दखल घेण्या सारखे काय ? जो पोट्टा एका हातात अक्खा किल्ला घेऊन पुढे सरकत असेल त्याची 'दखल ' घ्यायची नाही ? मला तर कृष्णाने सुदर्शन पर्वत उचलल्याची गोष्ट आठवली . . देवा . . घेतलास अवतार अखेर तू . . दिसले रे बाबा . . तुझे पाय खड्ड्यात दिसले . . मी नमस्कार करणारच होतो . . तेवढ्यात आडोशाला माझ्या शेजारी थांबलेलं म्हातारं सवयीने खाकरलं अन मी भानावर आलो . . एक नमस्कार वाचवला जेष्ठाने . . दिवाळीत ना,  'चव बघ ' म्हणून पोटभर खायला घालतात त्याने अशी सुस्ती आणि गुंगी येते ।  असो . . सांगायचा मुद्दा असा . . त्या पोट्ट्याच्या हातातला पीओपी चा लहानसा किल्ला बघून मला माझ्या लहानपणीचा मातीचा अन शेणाचा किल्ला आठवला . . उचलता न येणारा . . वर्षभर फडताळावर ठेवता न येणारा . .

Saturday 26 October 2013

दाभोलकर खून - माझ्या मना बन दगड !



कविता करणे किंवा कवितेच्या प्रांतात रमण्याची माझी प्रकृती नाही . किंबहुना ते माझ्या किंवा वाचणाऱ्याच्या प्रकृतीला मानवत नाही . तरीही मी नेटाने कविता लिहितो . आवडीने कविता वाचतो . या वाचनात मला विंदा करंदीकरांच्या कविता मनापासून आवडतात . पटतात . आजूबाजूच्या परिस्थितीला साजेशा वाटतात . डॉ . नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला लवकरच तीन महिने पूर्ण होतील . दिवाळी साजरी करायच्या नादात तपासाचे निघालेले दिवाळे आपल्याला कोणीतरी 'सवाल ' उपस्थित करेपर्यंत समजणार नाही . हे सवालही महिन्यातून एकदाच उपस्थित होतात . वीस ते वीस असा त्यांचा प्रवास असतो . असो . . या पार्श्वभूमीवर मला विंदांच्या  माझ्या मना दगड हो
 या कवितेतल्या काही ओळी लिहाव्याश्या वाटतात . .

'हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो! '