Sunday 15 December 2013

लक्षात राहिलेला . . लक्ष्या !!

आयुष्यातल्या जिंदगीत कधी महेश कोठारे यांच्याशी 'ग्रेट भेट ' झाली तर त्यांना एक प्रश्न विचारणार आहे . महेश सर तुम्हाला कधी 'महेश महेश ' अशी हाक मारून बोलावतंय असा भास होतो का हो ?? याचे उत्तर कदाचित होयच असेल . . . याच 'महेश ' ने अन नेहमी अडचणीत सापडणाऱ्या लक्षाने आम्हाला हसायला शिकवले . . आज लक्षाचा स्मृतीदिवस . . अगदी विस्मृतीत गेलेला . 'अरे यार ,आज लक्षा असता तर . . . ' असे म्हणत अनेक कट्टे भावनांनी अन आठवणीनी ओलसर केले . त्याचेच संवाद कसेबसे त्याच्याच स्टाइलने फेकायचे केविलवाणे प्रयत्न करत हास्याचे कारंजे उडवले . तो बनवाबनवी करत असताना स्वतःला बनवून घेतले . तात्या विंचू म्हणजेच तो गोष्टीतला बागुलबुवा समजून लहान वयात माहित असलेल्या सगळ्या देवांचे स्मरण केले . . पण तो आपल्यातून कधी गेला हा दिवस मात्र सपशेल विसरलो . . हा दिवस रंगभूमीला अन चित्रपटसृष्टीला आठवणीत असेल पण प्रेक्षकांना आठवण करून दिली तरी पटणार नाही . . कारण लक्षा गेलाय हे कोणाला पटणारच नाही . . तो इथेच कुठेतरी आहे . . जवळपास . . अजूनही हसवतोय . . चौकोनी चेहेरे हलवतोय . . चेहेऱ्यावर रंग लाऊन आयुष्याचे रंग बदलतोय . . तो जाणे शक्यच नाही . . याच 'भावनेला अन भासाला ' आज ९ वर्षे पूर्ण झाली . . . 

Saturday 14 December 2013

भय इथले संपत नाही

Now, should we treat women as independent agents, responsible for themselves? Of course. But being responsible has nothing to do with being raped. Women don’t get raped because they were drinking or took drugs. Women do not get raped because they weren’t careful enough. Women get raped because someone raped them.
Jessica Valenti

काही घटना या केवळ घटना नसतात . तर त्या जखमा असतात . एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अन संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर , दांभिकतेवर , नैतिकतेवर अन मुल्यांवर पडलेल्या . . . जखमा !! कालांतराने या जखमांचीही प्रतीके होतात , अस्मिता जन्माला येतात , भगभगणाऱ्या वेदना अन ठसठसणाऱ्या संवेदना शांत होतात . . व्यक्ती सावरते . . समाज विसरतो . . पण या जखमांची सुद्धा एक वेगळीच वेदना असते . . ज्या दिवशी त्या घडल्या त्याच दिवशी लोकांना अचानक स्मरण होते . . " अरे बरोबर अमुक वर्षापूर्वी तमुक घडले होते '' पुनश्च आठवणी ताज्या होतात . 'त्या ' दिवसापासून ते 'या ' दिवसापर्यंत काय घडले याचा वार्षिक आढावा घेण्यात येतो . इतर देशांपेक्षा भारत किती उदासीन आहे याबाबत चूकचूक पचपच होते . कालांतराने तीही नाहीशी होते . . हे असेच अनेक वर्षे सुरु आहे . . अव्याहत . . मग ती फाळणी असो , भारत -पाकिस्तान  भारत -चीन युद्धे असो , बाबरी मशीद असो , कारगिल युद्ध असो , संसद भवन हल्ला असो , २६ /११ चा दहशतवादी हल्ला असो वा . . . १६ डिसेंबर २०१२ असो . . . घटना घडल्यावर नजीकच्या भविष्य काळा बद्दल प्रत्येक भयभीत होतो . . कालांतराने आश्वस्त किंवा निर्भय होतो . . पण . . ' भय इथले संपत नाही ' . . येणारा प्रत्येक 'उद्या ' एका नवीन प्रश्नाला जन्म देतो . . नव्या जखमांसह समाजाला रुजा देतो , माणसातले माणूसपण खच्ची करतो अन समस्त मानवजातीला प्रश्न विचारतो . . 'मानसा मानसा कधी होशील रे माणूस ?''

Wednesday 4 December 2013

टाटा नॅनो ' प्रॉमिस इज प्रॉमिस '

कर्जाच्या गराड्यात अन हप्त्याच्या विळख्यात
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?
''आज छोटी म्हणाली , बाबा उद्यापासून तुम्ही मला शाळेत सोडायला येऊ नका . तीला कमीपणा वाटतो . माझा अन आपल्या स्कूटरचा . . तिच्या मैत्रिणी गाडीतून येतात . चिडवतात तीला . एक 'साधी ' गाडी नाही म्हणून . साध्या माणसाकडे कशी असणार ग गाडी ?? दूरच्या शाळेत जाताना माझी पोरगी माझ्यापासून दूर जात आहे . . . '' भावनांनी ओलावलेल्या रात्रीला आश्रुनी चिंब करणारे शब्द प्रत्येकाने ऐकले , अनुभवले असतील . कधी स्वतःच्या घरात तर कधी शेजाऱ्याच्या . . कधी ट्रेन मध्ये शेजाऱ्या कडून तर कधी ऑफिस मधल्या सहकाऱ्या कडून . शब्दांची पेरण वेगळी असली तरी वास्तवाची दाहकता सारखीच असते . आपण 'गाडी ' घेऊ शकत नाही याचे दुक्खच वेगळे असते . अनेक प्रौढ सायकलच्या दांडीवर किंवा पेट्रोलच्या टाकीवर बसलेल्या पोरासोबत लहान होतात . समोरून चाललेल्या चकचकीत गाडीकडे हरखून बघतात . पोराची आणि पोरसवदा मनाची समजूत घालत रस्ता संपवू बघतात . अशी अनेक कुटुंबे , अनेक कुटुंब प्रमुख आहेत ज्यांना पद्मिनीच्या जमान्यापासून गाडी घ्यायची असते पण जमाना गेला तरी त्यांचे स्वप्न 'अबाधित ' असते . कधी बस मध्ये लोंबकळत , ट्रेन मध्ये लटकत , टमटम मध्ये कोंबत , टेक्सी मध्ये गुदमरत रोजचा प्रवास करत करत असतात . जीवासाठी . . जीव धोक्यात घालून . अशा अनेक लोंबकाळलेल्या , लटकलेल्या , कोंबलेल्या , गुदमरलेल्या आणि घुसमटलेल्या जीवांकडे लक्ष कोण देणार ? आताच्या 'संस्कृतीत ' काच बंद केली किंवा दरवाजा जोरात आपटला की सगळे प्रश्न 'आपल्यापुरते ' संपतात . . या संकुचित जगात असा एकतरी जीव असतो जो इतरांची घुसमट समजू शकतो . त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारा असतो . निराशेला आशेत आणि नाही रे ला आहे रे मध्ये बदलण्याची क्षमता राखून असतो . . गरज असते योग्य 'वेळ ' येण्याची .