Monday 24 February 2014

मला दिसलेला फॅन्ड्री

फॅन्ड्री हा एक प्रयत्न आहे . वाद घडवून न आणता वादग्रस्त  विषय हाताळण्याचा . काहीही प्रोजेक्ट अन प्रमोट न करण्याचा . समाजातील एका वर्गाचे दुक्ख मांडत असताना इतर समाजाला न दुखावता विचारमग्न करणारा . शिवाशिव किती बेगडी अन सोयीची असते यावर मार्मिक भाष्य करणारा . परंपरागत व्यवसायापासून नवी पिढी का अन कोणत्या न्युनगंडामुळे फारकत घेत आहे ते स्पष्ट करणारा . अजूनही 'हुंडा ' अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण करणारा . . समाजाला पडलेला प्रश्न म्हणजे बापाला -कुटुंबाला दिले गेलेले एक आव्हान असते याचा प्रत्यय देणारा . स्वप्न बघायला जात शिक्षण रंग रूप लागत नाही याची वास्तविक जाणीव करून देणारा . वंचित घटकांना कोणत्या गोष्टीचे 'अप्रूप ' असते ते चितारणारा . दोन जीवांनी असमान जात ,धर्म ,सामाजिक -आर्थिक -शैक्षणिक स्तरास न जुमानता फुलवलेला  'टाइम पास ' न घडवता झुरणारे मन दाखवून अस्वस्थ करणारा . . . माणसाला डुक्कर  ही बोचरी उपाधी देऊन त्या फॅन्ड्रीने समाजाला मारलेल्या दगडाने मनाला बऱ्याच जखमा करणारा . . . . फॅन्ड्री हा एक स्तुत्य प्रयत्न आहे ! 

Saturday 22 February 2014

याद आ रही है

तो जाऊन आज दोन महिने झाले . दोन ? का दीड ? का सव्वाच ?? आठवत नाहीये . . नाही ' द आउटसायडर ' सारखे 'माझी आई बहुतेक काल गेली ' अशी सुरुवात करून वाचकाच्या मनात झिणझिण्या आणायच्या नाहीत मला . पण खरच आठवत नाही तो कधी गेला . . त्याचे जाणे मी अजून स्वीकारले नाही का जाऊनही त्याचे कुठेतरी थोडेसे ,माझ्यापुरते असणे मला भ्रमित करत आहे ?? ठाऊक नाही . . . काही गोष्टी कधीच उलगडत नाहीत . उलगडायचा धसमुसळे पणा केला की एकतर नासधूस होते अन गुंता होतो तो वेगळाच . . . बरेच दिवस मनाशी पक्के ठरवतोय की आता तो नाही . . कुठेच नाही . . मी कितीही प्रेमाने हाक मारली तरी तो येणार नाही . . हाकेच्या अंतराच्या पलीकडे गेलाय तो . . मला अलीकडे सोडून . . .

Saturday 1 February 2014

आप का क्या होगा ??

 ''एक माणूस होता. तरुणाईत त्यानं ठरविलं की, आपण पूर्ण विश्वामध्ये बदल घडवायला पाहिजेत. तरुणाईचा उत्साह आणि आत्मविश्वासामुळेच त्याला वाटलं की, आपण हे शिवधनुष्य पेलू शकू. दिवस सरले. तो गृहस्थ रानात शिरला. तेव्हा वाटलं विश्वाच्या बाबतीत हे करणं अवघड आहे, पण देशामध्ये मात्र नक्कीच काही तरी आमूलाग्र बदल करता येऊ शकतो. तो कामाला लागला. पन्नाशीत जाणवलं की, अवघड आहे, राज्यावर फोकस करावं, देश फार मोठा आहे. मग साठीमध्ये कळलं की, राज्यातही काही करू शकलो नाही. मग जिल्हा स्तरावर काही करावं असं त्यानं ठरवलं. सत्तरीमध्ये लक्षात आलं की, काही झालेलं नाही. आता सत्तरीत होता तो. गात्रं गलित झाली. मग लक्षात आलं की, आपण गावामध्येच काही केलं असतं तर बरं झालं असतं, काही तरी व्यवस्थित बदल करू शकलो असतो. तसंच काही प्रशासनाचं आहे. '' अनेक वर्षांचा संचित कचरा एकाच खेपेत साफ करण्याचा झाडू उचललेले अरविंद केजरीवाल यांची सुरुवात जरी दणक्यात झाली असली तरी यापुढचा त्यांचा मार्ग 'आम' राजकीय पक्षासारखा असणार आहे . . .