Sunday 2 March 2014

तगमग

कधीतरी जीवाची तगमग होते . बरेचदा ती अकारण असते . काहीवेळा सकारण . . पण ती होते . . कारण असेल तर ती सुसह्य असते . कारण नसेल तर ती आणखीन असह्य होते . नक्की कशामुळे तगमग होते आहे हेच माहित नसल्याने 'कारणाचा ' घेतलेला शोध नेमके कारण सोडून बरेच काही समोर आणून ठेवतो . . मग तो लहानपणी लहान हातानी बहिणीच्या पाठीत जोरात मारलेला मोठ्ठा गुद्दा असेल किंवा इट का जबाब पत्थर से या (अ )न्यायाने बहिणीने तिच्या मोठ्या हातानी माझ्या लहान पाठीवर मारलेले मोठमोठे फटके असतील . . जे आता हवेहवेसे वाटतात  किंवा . . हातातून पडलेले एखादे चोकलेट असेल . . आवडत्या माऊ किंवा भूभू चे देवाघरी जाणे असेल किंवा 'मेल्यावर माणूस कुठे जातो अन देवाघरी इतक्या साऱ्या माणसांचे देव काय करतो ?' या बालिश प्रश्नांची उत्तरे मिळायच्या आत काही जवळच्या माणसांचे मरण अनुभवणे असेल . .  कारणांची तीव्रता कितीही कमी जास्ती असली तरी तगमग मात्र प्रचुर तीव्रतेने होते . . कारण आपल्या हातातून काहीतरी निसटल्याचा रितेपणा त्यात असतो . . .

 . 
                    भरल्या पानावर आणि भरल्या घरात तोंड वाकडे करू नये म्हणतात . खरच पान आणि घर कधी भरलेले असते का ?? पानात पोळी -भाजी -चटणी वगैरे ठेवले की आपल्याला पान भरल्या सारखे वाटते . घरात दोन माणसे आली ,चार गृहोपयोगी अन दहा चैनीच्या वस्तू आणून ठेवल्या की घर भरल्यासारखे वाटते . . या वाटण्यातच आयुष्याचे सुख दडलेले आहे . मला वाटते माझे पान भरलेले आहे . मग माझ्या पानाकडे आशाळभूत नजरेने बघत असलेल्या कामवालीच्या पोट्ट्याच्या पोटाला काय वाटत असेल ?? माझे पान भरलेले आहे पण त्याचे पोट त्याला 'भरल्या सारखे ' वाटत असेल म्हणून भरलेले आहे . . माझे भरलेले पान , दुधाचा ग्लास , खाऊचा बाउल मला रिकामा वाटतो . . कारण दोन 'भरलेले ' डोळे त्याकडे बघत असतात . . इथे माझे वाटणे सुखाचे नसते . . घराचेही तेच . . भरलेल्या घरातील भिंतीवर लटकलेल्या काही तसविरी केवळ जागा भरून काढत नाहीत तर भरलेल्या जागेतून एक रिकामेपण प्रसवत असतात . . डायनिंग टेबल वरची 'ती ' रिकामी खुर्ची . . कपाटातले वापरात नसलेले 'ते ' कपडे , ठराविक वेळी ऐकू न येणारा 'तो ' आवाज , अनेक वर्षे अंगावरून न फिरलेला 'तो ' हात अन स्पर्श ,आठवणीतच उरलेला 'तो ' संवाद . . . भरल्या घरातही एक रितेपणा निर्माण करतात . . ते नाहीत म्हणून नाही तर आपण आहोत म्हणून . . ते जाऊनही आपल्यात जिवंत आहेत म्हणून . . . आपल्याला केवळ 'वाटते ' की माझे पान ,माझे घर ,माझे आयुष्य 'भरलेले ' आहे . . . पण जेव्हा याच बाह्य भरीव पणातला पोकळ अंतर्भाग नजरेत येतो तेव्हा सुरु होते . . . . तगमग ! 

                 खुपदा आतून जाळते ती तगमग . . महाकाय अनेक पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाला आतून वाळवी लागली तर आतून जसा गाभा पोखरला जातो तसेच मनाचेही होते . . सळसळणारी हिरवी पाने बघून जगाला वाटते की हा आनंदात आहे . . कारण सळसळणे हे सजीवात्वाचे लक्षण आहे अन त्याला काहीतरी करावेसे वाटते म्हणजे तो आनंदीच असणार न ?? पण त्या सळसळण्यामागची सल कोणालाच दिसत नाही . . केवळ वट पौर्णिमेला 'गजबजणारा ' तो पार अन 'अनन्यसाधारण महत्व ' असलेला तो वड वर्षाचे उरलेले दिवस किती एकटेपणात काढत असेल याचा विचार येतो कोणाच्या मनात ? कसा येणार . . . जिथे घरचे आई वडील 'पेन्शन जमा झाल्या दिवशीच ' आठवतात तिथे वड कोण लागून गेला ?? उरलो /उरले केवळ 'सही ' पुरता /पुरती या वेदनेने जगणाऱ्या अनेक म्हातार्यांची शरपंजरी अवस्था बघून मनाची तगमग होते . . आपणच बांधलेल्या घराचे फिरलेले वासे ,आपणच वाढवलेल्या मुला -मुलीचे बदललेले वागणे अन आपणच कौतुकाने घरी आणलेल्या सुनेचे वाढत जाणारे टोमणे सहन करता करता 'वांझ राहिलो असतो तर बरे झाले असते ' असे ऐकायला लागले तर मनाची तगमग होते . . पैशाने मोठा असलेला माणूस मनाने किती भिकार असतो याची जाणीव होते . . . 

              ही 'जाणीवच ' तगमग होण्याच्या मूळाशी असते . कारण जाणीव अन जाण ठेवल्याची किंमत मोजायला लागते . विश्रांतीगृहाने पंथास्थांचा , पाणवठ्याने तृशार्थांचा , वेलीने आपल्याच पुष्पाचा अन आकाशाने विहंगाचा मोह कधीच धरू नये . . हे ते जाणतात कारण त्यांची बुद्धी कमकुवत असली तरी मन भक्कम असते . . जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी मनाने मात्र सर्वात हळवा असतो . अमुक व्यक्तीसाठी मी माझी कामे सोडून तमुक केले त्याची किमान 'जाणीव ' ठेवायला नको ?? इतके सुंदर दिवस होते ते . . हिंडणे फिरणे बोलणे पण 'जाण ' नाही ठेवली त्याने /तिने . . मूव ओंन केले . . . . हाताच्या फोडासारखे जपले हो . . पण चांगले 'पांग ' फेडले . . इत्यादी . . आपल्या कर्तव्यात एक सुप्त अपेक्षा दडलेली असते . . समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजावे ,जाणावे , आपण काय केले दोन ठिकाणी वाजवून दाखवावे ,आयुष्यभर मिंधे राहावे , किमान कधीतरी वेगळी वाट काढून बोलावे -भेटावे इत्यादी अपेक्षा जोडलेल्या असतात . अगदी कितीही निरपेक्ष अन निस्वार्थी भावनेने कार्य करायचे म्हंटले तरी . . याच अपेक्षा अनेकदा डसतात . झोंबतात . नाती बिघडवतात . भावना तुडवतात . . . अशा काही /अनेक निसटून गेलेल्या भावनांच्या , नात्यांच्या , आठवणींच्या , मार्मांच्या , सहजीवनाच्या , मैत्रीच्या ,प्रेमाच्या ,आनंदाच्या ,दुक्खाच्या ,आवेगाच्या 'तत्कालीन ' पोत्याला वर्तमानात उघडणे . . . निसटून गेलेले धागे मनोमन विणायचा प्रयत्न करणे यास कदाचित . . ' तगमग ' म्हणत असावेत !!!