Sunday 13 July 2014

झुरळाची माणुसकी

जमिनी खालच्या त्या लोकोत्तर आळीत आज फार गडबड होती . पावसाच्या पाण्याचे अन मुन्सिपालटी ने मारलेल्या कोणत्याश्या सुगंधित कीटकनाशकाच्या तुषारांचे समान उत्साहाने स्वागत करणाऱ्या अनेक द्विपाद ,चतुष्पाद , अष्टपाद , दशपादापासून एक सहस्रपाद असलेल्या अनेक जीवांना आसरा देणारी ती अळी . अजूनही मानवाचा जमिनीखाली चरणस्पर्श न झाल्याने सुखाने नांदत होती . सेल्फात ओळीने मांडून ठेवलेल्या फळांची रांग एक असली तरी त्यांचा मान मात्र वेगळा असतो . सर्वाधिक उत्पादनापेक्षा सर्वाधिक खपाचा तो 'राजा ' या न्यायाने ज्याचे उपद्रवमूल्य अधिक तो त्या अळीचा 'राजा ' . . गोगलगाय ही मुळातच पोटात 'गाय ' घेऊन हिंडत असल्याने ती कसली उपद्रवी ? तिचे अस्तित्व असून नसल्या सारखे . त्यावरचे मानकरी म्हणजे मुंग्या . अळीच्या 'खानसामा' ची जबाबदारी त्यांची . सूरवंट म्हणजे भारताच्या प्रशासनासारखा निद्रिस्त  किंबहुना भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या सारखा . . . इतरांना खाजवून आपली सोयीची जागा बळकावली की त्या खाजेची भीती घालून वर्षानुवर्षे त्याच जागेवर बसून मलिदा खाणारा . बाकी बाळी , ढेकुण ,पिसवा , पाद्रे किडे ,पैसे किडे पायलीला शंभर किलो . . चविष्ट मिसळ खात असताना दातात मधेच फरसाण्यातला बेदाणा अडकून रसभंग व्हावा व मिसळीत बेदाण्याचे काय काम ? असा प्रश्न पावाच्या शेवटच्या  तुकड्यात आलेल्या टूटी फ्रुटीसह अनिच्छेने चघळावा तसेच या पाहुण्यांचे आळीतील नेमके 'प्रयोजन ' काय ? यावर नुकत्याच जन्मलेल्या पोरांपासून ते 'ऑल आउट ' पचवत असलेल्या आयसीयू वार्डा पर्यंत सर्वजण चर्चा करत . . अगदी (बे )चवी (बे ) चवीने . . आळीत रुबाब होता तो झुरळांचा . . . पुण्याच्या सभेत जर पहिल्या २-३ मिनिटात हशे आणि टाळ्या मिळवल्या नाहीत तर जसा वक्ता फ़ाउल होतो तसेच आपल्या आगमनातच किंकाळ्या मिळवल्या नाहीत तर किडा फ़ाउल होतो . हे किंकाळ्या काढायचे काम रिल लाईफ पासून ते रिअल लाईफ परेंत इमाने इतबारे कोणी केल असेल तर फक्त अन फक्त 'झुरळाने ' . . . म्हणून त्यास वलयही होते अन मानही. . .


    त्या अळीचा राजा झुर्ळूद्दिन मुंछ वाले आज अळी सोडून जात होते . त्यांनी  शहरातील 'इलाईट ' भागात आपली सोय केली होती . आपल्याकडे येणाऱ्या कारकुनाचा पोरगा कलेक्टर झाला की मालकाला कारकुनाने दिलेल्या मिष्ट कंदी पेढ्याची जी चव लागते तीच चव झुर्ळूद्दिन मुंछवाले ने वाटलेल्या रव्याची सर्वाना लागत होती . वरून बोलायला म्हातारी ' अगदी दृष्ट लागायला नको माझी ' म्हणत असतील नसतील तितके सगळे हात पाय मोडत होती . पण मनात 'दृष्ट लागो मेल्याला त्या स्वाइन फ्लू च्या डुकराची ' चे आशीर्वाद मिळत होते . अजून कशाचीच जाण नसलेले लहानसे किडे नाचत होते , समवयस्क जळत होते अन हिरवी नाकतोडी , गुलाबी पैशि किडी , ब्ल्याक ब्युटी सुरवनटी इत्यादी ललना मनोमन झुरत होत्या . . काय करायचे एकाच्या प्रमोशन ने त्याच्या आजूबाजूच्या लोकांना इतके काही एकाच वेळी वाटून जाते की ते पाप -पुण्य अशी वर्गवारी करताना साक्षात चित्रगुप्त या प्राण्यांचे हात उधारीने घेत असावा . . झुर्ळूद्दिन मुंछ वाले गेल्यावर अळीचा 'राजा ' कोण याचीही चर्चा आणि मोर्चे बांधणी सुरु होती . प्रचार वन टू वन करायचा का अबकी बार हायटेक करायचा ? यावर जेष्ठांचे मत खोपच्यात घेऊन विचारले जात होते . . .

 खुद्द झुर्ळूद्दिन मुंछवाले मात्र जरा भावनिक झाला होता . आपला 'घाबरवायचा ' धंदा इतका जोमात चालेल असे त्यालाही कधी वाटले नवते . आळीतल्या तमाम उनाड किड्यांचा तो म्होरक्या होता . विसाचे चाळीस झाले की तो सुधारेल म्हणून बापाने गोमी शी लग्न लाऊन दिले . . पण झुर्ळूद्दिन तसाच . सहज ब्यांड स्टेन्ड ला पाय मोकळे करायला गेला होता . . सभोवार फुललेल्या टपोर्या झेंडूच्या बागेत चुकीने उगवलेला निशिगंध  नजरेत यावा अन झेंडूच्या सौंदर्याने आतापर्यंत भुललेली नजर निशिगंधाच्या सुगंधाकडे कलावी तसे वार्यालाही मधून जायला जागा नसलेल्या अनेक जोडप्यातून शिताफीने आपली अंग प्रत्यांगे सुखरूप वाचवत  जाता जाता पोरीचे ताजे शाम्पू केलेले केस  उगाच पोराच्या गालावर उडवायचा अगौपणा वारा करत होता . अशात एक जोडपे मात्र एकमेकापासून मानवी १ हात अंतर राखून बसले होते . . . झुरळाला अचानक मागे त्याने केलेला ' क्युंकी मा भी कभी बेटी थी ' मालिकेतला त्याने केलेला गेस्ट रोल आठवला . . नायक अन नायिकेच्या मधुचंद्राची रात्र . बेडरूम कमी अन एखाद्या सहस्रचंडी यज्ञाच्या वेळीही कमी फुले उदबत्त्या असतील इतके सुशोभीकरण केलेली मंतरलेली खोली . . आधी कोण हा दोघानाही पडलेला प्रश्न . मुलाने पुढाकार घ्यावा तर तिला वाटणार 'याने याच साठी लग्न केलंय ' मुलीने पुढाकार घेतला तर त्याला वाटणार ' ही फारच बोल्ड आहे . हमारी खानदानी परंपरा मै ऐसा नही होता ' . . . क्लाय्म्याक्स चा सीन . . . अचानक झुर्ळूद्दिन मुंछ वाले ची एन्ट्री. . एक किंकाळी  . . फलंदाजाच्या ब्याट ची कड लागून गेलेला चेंडू पहिल्या स्लीप मधील खेळाडूने चक्क गली मध्ये जाऊन 'अलगद ' झेलावा तसा नायकाने तत्परतेने कवटाळलेली ती . . झुरळ ऑल आउट . . रोम्यांस ऑल इन . . . !! चला ट्राय मारू . . . झुरळ साक्षात त्या मुलीच्या पुढ्यात जाऊन मिशा हलवू लागले अन भेदरलेली मुलगी त्या किडक्या मुलाच्या डोकावणाऱ्या बर्गाड्यात दिसेनाशी झाली . . तोच तो क्षण झुर्ळूद्दिन मुंछ वाले च्या 'रोजगाराची ' सोय करणारा . . . अत्यंत उदार हृदयी त्या बरगडी सम्राटाने झुरळाला त्याच्या सर्कल मध्ये फ़ेमस करून टाकले . . . जिथे कोठे ' तात्पुरता जोड ' द्यायचा असेल तिथे फेवीक्विक ची रिस्क न घेता झुर्ळूद्दिन मुंछवाले ची मदत गरजेची बनली . . . हा सारा प्रवास अन त्याच्या भोवती पिंगा घालणाऱ्या आळीतल्या  ललना आठवून झुर्ळूद्दिन मुंछवाले नशिबाला दोष देऊ लागला . आयला आधीच ब्यांड स्टेन्ड वर कडमडलोअसतो तर ही गोमी पदरात पडली नसती . हिला साधी चप्पल घ्यायची म्हंटली तरी दुकानदाराला गो डाऊन मधून माल मागवावा लागतो . इतके करून एकाच रंगाचे अन मापाचे मिळत नाहीत ते नाहीत . . गबाळे ध्यान . . त्यापेक्षा ती हिरवी नाकतोडीन . . अहाहा . . काय फिगर . . . ''काय म्हणालात ?? '' मनातला आवाज इतक्या उत्कटतेने बाहेर पडेल अस त्याला वाटले नवते . स्वयपाक घरातून पुढचे ४ हात मागच्या ३ हातानी कोरडे करत गोमी आली . . . अग काही नही . . . तुझेच कौतुक करत होतो . . . ये न जवळ . . ईशः ही काय वेळ आहे का ?? काहीतरीच तुमचे . . त्या बेंड स्टेन्ड वर जायला लागल्यापासून तुम्हाला भलत्याच वेळी इच्छा होते हं . . . चावट कुठले . मी आले शेजारी गांडूळ वहिनींना भेटून . . आले की निघू . . . झुर्ळूद्दिन मुंछवाले ने सुटकेचा श्वास टाकला अन कोणती ललना कोणत्या अंगाने मादक आहे याची गोमिने फिसकटलेली  चित्रे जुळवू लागला . .

या या . . . मोट्ठे किडे आले आमच्या घरी . . .

ईशः . . काहीही हं गांडूळ वाहिनी तुमचे . . .

(वाहिनी नक्की कोणत्या तोंडाने बोलत आहेत याचा अंदाज गेली २ वर्षे त्यांचा शेजार असूनही झुर्ळी ला समजत नवते . . म्हणूनच त्यांच्या तोंडी कोणी लागत नसावे )

अहो काहीही काय . . . . तिकडे शनवारा वरून जाणारा माणूस सुद्धा शनवार हा पेशव्यांचा नसून आपल्याच तीर्थरूपांचा आहे या अभिमानाने हिंडतो आणि तुम्ही तर खुद्द झुरळवार बांधलाय . .
(गांडूळ वाहिनी ४ दिवस हवा पालट करायला पुण्याला जाऊन आल्या होत्या . त्यामुळे पुणेरी अभिमान अन पेठेतले बोलणे (टोचणे ?) त्यांनी आपलेसे केले होते )

हं . . बांधलाय बुवा खास . . आमच्या झुर्ळूद्दिन मुंछवाले ची मेहनत . . रात्रंदिवस काम असते हो त्यांना . . कष्टाची कमाई . .

अहो कसले कष्ट ?? ( पुलंच्या अंतू बरव्या सारखा नाकातून आवाज काढत ) अहो . . लग्नाच्या वरातीत घोड्याचे ते काय कष्ट ? वाजणारा वाजवतोय , नाचणारा नाचतोय , मिरवणारा मिरवतोय . . .तुमचा भाग काय त्यात ??

जा बुवा वाहिनी . . तुम्हाला कशाचे कौतुक नाही. मी जाते . . बरीच कामे आहेत . .

हो . . तू बरी ग कामाची . . आम्ही तर रिकाम्याच . . १००० हात असूनही कामे आवरत नाहीत तुज . . बस हो . . नंतर मी येईन मदतीला !! अग तुझ्या झुर्ळूद्दिन मुंछवाले ची काय चैन ? हल्ली बीएमडब्लू येते म्हणे त्याला न्यायला . .

अय्या . . तुम्ही बघितली ??

न बघून सांगतेस कोणाला ?? आता म्हैस शेण टाकत असताना त्यात बघण्य सारखे काही असते काय ? तरीही लोकांचे लक्ष असतेच न . . . तसेच आमचे . . कोणाचे काय पडायचे ते पडूदे ..  आम्हाला हवे ते आम्ही उचलणार . . पण कौतुक वाटते तो त्याचे . . पण नक्की काम काय असते त्याचे ??

अहो वाहिनी . . एकदम सोप्पे . . मुली झुरळाला घाबरतात . . असा सार्वत्रिक समज आहे . . यांचे काम अगदीच सोपे . . पोरे पोरी हल्ली डेट वर जातात ना . .

डेट ?? म्हणजे कोर्टात जातात की काय . .

अहो वाहिनी . . डेट म्हणजे आपली तात्कालिक आवड आउट डेटेड व्हायच्या आधीची एखादी डेट निवडून थोडासा शाब्दिक अन बराचसा ''तसा '' संवाद साधायचा . .

तसा म्हणजे काय ?? हे म्हणजे शास्त्रीय संगीतातला शा कळत नसलेलीस सवाई गंधर्वाच्या पहिल्या रांगेत बसवायचे अन ''मा'' वरून मालकंस ओळखायची अपेक्षा करायची असे झाले . .

वाहिनी तसा म्हणजे तसा हो . .

पाण्याने ओथांब्लेल्या ढगाहुनही कांकणभर अधिक कृष्ण असलेल्या गोमीच्या गालावर चढलेल्या लालिमा बघून वाहिनी काय ते समजल्या . . .

बंर . . तस्स होय . . मग तुमचे हे काय करतात तिकडे ??

अहो . . एकदा डेझर्ट म्हणजे गोड खाऊन झाले की पुन्हा तोंड गोड करायची संधी निर्माण करायची बस्स . .

इश्श . . बरीच वात्रट कामे करतात तुमचे हे . .

(वाहिनी दोन्ही तोंडानी समान लाजल्या )

हीही . . पण रोज काहीतरी नवीन शिकूनही येतात हो . . . 'त्यातले ' . .
( ३ तोंडातून हशा )
पण गोमे . . . माणसांच्यात तुमचे ते काय काम ?? बघतील ना त्यांचे ते . .

वाहिनी . . माणसाना आपली गरज असतेच . . फक्त आपल्या बद्दल प्रेम नसते . . मुलीना कुत्रे आवडते म्हणून तिच्या कुत्र्याला गोंजारणारे रस्त्यावरच्या कुत्र्यांना मात्र लाथा घालतात . . . गरजे पुरते आपण माणुसकी जपायची . .

ते काहीही असो . . झुर्ळूद्दिन दोन प्रेमी जीवना एकत्र आणतो . . फार पुण्याचे आहे हो . .

चुकतंय तुमच वाहिनी . .
बराच वेळ गोमी न आल्याने झुर्ळूद्दिन तिला शोधत आला होता . .

'' प्रेम आणि पुण्य या दोन गोष्टी आज फार स्वस्त झाल्या आहेत . प्रेमाचा उगम शरीर असते की मन ? आकर्षण हे देहाचे असते की देहाच्या आत कोठेतरी सतत वाहणाऱ्या अनेक भावनांचे , भावांचे अन रोम अन रोम पुलकित करणाऱ्या अनुभवाचे असते ? या प्रश्नांची उत्तरे आता माणूस शोधत नाही . दोघांना जवळ यायला झुरळांची गरज का लागते ?? वाहिनी शरीर जवळ यायला कारण लागते . . पण मन जवळ यायला निकोप स्पंदने लागतात . . अगदी लग्नाच्या बायकोच्या जवळ यायला एक रात्र पुरते हो पण दोघांची मने जवळ यायला , समरस व्हायला अनेक वर्षे जातात . काही ती समरस होतात . कधी ती होत नाहीत . आता सर्वस्व स्वीकारण्या पेक्षा सर्वस्व अर्पण करायची घाई जास्ती झाली आहे . प्रणयाच्या अत्युच्च बिंदूवर असणारे अनेक प्रेमाची पहिली पायरीही चढलेले नसतात . . अशांना एकत्र आणून काय पुण्य पदरी बांधणार आहे मी ?? ती दोघे गेल्यावर त्या जागेत जे 'रितेपण ' शिल्लक उरते ते एकदा पाहायला या वाहिनी . .  मी रोज अनुभवतो . . . प्रेमात असलेले भरलेपण अन भारलेपण आता लोप पावत आहे . ते अजूनही पुस्तकात आणि सिनेमात जिवंत आहे पण प्रत्यक्षात फक्त एक स्पर्धा आहे . . . उपभोग घेण्याची . . या वर्षात मी गब्बर झालो पण मनाने पार रिता झालो . . पहिल्यांदाच माणूस नसल्याचे मला समाधान वाटले . . . देहासाठी मन का मनासाठी देह याची उकल या पिढीला होणे अजून बाकी आहे . . मोजकेच आहेत . . खरे प्रेम करणारे . . ते आहेत तोपर्यंत माणुसकीवर विश्वास  शिल्लक आहे . . घाबरवून जवळीक साधून द्यायचा व्यवसाय काय अखंड सुरु राहील . . जोपर्यंत नर मादी आहेत तोपर्यंत '. . . '

चाल गोमे . . निघुयात . . . आज पानशेत ची सुपारी आहे . . .