Saturday, 27 April 2013

चाळीशीतील ''देव "

जसे सचिन देव बर्मन यांचे संगीत अजूनही आपल्याला मोहिनी घालते तसेच सचिनचा खेळ सुद्धा आपल्याला मोहिनी घालतच राहील . . अगदी त्याच्या निवृत्ती नंतरही ! 

देवाला वय नसते . तो अनादी , अनंत असतो . तारुण्य -वार्धक्य यासारख्या वयाच्या अवस्था त्याच्या कार्यास अडथळा ठरू शकत नाहीत . अवतारकार्य केव्हा सुरु करायचे आणि दैवी कार्याचा अंत कधी करायचा याचा निर्णय खुद्द देव घेतो . पण देव जेव्हा मनुष्ययोनीत जन्म घेतो तेव्हा त्यालाही पृथ्वीचे नियम लागू होतात . त्याचे अनादी ,अनंतत्व पंचमहाभूतात विलीन होऊन त्यास मर्त्य स्वरूप येते . त्याचे वय त्याच्या कर्तुत्वाचा आणी अस्तित्वाचा निर्णय घेते . आपले कार्य कधी सुरु करायचे किंवा कधी संपवायचे याचा निर्णय एखादी समिती किंवा भक्तांचा मोठा गट घेतो . वय वाढले की उत्साह कमी होतो , हातापायांच्या हालचाली मंदावतात , धडाडी कमी होऊन सौम्यपणा अंगी येतो , नाही म्हंटल तरी दृष्टी अधू होते , पंचपक्वानाचे ताट सुद्धा ' शुगर फ्री ' संस्कारातून पास होऊनच समोर येते , साठीची तरतूद करून ठेवा अशा सल्ल्यांची रांग लागू लागते . . . असे प्रत्येकाच्या बाबतीत होते का ?? 'हो ' कारण चाळीशी म्हंटल की या गोष्टी आल्याच . नाही आल्या तर ती चाळीशी कसली ? . . दिल कितीही जवान असले तरी अखेर शरीर थकतेच . . मग कामाचा ताण ,धावपळ कमी नको का करायला ? या गोष्टी नव नव्या वेष्टनात अजून काही वर्षे आपल्या समोर येतील . . कारण आपला देव चाळीशीत  आहे . . ! क्रिकेट हा धर्म मानला तर त्या धर्माचा देव सचिन रमेश तेंडूलकर याने  २४ एप्रिल २ ०१ ३ रोजी ' चाळीशीत ' पदार्पण केले !! 
                    
चाळीशी ! मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा , बदलांचा कारखाना , गोळ्यांच्या भडीमाराने घायाळ न होता आणि दररोज विविध कारणांसाठी अंगात घुसणाऱ्या सुयांची तमा न बाळगता आनंदी राहायचे , रडणाऱ्या बायकोचे सांत्वन करत ई.म .आय चे आकडे बघत स्वतः रडायचे , चाळीशीनंतरचे काम , आरोग्य आणि जीवन यासारख्या  कार्यक्रमास  जोडीने आणि जातीने जायचे वय ! चाळीशीतील  एखादा माणूस आपला अंदाज चुकवतो म्हणजे काय ? बर चुकवावेत ते तरी किती प्रमाणात ? थेट मैदानं गाजवावीत ? धावतो काय , पळतो काय , विश्वविक्रम करतो काय ? वयाचे भान आहे का नाही या तेंडल्याला ? रोज बायको टोमणा मारते . . नुसते सचिनला 'बघू ' नका त्याचे जरा 'अनुकरण ' करा बघावं तेव्हा चाळीशीचे कौतुक . . असे दिवसातून चाळीस वेळा ऐकावे लागते . आता तर पोरं पण 'पोक ' करायला लागलीत .. आयला खरच देव आहे तो नाहीतर आपली झेप आहे का ?असे संवाद ' फोर्टी प्लस ' क्लब मध्ये नक्की सुरु असतील . त्यामुळे सचिनची निवृत्ती ही चाळीशीची गरज आहे . .. . 
                             
सचिन ने निवृत्ती कधी घ्यावी आणि तो का घेत नाही ? हे दोन प्रश्न चघळत विशीतली पिढी चाळीशीत गेली ,तर  तेंदुलकर म्हणत प्लास्टिकची बात जमिनीवर आपटणारी पिढी विशीत आली ! तरीही हा प्रश्न , सचिन नावाचे गारुड अजूनही सुरूच आहे . यशस्वी माणसाने यशाच्या सर्वोच्च बिंदूवर असताना निवृत्ती घ्यावी असा सामान्य नियम आहे . पण सामान्य नियम असामान्यांना लागू होतो का ? वय असेपर्यंत होत नाही पण वय झाल्यावर हा नियम लागू होतो . कारण देव मनुष्ययोनीत जन्माला आल्यावर त्याला पृथ्वीवरचे नियम लागू होतात . मनाचे न ऐकता लोकांचे ऐकावे लागते . वयाचा माझ्यावर परिणाम झाला नाही हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी कसरत आणि धडपड करावी लागते . आतापर्यंत टाळलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात . माझ्या वाढत्या वयाची मला जाणीव आहे याची जगाला जाणीव करून द्यावी लागते . म्हणूनच सचिन त्याच्या वाढदिनी म्हणाला "चाळीस आकडा पाहून थोडे दडपण आले  " . . यानेही अनेक तर्क वितर्क सुरु झाले आणि ते अपेक्षितच होते . सचिनला महान याच टीकांनी  केले आहे . वैयक्तिक यश पण सांघिक अपयश , सांघिक यश पण वैयक्तिक अपयश , दोहोंचे यश तेव्हा संघाचे श्रेय , दोहोंचे अपयश तेव्हा जागा अडवल्याचा ठपका ! या कौतुक -टीका मार्गावरून झालेला सचिनचा प्रवास स्तिमित करणारा आहे . त्याची कामगिरी आणि विश्वविक्रम प्रत्येक क्रिकेट वेड्यास जवळपास पाठ असल्याने ते पुन्हा मांडणे म्हणजे लोकांच्या स्मरणशक्तीवर शंका घेण्यासारखे आहे . ती चूक मी चुकुनही करणार नाही . थोडासा संदर्भ देतो - शतकांचे शतक ! हि कामगिरी सामान्य नाही . . सामान्य व्यक्तीचीसुद्धा नाही !! अनेक शतके खेळ सुरु असूनही असा पराक्रम करणे कोणाला जमले नाही . . म्हणूनच कदाचित त्याला ' देवत्व ' बहाल केले असेल .  हे देवत्व सचिन मी देव नाही म्हणत चाळीशीत सुद्धा आनंदाने मिरवतो आहे . 
                   
  सचिन ने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलीच आहे , २० -२० प्रकारात आय . पी . एल मधून खेळत आहे . पण कसोटीचा मोह सचिनला सुटत नाही की आयुष्याची कसोटी खेळायची सवय असलेल्या सचिनला २२ यार्डाची खेळपट्टी सोडवत नाही हे केवळ त्यालाच माहिती . . सचिन आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेणारच आहे पण ती कामगिरी खालावली म्हणून कि वय वाढले म्हणून याचा निर्णय लवकरच होईल . अर्थात त्याचे वय वाढले आहे ' अधिसारखे आता ' अशक्य आहे . . सूर्यास्त होत असताना संपूर्ण जग पहात आहे . त्याचे फटके अजूनही वाहवा मिळवत असले , मैदानातील त्याची उपस्थिती कामे सोडून टी .व्हि समोर खिळवून जरी  ठेवत असली , १० क्रमांकाच्या जर्सी मधून समालोचकाच्या सफेद -निळ्या शर्टात पाहणे कितीही दुक्ख्दायक असले तरी दिवस लवकरच येणार आहे . खासदार म्हणून सचिनची नवी इनिंग सुरु झाली आहे . खासदार निधी वापरून विदर्भात सौरदिवे बसवायची त्याची कल्पना स्तुत्य आहे .त्यामुळे समाजसेवेसाठी आणि आणखीन सचिन घडवण्यासाठी , आफ्रिकेत त्याने खणखणीत कामगिरी करून निवृत्ती घ्यावी अशी सर्वांप्रमाणे माझीही इच्छा आहे . माणसाचा स्वभावाच मुळात चंचल .  देव आता ओल्ड झाला म्हणून अनेकांनी पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे . आतापर्यंत भाटाची भूमिका करणारे अचानक टीकाकार बनले आहेत . आणि सर्वच चूक आहेत असे म्हणता येणार नाही . . कारण देव चाळीशीत आहे आणि चाळीशी म्हणजे …जसे सचिन देव बर्मन यांचे संगीत अजूनही आपल्याला मोहिनी घालते तसेच सचिनचा खेळ सुद्धा आपल्याला मोहिनी घालतच राहील . . अगदी त्याच्या निवृत्ती नंतरही ! असा विचार मनात आला की मुकेश चा आवाज कानात घुमू लागतो . . कल खेल मै हम हो ना हो गर्दिश मे तारे रहेंगे सदा . .भूलेंगे हम भूलोगे तुम पर हम तुम्हारे रहेंगे सदा . .रहेंगे यही इसके निशान इसके सिवा जाना कहा . . . येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील . . चाळीशीतील "देव " !!  

Saturday, 20 April 2013

मादरचोद . . .


कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . 

" अबे मादरचोद दिखता नही क्या ?? "  एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे मादरचोद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला मादरचोद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . . 

Tuesday, 16 April 2013

आशा. .

' हो आज ती उठून बसली ' , ' डोळ्याची पापणी हलवली ' , ' मला त्यांनी ओळखले ' , ' वाटीभर भात खाल्ला त्यांनी ' , ' होईल बरे . . डाक्टर म्हणत होते ' , ' आता रगद  तपसायला दिलया काय निघतंय बिरोबाला ठाव पर कौल आपल्याच बाजून लागनार ' आयुष्य आणि मृत्युच्या झोपाळ्यावर हेलकावे खाणाऱ्या जीवाच्या जीवाची काळजी करणारे अनेक जीव . असहाय्य , हतबल पण आशावादी . लहानसहान गोष्टीनी हुरळून जाणारे , आनंदी होणारे . आपण काहीतरी पुण्य कमावले याची खात्री बाळगून देवाला हात जोडणारे . पै पाहुण्यांना फोन करून खुशाली कळवणारे . निराशेलाही आशेची पालवी फुटायला लावणारे आणि त्या पालवीला जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे नातलग . . . दवाखान्यात एक मृत्यूसोबत झुंझत असतो तर दवाखान्याबाहेर अनेक जण आयुष्यासोबत लढत असतात . . केवळ एका आशेवर . . आयुष्य मृत्यूला हरवेल या आशावादावर . . 
                                    या नातलगांची एक वेगळीच मानसिकता असते , वेगळेच विश्व असते . लहान गोष्टींचे सुद्धा अप्रूप असते .यांची सुखाची बेटे आणि दुक्खाचे डोह वेगळेच असतात .ज्याची आपण सधन लोक कल्पनाही करू शकत नाही . एकीकडे आपण अडाणी असल्याची वेदना असते तर दुसरीकडे अडाणी असूनही आपण भारी दवाखान्यात दाखल केले आहे याचे समाधान असते . खिसा फाटका असताना " भारी औषधे द्या , हयगय करू नका ' म्हणण्याचे धारिष्ट्य केवळ त्यांनाच ठाऊक . शेत म्हणजे पॉलिसी आणि शेतीत पैसा ओतून शिल्लक राहिलेले सोने म्हणजे एफ . डी . असलेले लोक दवाखाना कसा पार पाडतात हे मला दीर्घ काळापासून पडलेले कोडे आहे . कोठून आणतात हे पैसा आणि कोठून आणतात आशा ? इंग्लिश ने फरक पडला नाही तर देशी , त्यानेही फरक पडला नाही तर गंडे -दोरे -नवस आणि यानेही फरक पडला नाही तर केवळ वेडी आशा . माझा दादला -मालक -बा -आजा -म्हातारा बरा होईल याची केवळ आशा . इंटरनेट वरून ५ मिनिटात काहीतरी वाचून डॉक्टरच्या ५-८  वर्षाच्या शिक्षणावर आणि कितेक वर्षाच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या इतके हे लोक शहाणे नसतात . किंबहुना दिल्ली -मुंबई -बेंगलोर -विदेश इथे आमचा अमुक तमुक डॉक्टर आहे त्याच्याशी बोला जरा म्हणून स्टेट्स मिरवणारेसुद्धा नसतात . त्यांची असते ती केवळ श्रद्धा डॉक्टरवर . ' डाक्टर काय बी करा पर मानुस वाचवा ' इतकीच काय ती अपेक्षा . .  . 
                                   मळकट टोपी , रफू केलेली विजार ,त्यातल्या त्यात बरा सदरा आणि खांद्यावर टॉवेल टाकून धावपळ करणारे हे नातलग म्हणजे अज्ञानात शहाणपण -सुख याचे उत्तम उदाहरण असतात . डाक्टरचा मेडिकल वाला फार कमिशन मारतो , सकाळी दिलेली dettol इतक्यात  कशी संपली असे व्यावहारिक प्रश्न यांना कधी पडत नाही . मेडिकल चे बिल जास्ती झाले म्हणून कपाळावर आठ्या न पडता हसू येते . कारण आशा असते की डाक्टर ने "भारी " औषध चालू केलय आता काळजीचे कारण नाही .  यांच्या  अंगी असतो तो केवळ सच्चेपण आणि आशा . म्हणूनच आतापर्यंत 'शहाळे ' म्हणजे काय हेही माहित नसलेला तात्या ३० रुपये मोजून नारूळ घेऊन येतो . का ? कारण गाडीतून उतरलेला साहेब घेऊन येतो म्हणजे नक्कीच आराम पडत असणार . आशेला वास्तवाचे बंधन नसते . शेवटचे कधी जेवलो हे वास्तव विसरून रुग्णाला घरचे खायला देण्यासाठी धडपडणारी माणसे बघून मन कासावीस होते . जो जे सांगेल ते करायचा प्रयत्न अंगावर काटा आणतो . इतक सगळ होऊनही रुग्ण दगवलाच तरीही आशा मनात असतेच . म्या किती झटलो पोरानं पाहिलं , त्यो माझबी असच करेल . कपाळावरच कुंकू पुसत बांगड्या फोडून दवाखान्यातच टाहो फोडणाऱ्या आक्कीला तिचा बा सांगतो ' आग का टिपूस गाळतेस , हे प्वार तुला काय बी कमी पडून देणार नाय , बापाच नाव काढेल ' . . पुन्हा एकदा आशा . . वर्तमानाला विसरण्यासाठी भविष्याकडून केलेली आशा . . 
                                 
का जपतो आपण हि आशा ? जी माणसाला वास्तवापासून दूर नेते , मृत्यूलाही जीवनाचे स्वप्न दाखवते , प्रयत्नांना जिद्दीचे बळ देते , तुटलेल्या मनाला आणि मोडलेल्या संसाराला सावरायचा प्रयत्न करते .या आशेवरच तर आपले आयुष्य झुलत असते . वास्तवाचे दाहक चटके सहन करत असते .हीच आशा तर आपल्याला जगवते ,वाढवते , यशस्वी करते आणि सपाटून हरल्यावर जगायचे एक कारण देते  . याखेरीज आपल्या हाती असतेच काय ? म्हणूनच रुग्णाने ओळख दाखवली , थोडे खाल्ले , हालचाल केली तर नातेवाईकांना ' आशा ' वाटते . . क्षणभंगुर पण सुखद . !म्हणूनच "आता सगळे प्रयत्न थकले … आता केवळ आशा आहे चमत्काराची " असा संवाद ऐकला की डोळ्याच्या कडा पाणावतात आणि जीवनाचे सत्य समोर येते , आपण  जगतोही आशेवर आणि मारतोही आशेवर . . पुन्हा जन्म घेण्याच्या , अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याच्या !! 

Wednesday, 27 March 2013

सोयीचा रस्ता.....


वेळ साधारण रात्री ९ च्या आसपासची ..... " बाईक " च्या वेगाशी जमेल तितके जुळवून घेत तिच्यात गुंतलेला तो आपल्या अंगावर गाडी घालणार नाही याची काळजी घेत टाकीवर कुटुंबातील बऱ्यापैकी मोठे अपत्य ,त्याच्या मागे स्वतः , आपल्या आणि आपल्याच ( याचा उल्लेख करावा लागतो हल्ली ) बायकोच्या सर्वार्थाने  मध्ये लहान पिल्लू घेऊन कडे कडेने जायची कसरत करणारा मध्यमवर्गी मध्यमवयी माणूस ( माणसे ) .... त्याला घासून आपल्या अल्टो पासून ते ऑडी पर्यंत "चार चाके " हा "सुदैवाने " एकमेव समान धागा असलेली वाहने चालवणारे उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय ,शेजारून आपल्या गर्ल फ्रेंड ला मिरवत आणि जरा अंधार आणि थोडासा मोकळा रस्ता ( पुण्यात रस्ते मोकळे नसतात त्यामुळे मागच्या आणि पुढच्या गाडीत ५ फुटाचे अंतर असेल तेव्हा रस्ता मोकळा असे अनौपचारिक  खोडकर समीकरण आहे ) दिसला की ....... असो !! ,यांच्या मागे  रस्त्या पेक्षा रस्त्याच्या आजूबाजूला कोण आहे , शेजारच्या गाडीत किंवा गाडीवर कोण आहे हे माझी गाडी गडगडू नये याची काळजी घेत निरीक्षण करणारा मी ...... सर्व एकाच रस्त्यावर पण वेगवेगळ्या मार्गावर ..... पहिले कुटुंब टू बाय फोर वाले , तरुण जोडपे वन बाय टू वाले , चारचाकी वाले वन बाय हाफ वाले ( अक्खी डिश अक्खी खाऊ नये ताटात थोडे शिल्लक ठेवावेच असा संकेत आहे म्हणे ) ......आणि मी ..... घरी जाऊन पोटभर खाणारा ..... माझे निरीक्षण आणि आपला समाज याच्या कल्पना -संकल्पना संपल्या ...नाहीतर आधीची पिढी ओरडतेच न कि तुम्ही पुढचा मागचा विचार करत नाही ?? मी करतो न ...पुढे मी कोणाला धडकणार नाही आणि मागून मला कोणी धडकणार नाही याचा किंवा माझ्या पुढे कोणी जाणार नाही याचा किंवा माझ्या मागून कोणी माझी मारणार नाही याचा ..... आजूबाजूलाही जग असते याचा बहुतेक वेळेला विसर पडणाऱ्या मोठ्या वर्गातील मी एक सामान्य घटक .....
                              मागची सीट रिकामी त्यामुळे कोणी टाकीवर - मध्ये बसायचा प्रश्नच नाही .... संगीत आपला सोबती या न्यायाने मोबाईल मधले गाणे बर्यापैकी मोठ्या आवाजात ऐकत मी पुढे सरकत होतो ... कान उघडे ठेवले की मन बंद होत नाही ... शेजारून जाणाऱ्या जोडप्याचे लडिवाळ बोलणे ऐकले की आयुष्यातील एकटेपणा अधिक गहिरा होतो , मुलाला /मुलीला शाळेतून घरी नेणारी आई सिग्नल वर थांबली असता प्रेमाने केसात हात फिरवून " आज डबा खाल्ला का ... तुझ्या आवडीची भाजी ...." असा संवाद ऐकला की सकाळपासून आपण डबा खाल्लाच नाही याची आठवण होते . आतापर्यंत न जाणवलेल्या  भरलेल्या डब्याचे  उगाचच ओझे  होते  आणि आईच्या आठवणीने डोळ्यांच्या कडाही नकळत जड होऊ लागतात . ऑफिस मधून घरी जाणाऱ्या नवरा बायकोचे बोलणे ऐकले की मन उगाचच गृहस्थी ची स्वप्ने रंगवू लागते आणि " आयला काय आहे राव " अशी दाद मिळवून जाणारी मुलगी .." हि गर्ल फ्रेंड म्हणून चांगली आहे पण बायको म्हणून नो वे " असे  बळच चिकित्सक विचार करायला लावते .... एकंदरीत काय ... कान उघडे असले की मी माझा अशा साध्या सोप्या  आयुष्यात मग माझे कोण ? असा कटकटीचा प्रश्न निर्माण होतो . विचारांचा वेग वाढतो आणि गाडीचा वेग कमी होतो . मागचा असा काही होर्न वाजवतो कि त्याला विचारावेसे वाटते .... " अरे का कावला आहेस इतका ? " म्हणून कान बंद ठेऊन पुढे सरकणेच उत्तम ...अशी परीक्षा रोज जरी घेत असला तरी हाच रस्ता सोयीचा वाटतो . कारण त्यात कोठेतरी प्रवाहात असल्याचे समाधान असते …. 
                               
पण या रस्त्याचीही कमाल असते ....... अनेकांना रस्त्यावर आणतो पण रस्त्यावर असलेल्यांना मात्र रस्त्यावरच ठेवतो ... इतका स्वार्थी सर्वसमावेशक भाव कदाचितच कोठे असेल . सर्वाना आपल्या बरोबर घेऊन जाणारा पण मोजक्याच लोकांना पुढे घेऊन जाणारा .....इतर पडतात आजू बाजूला .... ज्यांच्याकडे आपले कधी लक्षच जात नाही ... रस्त्याच्या आजूबाजूला एक वेगळेच विश्व असते आणि ते आपल्या जगाइतके संकुचित नसते . तोंडाला भडक रंग लाऊन आपल्या आयुष्यातील अंधार झाकणाऱ्या वारांगनेलाही एक आयुष्य असते . उन्हात डोक्यावर पदर घेऊन पोपया -कणसे विकणाऱ्या तात्यालाही संसार असतो , महागड्या आईस्क्रीम खायची चटक लागलेल्या आपल्या सोसायटीत प्रवेश नसलेल्या कुल्फी वाल्याच्या पोटातही "आग " लागली असते जी  कोणी "थंड " घेतल्या शिवाय विझणारी नसते .फाटक्या चड्डीला करकचून सुतळी बांधून  कळकट शर्टाच्या मळकट बाहीला शेंबूड पुसणाऱ्या पोराच्याही डोळ्यात काही स्वप्ने असतात . वचावचा भांडणाऱ्या बायकांच्या किंवा पुरुषांच्या भाषेलाही कोठेतरी समाजापासून दुरावल्याची किनार असते . पण हे सगळ पाहायला ,यावर विचार करायला आपल्याला वेळ आहे कोठे ? वेळही काढता येईल पण बाजूला काय जग आहे हे समजून उमजून घेण्याची नैतिकता आपल्यात उरली आहेच कोठे ....आपल्यात आहे केवळ इर्षा आणि हाव ...पुढे राहण्याची आणि पुढे असलेल्याला ओवर टेक करायची ....
                               इतकेच आपले आयुष्य मर्यादित आहे ..नाही आपण ते तितकेच मर्यादित ठेवले आहे . कारण आपल्यावर झालेल्या संस्काराला ,नैतिकतेला ,संवेदनांना आणि जाणीवांना आपण " मिनीमाईझ " केले आहे .आणि डिलीट करायच्या मार्गावर आहोत . म्हणूनच वारांगनेच्या छातीवरचे मांसल गोळे डोळ्याला दिसतात ,डोळ्यात भारतात , कामज्वर निर्माण करतात पण त्याच गोळ्याखाली असलेल्या मनातल्या अगतिकतेकडे ,असहाय्य्तेकडे  आपली नजर कधी जातच नाही .कुल्फी वाला असो वा फळे विकणारी बाई -तात्या त्याचा माल कसा आहे याहून " विकणारी व्यक्ती " कशी आहे याला महत्व आहे कारण , कोथिंबीर पेंडी च्या मुळालाही माती पहायची आणि सहन करायची सवय नसलेल्या आपल्याला उघड्यावरच्या माणसाचा उघडा माल कसा खपणार ?? शर्टला शेंबूड पुसणारा मुलगा पाहून " इक्स किंवा व्याक " वाटणाऱ्या आपल्याला किंवा चुकून आपल्या घरच्या छोट्या मुलाने तसे केले तर " रस्त्यावरचा /झोपडपट्टी " मधला आहेस का म्हणून उद्धार करणाऱ्या आपल्याला , त्या पोराला सर्दी सोबत तापही असेल का हा प्रश्न कधीच पडत नाही . भांडणाऱ्या व्यक्तीच्या असंस्कृत ,अश्लील शब्दामागची मजबुरी आपल्या कानी कधी पडतच नाही ..कारण ....
               आपण कधी रस्त्याच्या कडेला जातच नाही .... समोर जाताना वेग येतो तर बाजूला जात असताना जबाबदारी . वेगाची आवड प्रत्येकाला आहे कारण वेग हा प्रकाशझोतात येतो , वर्तमानपत्रात झळकतो आणि वाहिन्यांवर मिरवतो . जबाबदारीचे काय ? घरच्यांची नको असते तेथे यांची कोण घेणार ? आणि का घ्यावी ? मला तर पुढे जायचय ....कडेला अडकून बसलो तर पुढे कसे जाणार ? जहाज कितीही सुंदर असले , बलशाली असले तरी ते प्रवाहातच शोभून दिसते , कारण प्रवाहात लाटांशी लढण्याची महत्वाकांक्षा असते , कोठेतरी पोहोचण्याची जिद्द असते , निसर्गापासून ते मानवापर्यंत सर्वाना हरवण्याची इर्षा असते ...काठावर बसून काय ? काठावर तर हरलेले ,निराश आणि हताश बसतात , ज्यांच्यात काही जिंकण्याची जिद्द नसते ... अशा लोकात मी कशाला वेळ वाया घालवू ? ते का माझ्या बौद्धिक ,सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक बरोबरीचे आहेत ? आमचा रस्ता तेवढा मोठा करा ...कडेला पेविंग बसवा किंवा आणखी काही ..मला काय त्याचे ? आणि माझी गाडी मागे पाहायला आरसा पुरवते  आणि मेंदू डोळ्यांना पुढे पहायची आज्ञा देतो ....कडेच्याना काडीचीही किंमत नसते म्हणून इंडीकेटर आणि कान दिले आहेत .... सोयीनुसार बंद चालू करता येणारे .... जबाबदारी झटकण्याची संधी देणारे ... माणसाचे मातीशी आणि रस्त्याचे कडेशी नाती तोडणारे ...माझ्या सोयीचा रस्ता दाखवणारे आणि रस्त्याच्या कडेच्या जीवनाला कोनाड्यात टाकणारे ....