Friday, 15 November 2013

तें . . .

समस्त महाराष्ट्राने ' तें ' वर मनापासून प्रेम केलं . त्यांना आपलंसं मानलं . 'तें ' च्या वेगळेपणाला स्वीकारलं . कारण 'तें ' म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे . तर ती एक मानसिकता आहे . एक जीवनशैली आहे . प्रस्थापित शक्ती , समजुती , भाकडकथा यांना हादरवून टाकणारी ताकद आहे . इतिहासात न रमता इतिहास निर्माण करण्याची जिद्द आहे . वर्तमानाला न चुचकारता भविष्याला आव्हान देण्याची धमक आहे . समाजात वावरताना सामाजिक नैराश्या विरोधात केलेला विद्रोह आहे . मोठ्ठ होत असताना मोठेपणातील फोलपणा ओळखून जमिनीशी नातं टिकवून धरण्याचा मोठेपणा आहे . वैयक्तिक आयुष्यातील दुक्खे मागे सारून समाजाला , देशाला पुढे नेण्याचे नेतृत्व आहे . मागाहून येणाऱ्या अनेक पिढ्यांवर गारुड राहावं अस कर्तुत्व आहे . उंचीवर जाऊन देखील खोलीतला खोलपणा जाणण्यातलं अन मानण्यातलं तत्व आहे . पराकोटीचे प्रेम अन टोकाचा विरोध एकाचवेळी मिरवण्याचे निष्काम कर्मयोग्याचे 'तें ' चे जीवन आहे . . . . 'तें ' . . मग ते विजय असो वा सचिन . . . क्षेत्र भिन्न पण कार्य एकच . साधने वेगळी पण साधना एकच . . . दिशा वेगळ्या पण अंतिम क्षितीज एकच . . फटकारे वेगळे पण भिरकावणे एकच . . . व्यक्ती वेगळ्या पण आत्मा एकच . . महतीचे पोवाडे अनेक पण महानता स्पष्ट करण्यास पुरेसा शब्द एकच . . ' तें ' . . . !!
                                या दोन्ही तेंडुलकरांनी जोरदार अन जोमदार कलात्मक फलंदाजी केली . . . यांनी रचलेला प्रत्येक शब्द आणि मारलेला प्रत्येक फटका येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरला . बागुलबुवा करून महत्व दिलेल्या गोष्टीना सीमापार भिरकावून द्यायची शक्ती यांनी दिली . यांची अदाकारी म्हणजे समोरच्याला कोड्यात टाकणारी , कोडे सोडवच म्हणून मजबूर करणारी , कमाल स्वगत घडवून आणणारी अन अंती कमालीचा आनंद देणारी . मला तेंडूलकर समजले असा कोणीही सखाराम गटणे म्हणण्याचे धाडस करणार नाही अन मला तेंडूलकरचे तंत्र समजले असे निवृत्ती नंतरही म्हणायचे धाडस कोणी गोलंदाज करणार नाही . . या दोनीही ' तें ' नी गूढता जपली . सूर्यप्रकाशात सर्व गोष्टी सुर्यप्रकाशासारख्या स्वच्छ दाखवूनही बरेच काही आकलनासाठी शिल्लक ठेवले . आपली ओळख निर्माण करत असताना आपल्या क्षेत्राला सुद्धा मोठे केले . . या दोन्ही तेंडुलकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'माणूस ' म्हणून प्रचंड मोठे अन समृद्ध झाले . आपापल्या क्षेत्रात चिरफाड करत असताना , वैयक्तिक आयुष्यात मात्र एक सभ्यता आणि पावित्र्य जपले .  विजय तेंडूलकर मलाही आताशी जरा कोठे समजायला लागले आहेत . सचिन बऱ्यापैकी समजला आहे . आजचा दिवस आणि येणारे काही दिवस सचिनचे असल्याने त्यावर थोडे अधिक भाष्य करतो . . 
                                 
भारतीय क्रिकेट मध्ये आपण चेंडू पर्यंत जायचे नाही तर चेंडूला आपल्या पर्यंत येऊ द्यायचे असा प्रघात असल्याचे काही मुलाखतीतून मला समजले . गोलंदाजाला अवास्तव महत्व देण्याचा हा प्रकार होता . 'पुढे सरसावून आघात ' करायची वेस्ट इंडिअन खुनशी मानसिकता आपण दूरच ठेवली होती . त्याचमुळे विशीच्या आतल्या एका पोराने अब्दुल कादिर ला पुढे सरसावून खणखणीत चार षटकार मारले तेव्हा भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलत असल्याचे अनेकांना जाणवले . भारत परदेशात जिंकू शकत नाही हा इतिहास कोठेतरी बदलायला लागला . गोळी सारख्या तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूला हतबलतेने पाहणारे गोरे सर्रास दिसू लागले . सुनील गावस्कर वगिरे यांनी याचा शुभारंभ केला होताच पण दूरदर्शन बाळबोध अवस्थेत असल्याने त्याचे दर्शन म्हणावे तितके झाले नाही . सचिन आल्यावर त्याने गोलंदाजांची जी कत्तल सुरु केली ती घरोघरी पोहोचली . आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला एक वेगळाच अनुभव देतोय याचा आनंद देशभर पसरायला लागला . प्रस्थापीत , नावाजलेली , दहशतनिर्माण केलेली ओस्त्रेलिया , पाकिस्तान , विंडीज यांची गोलंदाजी बेदरकारपणे फोडून काढता येते याचे प्रात्यक्षिक सचिन च्या रुपात पहायला मिळाले . अर्थात त्याच्या सहकार्यांनी सुद्धा गिअर चेंज केल्याने भारतीय क्रिकेट अन भारतीय प्रेक्षक यांची मानसिकता एकाच वेळी बदलायला लागली . सत्तांतराची  सुरुवात झाली . . याचा शिलेदार म्हणजे 'तें ' डूलकर . . . 
                         
   गेली पंचवीस वर्षे सचिन खेळत आहे . रोज काहीतरी शिकत आहे . कोणालातरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे शिकवत आहे . मोठेपणासोबत येणारी प्रसिद्धी आपल्या सहजतेवर मात करणार नाही याची दक्षता घेत 'तें ' प्रमाणे वाटचाल करत आहे . असामान्य गुणवत्तेला शालिनतेची जोड देऊन सभ्यतेचे नवे पायंडे पाडत आहे . विजय तेंडूलकर गेल्यावर साहित्य विश्वात जी पोकळी निर्माण झाली तीच पोकळी सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट विश्वात निर्माण होणार आहे . कारण सचिन सोबत  'तें ' ची मानसिकता असलेल्या  , संस्कार असलेल्या  , जीवनशैली असलेल्या अनेक पिढ्या एकाच वेळी निवृत्त होतील . . अनुकरण करणारे अनेक 'तें ' जन्माला येतील किंवा घातले जातील . काही काळाने त्यांचाही उबग येउन मूळ 'तें ' ची गरज , साधना , आराधना पुन्हा एकदा अधोरेखित होईल . कारण तो , ती , ते अनेक जन्माला येतात पण 'तें ' . . . . . ?? क्वचितच जन्माला येतात . . .  जन्माला आल्याचे सार्थक करून शांतपणे निघून जातात . . . आपल्याला अस्वस्थ करून . . !! 

Wednesday, 6 November 2013

उरले केवळ चार डाव !

सचिन च्या निवृत्तीची घोषणा ऐकल्यावर मी अस्वस्थ झालो . जसा जसा तो क्षण जवळ येत आहे तसा मी बेचैन होत आहे . माझे ,आपले कोणीतरी निवृत्त होत आहे असे वाटतंय . मन जुन्या दिवसात ,जुन्या आठवणीत रामतंय . मला शाळेतले दिवस अजूनही आठवतात . 'आई निवृत्त झाल्यावर /सुट्टीवर गेल्यावर ' काय होईल ? हा निबंध मी आईकडूनच लिहून घ्यायचो . माझा आवडता खेळ /खेळाडू यावर पटकन छानसा निबंध लिहून टाकायचो . कारण त्यावेळी आई मला कळली  नवती पण क्रिकेट आणि सचिन मला समजला होता . . लहानपणापासून मला मोठे करणाऱ्या , बाबांच्या अंगावर उड्या मारायला लावणाऱ्या , बहिणींशी पैजा लावायला लावणाऱ्या , अरे किती दंगा करतोस म्हणून आईचा मार खायला लावणाऱ्या सचिनच्या निवृत्तीला उरले केवळ चार डाव  . . . ! 

Tuesday, 5 November 2013

मातीचा किल्ला : भाग तीन

अभिव्यक्ती म्हणजे काय ? अभिजात म्हणजे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी असतील त्यांनी मातीचा किल्ला पहावा . किल्ला हे   माणसाला समृद्ध करणारे , त्याच्या निरीक्षण आणि आकलन शक्तीला वास्तवात उतरवणारे , , वास्तवाहून चार पावले पुढे जाऊन विचार करणारे ,कल्पनेला सत्यतेच्या कोंदणात बसवणारे , येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे , खर्ची पडलेल्या अनेक पिढ्यांच्या कर्तुत्वाची गाथा सांगणारे शिल्प असते . मग तो सह्याद्रीच्या निबिड अरण्यात ,घनदाट जंगलात वर आलेल्या कातळावर घडवलेला अभेद्य गड असो किंवा परसात केलेला काही फुटी मातीचा किल्ला असो , आकार बदलला तरी भाव बदलत नाही . मातीचा किल्ला करणे म्हणजे आपलंच असं स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते . राजेपण जरी शिवाजीचे असले तरी त्यास ते मिळवण्यास सहाय्य कण्याची एक समृद्ध धडपड असते . हि धडपड गेली साडे तीनशे चारशे वर्ष अखंड सुरु आहे . सह्याद्रीच्या कातळात आणि शहराच्या सिमेंटात अजूनही शिवरायांचे स्मरण होते . . पूजा होते . . साधना होते . .  राजेंनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून प्रार्थना होते . ही 'परंपरा ' अनेक पिढ्यांपासून सुरु आहे . याच परंपरेतला एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळीत घडवला जाणारा 'मातीचा किल्ला ' . . .

Sunday, 3 November 2013

दिवाळी "ती " आणि "ही".....


दिवाळी म्हणजे अंधकार भेदून जाणारा प्रकाशाचा सण...मग तो आसमंत मधील असो वा मना मधील .."तमसो मा जोतीर्गामय" हि उक्ती सार्थ ठरवणारा हिंदू धर्म मधील महत्वाचा आणि मानाचा सण....धन्वंतरी पूजन,लक्ष्मिपुजन,पाडवा,भाऊबीज अशा सणांनी नटलेले आणि मंतरलेले दिवस....किल्ला ,फटाके ,गोड धोड (मनापासून आणि वजन वाढीचा विचार न करता खाणे ) आताशी होत नसले तरी दिवाळीचा आनंद मात्र तसूभरही कमी होत नाही ......चकली खात असताना सहज डोक्यात विचार आला कि मागच्या वर्षी असेच बागेत बसून चकली वर ताव मारत होतो यंदाही मारत आहे मग या १क वर्षात बदल तो काय झाला ? ? आणि मग विचारांची चक्रे फटाक्याच्या चक्रा  सारखी गोल गोल फिरू लागली ...

Friday, 1 November 2013

मातीचा किल्ला : भाग दोन

माणूस सदनातून सदनिकेत रहायला गेल्यापासून सहजीवनातील मजा मर्यादित झाली आहे . चाळ किंवा वाडा हे जरी सदनिकेचे प्रकार असले तरी त्यांच्या वास्तूत सहजीवन कोठेतरी खोलवर मुरलेले , रुजलेले  होते . एखाद्या खोलीतील जन्माचा आनंद  आणि एखाद्या खोलीतील मरणाचे सुतक संपूर्ण चाळ साजरे करत होती ,पाळत होती . प्रत्येक घर दुसऱ्या घराचा पार्ट होता . . सदनिकेच्या उंच्या जशा वाढत गेल्या तशा घराच्या लांब्या आणि मनाच्या खोल्या आकसत गेल्या . किलबीलणारे अंगण , कुजबुजणारे स्वयंपाकघर ,समृद्ध परसबाग हे प्रकार नामशेष झाले . माती परकी आणि पोरकी झाली . जागेच्या आणि वेळेच्या युद्धात कुटुंबाचा विस्तार सुकत गेला . .पीओपी चा किल्ला त्याच सुकलेल्या कुटुंबात , हरवलेल्या बालपणात , मोठ्यांच्या 'आमच्या वेळी असं नवतं ' या स्वगतात , सोसायटीच्या 'बरं झालं . . चिखल आणि स्वच्छता वाचली ' या स्वार्थात कुठेतरी 'कल्पतरू ' सारखा वावरत आहे ... . हा काळाने स्वीकारलेला बदल आहे . हा बदललेल्या संस्कृतीचा चेहेरा आहे . तो आपल्याला स्वीकारायलाच हवा . . . .

Thursday, 31 October 2013

मातीचा किल्ला : भाग एक

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

हिन्दु धर्मात पूजनीय असलेल्या भगवत गीतेत श्री कृष्णने पुन्हा अवतार केव्हा घेईन ते स्पष्ट केले आहे . सध्या देशातील आणि देशाबाहेरील स्थिती पाहता 'अवतार ' लवकरच जन्म घेणार असे राहून राहून वाटते . . असेच काहीसे वाटत असताना विचारांच्या तंद्रीत आकाशात साचत असलेल्या ढगांकडे सपशेल दुर्लक्ष करून मी बाहेर पडलो . . आल्फ्रेड हीचकॉक हयात असते तर ' अरे हाच तो रस्ता जो मी अनेक वर्षे शोधत होतो ' म्हणून एखाद्या भयपटाची निर्मिती करून टाकली असती .दुपारच्या ४ ला चक्क अंधार , सोसाट्याचा वारा , पानांपासून ते पदरा पर्यंत हवेत उडणाऱ्या अनेक गोष्टी , हेडफोन वरून कमाल आवाजात कमालीचा ठेका असलेले गाणे ऐकत असतानाही कानाच्या पदद्यावर आदळणारा वीजा फुटल्याचा आवाज , मधूनच कडमडत जाणारे कुत्रे , कावरे बावरे होऊन झिग झेग पाळणारे मांजर , माणसांची धावपळ पक्षांची फडफड . . . हे सगळे माझ्यासाठी नाही असे समजून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पचाक पचाक पावले टाकत , कपाळावर साचलेल्या पावसाच्या थेम्बाना बेफिकीरीने उडवत ,हाफ चड्डीतले एक पोट्टे फुल एटीट्युडने समोर सरकत होते . . कदाचित कोलंबस चे गर्वगीत वाचून आले असावे . . पोट्टेच ते त्यात दखल घेण्या सारखे काय ? जो पोट्टा एका हातात अक्खा किल्ला घेऊन पुढे सरकत असेल त्याची 'दखल ' घ्यायची नाही ? मला तर कृष्णाने सुदर्शन पर्वत उचलल्याची गोष्ट आठवली . . देवा . . घेतलास अवतार अखेर तू . . दिसले रे बाबा . . तुझे पाय खड्ड्यात दिसले . . मी नमस्कार करणारच होतो . . तेवढ्यात आडोशाला माझ्या शेजारी थांबलेलं म्हातारं सवयीने खाकरलं अन मी भानावर आलो . . एक नमस्कार वाचवला जेष्ठाने . . दिवाळीत ना,  'चव बघ ' म्हणून पोटभर खायला घालतात त्याने अशी सुस्ती आणि गुंगी येते ।  असो . . सांगायचा मुद्दा असा . . त्या पोट्ट्याच्या हातातला पीओपी चा लहानसा किल्ला बघून मला माझ्या लहानपणीचा मातीचा अन शेणाचा किल्ला आठवला . . उचलता न येणारा . . वर्षभर फडताळावर ठेवता न येणारा . .

Saturday, 26 October 2013

दाभोलकर खून - माझ्या मना बन दगड !



कविता करणे किंवा कवितेच्या प्रांतात रमण्याची माझी प्रकृती नाही . किंबहुना ते माझ्या किंवा वाचणाऱ्याच्या प्रकृतीला मानवत नाही . तरीही मी नेटाने कविता लिहितो . आवडीने कविता वाचतो . या वाचनात मला विंदा करंदीकरांच्या कविता मनापासून आवडतात . पटतात . आजूबाजूच्या परिस्थितीला साजेशा वाटतात . डॉ . नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला लवकरच तीन महिने पूर्ण होतील . दिवाळी साजरी करायच्या नादात तपासाचे निघालेले दिवाळे आपल्याला कोणीतरी 'सवाल ' उपस्थित करेपर्यंत समजणार नाही . हे सवालही महिन्यातून एकदाच उपस्थित होतात . वीस ते वीस असा त्यांचा प्रवास असतो . असो . . या पार्श्वभूमीवर मला विंदांच्या  माझ्या मना दगड हो
 या कवितेतल्या काही ओळी लिहाव्याश्या वाटतात . .

'हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो! '