२१ बॉल मै ११ रन बनानेवालो . . जनता माफ नही करेगी
१४ करोड मै मुझे खरीदनेवालो . . जनता माफ नही करेगी
चषक उंचावण्यास आसुसलेले २२ हात . त्या हाताना आपल्या तालावर नाचवणारी २२ यार्डाची खेळपट्टी . चुकणारे ठोके . वाढणारा जल्लोष . लंकन वाघांनी ठिकठिकाणी ओरबाडल्या , चावल्या , नखे मारल्यामुळे अंगातून वाहणारा 'ब्लीड ब्लू ' . लंका दहन व्हावे म्हणून नेहमीप्रमाणे नवस बोलणारे कोट्यावधी भारतीय . भारतीयांचा नवस पूर्ण न होता 'अबकी बार . . हारना मत यार ' म्हणून प्रती नवस बोलणारे लंकन . चेंडूगणिक सामन्याचे स्पष्ट होत चाललेले चित्र . चेहेर्यावरून उडत चाललेले अन चेहेर्यावर जमा होत असलेले रंग . प्रत्येक रंगाचे एक वेगळेच समाधान ,दुक्ख अन गोष्ट . कही बजे शेहनाई तो कही मातम का माहोल . . . या सर्व चित्रात कोठेही न दिसणारा . . न जाणवणारा एकच खेळाडू . . जिंकलो तरी मार हरलो तर डबल मार या जाणीवेने कोठेतरी हरवलेला . . अन सर्व काही हरून , पुढचा काही काळ पाठ न सोडणारी टीका पाठीवर घेऊन मैदानातून बाहेर पडणारा . . . . . ''हतबल युवराज '' . . . .
कधीतरी जीवाची तगमग होते . बरेचदा ती अकारण असते . काहीवेळा सकारण . . पण ती होते . . कारण असेल तर ती सुसह्य असते . कारण नसेल तर ती आणखीन असह्य होते . नक्की कशामुळे तगमग होते आहे हेच माहित नसल्याने 'कारणाचा ' घेतलेला शोध नेमके कारण सोडून बरेच काही समोर आणून ठेवतो . . मग तो लहानपणी लहान हातानी बहिणीच्या पाठीत जोरात मारलेला मोठ्ठा गुद्दा असेल किंवा इट का जबाब पत्थर से या (अ )न्यायाने बहिणीने तिच्या मोठ्या हातानी माझ्या लहान पाठीवर मारलेले मोठमोठे फटके असतील . . जे आता हवेहवेसे वाटतात किंवा . . हातातून पडलेले एखादे चोकलेट असेल . . आवडत्या माऊ किंवा भूभू चे देवाघरी जाणे असेल किंवा 'मेल्यावर माणूस कुठे जातो अन देवाघरी इतक्या साऱ्या माणसांचे देव काय करतो ?' या बालिश प्रश्नांची उत्तरे मिळायच्या आत काही जवळच्या माणसांचे मरण अनुभवणे असेल . . कारणांची तीव्रता कितीही कमी जास्ती असली तरी तगमग मात्र प्रचुर तीव्रतेने होते . . कारण आपल्या हातातून काहीतरी निसटल्याचा रितेपणा त्यात असतो . . .
.
भरल्या पानावर आणि भरल्या घरात तोंड वाकडे करू नये म्हणतात . खरच पान आणि घर कधी भरलेले असते का ?? पानात पोळी -भाजी -चटणी वगैरे ठेवले की आपल्याला पान भरल्या सारखे वाटते . घरात दोन माणसे आली ,चार गृहोपयोगी अन दहा चैनीच्या वस्तू आणून ठेवल्या की घर भरल्यासारखे वाटते . . या वाटण्यातच आयुष्याचे सुख दडलेले आहे . मला वाटते माझे पान भरलेले आहे . मग माझ्या पानाकडे आशाळभूत नजरेने बघत असलेल्या कामवालीच्या पोट्ट्याच्या पोटाला काय वाटत असेल ?? माझे पान भरलेले आहे पण त्याचे पोट त्याला 'भरल्या सारखे ' वाटत असेल म्हणून भरलेले आहे . . माझे भरलेले पान , दुधाचा ग्लास , खाऊचा बाउल मला रिकामा वाटतो . . कारण दोन 'भरलेले ' डोळे त्याकडे बघत असतात . . इथे माझे वाटणे सुखाचे नसते . . घराचेही तेच . . भरलेल्या घरातील भिंतीवर लटकलेल्या काही तसविरी केवळ जागा भरून काढत नाहीत तर भरलेल्या जागेतून एक रिकामेपण प्रसवत असतात . . डायनिंग टेबल वरची 'ती ' रिकामी खुर्ची . . कपाटातले वापरात नसलेले 'ते ' कपडे , ठराविक वेळी ऐकू न येणारा 'तो ' आवाज , अनेक वर्षे अंगावरून न फिरलेला 'तो ' हात अन स्पर्श ,आठवणीतच उरलेला 'तो ' संवाद . . . भरल्या घरातही एक रितेपणा निर्माण करतात . . ते नाहीत म्हणून नाही तर आपण आहोत म्हणून . . ते जाऊनही आपल्यात जिवंत आहेत म्हणून . . . आपल्याला केवळ 'वाटते ' की माझे पान ,माझे घर ,माझे आयुष्य 'भरलेले ' आहे . . . पण जेव्हा याच बाह्य भरीव पणातला पोकळ अंतर्भाग नजरेत येतो तेव्हा सुरु होते . . . . तगमग !
खुपदा आतून जाळते ती तगमग . . महाकाय अनेक पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाला आतून वाळवी लागली तर आतून जसा गाभा पोखरला जातो तसेच मनाचेही होते . . सळसळणारी हिरवी पाने बघून जगाला वाटते की हा आनंदात आहे . . कारण सळसळणे हे सजीवात्वाचे लक्षण आहे अन त्याला काहीतरी करावेसे वाटते म्हणजे तो आनंदीच असणार न ?? पण त्या सळसळण्यामागची सल कोणालाच दिसत नाही . . केवळ वट पौर्णिमेला 'गजबजणारा ' तो पार अन 'अनन्यसाधारण महत्व ' असलेला तो वड वर्षाचे उरलेले दिवस किती एकटेपणात काढत असेल याचा विचार येतो कोणाच्या मनात ? कसा येणार . . . जिथे घरचे आई वडील 'पेन्शन जमा झाल्या दिवशीच ' आठवतात तिथे वड कोण लागून गेला ?? उरलो /उरले केवळ 'सही ' पुरता /पुरती या वेदनेने जगणाऱ्या अनेक म्हातार्यांची शरपंजरी अवस्था बघून मनाची तगमग होते . . आपणच बांधलेल्या घराचे फिरलेले वासे ,आपणच वाढवलेल्या मुला -मुलीचे बदललेले वागणे अन आपणच कौतुकाने घरी आणलेल्या सुनेचे वाढत जाणारे टोमणे सहन करता करता 'वांझ राहिलो असतो तर बरे झाले असते ' असे ऐकायला लागले तर मनाची तगमग होते . . पैशाने मोठा असलेला माणूस मनाने किती भिकार असतो याची जाणीव होते . . .
ही 'जाणीवच ' तगमग होण्याच्या मूळाशी असते . कारण जाणीव अन जाण ठेवल्याची किंमत मोजायला लागते . विश्रांतीगृहाने पंथास्थांचा , पाणवठ्याने तृशार्थांचा , वेलीने आपल्याच पुष्पाचा अन आकाशाने विहंगाचा मोह कधीच धरू नये . . हे ते जाणतात कारण त्यांची बुद्धी कमकुवत असली तरी मन भक्कम असते . . जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी मनाने मात्र सर्वात हळवा असतो . अमुक व्यक्तीसाठी मी माझी कामे सोडून तमुक केले त्याची किमान 'जाणीव ' ठेवायला नको ?? इतके सुंदर दिवस होते ते . . हिंडणे फिरणे बोलणे पण 'जाण ' नाही ठेवली त्याने /तिने . . मूव ओंन केले . . . . हाताच्या फोडासारखे जपले हो . . पण चांगले 'पांग ' फेडले . . इत्यादी . . आपल्या कर्तव्यात एक सुप्त अपेक्षा दडलेली असते . . समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजावे ,जाणावे , आपण काय केले दोन ठिकाणी वाजवून दाखवावे ,आयुष्यभर मिंधे राहावे , किमान कधीतरी वेगळी वाट काढून बोलावे -भेटावे इत्यादी अपेक्षा जोडलेल्या असतात . अगदी कितीही निरपेक्ष अन निस्वार्थी भावनेने कार्य करायचे म्हंटले तरी . . याच अपेक्षा अनेकदा डसतात . झोंबतात . नाती बिघडवतात . भावना तुडवतात . . . अशा काही /अनेक निसटून गेलेल्या भावनांच्या , नात्यांच्या , आठवणींच्या , मार्मांच्या , सहजीवनाच्या , मैत्रीच्या ,प्रेमाच्या ,आनंदाच्या ,दुक्खाच्या ,आवेगाच्या 'तत्कालीन ' पोत्याला वर्तमानात उघडणे . . . निसटून गेलेले धागे मनोमन विणायचा प्रयत्न करणे यास कदाचित . . ' तगमग ' म्हणत असावेत !!!
फॅन्ड्री हा एक प्रयत्न आहे . वाद घडवून न आणता वादग्रस्त विषय हाताळण्याचा . काहीही प्रोजेक्ट अन प्रमोट न करण्याचा . समाजातील एका वर्गाचे दुक्ख मांडत असताना इतर समाजाला न दुखावता विचारमग्न करणारा . शिवाशिव किती बेगडी अन सोयीची असते यावर मार्मिक भाष्य करणारा . परंपरागत व्यवसायापासून नवी पिढी का अन कोणत्या न्युनगंडामुळे फारकत घेत आहे ते स्पष्ट करणारा . अजूनही 'हुंडा ' अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण करणारा . . समाजाला पडलेला प्रश्न म्हणजे बापाला -कुटुंबाला दिले गेलेले एक आव्हान असते याचा प्रत्यय देणारा . स्वप्न बघायला जात शिक्षण रंग रूप लागत नाही याची वास्तविक जाणीव करून देणारा . वंचित घटकांना कोणत्या गोष्टीचे 'अप्रूप ' असते ते चितारणारा . दोन जीवांनी असमान जात ,धर्म ,सामाजिक -आर्थिक -शैक्षणिक स्तरास न जुमानता फुलवलेला 'टाइम पास ' न घडवता झुरणारे मन दाखवून अस्वस्थ करणारा . . . माणसाला डुक्कर ही बोचरी उपाधी देऊन त्या फॅन्ड्रीने समाजाला मारलेल्या दगडाने मनाला बऱ्याच जखमा करणारा . . . . फॅन्ड्री हा एक स्तुत्य प्रयत्न आहे !
तो जाऊन आज दोन महिने झाले . दोन ? का दीड ? का सव्वाच ?? आठवत नाहीये . . नाही ' द आउटसायडर ' सारखे 'माझी आई बहुतेक काल गेली ' अशी सुरुवात करून वाचकाच्या मनात झिणझिण्या आणायच्या नाहीत मला . पण खरच आठवत नाही तो कधी गेला . . त्याचे जाणे मी अजून स्वीकारले नाही का जाऊनही त्याचे कुठेतरी थोडेसे ,माझ्यापुरते असणे मला भ्रमित करत आहे ?? ठाऊक नाही . . . काही गोष्टी कधीच उलगडत नाहीत . उलगडायचा धसमुसळे पणा केला की एकतर नासधूस होते अन गुंता होतो तो वेगळाच . . . बरेच दिवस मनाशी पक्के ठरवतोय की आता तो नाही . . कुठेच नाही . . मी कितीही प्रेमाने हाक मारली तरी तो येणार नाही . . हाकेच्या अंतराच्या पलीकडे गेलाय तो . . मला अलीकडे सोडून . . .
''एक माणूस होता. तरुणाईत त्यानं ठरविलं की, आपण पूर्ण विश्वामध्ये बदल घडवायला पाहिजेत. तरुणाईचा उत्साह आणि आत्मविश्वासामुळेच त्याला वाटलं की, आपण हे शिवधनुष्य पेलू शकू. दिवस सरले. तो गृहस्थ रानात शिरला. तेव्हा वाटलं विश्वाच्या बाबतीत हे करणं अवघड आहे, पण देशामध्ये मात्र नक्कीच काही तरी आमूलाग्र बदल करता येऊ शकतो. तो कामाला लागला. पन्नाशीत जाणवलं की, अवघड आहे, राज्यावर फोकस करावं, देश फार मोठा आहे. मग साठीमध्ये कळलं की, राज्यातही काही करू शकलो नाही. मग जिल्हा स्तरावर काही करावं असं त्यानं ठरवलं. सत्तरीमध्ये लक्षात आलं की, काही झालेलं नाही. आता सत्तरीत होता तो. गात्रं गलित झाली. मग लक्षात आलं की, आपण गावामध्येच काही केलं असतं तर बरं झालं असतं, काही तरी व्यवस्थित बदल करू शकलो असतो. तसंच काही प्रशासनाचं आहे. '' अनेक वर्षांचा संचित कचरा एकाच खेपेत साफ करण्याचा झाडू उचललेले अरविंद केजरीवाल यांची सुरुवात जरी दणक्यात झाली असली तरी यापुढचा त्यांचा मार्ग 'आम' राजकीय पक्षासारखा असणार आहे . . .

आयुष्यातल्या जिंदगीत कधी महेश कोठारे यांच्याशी 'ग्रेट भेट ' झाली तर त्यांना एक प्रश्न विचारणार आहे . महेश सर तुम्हाला कधी 'महेश महेश ' अशी हाक मारून बोलावतंय असा भास होतो का हो ?? याचे उत्तर कदाचित होयच असेल . . . याच 'महेश ' ने अन नेहमी अडचणीत सापडणाऱ्या लक्षाने आम्हाला हसायला शिकवले . . आज लक्षाचा स्मृतीदिवस . . अगदी विस्मृतीत गेलेला . 'अरे यार ,आज लक्षा असता तर . . . ' असे म्हणत अनेक कट्टे भावनांनी अन आठवणीनी ओलसर केले . त्याचेच संवाद कसेबसे त्याच्याच स्टाइलने फेकायचे केविलवाणे प्रयत्न करत हास्याचे कारंजे उडवले . तो बनवाबनवी करत असताना स्वतःला बनवून घेतले . तात्या विंचू म्हणजेच तो गोष्टीतला बागुलबुवा समजून लहान वयात माहित असलेल्या सगळ्या देवांचे स्मरण केले . . पण तो आपल्यातून कधी गेला हा दिवस मात्र सपशेल विसरलो . . हा दिवस रंगभूमीला अन चित्रपटसृष्टीला आठवणीत असेल पण प्रेक्षकांना आठवण करून दिली तरी पटणार नाही . . कारण लक्षा गेलाय हे कोणाला पटणारच नाही . . तो इथेच कुठेतरी आहे . . जवळपास . . अजूनही हसवतोय . . चौकोनी चेहेरे हलवतोय . . चेहेऱ्यावर रंग लाऊन आयुष्याचे रंग बदलतोय . . तो जाणे शक्यच नाही . . याच 'भावनेला अन भासाला ' आज ९ वर्षे पूर्ण झाली . . .
Now, should we treat women as independent agents, responsible for themselves? Of course. But being responsible has nothing to do with being raped. Women don’t get raped because they were drinking or took drugs. Women do not get raped because they weren’t careful enough. Women get raped because someone raped them.
―
Jessica Valenti
काही घटना या केवळ घटना नसतात . तर त्या जखमा असतात . एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अन संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर , दांभिकतेवर , नैतिकतेवर अन मुल्यांवर पडलेल्या . . . जखमा !! कालांतराने या जखमांचीही प्रतीके होतात , अस्मिता जन्माला येतात , भगभगणाऱ्या वेदना अन ठसठसणाऱ्या संवेदना शांत होतात . . व्यक्ती सावरते . . समाज विसरतो . . पण या जखमांची सुद्धा एक वेगळीच वेदना असते . . ज्या दिवशी त्या घडल्या त्याच दिवशी लोकांना अचानक स्मरण होते . . " अरे बरोबर अमुक वर्षापूर्वी तमुक घडले होते '' पुनश्च आठवणी ताज्या होतात . 'त्या ' दिवसापासून ते 'या ' दिवसापर्यंत काय घडले याचा वार्षिक आढावा घेण्यात येतो . इतर देशांपेक्षा भारत किती उदासीन आहे याबाबत चूकचूक पचपच होते . कालांतराने तीही नाहीशी होते . . हे असेच अनेक वर्षे सुरु आहे . . अव्याहत . . मग ती फाळणी असो , भारत -पाकिस्तान भारत -चीन युद्धे असो , बाबरी मशीद असो , कारगिल युद्ध असो , संसद भवन हल्ला असो , २६ /११ चा दहशतवादी हल्ला असो वा . . . १६ डिसेंबर २०१२ असो . . . घटना घडल्यावर नजीकच्या भविष्य काळा बद्दल प्रत्येक भयभीत होतो . . कालांतराने आश्वस्त किंवा निर्भय होतो . . पण . . ' भय इथले संपत नाही ' . . येणारा प्रत्येक 'उद्या ' एका नवीन प्रश्नाला जन्म देतो . . नव्या जखमांसह समाजाला रुजा देतो , माणसातले माणूसपण खच्ची करतो अन समस्त मानवजातीला प्रश्न विचारतो . . 'मानसा मानसा कधी होशील रे माणूस ?''