Tuesday 16 April 2013

आशा. .

' हो आज ती उठून बसली ' , ' डोळ्याची पापणी हलवली ' , ' मला त्यांनी ओळखले ' , ' वाटीभर भात खाल्ला त्यांनी ' , ' होईल बरे . . डाक्टर म्हणत होते ' , ' आता रगद  तपसायला दिलया काय निघतंय बिरोबाला ठाव पर कौल आपल्याच बाजून लागनार ' आयुष्य आणि मृत्युच्या झोपाळ्यावर हेलकावे खाणाऱ्या जीवाच्या जीवाची काळजी करणारे अनेक जीव . असहाय्य , हतबल पण आशावादी . लहानसहान गोष्टीनी हुरळून जाणारे , आनंदी होणारे . आपण काहीतरी पुण्य कमावले याची खात्री बाळगून देवाला हात जोडणारे . पै पाहुण्यांना फोन करून खुशाली कळवणारे . निराशेलाही आशेची पालवी फुटायला लावणारे आणि त्या पालवीला जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे नातलग . . . दवाखान्यात एक मृत्यूसोबत झुंझत असतो तर दवाखान्याबाहेर अनेक जण आयुष्यासोबत लढत असतात . . केवळ एका आशेवर . . आयुष्य मृत्यूला हरवेल या आशावादावर . . 
                                    या नातलगांची एक वेगळीच मानसिकता असते , वेगळेच विश्व असते . लहान गोष्टींचे सुद्धा अप्रूप असते .यांची सुखाची बेटे आणि दुक्खाचे डोह वेगळेच असतात .ज्याची आपण सधन लोक कल्पनाही करू शकत नाही . एकीकडे आपण अडाणी असल्याची वेदना असते तर दुसरीकडे अडाणी असूनही आपण भारी दवाखान्यात दाखल केले आहे याचे समाधान असते . खिसा फाटका असताना " भारी औषधे द्या , हयगय करू नका ' म्हणण्याचे धारिष्ट्य केवळ त्यांनाच ठाऊक . शेत म्हणजे पॉलिसी आणि शेतीत पैसा ओतून शिल्लक राहिलेले सोने म्हणजे एफ . डी . असलेले लोक दवाखाना कसा पार पाडतात हे मला दीर्घ काळापासून पडलेले कोडे आहे . कोठून आणतात हे पैसा आणि कोठून आणतात आशा ? इंग्लिश ने फरक पडला नाही तर देशी , त्यानेही फरक पडला नाही तर गंडे -दोरे -नवस आणि यानेही फरक पडला नाही तर केवळ वेडी आशा . माझा दादला -मालक -बा -आजा -म्हातारा बरा होईल याची केवळ आशा . इंटरनेट वरून ५ मिनिटात काहीतरी वाचून डॉक्टरच्या ५-८  वर्षाच्या शिक्षणावर आणि कितेक वर्षाच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या इतके हे लोक शहाणे नसतात . किंबहुना दिल्ली -मुंबई -बेंगलोर -विदेश इथे आमचा अमुक तमुक डॉक्टर आहे त्याच्याशी बोला जरा म्हणून स्टेट्स मिरवणारेसुद्धा नसतात . त्यांची असते ती केवळ श्रद्धा डॉक्टरवर . ' डाक्टर काय बी करा पर मानुस वाचवा ' इतकीच काय ती अपेक्षा . .  . 
                                   मळकट टोपी , रफू केलेली विजार ,त्यातल्या त्यात बरा सदरा आणि खांद्यावर टॉवेल टाकून धावपळ करणारे हे नातलग म्हणजे अज्ञानात शहाणपण -सुख याचे उत्तम उदाहरण असतात . डाक्टरचा मेडिकल वाला फार कमिशन मारतो , सकाळी दिलेली dettol इतक्यात  कशी संपली असे व्यावहारिक प्रश्न यांना कधी पडत नाही . मेडिकल चे बिल जास्ती झाले म्हणून कपाळावर आठ्या न पडता हसू येते . कारण आशा असते की डाक्टर ने "भारी " औषध चालू केलय आता काळजीचे कारण नाही .  यांच्या  अंगी असतो तो केवळ सच्चेपण आणि आशा . म्हणूनच आतापर्यंत 'शहाळे ' म्हणजे काय हेही माहित नसलेला तात्या ३० रुपये मोजून नारूळ घेऊन येतो . का ? कारण गाडीतून उतरलेला साहेब घेऊन येतो म्हणजे नक्कीच आराम पडत असणार . आशेला वास्तवाचे बंधन नसते . शेवटचे कधी जेवलो हे वास्तव विसरून रुग्णाला घरचे खायला देण्यासाठी धडपडणारी माणसे बघून मन कासावीस होते . जो जे सांगेल ते करायचा प्रयत्न अंगावर काटा आणतो . इतक सगळ होऊनही रुग्ण दगवलाच तरीही आशा मनात असतेच . म्या किती झटलो पोरानं पाहिलं , त्यो माझबी असच करेल . कपाळावरच कुंकू पुसत बांगड्या फोडून दवाखान्यातच टाहो फोडणाऱ्या आक्कीला तिचा बा सांगतो ' आग का टिपूस गाळतेस , हे प्वार तुला काय बी कमी पडून देणार नाय , बापाच नाव काढेल ' . . पुन्हा एकदा आशा . . वर्तमानाला विसरण्यासाठी भविष्याकडून केलेली आशा . . 
                                 
का जपतो आपण हि आशा ? जी माणसाला वास्तवापासून दूर नेते , मृत्यूलाही जीवनाचे स्वप्न दाखवते , प्रयत्नांना जिद्दीचे बळ देते , तुटलेल्या मनाला आणि मोडलेल्या संसाराला सावरायचा प्रयत्न करते .या आशेवरच तर आपले आयुष्य झुलत असते . वास्तवाचे दाहक चटके सहन करत असते .हीच आशा तर आपल्याला जगवते ,वाढवते , यशस्वी करते आणि सपाटून हरल्यावर जगायचे एक कारण देते  . याखेरीज आपल्या हाती असतेच काय ? म्हणूनच रुग्णाने ओळख दाखवली , थोडे खाल्ले , हालचाल केली तर नातेवाईकांना ' आशा ' वाटते . . क्षणभंगुर पण सुखद . !म्हणूनच "आता सगळे प्रयत्न थकले … आता केवळ आशा आहे चमत्काराची " असा संवाद ऐकला की डोळ्याच्या कडा पाणावतात आणि जीवनाचे सत्य समोर येते , आपण  जगतोही आशेवर आणि मारतोही आशेवर . . पुन्हा जन्म घेण्याच्या , अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याच्या !! 

No comments:

Post a Comment