Saturday 10 March 2012

राहुल द्रविड.....एक दुर्लक्षित राजपुत्र !!


१९७० साली प्रदर्शित झालेल्या "आनंद " चित्रपटात योगेश यांच्या लेखणीतून साकारलेले आणि मुकेश यांच्या आवाजाने अजरामर झालेले "जिंदगी कैसी है पहेली " गाण्यातील "कभी देखो मन नही जागे पीछे पीछे सपनोंके भागे ..एक दिन सपनोंका राही ...चला जाये सपनोंके आगे कहा ..जिंदगी ...." या ओळी राहुल द्रविड यास चपखल बसतात ! राहुल द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेट ला पडलेले सुंदर स्वप्न ...कसोटी क्रिकेट मधील भारताचा मानबिंदू ...अपेक्षा पूर्ण करणारा हुकुमी खेळाडू ,गोलंदाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहून हुकुमी फटका मारणारा तंत्रशुद्ध फलंदाज ...स्लीप मधील अप्रतिम क्षेत्ररक्षक ...अव्वल यष्टीरक्षक ..उत्तम कप्तान आणि प्रतिस्पर्धी संघाचा विजय आणि भारताचा पराभव यामध्ये उभी असलेली खंबीर भिंत ! राहुल द्रविड.....असामान्य कर्तुत्व आणि प्रतिभा असूनही "देवत्वा" पुढे झाकोळली गेलेली कारकीर्द तरीही " तू न थकेगा कभी तू न थमेगा कभी तू न मुडेगा कभी कर शपथ ...."या कवितेप्रमाणे तो चालतच राहिला आणि एक एक यशोशिखरे पार करतच गेला ! राहुल द्रविड...संघाच्या प्रत्येक अडचणीस एकांगी शिलेदाराप्रमाणे लढणारा लढवय्या ...अगदी सलामी करण्यापासून ते गेलेला सामना जिंकण्यापर्यंत सर्व करावे आणि सर्वांनी अवलंबून राहावे ते याच्यावरच ! राहुल द्रविड "बिग ३ " मधील सर्वात महत्वाचा आणि अविभाज्य घटक....कसोटीमधील चौथ्या डावातील आशास्थान ! राहुल द्रविड ...अप्रतिम फूट वर्क , क्षणार्धात होणारी मनगटाची हालचाल आणि बंदुकीतून गोळी बाहेर पडावी असा तंत्रशुद्ध फटका मारून रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शैलीदार फलंदाज ! राहुल द्रविड.....एकदिवसीय सामन्यास अयोग्य असा शिक्का डोक्यावर बसूनही दहा हजारी फलंदाजांच्या पंक्तीत मानाने बसणारी असामी ! राहुल द्रविड....शांत आणि संयत स्वभावामुळे क्रिकेट या खेळास "सभ्यांचा खेळ " का म्हणतात हे सिद्ध करणारा आदर्श खेळाडू ! राहुल द्रविड ....मिडिया मध्ये फारशी प्रसिद्धी नसलेला ,विज्ञापन करण्यात माहीर नसलेला पण "अस्सल " चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा एक प्रतिभावान खेळाडू ...
                       क्रिकेट ! भारतात क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म म्हणून पहिला जातो...प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते ती "निळी " टोपी डोक्यावर घालण्याचे ...प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे , प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते ते विजयात हातभार लावायचे ...हि सारी स्वप्ने मागे टाकून एखादा महान खेळाडू पुढे निघून जातो तेव्हा त्याने मागे ठेवलेल्या पाऊलखुणांवरून त्याची महानता समजत जाते ...उमगत जाते ...असेच काहीसे आज झाले आहे ...राहुल ची कारकीर्द निश्चित तेजोमान होती पण तिला प्रसिद्धीचे वलय मात्र कधीच न्हवते ...अगदी आताच्या इंग्लंड दौऱ्यात खणखणीत ३ शतके ठोकूनही "महाशतक" झाले नाही म्हणून हिरमुसलेल्या चाहत्यांकडून आणि भारत रत्नाच्या शर्यतीत नसल्याने मिडिया कडून दुर्लक्षित झालेला  राजपुत्र ....खेळ आणि खेळावरची निष्ठा हा श्वास आणि तंत्रशुद्धता हा प्राण असलेला फलंदाज म्हणजे कोणत्याही कप्तानास हवा हवासा वाटणारा खेळाडू.....सुरुवात कोणीही कशीही करावी तिसऱ्या क्रमांकावर येऊन खेळपट्टीवर नांगर टाकून लढायची त्याची जिद्द आणि चिकाटी कौतुकास्पद आहे ....मैदानावर त्याचा ताबा क्वचितच सुटला ,शतका नंतरचा आनंद बोटावर मोजण्या इतक्या वेळाच त्याने व्यक्त केला म्हणूनच १९९६ साली पदार्पणाच्या सामन्यातील "लॉर्डस" वर हुकलेल्या शतकाचे (९५ ) स्वप्न जेव्हा त्याने २३/०७/२०११ रोजी प्रतिकूल परिस्थिती मध्ये पूर्ण केले तेव्हा एखाद्या खेळाडूच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती किती आनंददायक असते याचा प्रत्यय सर्व जगास आला ....मितभाषी असलेला राहुल जेव्हा "ब्रॅडमन" व्याख्यानमालेत बोलला तेवा साक्षात क्रिकेट देवता आपल्या समोर क्रिकेट चे अगम्य ज्ञान सोपे करून सांगत आहे असा भास  क्रिकेट रसिकांचे कान तृप्त करून गेला ...असाच होता राहुल.... यशाची धुंदी नाही अपयशाची निराशा नाही कारण हे दिवस पण जातील याची जाण असलेला प्रगल्भ क्रिकेटपटू !
                       कसोटी प्रकारात गोलंदाजाची कसोटी पहावी ती राहुलनेच ! स्टम्प समोर खंबीरपणे उभारलेला ,चेंडूवर नजर स्थिर असलेला ,चेहेऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेला आणि संघाला विजय मिळवून द्यायचाच आहे या चिकाटीने आणि जिद्दीने खेळणारा कसोटीपटू ....३१,२५८ चेंडू कसोटी कारकिर्दीत खेळलेला एकमेव कसोटीपटू ....आजच्या २०-२० च्या जमान्यात पाहण्याचे सुख देणारे फटके आणि वेड लावणारे फलंदाज असे आहेतच किती ? राहुलने दोनीही केले .....कवर ड्राइव  असो वा स्ट्रेट ड्राइव  तो फटका पाहिल्याचे सुख आणि चेंडू BAT च्या मधोमध बसल्याचा सुंदर आवाज ऐकावा तो राहुल च्या फलंदाजीतच ...सचिन आणि व्ही .व्ही   सोबत केलेल्या "स्पेशल " भागिदाऱ्या लाजवाब ...१९९७ साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध ९ तास खेळपट्टीवर टिकून केलेले शतक त्याच्या शारीरिक क्षमतेची प्रचीती देते तर २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध  व्ही .व्ही  सोबत केलेली ३७६ धावांची भागीदारी वेड लावते ...१९९९ ते २००४ काळात १२० डावात एकदाही शून्यावर न बाद व्हायचा पराक्रमही त्यानेच करावा ....एकदिवसीय क्रिकेट मध्ये सौरभ गांगुली सोबतची ३१८ धावांची भन्नाट भागीदारी त्यानेच करावी आणि १९९९ विश्वचषकामध्ये ४६१ या सर्वाधिक धावांचाही विक्रम त्यानेच करावा ....कसोटी असो वा एकदिवसीय सामना ..खेळाचा प्रकार बदलतो ,प्रतिस्पर्धी संघ बदलतो ,चेंडूचा रंग बदलतो  बदलत नाही तो खेळाडूचा "दर्जा" .....दोनीही प्रकारात अप्रतिम कामगिरी करून राहुल भारताच्या आणि जगाच्या क्रिकेट इतिहासात अजरामर झाला आहे ...ज्यांनी २०११ च्या इंग्लंड दौऱ्यातील राहुलची फलंदाजी पहिली असेल त्यांना "अरे आपण देव निवडायला चुकलो का ?" असा प्रश्न निश्चितच पडला असेल कारण सर्व महान फलंदाज हजेरी लावायचे काम करत असताना तो राहूलच होता जो इंग्लिश गोलंदाजांची हजेरी घेत होता ...२००४ साली रावळपिंडी मधील डावाने विजय मिळवून देणारी २७० धावांची खेळी किंवा एकदिवसीय सामन्यातील त्याची सचिन सोबतची ३३१ धावांची तुफानी  भागीदारी त्याची महानता सांगण्यास पुरेशा आहेत.....महान खेळाडूंचे कर्तुत्व त्यांची आकडेवारी पहिली कि अधोरेखित होते ....कसोटीमधील १६४ सामन्यातील ३६ शतके ,६३ अर्धशतके ,५२.३१ ची सरासरी ,२७० सर्वोच्च धावा आणि २१० झेल यांनी सजवलेली १३२८८ धावांची कारकीर्द आणि ३४४ एकदिवसीय सामन्यामधील १२ शतके ८३ अर्धशतके ३९.१६ ची सरासरी आणि १०८८९ धावांची कारकीर्द ,२९८  प्रथमश्रेणी  सामन्यातील २३७९४ धावा, १८ खेळाडूंसोबत ८० शतकी भागीदारी ,सचिन सोबत १९ शतकी भागीदारी ,कसोटी मधील ३६ पैकी २१ शतके परदेशात ,कसोटीमध्ये गांगुलीच्या काप्तानीत जिंकलेल्या २१ कसोटी मधील संघाच्या धावसंखे पैकी २३% धावा राहुल च्या ,२००६ सालची  पाकिस्तान विरुद्ध सेहवाग सोबतची ४१० धावांची भागीदारी,सलग ४ डावात ४ शतकांचा विक्रम करणारा जगातील तिसरा खेळाडू ,  १९९८ चा अर्जुन पुरस्कार , विस्डेन क्रिकेटर ऑफ इअर (२०००)  आई .सी.सी . टेस्ट प्लेअर ऑफ इअर(२००४), आई .सी.सी प्लेअर ऑफ इअर,  (२००४ ),पद्मश्री (२००४) ,आई,सी .सी च्या कसोटी संघाचा कप्तान (२००६) ,पोली उम्रीगर पुरस्कार (२०११) याहून मानवंदना आणि याहून कर्तुत्व एखाद्या खेळाडूचे काय असू शकते ?
                   ९/०३/२०१२ रोजीच्या  आजचा सवाल या कार्यक्रमात श्री .सुनंदन लेले यांनी अत्यंत सुंदर आणि बोलकी प्रतिक्रिया दिली...तिचा आशय असा कि" भारतीय क्रिकेट ची आई निवृत्त झाली आहे ...वडिलांचे कर्तुत्व ते कर्तुत्व असते पण आईचे कर्तुत्व हे तिचे कर्तव्य असते " अंगी सर्व गुण असूनही त्याला गृहीत धरल्याने जागतिक क्रिकेट चे नुकसान झाले आहे असे म्हणायला हरकत नाही....खेळाडू येतात ,प्रदर्शन करतात ,संघात आत बाहेर जातात शेवटी निवृत्त होतात  पण प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनातही स्वतः बद्दल आदर निर्माण करणे आणि पोंटिंग सारख्या समकालीन महान खेळाडूने सल्ला विचारणे  याहून यश ते कोणते ? आज राहुल ने सन्यास घेतल्या नंतर सर्व महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या ..त्यातल्या त्यात आपण ज्याला देव मानतो त्याची प्रतिक्रिया "Is is really tough to become another rahul dravid ...it will not happen overnight " राहुल चे महत्व अधोरेखित करून जाते ........सिनेमा प्रमाणे क्रिकेट चाही नियम असतो "शो मस्ट गो ऑन" याप्रमाणे कोणीतरी खेळाडू येऊन राहुल ची जागा घ्यायचा प्रयत्न करेल , २-४ दिवस सर्वत्र चर्चासत्रे ,राहुल चे गुणगान होईल ...आशिया कप चालू झाला कि परत प्रसारमाध्यमे राहुल ला विसरतील आणि "महाशतक" ची गोष्ट सुरु करतील....चाहतेही हळू हळू त्याला विसरू लागतील....पण क्रिकेट आणि क्रिकेट चा इतिहास तिसऱ्या क्रमांकावर येऊन डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या महान फलंदाजाला कधीच विसरणार नाही....फलंदाज अनेक होतात अनेक होतील पण राहुल सारखा "माणूस " क्वचितच होतो...कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात -
"आणि लक्षात ठेव हा खेळ आहे 
खेळांच्याच नियमांनी बांधलेला 
निर्मळ बिलोरी आनंदात सांधलेला 
आघात करायचा पण रक्त काढायचं नाही 
जीव ओतायचा पण जीवन हरपायचं नाही 
आणि आपल्या अंतरंगातील पंच 
तटस्थ समयसुज्ञ साक्षी 
थांबा म्हणतील त्याक्षणीच थांबायचं 
आणि जवळ जमलेले चंद्राचे तुकडे घेऊन 
आपापल्या अंधारात विलीन व्हायचं !!"
हे त्याच्या लक्षात आलं असाव म्हणून कोट्यावधी चाहत्यांचे प्रेम, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा आदर , संघ सहकाऱ्यांकडून सन्मान  आणि समीक्षकांकडून कौतुकाची थाप घेऊन नेहमीच्या शांततेत एक दुर्लक्षित राजपुत्र २२ यार्ड ची खेळपट्टी सोडून निघून गेला.......

1 comment:

  1. इतक सुंदर विवेचन क्वचितच वाचलय. अभिनंदन.

    ReplyDelete