Saturday 3 March 2012

सेक्सी शब्दाचे करायचे काय ?

एक जुना विनोद होता.....एक मुलगी वजन करायला वजनकाट्या वर उभारते ....जास्ती वजन पाहून पायातील चप्पल काढते ,अजून कमी होत नाही पाहुन खांद्यावरील पिशवी खाली ठेवते ,अजून कमी होत नाही म्हणून अंगातला स्वेटर काढून ठेवते आणि तिच्या हातातील नाणी संपतात ....अशा वेळी कोपऱ्यात शांतपणे उभा राहून हा प्रकार पाहणारा तरुण तिला म्हणतो "तुमचे चालुद्या माझ्याकडे भरपूर नाणी आहेत " आता या वाक्याचा अर्थ काय काढायचा ? म्हणजे त्याला त्या तरुणीला खरच मदत करायची आहे का आपले आंबट शौक पूर्ण करून घ्यायचे आहेत हे समजणार कसे ? तसेच काहीसे "सेक्सी" या शब्दाचे झालेले आहे ....NCW CHAIR PERSON ममता शर्मा यांनी जयपूर मध्ये "  "sexy" meant "beautiful and charming" so it should not be taken in a negative sense." अशा आशयाचे विधान करून त्यांची वैचारिक पातळी काय आहे आणि समाज नितीमत्तेपासून कसा झपाट्याने बाजूला जातोय  याचे  उत्तम  उदाहरण  दिले आहे ... सेक्सी या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ कामभावना चेतवणारा /चेतवणारी एखादी व्यक्ती किंवा घटना असा घेतला जातो....आता कोणी तुम्हाला अशा विशेषणाने संबोधले तर तुमची अवस्था निश्चितच वजन करणाऱ्या मुलीसारखी होईल ..कारण शब्द समजत आहेत पण त्यामागचा अर्थ आणि अर्थामागची भावना मात्र समजत नाही आहे ....

                                       भारतीय संस्कृतीने नेहमीच कुटुंबप्रधान आणि संस्कारिक जीवनशैलीचा पुरस्कार केला आहे ...आयुष्याचे ४ आश्रमात विभाजन करून मनावर संयम आणि ताबा ठेवला आहे ...अगदी एखाद्या स्त्रीकडे कामयुक्त नजरेने पहिले तरी ब्रह्मचार्याचा नाश होतो असे मानले आहे (ब्रह्मचार्याचे ८ प्रकार ) याचे कारण काय ? जनावरात हि काम आहे आणि मानवात हि काम आहे ....मग कामावर नियंत्रण का ठेवायचे ? कारण पशूंचा जन्म केवळ कामासाठी झाला आहे तर मानवाचा जन्म हा कर्मा साठी झाला आहे ...अगदी काम शास्त्रा मधेही कामाचा  मूळ उद्देश हा "उत्तम प्रजेच्या जन्मासाठी " असाच सांगितलेला आहे .....मानवी शरीरात सर्व धातूंचे सार "ओज " धातूस मानण्यात येते ...शुक्रक्षय झाला कि ओजाचे प्रमाण कमी होते व मानवाची  सत्वाकडून रज आणि तम या दोषांकडे वाटचाल सुरु होते म्हणूनच शुक्र संचय यास भारतीय संस्कृतीमध्ये महत्व आहे ... याच कारणाने घरात ,जवळच्या नात्यात लैंगिक गोष्टींवर व्यापक चर्चा होत नाही ,लैंगिक चर्चा  हि भारतीय समाज मनापासून स्वीकारत नाही म्हणून शाळेत लैंगिक शिक्षण असावे का नसावे यावर चर्चासत्रा पलीकडे काही होत नाही ....  


                               स्वातंत्र्य मिळाले ...वैचारिक आणि आचारिक स्वैराचार वाढू लागला ..समाजाची वाटचाल रुग्वेदाकडून कामवेदाकडे होऊ लागली आणि आताच्या युगास कलियुग का म्हंटले जाते ते सिद्ध होऊ लागले (अर्थात आधी असे काहीच न्हवते असे म्हणणे म्हणजे मी उठल्यावर सूर्य उगवला असे म्हणण्या इतके धाडसाचे ठरेल पण जे होते ते बऱ्याचश्या संस्काराच्या आणि समाजाच्या चौकटी सांभाळून होते ) त्यामुळे आपल्या आचार आणि विचाराच्या मध्ये ज्या गोष्टी येतात आणि जे लोक येतात त्यांना "मनुवादी " म्हणायची हिडीस पद्धत आपल्या समाजात रुजू झाली....भारतीय समाजाला कितीही पुरुष प्रधान म्हंटले तरी संस्कृती मध्ये स्त्रियांना योग्य तो आदर आणि मान नेहमीच मिळाला आहे ..अगदी मैत्रेयी ,गार्गी पासून हि परंपरा आहे ...स्त्रियांचे वर्णन हि शाकुंतल पासून ते आयुर्वेदापर्यंत सर्वत्र झाले आहे पण त्या कशालाही "कामाची " किनार न्हवती....अर्थात त्यांच्या अनुयायांनी ती लावायचा प्रयत्न केला असेल तर त्याला शास्त्र जबाबदार नाही ....अशा स्त्री ला खाजगी मध्ये ज्या नावाने संबोधण्यात येते अशा नावाने सार्वजनिक रित्या संबोधले जायला लागले तर स्त्रियांनी करायचे काय ? सेक्सी  म्हणजे सुंदर हे कोठपर्यंत ठीक आहे ? पत्नी ,प्रेयसी किंवा अगदी फारच जवळची मैत्रीण....उद्या जर बहिण किंवा काकू मावशी चांगले कापडी परिधान करून आली तर म्हणायचे का कि आज फार....... ? ? इतका हुच्चपणा अजूनतरी आपल्या समाजात नाही तो यावा म्हणून कोणी प्रयत्न करू नये ..स्त्रियांचा असा हलाखीचा काळ होता आणि काही प्रमाणात अजूनही आहे कि त्यांना भोग घ्यायची वस्तू समजले जायचे .." पाखरू आलंय वाड्यावर " असे संवादही सिनेमा मध्ये असायचे परंतु स्वकर्तुत्वाने आज स्त्रिया इतक्या अत्युच्च पातळीवर पोहोचल्या आहेत कि समाजास त्यानाही काही स्थान आहे ,त्यांचे विश्व आहे ,त्यांची मते आहेत आणि त्यानाही एक मन आहे हे पटायला लागले आहे ...असे सकारात्मक बदल होत असताना पुन्हा त्यांना शून्यावर नेऊन उभे करायचे याहून वैचारिक क्षुद्रपणा तो कोणता ?
                                    सेक्स या शब्दास अजूनही आपल्या संस्कृतीने स्वीकारले नाही आहे ..माझ्या घरचे उदाहरण म्हणजे नलिनी जमाल याचे "सेक्स वर्कर " हे पुस्तक माझ्या हातात पाहून घरच्यांची प्रतिक्रिया काय होती मी सांगू नाही शकत ...कोणत्याही प्रदर्शनात गेले कि या विषयावरची पुस्तके पहिली जात नाहीत , आपल्या छोट्या /छोटी ला सिनेमाला न्हेताना त्यात "तसलं" काही नाहीये न याची आधी खात्री करण्यात येते .....आणि यात बदल व्हायला हवा असे माझे तरी मत नाही...कारण हे काही "ब्रह्म ज्ञान " नाही कि ते मिळाले नाही कि "मोक्ष " मिळणार नाही ...वय वाढेल तसे ,समज येईल तसे हे समजतच जाते ..पण मूळ शब्दांचे अर्थ त्या मागचा असणारा भाव बदलून त्यास सोज्वळ रूप देण्याचा प्रयत्न एका "स्त्री " ने करावा यासारखी लाजिरवाणी घटना  नाही .... नुकतीच तारुण्यात आलेली मुलगी समाजाच्या नजरा सहन करू शकत नाही तर शब्द काय सहन करणार ? स्त्रियांविषयी बोलताना त्यांच्या मनाचा ,त्यांच्या मानसिकतेचा आणि समाजातील स्थानाचा विचार करूनच बोलले पाहिजे याचा विसर पडणे शोभनीय नाही .... 

No comments:

Post a Comment