Wednesday 28 March 2012

सुटलेला संयम...... !

 एका भल्या मोठ्या देशावर एक राणी राज्य करत असते ....कमी होत असलेला पैसा ,वाढत चाललेली महागाई ,वाढत असलेली गरिबी ,वाढत असलेला भ्रष्टाचार ,राणीच्या मंत्री मंडळातील सदस्यांचे घोटाळे , देशातून विदेशात वाहणारी काळ्या पैशाची गटार आणि सामान्य माणसास दिवसास ३० रुपये पुरतात ,म्हणून राणीने केलेली थट्टा, राणीच्या कारभारातील शिपाई ,हवालदार ,कोतवाल ,पट्टेवाले ,चोपदार यांच्याही कोट्यावधी च्या उड्या या सर्वाने त्रासलेला एक वृद्ध या भ्रष्ट कारभाराचा अभ्यास करतो , जनतेचे प्रश्न -समस्या एका कायद्यात मांडून तो कायदा डोक्यावर घेऊन देशाटन करत राहतो ....वाटेत लोक त्या कायद्याला पाहून ,आपल्या समस्या हा मांडणार आणि आपली सुटका करणार या आशेने त्याला नमस्कार करू लागतात , त्याच्याबरोबर सामील होतात ,आता सरकार आणि सरकारी लोकांची मानसिकता बदलणार अशी भाबडी अशा ठेवायला लागतात पण हा लोकांचा प्रतिसाद पाहून त्या व्यक्तीला वाटू लागते कि लोक मलाच नमस्कार करत आहेत ,कायद्यापेक्षा ,देशापेक्षा ,देशाच्या नियमांपेक्षा मी मोठा आहे ...सार्वभौम आहे ! याचा उन्माद येऊन बेताल वक्तव्ये करू लागतो आणि नेताच असे वागतो म्हणून कार्यकर्ते पण फुकाचे अवसान आणून त्याची री ओढू लागतात आणि या बोल बच्चन पणात जनतेच्या पदरी मात्र पुन्हा भोपळा येतो ......

                                      भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळ उभी करून सर्व देश एकवटून दाखवणाऱ्या अण्णा हजारे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे ... बाबा आमटे म्हणायचे " झोपले अजून माळ तापवित काया असंख्य या नद्या अजून वाहतात वाया अजून अपार दुक्ख भोगताहे अजून हा प्रचंड देश भिक मागताहे " खरच देशाबाहेर जितका पैसा जातो तितका देशात राहिला तर भिक मागण्या ऐवजी भिक देण्या इतकी परिस्थिती नक्कीच सुधारेल ... या विरोधात अनेक लोकांनी आवाज उठवला पण प्रथमच संघटीत लढा आणि शक्तीचा परिपाक दाखवण्याचे श्रेय अण्णा यांना द्यावेच लागेल .. पण एखादी ताकद हाती आल्यावर जबाबदारी पण तितकीच मोठी असते हे दुर्दैवाने त्यांना व त्यांच्या  टीम ला समजले नाही.....ज्या गांधीवादाचा पुरस्कार करतात त्या गांधींची ३ माकडे सोयीस्कर रित्या विसरले .... मनाला हवे ते ,वाटेल ते वक्तव्य करू लागले आणि करत आहेत ... अशी व्यक्तव्ये वैफल्यग्रस्ततेतून येत असतात ...जंतर मंतर वर उभारलेला अभूतपूर्व लढा पण मुंबईत झालेला सपशेल पराभव , लटकलेला लोकपाल , निवडणुकीत न दिसलेला प्रभाव ,टीम मधील एकीचा अभाव , अनेक जाणकार मान्यवरांनी दिलेला नारळ आणि प्रसार माध्यमांनी फिरवलेली पाठ या कारणाने टीम सध्या वैफल्यग्रस्त झालेली दिसत आहे ...चर्चेत राहण्यासाठी काहीही बेताल वक्तव्ये करत प्रसिद्धीत राहायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे ..लोकपालाचा मुद्दा कितीही चांगला असला , लढा कितीही गरजेचा असला ,भ्रष्टाचारा विरोधात केलेली जागृती कितीही मोलाची असली आणि वैयक्तिक अण्णा कितीही शुद्ध चारित्र्याचे असले तरी या सर्व गोष्टी सभ्यतेच्या आणि संयमाच्या कोंदणात शोभून दिसतात ..... हे कोंदण टीम अण्णा ने सुरुवातीपासून सोडलेले आहे ..आपण जे वागतो आणि जे बोलतो ते बरोबरच आहे आणि त्याला कोणी विरोध केला तर त्याला जनता विरोध करेल अशा कल्पनाविलासात रममाण झालेली टीम अण्णा ! लालू प्रसाद यादव यांच्यावर त्यांच्या मुलांवरून केलेली लैंगिक टीका असो ,जंतर मंतर वरील बेदी बाईंचा वाचाळपणा असतो , शरद पवार यांचेवरील हल्ल्या नंतर एकही मारा अशी निंद्य प्रतिक्रिया असो , छोटा हनुमान केजरीवाल यांचे संसदेत बलात्कारी /भ्रष्टाचारी आहेत असे वक्तव्य असो किंवा परुळेकर यांचेवर झालेली खाजगी टीका असो ...टीम अण्णा यांचा संयम वारंवार सुटलेला दिसतो आणि ते निश्चित स्वीकारण्या सारखे नाही ,आणि त्याहून निंद्य म्हणजे केलेल्या विधानाचे काहीही न वाटायचा कोडगेपणा ...एखादे विधान चुकून झाले असेल व बोलण्याच्या भरात सुटले असेल ( अर्थात हे राष्टीय पातळीवर राष्ट्राचे प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्या लोकांकडून अपेक्षित नाहीच तरीही ) तर नंतर त्या विधानाची माफी मागितली किंवा परत घेतले तर सभ्यपणा दिसू शकतो पण तो दाखवण्याची तसदी टीम कधी घेत नाही हे खेदजनक आहे !!
                                      कोणताही लढा हा जसा रण भूमीवर लढायचा असतो तसेच तो वैचारिक भूमीवरही लढायचा असतो ... रण भूमीवरील पराभव लोकांच्या विस्मृतीत सहजतेने जातो पण वैचारिक पातळीवरील पराभव हा जनमानसाच्या मनावर कोरला जातो ...युद्धे हि कधीच लक्षात ठेवली जात नाहीत कारण कालानुरूप युद्धाचे प्रकार , लढायचे मार्ग ,आणि कारणे बदलत राहतात लक्षात राहतात ते विचार कारण विचारात काल बदलायची क्षमता असते ताकत असते ....त्यामुळे लोकपाल संमत व्हावा हि साऱ्यांची इच्छा आहे , त्यासाठी लढायची सर्वांची तयारी आहे , तो अमी सांगतोय तसाच संमत व्हावा हि हुकुमशाही आहे आणि तो संमत होत नाही म्हणून संयम सोडून बरळणे हा वैचारिक आणि तात्विक पराभव आहे ....कारण लोकपाल आला किंवा नाही आला तर भ्रष्टाचार संपेलच असे खात्रीने कोणही सांगू शकत नाही ..गरजेचे आहे अण्णा यांचेबद्दलचा आदर कायम राहणे ...... त्यासाठी सर्व टीम अण्णा ने " इतनी शक्ती हमे दे  ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले नेक रस्ते पे हमसे भूलकरभी कोई भूल हो  ना" या गाण्याचा आदर्श घ्यावा आणि संयमाची चौकट न सोडता लढा सुरु ठेवावा ....आम्ही आहोतच सोबत ...

No comments:

Post a Comment