Friday 2 March 2012

मला भाजी विकायची आहे ....

 प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असते कि आपल्या मुलाने शिकावे ,सुसंस्कृत व्हावे ,एक चांगला माणूस व्हावे आणि आपण निर्माण केलेले विश्व सांभाळावे आणि वाढवावे .....आधीच्या २ पिढ्या डॉक्टर असल्याने व मला पण आवड असल्याने मी डॉक्टर झालो,सुसंस्कृत  आणि चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करत आहे हे पाहून साहजिकच आईला स्वप्न पडू लागले कि मी आता वडिलांचा दवाखाना सांभाळणार आणि तिची इच्छा पूर्ण करणार....४-५ दिवस हातात अभ्यासाचे पुस्तक न दिसल्याने अस्वस्थ होऊन ६ व्या दिवशी तिने "वरच्या सा" मध्ये विचारले " काय ? काय ठरवलंय पुढे ?" .....थोडासा बिचकत ,घाबरत ,आईचा हात आणि माझा गाल यात यात सुरक्षित अंतर आहे ना याचा अंदाज घेत आणि तिच्या हातात झाडू ,लाटणे ,पट्टी ,पायात चप्पल नाहीयेना याची खात्री करत बोललो " आई आतापर्यंत तू -बाबा म्हणाल तसे वागलो ,शिकलो आता मला माझ्या मनासारखे वागायचं .....मला भाजी विकायची आहे ...." "कोणतेही काम वाईट नसते ,अगदी चांभार हो पण गावातला सर्वोत्तम हो " अशा गोष्टी तात्पर्यासह सांगणे सोपे असते पण "आपल्या कार्ट्याने त्या इतक्या मनापासून ऐकल्या आणि मनावर बिम्बवल्या आहेत " हे स्वीकारणे खूप कठीण असते ........

                           धक्क्यातून सावरल्यावर ,मी आणून दिलेले पाणी पिऊन थंड झाल्यावर संतांचे प्रवचन ऐकायला गेल्यावर सामान्य माणूस ज्या उत्सुकतेने "आता हे काय बोलणार " म्हणून पाहत असतो त्याच उत्सुकतेने ती माझ्याकडे पाहू लागली त्यामुळे अधिक वेळ ना घालवता मी बोलू लागलो...." हे बघ अगदी सोपे आहे...मी मुंबई ला जाईन... "विले पार्ले " मध्ये एक भाजीचा ठेला चालू करेन ....२-४ वर्ष हे करत असताना स्थानिक नगरसेवक,आमदार यांच्याशी ओळख वाढवून भविष्यातील गुंतवणूक करून ठेवेन .....मराठी मतांची फाटाफूट होत असल्याने ती एकत्र आणण्या साठी कोणाला तरी माझी गरज लागेलच....लगेच नगरसेवक ,त्यांनतर आमदार, गृह खात्याचे राज्य मंत्रिपद ,मुंबई पक्ष कार्यालयाचे  अध्यक्षपद आणि मग कोटीच्या कोटी उड्डाणे ..अग पैसे मोजून मोजून दमशील पण पैसे संपणार नाहीत.....जाताना टोपलीतून भाजी घेऊन जाईन येताना टोपलीतून पैसे घेऊन येईन...जवळपास ३०० कोटी तरी मी निव्वळ नफा कमवेन.... "अर्थात मी ज्या शाळेत शिकलो  होतो ती शाळा तिनीच शिकवली  असल्याने तिला सर्व प्रकरण समजले ,जीव भांड्यात पडला आणि सुस्कारा टाकून देवासमोर साखर आणि उदबत्ती लावायला शांतपणे निघून गेली .. ( मुलगा भरकटला नाहीये याचा आनंद नको का साजरा करायला ?) 
                          खरच एखाद्याला सांगितले कि अरे तू भाजी विक "कोटी " मिळवशील....वेड्यांच्या इस्पितळात  दाखल हो हा सल्ला आणि वर २-४ उत्तम मानसोपचार तज्ञांचे संदर्भ देण्याची आपुलकी ..त्यात कहर म्हणजे "माझे नाव सांग सवलत मिळेल " हि माणुसकी नक्कीच वाट्याला येईल....पण कृपा शंकर यांचे आकडे पहिले कि मी घरात आणलेले कांदे ,बटाटे नीट पाहून कापतो ...चुकून एखादे सोन्याचे नाणे ,हिरा पडला तर ? विनोदाचा भाग सोडला तर १९७० साली मुंबई मध्ये "भाजी विकायला आलेल्या " कृपाशंकर यांची २०१२ मध्ये ३०० कोटी पेक्षा जास्ती मालमत्ता होते याला कृपा यांचे कसब म्हणायचे ? त्यांचे नशीब म्हणायचे ? लोकशाहीची थट्टा म्हणायची ? कि न्यायव्यवस्था खरच आंधळी आहे आणि पोलीस खाते राजकारणी लोकांची बटिक आहे यावर शिक्कामोर्बत करायचे ? त्यांचे आकडे पहिले तर पत्नीच्या खात्यात २००९ मध्ये ३ कोटी  ४० लाख ,मुलाच्या खात्यात २ वर्षात ६० कोटींची उलाढाल , विले पार्ले मध्ये २.५ कोटी ची सदनिका , उत्तर प्रदेश मध्ये २ कोटीची स्थावर मालमत्ता ..वांद्रे येथे ४० कोटींची तरंग सदनिका ,बी .के .सी. मध्ये २२,५०० चौ.फुट . क्षेत्रफळाचे ११२ कोटीचे कार्यालय ,२०१२ च्या महानगरपालिकेत तिकीट वाटपात किती दाबले माहित नाही, मधु कोडा यांच्यासह किती खाल्ले त्याचे आकडे अजून यायचे आहेत....आता इतके गांधी घरात असल्यावर गांधींचा पक्ष सोडून जायला कोणाला आवडेल का ?
                        कुसुमाग्रज म्हणतात "माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखा शाप नाही ,पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगळ,इतके दुक्ख्दायक इतके भेसूर दुसरे पाप नाही " मी त्यात आणखी वाढवेन कि आपल्याच बंधू भगिनींचे (भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत...) गोचीडीसारखे रक्त पिणाऱ्या नराधमांचे पृथ्वीवर असणेच सर्वात मोठे पाप आहे ....मुलाच्या शिक्षणास कामी येतील म्हणून मोलमजुरी करून ४ पैसे बाजूला टाकणारी बाई,मुलीच्या लग्नात उपयोगाला येतील म्हणून आपली स्वप्ने बाजूला सारून पैसे ठेवणारे वडील,म्हातारपणी कामी येतील म्हणून तरुणपणीच्या ५-६ गरजा कमी करून बँकेत पैसा टाकणारे आणि या काट कसरीतुनही कर वेळेवर भरणाऱ्या जनतेचा पैसा या डुकरांना चराऊ कुरणासारखा वाटतो ....आणि आपणही वेडेच असतो कि आपल्या "कृपेचा " "हात " यांच्यावर वारंवार ठेवत असतो....कृपाशंकर यांनी राजीनामा दिला तो मुंबई पराभवाच्या कारणाने ...खाल्लेल्या पैशाची  ना त्यांना लाज ना तमा ...अजून त्यांना अटकही नाही झाली ..हीच का लोकशाही ...लोकांचे लोकांनी लोकात वाटून खावे याचा पुरस्कार करणारी ?
                       
 आयुष्यभर कितीही प्रामाणिक कष्ट केले तरी कदाचित  ३०० कोटी नाही मिळवू शकणार मी ..पण ३० लोक जरी मला माझ्या "माघारी " चांगले म्हंटले तर ३००० कोटी मिळवले असे समजीन ...कारण ते संस्कार असतात ,ते शिक्षण असते जे सदाचार आणि दुराचार यात अंतर पाडते....निसर्ग हा मोठा गुरु आहे ..शाळेत जाऊन ना शिकलेले पण निसर्गाच्या सानिध्यात राहून बरच काही शिकतात फ़क़्त शिकायची इच्छा आणि पहायची दृष्टी हवी...भारत अजून विकसनशील देश का आहे कारण भारतात विकास फ़क़्त राजकारण्यांचा होतो आणि जनतेच्या हातात मतासाठी ५०० रुपये पडतात जे ५ वर्ष पुरवावे लागतात ...आपली परिस्थिती रामायणातल्या सीते सारखी किंवा  महाभारत मधल्या द्रौपदी सारखी आहे ...युद्ध राम जिंकला काय रावण....कौरव जिंकले काय किंवा पांडव "सीतेच्या /द्रौपदीच्या आयुष्यातील वनवास कधीच संपत नाही....खुश आहे माझ्या क्षेत्रात मी कारण माझे शास्त्र मला शिकवते ....
"क्वचित् धर्मः क्वचिन्मैत्रि क्वचिदर्थ : क्वचिद्यशयः 
कर्मभ्यसः क्वचिचेति चिकित्सा नास्ति निश्फ़ला  "

हे संस्कार नसते तर मी पण ओरडलो असतो....कांदे घ्या कांदे.......

1 comment:

  1. अतिशय सुंदर शब्दांत मांडणी केली आहेस्

    ReplyDelete