Sunday 26 February 2012

"शिवशाही आणि लोकशाही "


"त्या अनोळखी प्रदेशात केव्हातरी
घनदाट अरण्याने वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात
हिंडताना मानवेंद्र शिवाजी राजा ...
तुझ्या मनात विचार चमकला असेल
शतखंड झालेल्या भारताच्या या तुकड्यांना मी भरून टाकेन
श्रींचे राज्य उभारेन..........
भारतात आणि महाराष्ट्रात हिरवे वादळ वेगाने घोंगावत असताना..अनेक मंदिरांच्या कळसाचे घुमट होत असताना ,घरची अन्नपूर्णा जनानखान्यात लाचारीचे जीवन जगात असताना,लुटले जाईल म्हणून कन्या तर सोडाच पण गवताच्या पात्याला आणि धान्याच्या दाण्याला उगवायची भीती वाटत असताना,आपल्याच लेकरांची कलेवरे किती काळ वाहायची म्हणून नदीही दुखी असताना हे गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधिश्वर राजाधिराज शिवाजी राजा हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलेस !! श्रींची इच्छा,मातोश्रींची आज्ञा,संतांची आशा  ,माता भगिनींचे नवस ,आणि सामान्य जनतेने फ़क़्त स्वप्नात पाहिलेले ,अगदी परकीय शत्रूनही हेवा वाटावे असे  हिंदवी स्वराज्य स्थापलेस ...मंदिरांच्या घुमटाचे पुन्हा कळस झाले पण घुमटाची विटंबना न होता,घरची अन्नपूर्णा पुन्हा घरात मानाने नांदू लागली ,गायीच्या वासराचा हंबरडा पुन्हा ऐकू येऊ लागला ,घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून गाव सोडून पाळणाऱ्या लोकांना आता टापांचा आवाज गन्धर्वस्वर वाटू लागला संतांची कवने व वासुदेवाची भूपाळी पुन्हा महाराष्ट्रभर घुमू लागली ...हिंदू धर्मावर श्रद्धा आणि इतर धर्मांचा स्वधर्माइतकाच आदर राखत आदर्श महाराष्ट्र राज्य उभारलस !! राजकारण ,समाजकारण .धर्म ,न्याय ,आक्रमण व सबुरी याचा सर्वोच्च मिलाफ साधत विश्वकर्म्याला महाराष्ट्राच्या धरतीवर इंद्रप्रस्थ बांधायला भाग पडलास....एक एक दगड व एक एक माणूस पारखून महाराष्ट्रात दुर्ग व नरदुर्ग उभारलेस ..दोन्हीही अभेद्य आणि स्वामिनिष्ठ ..पण म्हणतात न माणूस जाताना त्याची पुण्याई सोबत घेऊन जातो ..राजा तू गेलास आणि फंद फितुरीचे पिक पुन्हा वेगाने वाढू लागले ..शंभू राजांचा घात झाल्याने महाराष्ट्र तर पोरकाच झाला...
              गुलामगिरीत जन्मलेला ,हुजुरेगीरीत वाढलेला आणि वतनदारीत /सरदारकीत रमलेला आपला समाज आणि पर्यायाने महाराष्ट्र . कधी मोगल तर कधी निजाम यांच्या चाकरीत धन्यता मानणारा आणि स्व त्वाचा विसर पडलेला आपला महाराष्ट्र परकियांच्या ताब्यात अलगद गेला..."यदा यदा हि धर्मस्य ..." म्हणत आणि "राजे पुन्हा जन्माला या " म्हणत अत्याचार सहन करत राहिला...प्रत्येक समाजाची ,प्रदेशाची एक मानसिकता असते ..त्याचा प्रत्यय त्या समाजाच्या सांघिक व वैयक्तिक प्रयत्नांतून येत असतो..आपला समाज व्यक्तिकेंद्रित आहे ..आपण सामाजिक सांघिक पातळीवर नेहमीच असंघटीत असतो ..कोणीतरी येईल आणि मला वाचवेल या आशेवर वाट पाहत राहतो आणि आपली वाट लाऊन घेतो...दीड शतक परकीयांचे राज्य सहन केल्यावर अखेर फाळणीच्या जखमेसह आम्हाला स्वातंत्र्य मिळाले  आणि आमच्या पथ्य पुस्तकात एक धडा समाविष्ट झाला ......."लोकशाही "
              अजाणतेपणी आम्ही कधी "जाणता राजा " कधी वाचलाच नाही वाचल्या त्या फ़क़्त सनावली ....कारण शिवशाही आमच्या रक्तातच होती आणि आहे ...कोणी कधी स्वतालाच टोचून "पाहू माझे रक्त किती लाल आहे "असा वेडेपणा करत नाही ..नागरिक शास्त्रातील लोकशाही मात्र आम्हाला नवी होती...मोठ्या इमाने इतबारे आम्ही दोन्ही "शाह्या"अभ्यासल्या ...पण जसे अजाणतेपाणाकडून जाणतेपणाकडे संक्रमण व्हायला लागले तसे शाळेत शिकवलेले सर्वच मिथ्या वाटू लागले ..तत्व ,ध्येय ,नितीमत्ता ,आचार ,निष्ठा ,संस्कार यांचे इतके वेगाने झालेले पतन पचवायला थोडे जडच गेले...शिवशाही चा आदर कितेक पटीने वाढला पण लोकशाही च्या व्याख्या मात्र बदलल्या ... "मोगल,कुतुबशाही ,निजामशाही ,आदिलशाही ,कुतुबशाही यानंतर जी येते ती लोकशाही व या सर्व शाह्यांहून वेगळी असते ती शहजीपुत्र शिवाजी ची शिवशाही "
             लोकशाही ची तऱ्हाच न्यारी ..नियम फ़क़्त कागदावर आणि कारवाई फ़क़्त न्यायालयाच्या निकालावर ! जितके कुप्रसिद्ध तितके सुप्रसिद्ध या नीतीने चालणारी शाही ...प्रत्येकाचे घर काचेचे आणि प्रत्येक जण अव्वल नेमबाज...कोणी कोणाच्या घरावर दगड मारायचा ?हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला ...पण लोकशाही चा एक फायदा आहे ..तुम्ही पुन्हा जन्म खरच घेतला तर स्वराज्याची घडी बसवण्यासाठी सुरतेवर छापा टाकायची गरज नाही...बद"सुरत" ची पुन्हा खूब "सुरत " कुशल राजकारण्यांनी केली आहे ..आणि आपल्या महाराष्टाला सुरत आहे का पहावी लागत आहे ..इतका पैसा आणि सुबत्ता गेली कोठे ? काही जिल्ह्यातला सरदारांच्या चौ सोपी वाड्याच्या तळघरात सोन्याचा धूर ओकणारी धुराडी आहेत ,सोन्याच्या अनेक लंका ,अनेक सुरता तुम्हाला इथे सापडतील फ़क़्त खणायची बाकी आहे ...तिरुमला चा तिरुपती ,पद्मनाभ स्वामी यांचा पैसा कमी भरेल अगदी कुबेरालाही भोवळ येईल इतका पैसा संचित करून ठेवला आहे ..काय करायचे शिवशाहीत भ्रष्टाचार,अनागोंदी,स्व राष्ट्राशी गद्दारी ,बेईमानी करणाऱ्यास तोफेचे तोंड,हत्तीचा पाय किंवा टकमक टोक दाखवले जायचे....लोकशाहीत नगरसेवकपद,आमदारकी ,खासदारकी ,मंत्रिपद दाखवले जाते !!
              राजे तुम्ही शिवशाही वाढवली ती दुर्ग आणि नरदुर्ग यांच्या जोरावर ...तानाजी ,येसाजी,जीव,बहिर्जी,बाजी,मुरारबाजी अहो किती नवे घायची ?लेखणी थिटी पडेल....राज्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आणि राज्यांचे स्वप्न म्हणजे प्राण समजून तळहातावर जीव घेऊन लढणारी ,अंगावर झालेला वार अलंकाराप्रमाणे मिरवणारी ,लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून मारतानाही ५ १० गनिमांना गारद करणारी पिढी याच महाराष्ट्रात जन्माला आली होती का असा प्रश्न आता पडू लागला आहे ...जीवाची पर्वा न करता लढायचे ,जीव राहिला तर राजाने दिलेली कौतुकाची थाप, मानाची वस्त्रे  किंवा सोन्याचे कडे मिळाले तर आयुष्याचे सार्थक झाले मानणारी पिढी शिवशाहीतच संपली ...उलट शिवशाहीत ज्यांना वतनदारी ,देशमुखी न मिळालेल्या अतृप्त आत्म्यांनी लोकशाहीत जन्म घेतला कि काय असे वाटू लागले आहे ..आता जर त्यांना लढायला पाठवायचे म्हंटले तर नगरसेवकपद,दुधसंघ ,साखर कारखाने ,राज्य सहकारी बँक ,वाळूचा ठेका किंवा जिंकलेल्या प्रदेशाच्या वार्षिक उत्पन्नाची टक्केवारी असे आमिष दाखवायला लागते ...ते दाखवून जरी एखादा गेला आणि निम्म्या वाटेवर मोबाइल वर दुसरा प्रस्ताव आला तर निष्ठा बदलायला वेळ नाही लागणार ..काय करायचं लोकशाही आहे...लोकांचे लोकांनी लोकात वाटून खावे असा इथला अलिखित नियम आहे !!
             ज्या किल्ल्यांवर शिवशाहीत तुम्ही राज्य केलेत ते अस्तित्वाची लढाई कशीबशी जगात आहेत ..लोकप्रतिनिधींच्या घरांची वर्षातून २-४ दा डागडुजी होते पण किल्ल्यांची शतकानुशतके होत नाही..होतात त्या फ़क़्त घोषणा ...ज्या किल्ल्यांवर कधी मनाच्या नौबती झडत ते आज ओस आहेत...ज्या किल्यांवर शिधेची ,शास्त्रांची आणि शास्त्राची रास असायची तेथे दारूच्या बाटल्यांचा खच असतो...ज्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी मावले नेमले आता त्याच किल्ल्यांच्या "पावित्र्याचे " संरक्षण व्हावे म्हणून गस्त घालावी लागते ...किल्ल्यांच्या मातीला आजही लाल रंग लागतो ..पूर्वी मावळ्यांच्या रक्ताचा लागायचा आता गुटखा/पानाचा लागतो...आजही किल्ल्यांच्या शिळांवर लिहिले जाते ..पूर्वी "सेवेच्या ठाई तत्पर " लिहिले जायचे आता युगुलांची नावे लिहिली जातात ...काय करणार लोकशाही आहे !!
            शिवशाहीत तुम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन केलेत ते सर्व धर्मांचा आदर राखून....मंदिरे वाढवलीत ती इतर प्रार्थना स्थळांना संरक्षण देऊन....तुम्ही तर सार्वभौम राजे तुम्हास शिवधर्म काढणे काही कठीण होते का ? तुम्हाला याची जण होती कि कोणताही धर्म विनाश ,भेद किंवा आत्मघात शिकवत नाही...कोणत्याही महान विचारांची,धर्माची विटंबना त्याच्या अनुयायांकडूनच होत असते ..त्यामुळे आशा अनुयायांवर अंकुश ठेऊन  तुम्ही शिवशाही वाढवलीत...लोकशाहीत प्रत्येक धर्माच्या ,जातीच्या वेगवेगळ्या टोळ्या असतात ..एखादा गड जिंकायचा असेल तर गडाच्या आसपास कोणत्या धर्माचे प्राबल्य आहे ,आपण हल्ला केला तर तो समाज रुष्ट होणार नाही न याचा अभ्यास केला जातो...सैन्याची नेमणूक जाती व धर्माच्या आधारावर होते ..मग जिंकलेल्या गडाचा किल्लेदार ठरवण्यात येतो...त्या किल्लेदारालाही आपण सर्वधर्मसमभावी आहे हे दाखवण्यासाठी अनंत खटाटोप करावा लागतो...लोकांना खुश करण्यासाठी अधून मधून देशविघातक काहीतरी बोलावे लागते...आज हातात भगवा धरला ...सावरकर ,भगतसिंग यांचे नाव घेतले कि जातीयवादी ठरवले जाते ...दादोजींची सत्य सत्यता , रामदास स्वामी व आपली भेट याची शहानिशा करावी लागते ..काय करायचे...लोकशाही आहे ....
           होती एक शिवशाही जिथे आदर्शांची कमतरता न्हवती....मातोश्रींपासून शंभू राज्यांपर्यंत, येसाजी पासून बाजी पर्यंत ...रामदास स्वामी काय किंवा कवी भूषण काय ...आदर्श व्यक्ती..."शिवरायांचे ऐसे बोलणे शिवरायांचे ऐसे चालणे.. " प्रत्येक गोष्टींचा आदर्श घेतला गेला आणि महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही पिढ्या झाल्या.... दुर्दैवाने पुढील पिढ्यांचे चित्र "पाखरू आलंय वाड्यावर " असेच रंगवले गेले...असे असतानाही काही आदर्श झालेच ..आताच्या लोकशाहीत "आदर्श" हा शब्दच "बदनाम " आहे तर घ्यायचे काय ? ज्याला आज आदर्श मानावे त्याचे कारनामे काही दिवसांनी उघड होतात आणि मग व्यक्तीवरचा विश्वासच उडून जातो...आता सर्वाना सर्वकालीन आदर्श पुत्र ,राजा आणि व्यक्ती असलेला शिवाजी राजा हवा आहे म्हणूनच तुमच्या प्रत्येक जयंतीला "राजे पुन्हा जन्माला या "असा टाहो फोडला जातो....पण तो "शेजारच्या" घरात ..माझ्या घरात जन्माला यावा तो एखादा सिनेकलाकार,गायक,उद्योगपती ,खेळाडू किंवा तत्सम....बाहु स्फुरण पावतील ,छाती रुंद होईल ,कानशिले तप्त होतील ,अन्याय विरुद्ध पेटून उठवतील असे पोवाडे आता येतात कोठे ? चुकून एखादा आलाच तर "सेन्सोर " "सामाजिक शांतता भंग होईल " या सबबीखाली कापून टाकेल ....अनंत कर्तुत्व केलेत तुम्ही पण दुर्दैवाने आमचे कर्तुत्व फ़क़्त अफजलखान ,शास्ताखान यांचे धडे इतिहासातून काढण्यात आणि पुतळे हलवण्यातच दिसते..शिवशाहीत स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळाचे लोकशाहीत चहुबाजूनी विस्तार झाला पण मंत्र्यांचे युद्ध नक्की गानिमासोबत आहे का एकमेकाशी आहे हेच समजेना झाले...शिवशाहीत तुम्ही तह केलेत पण ते जनतेच्या कल्याणासाठी...स्वताच्या स्वार्थासाठी नाही... शिवशाही ,कुतुबशाही ,आदिलशाही यांचा संयुक्त "शाही pattern "असे मी तरी कधी ऐकले नाही पण आता हे सरास होते काय करायचे लोकशाही आहे !!
           काळोखाचा सागर कितीही अथांग असला तरी त्यावर काही प्रकाशाची बेटे असतातच ....त्या बेटांवर राहतोय तो आजचा समाजाचा मोठा वर्ग..जो तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटतोय,राजकारण राजकारणी यांचेपासून अलिप्त राहून कार्य करतोय,दऱ्या खोऱ्या पालथ्या घालतोय ...मोहिमा काढतोय ..कालौघात नष्ट झालेले इतिहासाचे पुरावे सांधण्याचा पुरावा करतोय,तुमच्या जयंतीस मंदिरात ज्या पवित्र भावनेने जातो त्याच पवित्र भावनेने व्याख्याने ऐकण्यास जातोय...आपल्या देशाची आणि मराठी भाषेची पताका जगभर मानाने फडकवत आहे ..कले पासून क्रीडेपर्यंत महाराष्ट्रास आघाडीवर आणण्यास सर्वस्व पणाला लावतोय ..पोलीस भारती असो व सैन्यभरती उत्साहाने सहभागी होऊन "मावळ्या" चे कर्तव्य बजावतोय ...कितीही मतभेद असले तरी "जय भवानी जय शिवाजी " या नाऱ्यावर एकत्र येतोय ,हीच "लोकशाही " मध्ये असलेली "शिवशाही " आहे .........
                 .................................... त्या अनोळखी प्रदेशात केव्हातरी
                                                     तुझा संदेश आजही दऱ्या खोऱ्यात गुंजतो आहे
                                                     तुझे नेत्र आजही अनागातला न्याहाळत आहेत
                                                      ते स्वप्न काय असेल ?
                                                       हे मानवी देहधारी साधुपुरूषा
                                                        तुझी तपस्या ,ध्येय ,कार्य
                                                         जणू चिरंतनाला आव्हान देत आहे !! ""

2 comments:

  1. Good start to blogging! Marathi madhun blog hi sundar kalpana ahe. Aaj kal che politics ani Ch. Shinaji Maharaj yanchi tulana karne mhanaje divyachi- suryashi tulana karnyasarkhe ahe...

    ReplyDelete
  2. उत्तम मांडणी आणि विचार सुद्धा !!!!!!!!!!!!!!!!! हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!

    --
    आसावरी

    ReplyDelete