Sunday 27 January 2013

मराठी मालिका ....


सिनेसृष्टी मधील काही कलाकार त्यांच्या खास शब्दांमुळे तर काही शब्द कलाकारांमुळे प्रसिद्ध झाले . शब्द आणि कलाकारांच्या दृढ नात्यावर  रसिकांनी जितके  मनापासून प्रेम केले तितकेच आपल्या पद्धतीने त्याचे अनुकरण करण्याचे प्रयत्नही . अजित ची मोना डार्लिंग ,राज कुमार चा जानी , शत्रुघ्न चा खामोश , धर्मेंद्र चा कुत्ते कमीने , अमरीश पुरी चा मोगॅम्बो , महेश कोठारे चा damn it  इत्यादी शब्द त्या कलाकारांची ओळख बनले . सध्या मराठी मालिका विश्वातही तेच होत आहे . शब्दांची किमया ,सादरीकरणातील प्रभुत्व आणि भूमिकेने कलाकारांभोवती निर्माण केलेले वलय यामुळे मालिका ठराविक कलाकारांमुळे आणि त्यांच्या शब्दांमुळे  ओळखल्या जाऊ लागल्या आहेत . अक्कासाहेबांचा कळलं असो वा सर्जेराव विखे पाटील यांचा किडक रताळ किंवा आमचा सबुद म्हणजे एक घाव शंभर तुकडे असो . रमेचा स्वतः असो वा माऊचा ए लिसन असो .  संग्राम चा तुमच्यासाठी कायपण आणि सत्यजितची भुवई वक्र करून बोलायची स्टाईल  तर तरुणाईत इन आहे . बाहेर पडल्यावर अनेकदा कोणाच्या तरी तोंडात किंवा कोणाच्या गाडी मागे यातील काही शब्द हमखास सापडतात .दिवाळीत संग्राम कुर्ते , देवयानी साडी ,अक्कासाहेब मंगळसूत्र , रमेची नथ याला मागणी वाढते  आणि जाणीव होते मालिकेच्या आपल्या आयुष्यातील स्थानाची , प्रेक्षक आणि मालिका यांच्या नात्याची आणि मराठी मालिकांना अजूनही प्रेक्षकवर्ग आहे या सुखद सत्याची !!
                                                मराठी मालिका विश्व विषयातील वैविध्य जपत चोखंदळ प्रेक्षकांना आपल्या वाहिनीशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे . अनेक वर्षापासून चालू असलेल्या काही मालिकांना आकर्षक करण्याचे प्रयत्न आणि सोबतीला नवीन मालिकांची सुरुवात यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे हे मात्र खरे .सध्या स्टार प्रवाह वरील पुढच पाऊल  , देवयानी ,लक्ष्मी वर्सेस सरस्वती ,स्वप्नांचा पलीकडे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत तर झी .मराठी वरील होम मिनिस्टर , तू तिथे मी , दिल्या घरी तू सुखी रहा , मला सासू हवी या मनोरंजनात्मक मालीकांसोबत उंच माझा धोका ही प्रबोधनात्मक मालिका लक्ष वेधून घेत आहे . ई .टीव्ही मराठी चार दिवस सासूचे सोबत कालाय तस्मै नमः , गुंडा पुरुष देव ,लेक लाडकी या घरची ,एक मोहोर अबोल यांसारख्या मालिकातून स्पर्धेत राहण्याचा प्रयत्न करत आहे . वाहिन्यांचे आणि त्यावरील मालिकांचे इतके वैविध्य असताना काही अपवाद सोडले तर सासू -सून या मुलभूत संकल्पनेतून निर्माते अजून पुढे जाताना दिसत नाहीत . कलाकार वेगळे , विषयाची मांडणी वेगळी पण आशय तोच दिसून येतो . " मराठी मालिका अजूनही सासू -सून यातून बाहेर पडताना दिसत नाही . काही ठिकाणी सासू चांगली सून वाईट तर काही ठिकाणी सून चांगली सासू वाईट . त्यामुळे प्रारंभी नाविन्य वाटले तरी नंतर आपण नवीन काही पहात  आहोत असे वाटत नाही . आणि मग शोध सुरु होतो नवीन कथेचा ....नवीन मालिकेचा " एका गृहिणीचे मत . असे असतानाही चार दिवस सासूचे सारखी मालिका अनेक वर्षे टिकून आहे . सासू सून यातील नात्यापासून सुरु झालेली मालिका आता त्यांच्या नातवंडे मुले यांच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यात व्यस्त आहे . " मी मालिका फ़क़्त आशालता देशमुख यांच्यासाठी पहाते . त्यांची भूमिका आणि कठीण प्रसंग हाताळण्याची शैली आदर्श आहे . वैयक्तिक आयुष्यात असे वागणे कठीण आहे पण पडद्यावर पाहायला आणि कधीतरी तसे वागायचा प्रयत्न करायला खूप छान वाटते. माझ्या सुनेने अनुराधा सारखे वागावे असे नेहमी वाटते . . " एका सासू चे मत . त्यामुळे काही मालिकांची लांबी वाढली म्हणून मस्करी करणारा जितका मोठा वर्ग आहे तितकाच कथा फुलायला ,कथेविषयी आणि पात्रांविषयी आपलेपणा वाटायला वेळ हा  लागतोच . असे मानणारा ही तितकाच मोठा वर्ग आहे . ज्यांना सासुरवासातून सुटका हवी आहे त्यांना हसवायला झी ने फु बाई फु तर ई ने कॉमेडी एक्सप्रेस पुरवली आहे . प्रवाह ने सासू सून या हीट मंत्रा ला विनोदाची फोडणी देऊन आंबट गोड ही नवी मालिका सादर केली आहे . याचाही कंटाळा आला तर लक्ष ,पंचनामा यासारख्या शोधात्मक तर तुमच्यासाठी काय पण , होम मिनिस्टर यासारख्या कौटुंबिक , अजूनही चांदरात आहे यासारखी भयप्रद मालिका आहेच . त्यामुळे मराठी प्रेक्षकांकडे पर्याय भरपूर उपलब्ध आहेत हे मात्र खरे .
                                               मराठी मालीकांसोबत मराठी प्रेक्षक पुढे जात असताना शिक्षांचा नवा प्रवाह  पडत आहे . कोणतीही चूक झाली , कोणीही केली तरी शिक्षा ही ठरलेली . प्रत्येकवेळी परिस्थितीला साजेशी शिक्षा शोधून काढणे आणि ती प्रेक्षकांना पटणे हे खरच कौशल्याचे काम आहे . आमच्या घरी केवळ माझाच न्याय चालतो या थाटात केलेल्या शिक्षा मनोरंजन वाढवत असल्या तरी यातून काही चुकीचा संदेश जात नाही न ? याचीही काळजी घेणे महत्वाचे आहे ... " माझे लग्न झाले तेव्हा काही चूक झाली तर सासू शाब्दिक शिक्षा बऱ्याच द्यायची . खूप सोसले ...पण आता काळ बदलला आहे , स्त्रियांचे महत्व काही अंशी लोकांना पटू लागले आहे . त्यामुळे अंतर्गत कुरबुरी चालू असल्या तरी शिक्षा आता नाहीश्या झाल्या आहेत आणि ते चांगलेच आहे .. किती काळ महिलांनी सोसायचे ?? टीव्ही वर बघून आता कोणी शिक्षा करेल आणि सून सहन करेल अशी परिस्थिती नाही .... " सत्तरीच्या घरातील आजीबाई ठसक्यात सांगतात . दामिनी , महाश्वेता , थरार , आमची माती आमची माणसे , सपट परिवार महाचर्चा यासारख्या  दर्जेदार मालिका पुरवल्या नंतर आता सह्याद्री थोडेसे मागे पडले आहे . इतर वाहिन्यांची आणि मालिकांची मुबलक संख्या , केबल चे कमी झालेले दर यामुळे प्रेक्षक सह्याद्रीपासून काहीसा दुरावला आहे .असे असले तरी सात च्या बातम्यांचे आकर्षण अजूनही कायम आहे .जेष्ठ लोक सह्याद्रीची आजही आठवण काढतात . आता "रेकॉर्ड " ची सुविधा उपलब्ध असल्याने हातातली कामे पटापट आटपून किंवा बाजूला सारून मालिका पाहण्यातील मजा आताच्या पिढीला कळणार नाही अशी खंतही बोलून दाखवतात . राजा शिवछत्रपती  ,एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या मालिकांनी सतत वाढत असलेल्या टी .आर .पी . च्या मोहात न पडता योग्य वेळी मालिका बंद करून नवा पायंडा पाडला आहे . ठराविक भागापुरती मालिकेची निर्मिती हि स्तुत्य संकल्पना काही अंशी रुजत आहे.
                                              अखेर मालिका म्हणजे काय ? आपल्या मनातील काल्पनिक कथा पडद्यावर पाहण्याचे सुख , अरे मी यातूनच गेलो आहे अशा आठवणीत रमण्याची वेळ , असे कोणाच्याही आयुष्यात घडू नये म्हणून संवेदनशील मनम लागलेली रुखरुख , निराशेने व्यापलेल्या दिवसात हास्याचा छोटासा कारंजा आणि दिवसभराच्या धावपळीतून स्वतःसाठी ,स्वतःच्या आवडीसाठी काढलेला घटकाभर वेळ . प्रत्येकाची आवड वेगळी , निवड वेगळी पहायची दृष्टी  आणि वेळही निराळी . असे असतानाही एखादी मालिका आवडून जाते . आणी जुळतात ते मालिकेसोबत ,त्यातील कलाकारांसोबत भावनिक बंध , वाढते ती उत्सुकता आणि सर्व नीट होऊदेत म्हणून होणाऱ्या प्रार्थना . कोण म्हणतो टी .व्ही .ला इडीअट बॉक्स ?? हे तर आहे आमच्या मनोरंजनाचे ,आनंदाचे  द्वार ....कळलं  ??

Saturday 19 January 2013

मेणबत्त्यांच्या मशाली झाल्याच नाहीत .....

"ठेविले अनंत तैसेचि राहावे चित्ती असावे समाधान " अशी मनोवृत्ती बाळगणाऱ्या , "शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात " अशी प्रार्थना करत आयुष्य (व्यर्थ ) घालवणाऱ्या परंपरेचे पालन करणाऱ्या , " राजकारण म्हणजे गटार किंवा चिखल त्यात उतरू नकोस हं " अशी शिकवण होणाऱ्या अपत्यास गर्भसंस्कारातून देणाऱ्या , पोलिओ डोस च्या आधी " कोणाच्या अध्यात मध्यात जायचं नाही " असा डोस देणाऱ्या , "सत्यमेव जयते " हे जरी देशाचे ब्रीदवाक्य असले तरी हे कलियुग आहे ..येथे असत्याचाच  विजय होतो नसती हिरोगिरी करायची गरज नाही असे (मिथ्या ) बाळकडू गेली ६० वर्षे  आपल्या मुला मुलीना पाजणाऱ्या वडिलांच्या विर्यातून कोणते गुण संक्रमित होणार ?? याच निराश आणि निराशावादी मानसिकतेने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या ६ पिढ्या निद्रिस्त झाल्या होत्या .. गोरे गेले आणि काळे आले या आनंदात आकंठ बुडालेले , आपल्या आणि आपल्या पूर्वजांच्या कर्तुत्वाच्या कथांचे कथाकथन करण्यात मश्गुल झालेले , लोकशाही पासून ठराविक अंतर राखून असलेले , विरोध करायच्या मुलभूत हक्कालाही विरोध करणारे , घराण्याला सलाम करणारे आणि आमच्या वेळी असे नवते म्हणून उसासे टाकणारे ..... इंडिया आणि भारत दोन्हीतही राहणारे "भारतीय " .... अर्थात कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे " काळोखाचा सागर कितीही अथांग असला तरी त्यात प्रकाशाची बेटे असतातच " त्याच बेटांवर जन्म झालेली , स्वतंत्र विचारात वाढलेली , बदल हा तुझ्यापासून होतो या संस्कारात वाढलेली , न्याय आणि अन्याय याच्या परिभाषा स्पष्ट असलेली , कैक वर्षे बसलेला "बेजबाबदारपणाचा " शिक्का फ्लश करून सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यास एकत्र येणारी , अहिंसा परमो धर्मः मानत रंग दे बसंती स्टाइल मेणबत्ती मोर्चा काढणारी आणि बदल्यात लाठी ,अश्रुधूर यांसारखी दडपशाही सहन करूनही आपल्या हक्कांसाठी लढणारी एक नवी पिढी अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर दिल्ली सामुहिक बलात्कार घटने नंतर माझ्या पिढीला पाहायला मिळाली ..... ( जे .पी . आंदोलन केवळ श्रुत आहे अनुभूत नाही )

Friday 11 January 2013

बापूंच्या देशा ....श्वानांच्या देशा ....

मला काहीतरी कळतंय हे जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि कदाचित ती अतृप्तच राहील अशी चिन्हे दिसत असल्याने " काकस्पर्श " होणे कठीणच आहे .... त्यामुळे मित्रानो अशावेळी माझ्या पिंडाजवळ जाऊन म्हणा " अरे तुझी इच्छा पूर्ण झाली , आपल्या देशातील सर्व अण्णा ,बाबा आणि बापू आपापल्या कार्यक्षेत्रा पुरतेच मर्यादित रहात आहेत " अखेर आपला आत्मा म्हणजे पण श्वानच ( श्वानास सभ्य भाषेत  कुत्रा म्हणतात )....आशेचे बिस्कीट दाखवल्यावर सारासारविवेक बुद्धी बाजूला सारून हुरळून जाईल आणि अखेर मला मुक्ती मिळेल ...आता आणखी काही वर्षांनी जश्या चिमण्या गायब झाल्या तसेच कावळे देखील गायब होतील मग कसे ? असा टारगट प्रश्न विचारायला परवानगी नाही ...कारण भारत ( इंडिया म्हणायचीही परवानगी आहे ) आशावादी लोकांचा देश आहे .... वाईटातून देखील चांगले हुडकायचे आपल्यावर संस्कार आहेत , लोकांच्या भावना भडकावणे आणि भडकलेल्या भावनांशी खेळणे ही आपल्या आदर्शांची नीती आहे ,बिरबल कथे प्रमाणे (आपल्या स्वार्थाची )  हंडी उंच बांधून त्यातील सुप्त उद्दिष्टांची अळ्या विरहित खिचडी ( कारण खिचडीतील अळ्या केवळ शालेय पोषण आहार योजनेत सापडतात ) शिजत नाही तोपर्यंत पेटलेल्या आगीचा आपल्या वक्तव्यांनी  वणवा करणे ही परंपरा आहे आणि तोंडघशी पडल्यावर मिडिया ला जबाबदार धरणे ही मानसिकता आहे .... या सर्व प्रकारात आपली भूमिका असते ती श्वानाची ... जिकडे हाडूक किंवा बिस्कीट दिसते तिकडे गोंडा घोळायचा  ,काही मिळाले नाही तर डेसिबल ची मर्यादा न मोडता  उगाच गुरगुरल्याचा आवाज काढायचा आणि काहीतरी मिळेल या आशावादावर किंवा काहीतरी मिळाले या समाधानावर उपाशी पोटाला ,अतृप्त इच्छाना "सत्संगाची " जोड देऊन पुष्पक विमानाची वाट पहात बसायचे ....