Friday 23 March 2012

समृद्धीचा आणि मांगल्याचा... गुढी पाडवा !!


चैत्र शुद्ध  प्रतिपदा ... गुढी पाडवा !! मराठी मनाचा ....मानाचा आणि अस्मितेचा दिवस  ! साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त ! हिंदू रीतीनुसार  प्रारंभ.... नव्या भविष्याचा ...नव्या क्षितिजांचा ... नव्या वर्षाचा ! आयुष्यात आलेली आणखी एक संधी .... भूतकाळाच्या कटू गोड आठवणी भूतकाळातच ठेऊन त्यातून आलेला अनुभव वर्तमानात घेऊन येणे आणि वर्तमानातील कर्म आणि भूतकाळातील अनुभव यांच्या शिदोरीने भविष्य उज्वल बनवायची एक संधी ... ! एक मुहूर्त ..... आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचा ! एक दिवस ..... विजय साजरा करायचा , शुभ कामनांची देवाण घेवाण करायचा आणि पुन्हा संस्कृती जवळ जायचा ! एक सकाळ ..... आकाशात उंच गुढी  उभारायची ... उगवत्या सूर्याची किरणे गढू वरून परावर्तीत होताना पहायची ....उभारलेल्या गुढीकडे अभिमानाने पहायची ! एक दुपार ... पुरण पोळी ,तूप ,कटाची आमटी, ३ प्रकारचे भात आणि साग्रसंगीत स्वयंपाक खायची आणि समाधानाने "अन्नदाता सुखी भव " म्हणायची !  एक सायंकाळ ...... उंच उभारलेल्या गुढीस खाली उतरवायची ...आणि वर गेलेले कधीतरी खाली येणारच हा संस्कार मनी रुजवायची , आप्तेष्टांना भेटून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायची आणि नवीन वर्षाची काहीतरी खरेदी करायची !! आणि एक रात्र ....दिवसभर जसे वागलो ,जे संकल्प केले ...कळत न कळत जे संस्कार झाले ते टिकवायची आस मनात धरून सूर्योदयाची वाट पाहणारी
.... याच दिवशी ब्रह्मा यांनी विश्वाची उत्पत्ती केली , याच दिवशी विष्णू यांनी  मत्स्यावतार घेतला , याच दिवशी श्री राम रावणाचे भूतलावरील कार्य संपवून अयोध्येत परतले , याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली , याच दिवशी शालिवाहन राजाने राज्यविस्तारा करिता दक्खन च्या पठारावर चढाई केली व हण या राजास पराभू करून प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे येथे राजधानी स्थापन करून धर्माध्वजाखाली राज्यशासन केले व स्वताच्या शकाची (शालिवाहन शक ) निर्मिती केली  ,याच दिवसाचा संबंध शिवाजी राजांनी जो अतुलनीय पराक्रम केला त्या "विजयाशी " लावला जातो , याच दिवशी (२३/०३/१९३१ ) भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव यांनी स्वातंत्र्याची गुढी उभारण्यासाठी हौतात्म्य पत्करले , याच दिवशी शेतकरी रब्बी हंगामात काढलेले धान्य बाजारात विकायला पाठवतो  आणि याच दिवशी अनेक लोक इतिहासात अजरामर होण्यासाठी नव्या उमेदीने सुरुवात करतात !! असा हा समृद्धीचा आणि मांगल्याचा गुढी पाडवा !!
                हिंदू धर्म आणि धर्मातील सण आणि शास्त्र यांचा किती निकटचा संबंध आहे याचा प्रत्यय गुढी पाडवा या सणाकडे पहिला कि येतो ...सूर्योदयापूर्वी  उठून अभ्यंग स्नान करून गुढी उभारायचा प्रघात आहे ... या वेळेस "ब्रह्म मुहूर्त " म्हंटले जाते ..म्हणजे रात्र अजून ४ घटका शिल्लक आहे अशी वेळ ( साधारण ४-५ ) , अभ्यंग केल्याने वृद्धत्वाचा नाश ,वर्ण कर , बल देणारे ,आयुष्य आणि दृष्टी वाढवणारे , वात आणि कफ कमी करणारे एकंदरीत निरामय आयष्य करणारे अभ्यंग ..... अनुष्ण पाण्यात घातलेले निंब पत्र ज्याचा अभ्यंतर आणि बाह्य प्रयोग केल्याने रक्ताची शुद्धी होते आणि सर्व त्वक विकार नाश पावतात , गुढीला बांधलेली आंब्याची पाने पित्तशामक असतात , दारासमोर काढलेली रांगोळी मांगल्याचे प्रतिक असते आणि वाईट प्रवृत्तींना घरापासून दूर ठेवणारे असते ....सण आणि शास्त्र यांचा सुंदर संयोग म्हणजे गुढी पाडवा ! आणि त्याहून येणारा संदेश अतीव महत्वाचा .....गुढीखाली ठेवलेला पाट हा स्थैर्याचे प्रतिक , वाहिलेले हळद कुंकू सौभाग्याचे प्रतिक , बांबू /वेळू ची काठी सामर्थ्याचे प्रतिक , घातलेली जरीची साडी वैभवाचे प्रतिक , साखरेची माळ आणि लिंबाचा पाला एकत्र बांधून सुख आणि दुक्ख सोबतच येत असतात या संस्काराचे प्रतिक , पुष्पहार हा मांगल्याचा प्रतिक आणि सर्वात वरती असणारा गढू /कलश हा यशाचा , आधाराचा आणि सर्वसमावेशक गुणधर्माचे प्रतिक !! गुढी उभारत असताना 
" ब्रम्हध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे |

प्राप्तस्मिनसंवत्सरे नित्यं मदग्रहे मंगलं कुरु"||

अर्थ - ब्रम्हाचे प्रतिक असेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे अशी प्रार्थना करून सृष्टीच्या कर्त्या ब्रह्मदेवाची केलेली उपासना ....
            अश्या या गुढी पाडव्याच्या आपल्याला व आपल्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा ! आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हि शुभकामना ....आणि आपल्यातील प्रेम , ऋणानुबंध असाच वृद्धिंगत होवोत हि ईश्वर चरणी प्रार्थना .... आजचा दिवस हा नुसता सण नाही तर संस्कारांचा , आपुलकीचा , ममतेचा , कर्तुत्वाचा आणि प्रारंभाचा खजिना आहे ... प्रत्येकाने यथाशक्ती त्याचा लाभ घ्यावा आणि आपले आयुष्य गुढी सारखे सजवावे ..... उंचीवर असूनही अहं भाव नसलेले , जमिनीशी भक्कम नाते ठेवलेले , सुख आणि दुक्ख यांची जाण असलेले , सामर्थ्याचे , स्थैर्याचे ,शौर्याचे , सौभाग्याचे ,वैभवाचे ,यशाचे , मांगल्याचे आणि समृद्धीचे .......... ........

No comments:

Post a Comment