Saturday 31 March 2012

बिगुल वाजला ..

1976 मध्ये मेहमूद च्या आवाजातील " ना बीबी ना बच्चा ना बाप बडा ना मैया the whole thing is that के भैया सबसे बडा रुपैया...खाली हात अगर तू मर गया मेरी जान ना अग्नी तुझको छुयेगी ना धरती देगी मान.... "अशा वास्तवदर्शी आशयाचे एक गाणे येऊन गेले होते .... काही प्रसंग असे असतात कि त्यावेळी अशा जुन्या आणि अर्थपूर्ण गाण्यांची हमखास आठवण येते .. आणि बुजुर्ग "गीतकारांच्या जाणतेपणाचे" आश्चर्ययुक्त कौतुक वाटते ... सध्या आई.पी .एल .५ च्या जाहिराती पाहत असताना कळत न कळत हे गाणे सारखे ओठावर येते आणि डोळ्यासमोर येते ती गावातील जत्रा आणि कोंबड्यांच्या झुंझी...ज्यात दोन पैसेवाले मालक आपल्या मनोरंजनासाठी आणि वर्चस्वाच्या लढाईसाठी आपल्याकडील सर्वोत्तम कोंबडे मैदानात उतरवतात ..मैदानाच्या कोपऱ्यात मदनिकांच्या सहवासात आणि मद्याच्या घुटक्यात झुन्झीचा थरार पाहून आनंद घेतात ..कोंबडे सुद्धा जीवाच्या आकांताने मालकासाठी आणि मालकाच्या पैशा साठी लढत असतात कारण त्यांना ठाऊक असते कि जिंकलो तर डोक्यावर आणि हरलो तर चुलीवर .... ! जग हे असेच चालत असते ... पैसे वाल्यांनी आपल्या करमणुकीसाठी पैसे ओतून एखादा खेळ निर्माण करावा आणि सर्व सामान्य लोकांकडून ओतलेल्या पैशाच्या अनेकपट पैसा वसूल करावा हे सर्व   चालत असताना नियामक मंडळाने मात्र केवळ दलालाची भूमिका बजावावी  आणि खेळाचा खेळ खंडोबा करून टाकावा .......

                कोणताही सांघिक खेळ हा परिपाक असतो सांघिक प्रदर्शनाचा , मेहनतीचा , त्यागाचा ,जिद्दीचा , देशाविषयी असलेल्या निष्ठेचा , संयमाचा , आक्रमणाचा ,डावपेचांचा , शारीरिक तंदुरुस्तीचा आणि मानसिक कणखरतेचा... आणि यातच खेळाडूंची खरी कसोटी लागते कारण अशा सांघिक खेळांचा हेतू हा "देशाची प्रतिष्ठा " असतो त्यामुळे त्यात पावित्र्य असते ,मान असतो आणि आपण देशासाठी खेळतोय याचे अतुल्य समाधान असते ...पण प्रत्येक खेळात कधीकधी या सर्व गोष्टींपेक्षा पैसा वरचढ ठरतो आणि मग खेळासाठी पैसा हे विधान कालबाह्य ठरून पैशासाठी खेळ असा पायंडा पडू लागतो आणि खरा रसिक खऱ्या खेळाडूसह मनातून दुखी होतो ...भारतीय नियामक मंडळाला भस्म्या रोगाची लागण झाली आहे यावर निश्चितच सर्वांचे एकमत होईल .. भरमसाठ दौरे त्यात खेळाडूना होणाऱ्या दुखापती , ढासळत चाललेली कामगिरी , परदेशी खेळपट्ट्यावर खेळाडू घालत असलेले लोटांगण ,तरुण खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने उदासीनता ,संघात चालत असलेले शीतयुद्ध ,राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची दुरवस्था या आणि तत्सम चिंतनीय गोष्टींकडे हेतुपुरत्सर दुर्लक्ष करून पैसे छापण्याचा एक कलमी कार्यक्रम आखला आणि राबवला जातोय .... याच कारणाने "जेष्ठांना " एक दिवसीय आणि २०-२० प्रकारात "पर्याय "मिळतोय पण "कसोटीमध्ये " गोलंदाजांची "कसोटी " पाहणारा "सक्षम  कसोटीवीर " अजूनही मिळत नाही आहे .. मुळात २०-२० स्पर्धांचे नियोजनच तुंबड्या भरण्यासाठी झालेले असल्याने खेळ हा त्यात दिसतच नाही ...३ तासाचा सिनेमा पाहण्या पेक्षा ३ तासाची म्याच पाहिलेली काय वाईट ? आणि सध्या सामन्याची आणि सिनेमाची तिकिटे एकाच किमतीला मिळतात ... त्यामुळे "मनोरंजन का बाप " असे सार्थ बिरूद मिरवणारी आई .पिल एल . स्पर्धा भरवण्याचा घाट २००८ पासून घातला जातोय ... राष्ट्रीय संघांच्या आंतर राष्ट्रीय दौऱ्यांना डावलून आणि व्यस्त कार्यक्रमातून थकून भागून  पराभूत होऊन आणि सोबत  किती प्राण पणाला लाऊन लढलो हे दर्शवण्यासाठी डझनभर दुखापतींचे पारितोषिक सोबत घेऊन येणाऱ्या खेळाडूना माफक विश्रांती देऊन पुन्हा उतरवले जाते मैदानात ... पैशासाठी ...आणि मनोरंजनासाठी ....
            आई .पी. एल .च्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत नाही तर पैशांचा पाऊस पडतो ... जसे आकाशातून पडणाऱ्या पाऊसचे थेंब सामान्य माणूस मोजू शकत नाही तसे आई .पी .एल मध्ये पडणाऱ्या पैशाच्या पावसाची कल्पनाही करू शकत नाही .. मग प्रसारण हक्क साठी सोनी ने मोजलेले ८७०० कोटी असो , डी.एल .एफ .ने मोजलेले यु.एस $ ५० मिलिअन असो ,हिरो होंडा चे $२२.५ मिलिअन असो ,पेप्सिको चे $ २.५ मिलिअन असो वा किंग फिशर चे $२६.५ मिलिअन असो ...अगदी खेळणाऱ्या संघांचा विचार केला तर चेन्नई $ ७९.१३ मिलिअन , मुंबई $ ६३.५८ मिलिअन असो किंवा आई.पी.एल ४ चे ९०० कोटीचे उत्पन्न असो ...असे मोठे आकडे पहिले कि उगाचच आपण "आर्थिक महासत्ता " असल्याचे दिवास्वप्न पडू लागते ... क्रिकेट हा "साहेबांचा" खेळ होता आणि आता "साहेबांचा" आहे ..आणि जेथे साहेब तेथे पैशाचा पाऊस हे समीकरण आहेच ... त्यामुळे मंडळाची अब्जची अब्ज उड्डाणे चालू असतानाही सरकार १९ अब्जचा कर माफ करते हे अजबच आहे नाही का ? कालपर्यंत २-४ जणांना नाव माहित असलेले "ब "वर्गातील जडेजा $२मिलिअन मिळवून जातो तर "क" वर्गातील विनय कुमार $१ मिलिअन कमावून जातो ...याने खेळाडूंचा फायदा मात्र निश्चितच होतो असे म्हणायला जागा आहे ...आर्थिक गणिते काही काळ डोळेझाक केली तर स्थानिक /रणजी खेळाडूना आंतर राष्ट्रीय स्तरावर ,आंतर राष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळायची संधी मिळणे आणि त्यातील काही गुणवान खेळाडूंची राष्ट्रीय संघात "पाणक्या "ची भूमिका बजावण्यासाठी निवड होणे हे खरच सुखावह आहे ... पण लोकांच्या आणि निवड समितीच्या नजरेत भरण्यासाठी चेंडू "तटवणे" असा काही प्रकार असतो हे प्रशिक्षक आणि खेळाडू विसरल्याचे दिसतात ....आलेला प्रत्येक चेंडू हा सीमारेषेची सीमा ओलांडण्या साठीच असतो हे सिद्ध करण्याचे केविलवाणे प्रयत्न मनात धडकी भरवतात ...कारण या प्रकारात फटक्यातील "नजाकत किंवा कलात्मकता " कोठेतरी लोप पावत आहे असे राहून राहून वाटते ... त्यामुळे सीमारेषे बाहेर वेगाने जाणारा चेंडू ,प्रेक्षकांचा आनंद आणि सामन्याची चढलेली नशा यामुळे तोंडातून उत्स्फुर्तपणे आरोळी बाहेर पडतेच पण मनातून दाद द्यावी असे फटके जाणत्या खेळाडूंच्या भात्यातूनच बाहेर पडल्याचे दिसतात...आणि यांच्या निवृत्ती नंतर "आला चेंडू घुमिव "या खेळाला खेळला असे म्हणायचे का असा अनुत्तरीत प्रश्नही मनास पडतो .....
           अन्न कितीही चविष्ट आणि रोचक असले , खायला कितीही आवडत असले , कितीही खाल्ले तरी समाधान होत नसले तरी सतत खाल्ले तर एक दिवस " अजीर्ण " होते आणि त्यातील नाविन्य नाहीसे होते ... रोजची येतो दिवाळी दसरा प्रमाणे दर वर्षीच येतो आई .पी .एल असे होऊन "अजीर्ण " झाले आहे ..आणि हे दूर करण्यासाठी " लंघना " ची गरज आहे ... दर वर्षी होणारे आई .पिल एल .आणि चम्पिअन ट्रोफी याचा आता सामान्यांना नाही तर कार्पोरेट क्षेत्रालाही आता कंटाळा येऊ लागला आहे ..म्हणूनच स्पर्धा ४-5 दिवसावर  असताना १० पैकी फ़क़्त ६ प्रायोजक मिळवण्यात यश आलेले आहे ... त्यामुळे या झुंझी दर वर्षी भरवण्या पेक्षा २ वर्षातून एकदा भरवाव्यात... हे खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या हिताचे आहे .. पण माझा  सल्ला ऐकणार कोण ? ना मी खेळात ना खेळातील राजकारणात .... ना मी अंबानी ना मल्ल्या .. ना शाहरुख माझा  पाहुणा ना शिल्पा -प्रीती माझी  मैत्रीण ..ना मी  साहेबांचा  कार्यकर्ता  ना मंडळाचा पदाधिकारी ....त्यामुळे मतास काय किंमत ? (थोडे दिवसांनी हे लोक  माताचीही बोली लावतील .. आताच विश्वसनीय सूत्रांकडून नाव  न जाहीर करण्याच्या बोलीवर विश्वसनीय बातमी आलीये ) अमी तर सामान्य प्रेक्षक ..... आई .पी .एल चा बिगुल वाजला कि कोणतातरी एक संघ निवडायचा आणि कोणता कोंबडा बाजी मारेल यावर मित्रांच्या टोळक्यात झुंझी खेळणारा आणि मैदानात जाऊन कोणत्यातरी कोपऱ्यातून सामना पाहणारा  एक सामान्य प्रेक्षक .......

1 comment: