Tuesday 6 March 2012

बालपणाची किंमत......एक मोबाइल !!






बालपण हे माणसाच्या आयुष्याला पडलेले एक सुंदर स्वप्न असते ....स्वप्न अशासाठी कि एकदा पडलेले सुंदर स्वप्न पुन्हा पडत नाही आणि पडलेच तरी मूळ स्वप्नातील गोडवा त्यात असत नाही....आईच्या कुशीत झोपावे ,आजीच्या मांडीवर लोळावे ,बाबांच्या खांद्यावर बसून डोलावे,आजोबाना घोडा करून खेळावे , ताईचे बोट धरून चालावे आणि दादाला चीड्वावे...कितीही खावे ,कितीही झोपावे ,वाटला तर अभ्यास करावा नाही वाटला तर पोटात दुखतंय म्हणून नाटक करावे ,मित्रांच्या सोबत हुंदडावे ,फुलपाखराच्या मागे बागडावे ,भूभूच्या किंवा मनीच्या पिल्ला सोबत खेळताना तासनतास रमावं ,चांदोबा किंवा चंपक वाचत बसाव आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकत हसावं..घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात फतकुल मारून बसाव आणि आजूबाजूच्या भिंती सह एखाद चित्र रंगवाव , २ घास खाण्यासाठी आईला २ तास घरभर पळवाव ,भीत भीतच बाबांकडे काहीतरी मागाव ..मिळालं तर हरकून जाव आणि श्रीमुखात मिळाली तर १/२ -१ तास रड झाल कि पुन्हा बाबांच्या मिठीत शिराव, कोणीही भेटला तरी त्याच्याकडे निरागसपणे पहाव आणि काका ,मामा काहीतरी जोडून आपलंसं कराव ,बोबड्या आवाजात एखाद बालगीत म्हणून आई बाबांच्या डोळ्यात माया पहावी तर अडखळत रामरक्षा म्हणून आजी आजोबांकडून खाऊ घ्यावा ....खरच अस बालपण आयुष्यात आणखी एकदा मिळाव !!
                           किती निरागस होत आपलं बालपण.....आता कामावरून घर आणि घरातून कामावर जायची इतकी गडबड असते तेव्हा शाळा सुटली कि आईच्या मिठीत शिरायची गडबड असायची...गोष्टी मधला राजकुमार/ राजकुमारी मेली कि भोकाड पसरायचो आपण ....दुक्ख ,जन्म .मृत्यू ,वेदना याच्या परिभाषाच माहित नसायच्या आपल्याला..एखादा किडा मारला तरी पाप केल्यासारखे वाटायचे ..आपण जे बालपण अनुभवले त्याहून रम्य आणि सुंदर बालपण आपल्या संततीला मिळावे म्हणून प्रत्येक जण कष्ट करत असतो.... इतके  मोठे आणि कर्तुत्ववान झाल्यावर आपल्याला आपल्या आई वडिलांची खरी किंमत समजते आणि "थकलेल्या बाबाची गोष्ट " डोळ्याच्या कडा ओलावून जाते ....असाच एक बाबा ,आपल्या मुलाच्या रम्य बालपणाची ,सुंदर तारुण्याची आणि उज्वल भविष्याची स्वप्ने पाहत असताना जेव्हा कानावर लहान मुलाच्या "आत्महत्या " ची बातमी कानावर येते तेव्हा त्याचे काय झाले असेल ? ११ वर्षाचे कोवळे पोर ...सातवी मध्ये शिकणारे...कितीसे मोठे ? अशा मुलाला "आत्म" म्हणजे काय आणि "हत्या " म्हणजे काय हे तरी माहित असणे शक्य आहे का ? पण त्याने केली....त्याने आत्महत्या केली ...स्वताचे बालपण स्वताच्या हाताने संपवले ,स्वताचे आयुष्य ,आई वडिलांनी पाहिलेली स्वप्ने सर्वकाही क्षणार्धात संपवले .....बाबांच्या एका नकारासाठी.....फ़क़्त एका मोबाइल साठी !!
                           मध्य प्रदेशातील मंडसौर जिल्ह्यातील गारोथ गावात दिनांक २ /०३/२०१२ रोजी  घडलेली हि सत्य घटना आहे ... पोलीस अधिकारी बिहारीलाल मेहेर यांचा पुत्र सुजल याने वडिलांनी मोबाइल घेण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली....विवेकानंद इंग्लिश शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या सुजल ने "शाळेत " त्याच्या मित्राकडे टच स्क्रीन मोबाइल पहिला ...घरी आल्यावर मला पण तसाच हवा म्हणून हट्ट केल्यावर आई वडिलांनी निसर्गिकरित्या तो देण्यास नकार दिल्याने याने आपले आयुष्य संपवून टाकले ....याच्या मृत्यूस जबाबदार धरायचे कोणास ? सातवीत शिकणाऱ्या मुलास  टच स्क्रीन मोबाइल देणाऱ्या पालकांस ? दिलेला मोबाइल शाळेत आणण्यास परवानगी देणाऱ्या प्रशासनास ? मुलाच्या अवास्तव हट्टास नाही म्हणणाऱ्या पालकांस ? नकार ऐकायची सवय नसलेल्या मानसिकतेस ? आत्महत्ये सारखे शब्द आणि संकल्पना घरा घरात आणि मना मनात पोहोचवणाऱ्या प्रसार माध्यमास ? कि सुजल च्या बाल वयास? नक्की कोणाला अपराधी मानायचे ......कि बदलती जीवनशैली , अनेक मार्गांनी घरात येणारा पैसा ,एक एकटे अपत्य त्यामुळे  त्यांचा शब्द खाली पडू न द्यायची तत्परता , मुलाचा/मुलीचा प्रत्येक हट्ट पूर्ण झालाच पाहिजे हा अट्टाहास त्यामुळे "नाही "हा शब्द "माहीतच नाही " अशी मुलांची /मुलींची होणारी मानसिकता ......
                          प्रत्येक आई वडिलांनी ,होऊ घातलेल्या आई वडिलांनी ,आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या जोडप्यांनी आणि प्रेमात पडून २५ दिवस पण झाले नाहीत तोपर्यंत लग्नाच्या २५ साव्या वाढ दिवसाची नियोजने करणाऱ्या युगुलांनी समाजातील बदलते प्रवाह अधोरेखित करणाऱ्या या घटनेचा  निश्चितच विचार करायला हवा ...मिळणारा अगणित पैसा ,स्वप्नातीत प्रतिष्ठा ,आपले सर्कल ,कामाचे १२/१५ तास आणि इतके करून "असमाधान " अशा  गोष्टींमुळे ज्यांच्यासाठी हे सर्व चालू आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत नाहीये ना याकडे पण लक्ष दिले पाहिजे ....आताच्या जमान्यात माणसांपेक्षा यंत्रांना महत्व जास्ती आले आहे ..बायको पेक्षा मोबाइल जास्ती जवळ असतो, प्रतिष्ठा हि गाडी च्या "ब्रांड " वरून ठरवली जाते ,दिवंगत आई वडिलांचा फोटो वर्षानु वर्षे पाहायला होत नाही पण कॉम्पुटर इतर फोटो मात्र दिवसातून १०० वेळा पहिले जातात ..कानात पक्ष्यांचा मंजुळ स्वर .पानांची सळसळ कधी पडतच नाही कारण आईपोड चालू असतो ..त्यामुळे यंत्र हेच आयुष्य मानणाऱ्या वर्गाचे सुजल हा निरागस प्रतिनिधी आहे ... सुजल च्या आत्महत्ये विषयी निश्चित कारणे कदाचित सापडणार नाहीत ...त्याचे आयुष्य हे एखाद्या "मेडीकल" परिभाषेत कोंबण्या इतके छोटे निश्चितच नाही पण ते एक उदाहरण आहे ....पुढचे सुजल होऊ नयेत म्हणून ......अर्थात समजून घेतले तर.....

1 comment:

  1. Digvijay Nilekar6 March 2012 at 23:21

    मी हा लेख वाचला .. अप्रतिम विचार आहे.. आजकालच्या (विशेषतः आय.टी. कंपन्यांमधल्या) पालकांनी हा लेख जरूर वाचावा...!!

    ReplyDelete