Friday 16 March 2012

तो "राज" हंस एक..... !!


" कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनि बोट त्याला म्हणती हसून लोक ...पिल्लास दुक्ख भारी भोळे रडे स्वताशी भावंड न विचारी सांगेल ते कोणाशी ..जे जे त्यास टोची दावी उगाच धाक .... पिल्लू तळ्यात एक " माडगूळकरांच्या समृद्ध लेखणीमधून उतरलेल्या या ओळी राज ठाकरे यांना चपखल बसतात ! सर्वांनी नाकारलेले ,चेष्टा केलेले , सख्ख्या लोकांकडून परकेपणाची वागणूक मिळालेले ,सर्वांच्या टीकेचे धनी झालेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर हा माणूस एक दिवस राज्य करेल असे कोणाशी न वाटलेले राज ठाकरे !! शिवसेने शी असलेली निष्ठा ,बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेले वैचारिक मतभेद याचे वर्णन " विठ्ठल आणि बडवे " असे केलेले राज ठाकरे ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या कार्यक्रमात अक्खे शिवाजी पार्क भरवून आणि गाजवून दाखवणारे बाळासाहेब यांच्या नंतरचे एकमेव राज ठाकरे ! सभा कशा भरवाव्यात...कशा गाजवाव्यात आणि कशा जिंकाव्यात ....लोकांच्या मानसिकतेची नस कशी पकडावी याचे बाळासाहेब यांच्या नंतरचे उत्तम उदाहरण राज ठाकरे ! शिवसेना सद्य नेतृत्वाशी कितीही वैचारिक आणि पाक्षिक मतभेद असले तरी बाळासाहेबांसाठी आणि मराठी मनासाठी नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणारे राज ठाकरे !! आज राज ठाकरे यांच्यावर लिहायचे कारण म्हणजे नाशकात त्यांनी " करून दाखवले ".... शिवसेनेने खो घालायची जय्यत तयारी केलेली असताना ,अनेकांनी आपल्या भूजातील बळ तपासायला सुरुवात केली असताना , पावर गेम व्हायची शक्यता असताना हाताने घड्याळाचे काटे उलटे फिरवून रेल्वे डब्यात कमळाची फुले भरून  सुसाट धावणे हा राजनीतीचा आणि राजकीय परिपक्वतेचा अत्युच बिंदू आहे !!

                १४/०६/१९६८ रोजी प्रबोधनकारांच्या ,बाळासाहेबांच्या ,श्रीकांतजींच्या "ठाकरे " घराण्यात जन्म घेणारे स्वरराज श्रीकांत ठाकरे  ! कलाप्रेमी आणि कलासक्त घराण्यात जन्म झाल्याने अंगात कला आली नसेल तर नवलच....तबला ,गिटार शिकलेले आणि नंतर चित्रकले कडे वळालेले राज ...व्यंग चित्रकार राज ठाकरे ...अत्युच्च दर्जाची व्यंग चित्रे ..यात बाळासाहेब यांच्या इतकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी त्यांची प्रकाशित झालेली चित्र पहिली कि त्यांची विचारसरणी आणि पेन्सील वरची हुकुमत सहज लक्षात येते ....१९९७ साली शिव उद्योग सेना स्थापन करून राजकारणात उतरलेले राज यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे ... त्यांचे नियोजन आणि  इवेन्ट मेनेजमेंट याची प्रचीती मायकेल जाक्सोन याच्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमातून येते ...जे करावे ते नेटके आणि भव्य ....अशा स्वभावाची माणसे प्रचंड महत्वकांक्षी असतात ...प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची यांना आवड असते ... आपली मते ,आपली स्वप्ने यावर ठाम असतात ... कधी कधी मनात विचार येतो कि राज यांनी शिवसेना सोडली नसती तर काय झाले असते ? एका सच्च्या  कार्यकर्त्या सारखे राबले असते ,पक्षा साठी सर्व काही केले असते ,महाभारतात जी भूमिका भीष्मांनी बजावली तशी बजावली असती पण त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळाले असते ? अगदी आयुष्यभर सेनेची मनापासून सेवा केल्यावर मनोहर जोशींना जे फळ मिळाले तसे ?यात महाराष्ट्राचा तोटाच झाला असता यात शंका नाही....  ९ /०३ /२००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाला नसता तर महाराष्ट्राला वक्तृत्वाची मुलुख मैदान तोफ ,विचारी राजकारणी , एक सक्षम पर्याय आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मराठी माणसास आशास्थान सापडलेच नसते ! आज म.न .से आणि राज यांची जी वाटचाल चालू आहे ती कोणीही हेवा करावी अशी आहे .. पक्षाची स्थापना वैयक्तिक महत्वकांक्षे  साठी असो , भुजबळ राणे यांच्या पाठोपाठ जो नगरसेवक ,आमदार यांचा लोंढा बाहेर पडू लागला आणि मराठी मते कॉंग्रेस ला जातील अशी शंका निर्माण झाली त्याचे निराकरण करण्यासाठी असो किंवा ठाकरे बंधुतील वैयक्तिक मतभेद असो ...आज म.न.से हा महाराष्ट्र मधील राजकारणाचा अविभाज्य घटक बनला आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही !!
             राज आणि त्यांचे वक्तृत्व ......बोलणारे अनेक असतात पण कधी ,कोठे , कोणासमोर ,कसे ,केव्हा आणि काय बोलावे याचे भान ज्याला असते तोच खरा "वक्ता " ठरतो ...पु .भा .भावे म्हणायचे " वास्तवता दाखवा पण काय वास्तव दाखवता याचे भान ठेवा , बाहेरून आलेल्या पाहुण्याला आपली बाग ,घरातले देवालय दाखवतो पण वास्तव आहे म्हणून लगेच शौच कुपाकडे नेत नाही....वास्तव रेखाटताना विवेक हवा " आणि हाच विवेक आपल्या वक्तृत्वातून जागवणारे कधी विजेसारखे चमकणारे तर कधी समयी सारखे तेवणारे , कधी धीरगंभीर वास्तवाशी ओळख तर कधी नरम विनोदाशी सलगी ,कधी शब्दांचे वज्र तर कधी काव्याचे पुष्प हाताशी धरून महाराष्ट्रातील जनतेला तृप्त आणि मंत्रमुग्ध करणारे अनेक वक्ते महाराष्ट्रात होऊन गेले .... सावरकरांचे तेजस्वी , आचार्य अत्रे यांचे ओजस्वी  ,शिवाजीरावांचे विचारी  ,पुरंदरे यांचे अभ्यासी ,पु.ल .यांचे मिश्कील ,राम शेवाळकर यांचे काव्यात्मक आणि बाळासाहेबांचे ठाकरी वक्तृत्व महाराष्ट्राने पहिले ,ऐकले ,मनात सामावले ! वक्ता म्हणजे बोलके विद्यापीठ ...आतापर्यंत वाचलेले ,ऐकलेले , अनुभवलेले ,समजलेले सर्व ज्ञान १०-१५  मिनिटात जनसमुदायापुढे मांडणारी व्यक्ती ... असंख्य जनसमुदाय ,विविध प्रकारचे आणि हेतूचे लोक समोर असताना वक्त्यास जनसमुदाय आपलेसे करायला जास्तीत जास्ती २-३ मिनिटे मिळतात ...जनसागर आपलासा केला कि बरसणारे शब्द वर्षेसारखे भासतात....मनाच्या अतृप्त भूमीवर शब्दरूपी पडून तृप्त करणारे ...नाहीतर पाऊस पडत असताना पन्हाळी वरून वाहून जमिनीत मिसळणारे पाणी ... पडल्याचे कोणास सुख नाही ...आणि जमिनीत मिसळल्याचे कोणास दुक्ख नाही ! आठवते सभा औरंगाबाद ची ....आमदार. हर्षवर्धन मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी भरवलेली...एक वक्ता आला ...शांतपणे बोलायला उभारला ...समोरचे हुल्लड करणारे लोक पहिले ...त्यांना आवरायचा प्रयत्न केला ..प्रसंगी दम दिला ..थोडी शांतता झाल्यावर शब्द बाहेर पडले "माझी सर्व छाया चित्रकारांना विंनती आहे कि आपल्यापैकी २-३ जणांनी व्यासपीठावर याव आणि हे समोर जे काही जमलंय या सर्व गोष्टीच छायाचित्र उद्याच्या वर्तमान पत्रात दाखवाव " जिंकली ....सभा जिंकली .... राज ठाकरे यांनी "मैदान " मारले .... महाराष्ट्रा मधील मैदानी वक्तृत्वा मधील नवा तारा.. उद्धव यांनी कितीही प्रयत्न केला किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नेत्याने प्रयत्न  केला तरी बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेची आणि दसरा मेळाव्याची जागा घेणे अशक्य आहे ...ती पात्रता आणि योग्यता आहे फ़क़्त राज यांची ....मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांची वांद्रा संकुलात सभा असताना राज यांची सभा ऐकायला जांभोरी मैदानावर जी तोबा गर्दी जमवली आणि जी टोलेबाजी केली ती पाहून बाळासाहेब सुद्धा सुखावले असतील....उपजत मार्मिक पणा ,कमावलेला आवाज ,मिळवलेले ज्ञान , काकांची शैली ,विचारांची जोड ,पुराव्यांची रेलचेल , ठाकरी भाषा , मुद्देसूद संहिता आणि लोकांच्या मनाचा आलेला अंदाज या भांडवलावर राज यांची शाब्दिक तलवार अनेकांना घायाळ करत आहे  आणि युवा पिढीला  आकर्षित ....
                           या वक्तृत्वाला जेव्हा कर्तुत्वाची जोड मिळते तेव्हा माणसाचे व्यक्तिमत्व प्रभावी दिसते ...शिवसेना स्थापन झाली ती मराठी आणि गिरणी कामगारांच्या प्रश्ना साठी.... पण हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यापासून मराठी माणसाकडे थोडेफार सेनेचे दुर्लक्ष होत आहे अशी सल मराठी माणसाच्या मनात होती आणि नेमका हाच धागा पकडून राज यांनी आपल्या स्वतंत्र राजकीय कारकीर्दीचा शुभारंभ केला ... " मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा " असे पक्षाचे ब्रीदवाक्य असल्याने रेल्वे इंजिन कोठपर्यंत धावणार याच्या सीमा राज यांनी ठरवून टाकल्या ...महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि झोपलेली मराठी अस्मिता जागे करण्याचे कार्य राज यांनी नव्याने सुरु केले....मराठी मुद्दा असो , मराठीची सक्ती असो , यु .पी /बिहार वाल्या "भैयांना " दिलेले टोले असो , जया बच्चन यांनी आपल्या उंची पेक्षा कमी वैचारिक उंचीच्या केलेल्या टीकेचा घेतलेला खरपूस समाचार असो , वाट बघणाऱ्या रिक्षा वाल्याच्या मुजोरी पणाची लावलेली वाट असो किंवा वेक अप सिड सिनेमा मधील बॉम्बे शब्दाला घेतलेला आक्षेप असो , अब्बू आझमी ला विधानसभेत दिलेला धडा असो , काठ्या वाटल्या तर तलवारी वाटू असे केलेले विधान असो , किंवा प्रसार माध्यमांच्या पक्षपाती पणावर सोडलेले टीकास्त्र असो ...राज यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय नेहमीच राहिले ... पक्षाचे एकटेच सेनेनी असून सेनेला ज्या प्रकारे  लढायला लावले ते आश्चर्यचकित करायला लावणारे आहे ...२००९ मध्ये निवडून आणलेले १३ आमदार असो किंवा अगदी आताच्या महानगर पालिका निवडणुकात  मुंबई मधून २८, ठाणे ८, पुणे २९ ,नाशिक ४० ,पिंपरी चिंचवड ४ नगरसेवक निवडून आणून आपला राजकीय आलेख कसा उंचावत चालला आहे हे सप्रमाण सिद्ध केले ..राज यांचा विकास कामांवर नेहमीच भर राहिला आहे ..२०११ मध्ये ९ दिवसाच्या गुजरात दौऱ्या नंतर गुजरातचा विकास पाहून राज यांच्या बोलण्यात आणि विचारात सकारात्मक फरक पडल्याचे जाणवते ... त्यांच्या बहुचर्चित ब्लू प्रिंट ची प्रतीक्षा अगदी विरोधकानाही आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही ....अशा कारकीर्दीस रमेश किणी (१९९६) आणि कोहिनूर मिल (२००६) या घटनांचे गालबोट लागले आहे ..दर निवडणुकीत याचा  उल्लेख येत राहणार ..पण म्हणून राज यांचे कर्तुत्व कोणी नाकारू शकत नाही .....
                           नाशकात ४० जागा मिळवून १४४० कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असणारी महानगरपालिका राज यांनी ताब्यात घेतली .... राजकारणाची समीकरणे किती झटपट बदलतात याचे ताजे उदाहरण म्हणजे नाशकात मनसे चा महापौर निवडला जाण्याची घटना ...१२२ जागा असणाऱ्या महानगरपालिकेत मनसे ४० + बीजेपी १४ + जनसुराज्य २ अशी खेळी करून राज यांनी सत्ता संपादन केली ...तर राज यांना किंग बनवणारे "किंग मेकर " बी .जे .पी .यांच्या बद्दलची राज यांची प्रतिक्रिया खूप रोचक होती ...निवडणुका आधी आई.बी .एन लोकमत वाहिनीवर "ग्रेट भेट " या कार्यक्रमा अंतर्गत निखील वागळे यांच्याशी बोलताना राज म्हणाले होते " भारतीय जनता पक्षाची स्थिती जुन्या टीवी मधल्या ठिपक्या सारखी आहे ..टीवी बंद केला कि चित्र ठीपक्याचे स्वरूप घेते तो ठिपका  लहान लहान होतो आणि बंद पडतो " तर अशा पक्षाचे सहकार्य घेऊन सत्ता मिळवणे हे राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे सिद्ध करणारे आहे .. असेच दोन सेने मधील युद्ध संपावे आणि "महासेना " तयार व्हावी हि मराठी मनाची प्रार्थना लवकर पूर्ण व्हावी कारण ३७% मते मिळवणारा कॉंग्रेस बाकी मतांचे एकीकरण नाही म्हणून सत्ता उपभोगतो आहे ...इतके दिवस सत्ता द्या ,विश्वास टाका म्हणणारे राज सत्ता मिळाल्यावर काय करतात हे पाहणे रोमांचक आहे ...आणि हे सुद्धा इतकेच खरे आहे कि इतर पक्षांनी इतकी वर्षे केलेली घाण ५ वर्षात राज साफ करू शकत नाहीत ..जनतेला अपेक्षा आहे ती फ़क़्त सकारात्मक सुरुवातीची आणि प्रामाणिक प्रयत्नाची ... मार्ग अतिशय खडतर आहे ...नवा पक्ष, नवे नेतृत्व ,खुर्च्या उबवायचा अनुभव नाही , लोकांच्या अपेक्षांचे ओझे अशा खडतर रस्त्यावरून वाहायचे आणि त्याच वेळी सेना आणि राष्ट्रवादी या झारी मधील शुक्राचार्यांचा सामना करायचा ( कॉंग्रेस ला  महाराष्ट्रात काही उपद्रवमूल्य आहे असे मला वाटत नाही ) आणि हे करत असताना विकास कामांचा गुणाकार , भ्रष्टाचाराची वजाबाकी , चांगल्या कार्यकर्त्यांची बेरीज आणि गुन्ह्यांचा भागाकार करायची अशक्यप्राय कामगिरी राज यांना पार पडायची आहे ... अशा वेळी मिर्झा गालिब यांचा शेर आठवतो " मै घाबरा गया था देखकर अलाबोन्को पाव के मगर अब मै खुश हु राह मै पुरखार देख कर " प्रतिकूल परिस्थिती मध्ये अनुकूल कार्य करणारे नेतृत्वच महान असते ... अगदी छोटी मुंगी पहिली तरी वजनाच्या कितीतरी पट जड असलेला साखरेचा दाणा नेऊन ,वाटे मधल्या प्रत्येक विघ्न पार करून  आपले ध्येय साध्य करते .....तर आपल्याला असाध्य काय आहे ?  आज राज यांच्या बद्दल इतका आदर आपल्याला आहे कारण " एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले....पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणिक त्याचेच त्या कळाले तो "राज" हंस एक..... !!

No comments:

Post a Comment