Wednesday 14 March 2012

सोंग ठेऊन गेलेला सोंगाड्या ...


चापून चोपून बसवलेले केस....ओठाच्या वर  बारीक पण भारदस्त मिशी , वाढत्या मापाचा सदरा , पायात लेंगा आणि त्याची लोंबणारी नाडी...चेहेऱ्यावर मिश्कीलपणा ,प्रेक्षकांना हसवण्याचा घेतलेला मक्ता , सामाजिक उणीवांवर मारलेला फटका , राजकीय पक्षांना काढलेला चिमटा  आणि द्वय अर्थी विनोदाचा खास कोल्हापुरी ठसका यामुळं मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अजरामर झालेले आणि विनोदवीर म्हटले कि हटकून मानाचे पहिले स्थान मिळवणारे कृष्णा कोंडके म्हणजे दादा कोंडके .... १४ मार्च १९९८ रोजी जेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला तेवा विनोदाच्या मैदानात हास्याच्या तलवारीने लढणारा रांगडा पण मिश्कील योद्धा हरपल्याचे दुक्ख सर्व चाहत्यांना झाले ...विनोदवीर अनेक झाले पण "दादा " एकच....लालबाग मधील गिरणी कामगाराच्या घरी जन्म घेतलेला ....उमेदीच्या काळात अपना बझार मध्ये काम केलेला आणि नंतर अबाल वृद्धाना आपलस केलेला दादा म्हणजे असामान्य माणूस ...वसंत सबनिसांनी दादा ना पहिले नसते ..त्यांच्यातील गुण खणखणपुरचा राजा मध्ये पहिले नसते आणि "विच्चा माझी पुरी करा " लिहिले नसते तर सर्वांच्या विच्चा पुऱ्या करणारा सोंगाड्या कदाचित काळाच्या पडद्या आड कधीच लुप्त झाला असता ....
                   अभूतपूर्व गुण ,अलौकिक प्रतिभा ,असामान्य अभिनय क्षमता ,सहज साधलेले विनोद त्याला सुंदर अभिनयाची जोड यामुळे हा सोंगाड्या पुढे जातच राहिला ...द्वय अर्थी किंवा कमरेखालचे विनोद यामुळे पांढऱ्या कॉलर वर्गाने दादांना क्वचितच स्वीकारले पण पिठातल्या प्रेक्षकाने दादाला डोक्यावर उचलून घेतले ...सोंगाड्या असो ,एकटा जीव सदाशिव असो ,आली अंगावर असो ,राम राम गंगाराम असो ,पांडू हवालदार असो ,ह्योच नवरा पाहिजे असो , मुका घ्या मुका असो ,येऊ का घरात असो किंवा सासरचे धोतर असो दादांनी निर्माण केलेल्या  हास्याच्या सुनामी मध्ये मराठी प्रेक्षक आनंदाने बुडत राहिला ....गाणी हा दादांच्या सिनेमा मधला अविभाज्य घटक....अवीट गोडीची, "अनेक" अर्थ असलेली ,दादांनी अभिनयानी जिवंत केलेली गाणी ...मग ते " ढगाला लागली कळ असो " व "आली मुंबईची केळीवली ". गंगू तारुण्य तुझ बेभाम " एका रातीला  सपना पडल " " लबाड लांडगा ढोंग करतोय " " अंजनीच्या सुता " , "भरलेत दोन्ही माठ गळतय पाणी " "पिकलं जांभूळ तोडू नका "  असो....महेंद्र कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजाने   घरा घरात आणि मना मनात पोहोचलेली  .सहज समजणारी ,उमगणारी आणि जिभेवर बसणारी..... असेच होते दादा ! बेभाम ,बेधुंद 



     वैयक्तिक आयुष्यातील बाळासाहेबांच्या स्नेहासंबंधामुळे शिवसेने कडे आकर्षित झालेल्या दादांचे दसरा चौकातील भाषण म्हणजे वक्तृत्व परंपरेतील मानबिंदू जणू ...इतकी प्रतिभा असूनही दादांच्या वाट्याला फ़क़्त २० चित्रपट आले ...ठोकळ्या चेहेर्याच्या , विनोदाचे अंग नसलेले , ओढून ताणून विक्षिप्त हावभाव करून विनोद निर्माण करायचा प्रयत्न करणारे आज डझनाने चित्रपट करतात पण जन्मजात विनोद्वीरास केवळ २० चित्रपट मिळतात याहून मराठी प्रेक्षकांचे दुर्दैव ते काय ? म्हणूनच कदाचित दादा एकटा जीव सदाशिव मध्ये "माणसापरीस मेंढरे बरी " म्हणत असावेत .....एक मात्र खरे ...असंख्य प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलेले  आणि हृदय विकाराचा झटका  आल्याने  पंचतत्वात विलीन झाल्याने... बोट लावीन तेथे गुदगुल्या करणारा सोंगाड्याने अजरामर केलेल्या विनोदाला रसिक पोरके झाले...... भावपूर्वक श्रद्धांजली !!

3 comments: