Sunday 25 March 2012

ज्योती चौधरी .....अखेर न्यायाची ज्योत पेटली !

नियती ! सामान्य वाटणारे शब्द पण असामान्य कार्य करणारे ...आयुष्याला व्यापून टाकणारे ...सत आणि असत यातील भेद दूर करणारे , प्रज्ञापराध करायला भाग पाडणारे, सत सत विवेकबुद्धी भ्रमिष्ट करणारे , संवेदनांना बोथट करणारे ,सुखाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवून दुक्खाच्या खाईत लोटणारे , यशाच्या सीमा ओलांडून अपयशाच्या परिसीमा दाखवणारे ... ३ शब्द ! सतत आपल्या आसपास वावरणारी  , आपले सुख ,आनंद  ,यश याकडे पाहून खिन्नपणे हसणारी आणि आयुष्यात प्रवेश करण्याची एक संधी कायम हुडकत असणारी नियती .... होत्याचे न्हवते आणि न्हवत्याचे होते करणारी नियती ...आणि नियतीसमोर अगतिक असणारा सर्वशक्तिमान माणूस !!
           
  लहानपणापासून मोठे व्हायचे स्वप्न ,त्यासाठी केलेले कष्ट ,त्याग ,तडजोडी आणि प्रयत्न याच्या परीपाकातून जेव्हा यशाची चव चाखायची वेळ येते त्यावेळी काही लोकांच्या बाबतीत नियती आडवी येते ..आणि आपला खेळ खेळून जाते ...कलियुगाच्या सुरुवातीस जेवा कली उत्पन्न झाला तेव्हा त्याचे स्वरूप , मोठे लैंगिक अययव आणि व्यक्त केलेला हेतू पाहून तत्कालीन ऋषींना कापरे का भरले होते याचा प्रत्यय अशा घटनांकडे पाहून येतो ...आणि अजूनही स्त्रीस भोगवादी खेळणेच समजले जाते याची खंतही वाटते ....वासना सोडून इतरही काही भावना आहेत याचा विसर समाजाला बहुदा पडलेला असावा  त्यामुळे २ वर्षाच्या बालीकेपासून ते ९६ वर्षाच्या वृद्धे पर्यंत बलात्कार झाल्याच्या घटना समोर येतात ...कधी स्वेच्छा कधी अनिच्छा तर कधी बलात्काराचा वापर करून आजच्या युगाचे "कलियुग " हे वर्णन किती सार्थ आहे हे ठरवायचे काम आपण करत असतो ..अशा घटना घडतात तेवा यास स्त्रीच कारणीभूत आहे असे समजून तिचा मानसिक बलात्कार करायचे काम आपला समाज इमाने इतबारे करत असतो ...कपडे ,वागणे ,बोलणे ,शिक्षण ,सामाजिक वावर यासारख्या गोष्टींचा बाऊ करून त्यांना दोषी  ठरवण्यात येते ..अश्या वेळी जुन्या मराठी सिनेमा (आणी वास्तवातही ) आपल्या शरीराचा एकही भाग परपुरुषास दिसू नये म्हणून झटणारी स्त्री , मिशाच्या आकड्यांना पीळ देत छद्मी हास्य करत कामयुक्त नजरेने तिच्याकडे पाहणारा सावकार ,एक आर्त किंकाळी आणी विझलेली समयी किंवा फुटलेला आरसा आठवतो आणी या स्त्रियांची काय चूक होती असा प्रश्न मनास पडतो ...अगदी नजीकच्या भूतकाळात गेले तर "सात च्या आत घरात " मधील न्यायालयीन प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो ...त्यात बलात्कारी " झाकण सारलेल्या भांड्यावर माझी नजर गेली हीच काय ती चूक " असे म्हणून केलेल्या बलात्काराचे समर्थन करतो तेव्हा संवेदनशील मनास चिंतायुक्त रागाच्या झिणझिण्या आल्याशिवाय राहात नाहीत .....
                    ज्योती चौधरी २२ वर्षाची तरुणी .... विप्रो बी .पी. ओ . मध्ये काम करणारी ...१ /११/ २००७ पासून गायब असणारी आणी अखेर ४/११/२००७ रोजी पुण्याजवळील गहुंजे येथे मृतावस्थेत सापडलेली .... हिंजवडी आई.टी. पार्क मधून घरी सोडण्यासाठी नेमलेल्या  "कूल कॅब " मधील चालकांच्या वासनेची शिकार ठरलेली दुर्दैवी तरुणी ....कल्याणीनगर मध्ये एका तरुणीवर असिड फेकण्याची घटना ताजी असताना घडलेला हा बलात्कार म्हणजे बी .पी.ओ /आई .टी कंपनीत काम करणाऱ्या ४०% स्त्रियास , त्यांची काळजी करणाऱ्या कुटुंबास, कंपनी चालवणाऱ्या मालकास आणी सुधारल्याचे ढोंग घेतलेल्या समाजास काळजीच्या काळोखात लोटणारा होता ...पण जवळपास ५ वर्षांनी न्यायाधीश बदर यांनी आरोपी दशरथ बोराटे आणी प्रदीप कोकडे यांना सुनावलेली फाशीची शिक्षा हि ज्योतीच्या पश्चात न्यायाची पेटलेली ज्योतच आहे ...हा विजय आहे ज्योतीच्या वेदनेचा  , तिच्या परिवाराच्या संघर्षाचा ,महिलांच्या हक्काचा , समाजातील सत प्रवृत्तीचा आणी न्यायाची अपेक्षा ठेवणाऱ्या अनेक पिडीत महिलांचा....या शिक्षेने ज्योती परत येणार नाही पण आणखीन ज्योती निर्माण होणार नाहीत अशी अशा नक्कीच करू शकतो .......

No comments:

Post a Comment