Thursday 22 March 2012

गोष्ट छोटी डोंगरा एवढी !!



हाताचे बळ जवळ असताना निराश कधी व्हायचे नसते
गत दुक्खांची उजळणी करत  हताश कधी व्हायचे नसते
यश पदरात पडत नाही म्हणून कधी रडायचे नसते
नव्या जोमाने सुरुवात करून जीवनाची दशा बदलायची असते
हाताचा पसा दुसऱ्यासमोर धरून लाचारी कधी स्वीकारायची नसते
संकटांची तमा न बाळगता त्यावर मात करायची असते .....!!  

    असे म्हणत सतत पुढे जाणारा शेतकरी ! मुळात पांढरा पण निळीच्या सढळ वापराने निळसर झालेला आणि त्यालाही मातकट रंगाची किनार असलेला सदरा , त्याच्या आत काहीही सामान माऊ शकेल असा  कप्पा असणारी बंडी,खाली ठिगळ लावलेले धोतर, किंवा आताच्या मुलांच्या दोन प्यांता  होतील इतके कापड वापरलेली विजार ,गळ्यात एखादी तुळशी माळ  आणि कपाळावर गंध किंवा बुक्क्याचा टिळा, डोईवर मुंडासे /पटके किंवा गुंडाळलेला टॉवेल, एका हाती खुरपे तर दुसर्या हाती बैलगाडीचे दावे आणि सोबतीला चंची ....अनंत चिंता ,समस्या असूनही शेतावर मनापासून प्रेम करणारा , मातीने लिंपलेल्या  आणि शेणाने सारवलेल्या घरात समाधानाने राहणारा , २४ तासातले १८ तास वीज नसूनही शेती फुलवणारा,वाढवणारा आणि जगवणारा ,रानात गेलो तर २-४ कांसे मातेच्या ममतेने खायला घालणारा आमचा शेतकरी !! आताच्या ३० मजल्याच्या इमारतीत २८ मजल्यावर राहणाऱ्या ,विदेशी उंची कडपे मूळ रंगतच वापरणाऱ्या ,बेल्जियम कार्पेट वर चकचकीत बुटांसह फिरणाऱ्या ,२४ तासापैकी २४ तास ए.सी मध्ये बसणाऱ्या  ,फर्डे इंग्लिश फाडणार्या, शेतकर्याचे वार्षिक उत्पन्न महिन्यात मिळवणाऱ्या , शेतकरी जसा कामासाठी तालुक्यात किंवा जिल्ह्यात येतो तसे उठसुठ विदेशवारी करणाऱ्या "प्रगत " लोकांच्या भाषेत "गावठी / गावाकडचे लोक "
                               आधुनिक  जीवनशैलीत टापटीप ,व्यवहार ,आपल्या सर्वच गोष्टींचे प्रदर्शन ,खाणे ,बसणे,बोलणे सर्वच बाबतीतले नियम , नाटकी स्वर काढून बोलणे ,चेहेर्यावरील २-४ स्नायुंना उगीच त्रास देऊन "मी हसलो हं " असा समोरच्याला भास करून देणे , भारत आणि पाकिस्तान यांच्या अफगाणिस्तान मधील हस्तक्षेपाबद्दल अमेरिकेचे मत काय ? यावर मद्याचे पेले रिचवत चर्चा करणे , रंगरंगोटी करून जे नाही ते आहे करण्याचा अट्टाहास करणे यासारख्या गोष्टीना अनन्य महत्व आहे आणि यात मोकळा ,बेधुंध , ज्या विषयावर बोलल्याने आपला फायदा होतो अशा विषयावर बोलणारा, आपल्या रुपड्या वर खर्च करण्यापेक्षा शेताच्या रुपड्या वर खर्च करणारा ,शेतकरी /गावकरी लोकांना नकोसा झाला ...अगदीच काही निराशा नाही ...कारण लोकांना आता "नवीनच सापडलेल्या " पिठलं ,भाकरी ,खर्डा ,धपाटे ,यासारख्या "गावरान " थाळीचे आकर्षण वाटू लागले आहे , ५ तारांकित मामाचा गाव किंवा चला गावाकडे अशा "खेड्यात " राहावे वाटू लागले आहे पण याच ठिकाणी जर एखादा गावकरी शेजारी येऊन बसला तर हात नाकाकडे जातात , "शी गावठी " अशी प्रतिक्रिया प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून बाहेर पडते , रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळा  झेंडू फुललेल्या गावात आमंत्रण असूनही जायला नको असते .. थोडक्यात काय ? गाव आणि गावकरी यांना आपण अजूनही मनापासून स्वीकारले नाही हे वास्तव आहे ..
                                असे वैचारिक द्वंद्व चालू असताना थोडा उशीरच पण पाहण्यात "गोष्ट छोटी डोंगरा एवढी " आला ...गावातील लोकांच्या समस्या ,त्यांचे दोलायमान भविष्य , काळोख्लेला वर्तमान , आयुष्याशी चाललेला संघर्ष ,आणि संपवलेली जीवन यात्रा पाहत असताना खूप महिन्यांनी अश्रुना मनापासून वाट मोकळी करून दिली ...हे विदारक वास्तव पाहत असताना मला शेतकऱ्याच्या घरात एका कोनाड्यात ठेवलेली चिमणी आठवली ...फार उत्साहाने आणलेली पण नंतर कोनाड्यात पडलेली , गरजेच्या वेळेसच आठवण होणारी ,रॉकेल वर चालणारी ,मंद तेवणारी ,गरजेपुरताच प्रकाश फेकणारी ,काळवंडलेल्या काचेतून जग पाहणारी , म्हातारीच्या ९ वरातील १/२ वाराच्या वातीवर कशी बशी जाळणारी ...शेतकऱ्याचे आयुष्यही असेच असते न ? आशावादाच्या इंधनावर जळणारे, ज्योतीचे तेज किती असावे यासाठी कधी दैव तर कधी राजकारणी यांच्यावर अवलंबून असणारे , गरजेपुरताच प्रकाश फेकणारे आणि प्रकाश फेकत असताना आपल्याच प्रकाशात आपल्या दारिद्र्याचे भेसूर चित्र दिसू नये म्हणून काळजी घेणारे ,रोजच्या जीवनात महत्व असूनही आपमतलबी लोकांनी कोनाड्यात बसवलेले ,कितेक वर्षे मनावरील काजळी कमी न होता वाढतच जाणारे , वातीचा १/२ वार संपला कि शेवटचा क्षण कोणाचीही पर्वा न करता  आपले अस्तित्व दाखवण्यासाठी तेजोमान होणारे आणि .....
श्वासात होता श्वास तेव्हा नवत कोणी डोकावून बघायला 
आज जेव्हा श्वासच नाही उरला तेवा आले सगळे बघायला 
न्हवत कोणी एक घास खाऊ घालायला 
आज जेव्हा भूकच मेली माझ्याच बरोबर माझी 
ठेवलाय माझ्यासाठी यांनी भात शिजायला 
जन्मभर लाथा मारून जे गेले मला 
आज आले माझ्या पाया पडायला 
शब्दाचाही आधार दिला नाही ज्यांनी 
आज चौघे चौघे आले मला धरायला ......
अशी खंत मनात ठेऊन अनंतात लुप्त होतो ......एक सामान्य शेतकरी !!
                                      असे चित्रपट पहिले आणि विचारचक्रे वेगाने फिरवली कि वाटते प्रगत होऊन आपण काय मिळवले ? शेतकरी , त्याच्या अडचणी , निसर्गाशी चाललेला जुगार , परिस्थिती शी चालू असलेले निरंतर युद्ध , शारीरिक यातनेला मानसिक खंबीरतेची साथ आहे तोपर्यंत जगलेले आयुष्य आणि ते आणलेले अवसान  संपले कि संपवलेले आयुष्य ...या गोष्टी ५-५० हजार रुपये ,विधानसभेत कधीही न मिळणाऱ्या उत्तरासाठी मांडलेले प्रश्न , सरकारचा अहवाल ,एखाद्या एन.जी .ओ ने तयार केलेली पत्रके , कोण्या समितीच्या शिफारसी इतक्यावरच सीमित आहे का ? शेतकर्याची आत्महत्या यावर न्याय मागायचा झाला तर आरोपी करायचे कोणास ? आपल्या संवेदना बोथट तर झाल्या नाहीत न ? कारण सिव्हील मध्ये असताना आत्महत्या करायचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या शेतकर्याची कथा ऐकून कानात कोणीतरी तप्त शिशाचा रस ओतत आहे असे वाटले ...कोणत्याही युद्धात जिंकलेल्या राजास विजयाचे श्रेय दिले जाते आणि पराभूत राजास पराभवाची सहानुभूती ...पण शेतकरी हा एकाच राजा असा असतो कि जो अल्प मनुष्यबळ ,स्वल्प रसद ,दुय्यम साधने ,प्रतिकूल परिस्थिती ,स्वार्थी राजकारणी अशा मातब्बर विरोधकांशी प्रणपणे लढतो आणि शेवटी त्यातच धारातीर्थी पडतो पण त्यास विजयाचे श्रेयही मिळत नाही आणि पराभवाची सहानुभूतीही नाही ..अर्थात काही प्रगतीशील शेतकर्यांनी शासनाच्या साह्याने तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करत आपले जीवन सुखकर केले आहे पण वर दिसणारे टोक म्हणजे संपूर्ण हिमनग नाही न ?

                                       खालावत जाणारी आर्थिक परिस्थिती , पाण्याचा व विजेचा प्रश्न , शिक्षण ,आरोग्य ,सावकारी ,शेतमजूर स्त्रियांचे शोषण ,निसर्गाची अनिश्चितता ,दलाल आणि राजकारणी यांचे दुष्ट हितसंबंध .यासारख्या गोष्टी छोट्याच आहेत पण जो यातून जातो त्याला या डोंगरा एवढ्या आहेत ..म्हणूनच या सिनेमातील एक संवाद मनातील भावनेच्या घरास संवेदनांचे झरोके पडून जातो.....
"काय असते अहवालात ? कि शेतकरी कर्ज काढून लग्न लावतो पोरींचे ? एका वर्षाच्या शेंबड्या पोराच्या बर्थ डे वर हजारो रुपये खर्च करता लग्न पेक्षा जास्त , पैसे कोणाकडेच का असतात ? सर्वांकडे का नसतात ? आमच्या बटाट्याला २ रुपये भाव आणि तुम्हाला ४ वेफर पाकिटात टाकून १० रुपयाला विकणार ,आमचा कांदा सडला तरी विकला जात नाही आणि शहरात कांदा मिळत नाही असे का ? शेतकर्यांनी काय फ़क़्त पेरायच आणि उगवायच ? एवढंच जगण आहे त्याच ? त्याच्या घरी कोणी आजारी पडत नाही ? त्याला पोरी उजवायच्या नसतात ? दरवर्षी ५-५० हजार मातीत टाकून दाखवा ..पाऊस चांगला पडेल का ? बियाणे चांगले उगवेल का ? पिक चांगले येईल का ? भाव चांगला राहील का ? काही माहित नसते आणि अस असताना हजारोचा पैसा मातीत टाकून जुगार खेळणे जमेल तुम्हाला ? आमच्या कापसाचा भाव ठरवता आणि ५ %production cost असलेले injection  हजारोंना विकता तेव्हा विचारता का ? मोबाइल चा ठरवता का हमीभाव ? शीतपेयांची करता का प्रतवारी कापसा सारखी ? फारच छोटे प्रश्न आहेत आमचे ..आम्हाला चांगल बियाणे द्या , पाणी द्या ,आमच्या पोरांच्या शिक्षणाची आरोग्याची सोय करा ......अन आमचबी जगण मान्य करा ....!! "
                           

No comments:

Post a Comment