Saturday 17 March 2012

महान खेळाडूचे....महाशतक !!


दिनांक १६/०३/२०१२ ..... वेळ सकाळची ....चर्चेचे विषय २.... पहिला अर्थसंकल्पाचा आणि दुसरा सचिन च्या महाशतकाचा  ! दोन्हीही विषय तितकेच महत्वाचे आणि मनाच्या जवळचे .... सवई प्रमाणे कॉंग्रेस ने २ हातानी दिले आणि ४ हातानी काढून घेतले ...या दुक्खात भारतीय जनसागर असताना १.३० मिनिटांनी सचिन रमेश तेंडूलकर याचे मिरपूर मैदानाच्या २२ यार्ड खेळपट्टीवर आगमन झाले ... आश्वासक सुरुवात करताना ४ खणखणीत चौकार मारून आशेचा किरण दाखवला .....आणि बघता बघता शतकांचे महाशतक करून कॉंग्रेस सरकार ला "फुल्या फुल्या " वाहणाऱ्या लोकांना स्वतावर " स्तुतीची फुले " वाहायला भाग पाडले... या "सोनियाच्या " दिनाचे अप्रूप सचिन पेक्षा सोनियाला जास्ती असणार ...प्रणव दादांनी निराशा केल्यानंतर ...बाबा राहुल कोठल्या तरी कोपऱ्यात दिग्गी गुरुजी सोबत पंतप्रधान - पंतप्रधान खेळत असताना ... विरोधी पक्ष योर्कर वर योर्कर टाकत असताना पोराला आवरायचे का पक्षाला सावरायचे या द्विधा मनस्थिती मध्ये असणाऱ्या बाईंचे काम सचिन ने हलके केले .....सचिन तेंडूलकर परंपरेत न बसणारे पण सगळ्या जगाला उत्सुकता असणारे महाशतक आज साजरे झाले ....सचिन निवृत्त हो म्हणणारे "अरे सचिन ? अजून १५ शतके करू शकतो " म्हणायला लागले ...तुटून पडणारी प्रसार माध्यमे पुन्हा ठरलेला कार्यक्रम फ़क़्त एक शतक वाढवून दाखवू लागले ... सचिन ला भारत रत्न मिळालाच पाहिजे या चर्चेला पुन्हा उधाण आले ...आणि सचिन ने शतक केले कि भारत हरतो हे सिद्ध करण्यासाठी संघ सहकारी झटू लागले ...हे सर्व होत असताना एक माणूस मात्र शांत होता ...प्रेमा इतकीच टोकाची टीकाही सहन केलेली मानसिकता ,आणि जवळपास २२ वर्षे क्रिकेट खेळल्याने आलेली परिपक्वता आपल्या वागण्यातून दाखवत होता .... नुसते शतक केले तरी मैदानावर " डान्स इंडिया डान्स " सादर करणारे अनेक "शतकवीर " आपण पहिले आहेत ...पण शतकांचे शतक करूनही खेळापेक्षा आणि संघा पेक्षा आपला आनंद मोठा नाही या भावनेने नेहमीच्या शैलीत bat आणि हेल्मेट हवेत उंचावून शांतपणे कौतुकाचा स्वीकार करणारा "महा शतकवीर " आज आपण पहिला ..... सचिन रमेश तेंडूलकर !!
                   सचिन रमेश तेंडूलकर या नावाने गेली २२ वर्षे भारतीय आणि जागतिक क्रिकेट वर आपली मोहिनी घातली आहे ..अनेक खेळाडू येतात ...आपला खेळ दाखवतात काही विक्रम करतात काही मोडतात ....ठराविक काळ रसिकांच्या मनात राहतात आणि नंतर विस्मृती च्या दलदलीत लुप्त होतात ....काही मोजकेच खेळाडू असे असतात कि जे शतकानु शतके लक्षात राहतात ...खेळाचे नाव काढले कि डोळ्यासमोर येतात ..मनात घर करून राहतात आणि येणाऱ्या कितेक पिढ्यांसाठी आदर्श ठरतात ! यामागे असते त्यांचा खडतर सराव ,कठोर मेहनत ,कमालीची शारीरिक क्षमता , सतत नवे शिकायची वृत्ती , खेळा विषयी निष्ठा ,देशा विषयी प्रेम , आपले स्वप्न साकार करायची जिद्द आणि नम्रता !! या सर्व गुणांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा सचिन सारखा खेळाडू घडतो आपली एक वेगळी प्रतिमा तयार करतो आणि ती जपतो , फिक्सिंग च्या सुनामितून सही सलामत सुटतो, प्रत्येक गोलंदाजाच्या मनात आदरयुक्त दहशत निर्माण करतो ....  लहान कृतीतूनही आपली महानता जगाला पटवून देतो ...आजपर्यंत सचिन वर अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली पण त्याला शाब्दिक उत्तर दिल्याचे मला तरी कधी स्मरणात नाही ....विरोधात बोलणाऱ्या लोकांना आपल्या बाजूने बोलायला भाग पडणे यातच यशस्वी माणसाचे यश दडलेले असते .... सचिनची निवृत्ती हि भारता समोरील गंभीर समस्या अनेक वेळा झालेली होती.....त्यावर चर्चासत्रे अनेक झाली , अनेक विचारवंतानी आपले महान विचार बरळले , अनेक संधिसाधू पोपटाना कंठ फुटला , अनेक "कर्तुत्ववान माजी " खेळाडूना रोजगार मिळला , प्रसार माध्यमांना चघळायला विषय आणि पेपर वाल्यांना खप वाढवायचे साधन सापडले .... कारण सचिन आणि सचिन ची निवृत्ती यावर काहीही बोलाव आणि प्रसिद्धी मिळवावी याचा मोह त्याच्या "जिवलग मित्रानाही " आवरला नाही .....रण भूमी असो किंवा रन भूमी ...विजेता सेनानी तोच असतो जो शांतपणे  विरोधी लोकांचे चाळे शांतपणे पाहतो , त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टींवर त्रयस्थ पणे विचार करतो , कमकुवत बाजूवर मेहनत करतो ,भात्यातील अवजाराना कालानुरूप बदलतो आणि हुकुमी अस्त्रांना परजतो , सर्व शक्याशक्यतेचा विचार करतो .... मैदानात उतरतो आणि प्रतिपक्षावर तुटून पडतो ! होणाऱ्या टीका आणि अनाहूत सल्ले यांनी सचिनला "घडवले " आणि सचिन साठी जाळे फेकलेले त्याच जाळ्यात अडकले !
                  १८८ कसोटी सामने १५,४७० धावा ,५१ शतके आणि ६५ अर्ध शतके ,४५ बळी ...४६२ एकदिवसीय सामने १८३७४ धावा ,४९ शतके (नाबाद २०० चा विश्व विक्रम ) ,९५ अर्ध शतके ,१९४ षटकार,१५४ बळी , २९२ प्रथम   श्रेणीय सामन्यात ७८ शतकांसह २४३८९ धावा , १९९८ मध्ये १२ शतके ,१९९६ ,१९९९ ,२०१० मध्ये ८ शतके ... एका वर्षात कसोटी मध्ये १ हजार पेक्षा जास्ती धावा करायची कामगिरी ६ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ७ वेळा ,सलग १८५ एकदिवसीय सामने ,सौरव गांगुली सोबत सलामीला २१ शतकीय आणि २३ अर्ध शतकीय भागी सह ६६०९ धावा ,२८ वेळेला नव्वदीत बाद ,एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सामनावीर (६२) आणि मालिकावीर(१७),आई.सी.सी .नामांकनात अव्वल १० मध्ये गेली १० वर्षे राहणारा एकमेव ,२००२ मध्ये ब्राडमन नंतरचा कसोटीपटू म्हणून सन्मान, २००३ मध्ये विस्डेन कडून अव्वल एकदिवसीय खेळाडू चा सन्मान ,जागतिक क्रिकेट मध्ये ३३,००० पेक्षा जास्ती धावा करणारा एकमेव ,द्रविड सोबत एकदिवसीय मधील ३३१ धावांची सर्वोच्च भागी ,आणि कसोटी व एकदिवसीय मधील सर्व विक्रम नावावर असलेला ,१९९४ मध्ये अर्जुन ,११९७ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ ईअर., १९९७ पद्मश्री ,१९९८ राजीव गांधी खेलरत्न ,२०१० आई .सी .सी क्रिकेटर ऑफ    ईअर ,आई.सी.सी वर्ल्ड टेस्ट XI २००९.२०१० ,आई .सी ,सी वर्ल्ड ओ.डी.आई  XI २००१.२००४.२००७.२०१० ,२०११ असे अनेक जागतिक विक्रम नावावर असताना "महाशतक" ते काय ? म्हणजे अगदी काळ ते झाल्यावरही सचिन म्हणाला कि कोठेही गेले कि सर्व १०० व्या षटका बद्दल बोलत आधीच्या ९९ शतकांबद्दल कोणीच बोलत नाही ....सचिन ने चाहत्यांच्या मानसिकतेवर बरोबर स्ट्रेट DRIVE मारला आहे ..आपली मानसिकताच असते कि महान माणसाकडून भव्य दिव्यच अपेक्षित असते ..आपल्यात तर "शतकाला " प्रचंड महत्व आहे अगदी आशीर्वाद देताना "शतायुषी भव " बोलताना " १०० वर्षे आयुष्य आहे बघ " ,सुवर्ण मोहोत्सव , चित्रपटाने १०० दिवस काढले कि जल्लोष इत्यादी गोष्टींमुळे शतकाला  वलय आहे ...आणि जर शतकांचे शतक होणार असेल तर त्याला "महावलय" प्राप्त होणारच.....याचा सचीन वरही निश्ह्चीत परिणाम झाला ..१ शतकासाठी १ वर्ष वाट पाहावे लागले ... आपल्या समाजाची एक हुच्च मानसिकता असते एखादी वस्तू /माणूस आपल्या मनापर्यंत काम करत आहे तोपर्यंत तिचे कौतुक करायचे आणि तसे झाले नाही कि सरळ मोडीत घालायचे , खराब फॉर्म असो वा फेरारी असो टीका करत राहायचे  .... सचिनचे महाशतक होत नाही हे पाहून अनेकांनी निवृत्त व्हायचा सल्ला दिला पण १९९९ मधील पाठीची दुखापत ,२००१ मध्ये टाचेची दुखापत ,२००२ सालची हाम स्ट्रिंग ची दुखापत ,२००४ टेनिस एल्बो ,२००६ खांदा ,२००७ गुडघा दुखापत यातून सावरून मैदानावर धावांचा पाऊस पडत असणाऱ्या तेंडल्या ला थांबणे माहीतच नवते !!
            महाशतक झाले...कौतुकाचा सडा पडू लागला , अनेक मान्यवर सचिन किती महान आहे याचे गुणगान गाऊ लागले ....मोह होत असूनही त्यांच्या प्रतिक्रिया येथे लिहिणे टाळतोय कारण "दुतोंडी " व्यक्तिमत्वे मला आवडत नाहीत ...महाशतक झाले ,ते होणारच होते ....सचिन खेळतोय आणि एक दिवस तो निवृत्त होणारच आहे ..पण या दोन्ही गोष्टींसाठी त्याच्यावर सक्ती करून जो वैचारिक दरिद्रीपणा दाखवला तो भारताने बांगलादेश कडून हरण्या पेक्षा निंदनीय आहे ... महा शतकाचे ओझे खांद्यावरून कमी झालेले आहे ...आता त्यालामानासारखे काही काळ खेळू द्या .. दीड दिवस कौतुक झाल्यावर " क्या यही समय है सचिन के सन्यास का ?" ...." शिखर तो हुवा पार ...कब करेंगे सचिन एलान सन्यास का ?" असे भपकेबाज मथळे असलेले आणि रणजी सामन्यात सचिन पेक्षा १/२ धावाही न केलेल्या भाडोत्री खेळाडू बोलावून "चर्चा सत्रे " आरम्भू नका .... त्याला निवृत्त होऊद्या...निवृत्त करू नका .... काल महाशतक झाल्यावर शांतपणे जेवा त्याने आकाशाकडे पहिले तेव्हा त्याला काही क्षणा पूर्वीचे आणि आताचे आकाश यात फरक निश्चित जाणवला असेल..... गेले १ वर्ष अपेक्षा ,तिरस्कार ,टीका ,द्वेष , हेटालणी, याच्या काळ्या कुट्ट ढगांनी भरलेले आकाश आज "झाले मोकळे आकाश " भावनेने पाहताना समाधान वाटले असेल ... असा खेळाडू पुन्हा होणे नाही ,असा लढवैया पुन्हा होणे नाही , असा माणूस पुन्हा होणे नाही ,असा विक्रमादित्य पुन्हा होणे नाही ....त्यामुळे जोपर्यंत त्याला शरीर साथ देत आहे तोपर्यंत त्याला खेळू द्या ... आणि ते साध्य करणे सचिन ला अशक्य नाहीच कारण तो म्हणतोच "माझ्यासाठी हा सर्वात कठीण काळ होता,मी हंगामाची सुरुवात चांगली केली होती. पण दुर्दैवाने मोठी खेळी साकारू शकलो नाही. महाशतकाचा मी कधीही विचार करत नव्हतो, पण प्रसारमाध्यमांनी हे सारं सुरू केलं होतं. मी जिथे जायचो तिथं महाशतकाबद्दल विचारणा व्हायची. सर्वजण शंभराव्या शतकाबद्दलच बोलत होते, पण कोणीही माझ्या ९९ शतकांबद्दल बोलले नाहीत. आजची खेळी थोडी वेगळी होती, बॅटवर चेंडू नीट येत नव्हता. तुम्ही किती शतके करता याला महत्त्व नाही, तर संघासाठी धावा करणं महत्त्वाचं आहे. स्वप्नं सत्यात उतरतात, विश्वविजयाच्या स्वप्नपूर्तीसाठी मला २२ वर्षे वाट पाहावी लागली. " !! पूर्ण केली आहेत सारी स्वप्ने , फेडले आहे डोळ्यांचे पारणे , मिळवून दिले आहेत अनेक विजय ,मोडले आहेत अनेक विक्रम , स्थापले आहे अनेक विश्व विक्रम , मिळवला आहे मान सन्मान आणि आदर , झाला आहे अमर क्रिकेट च्या इतिहासात , वाढवली आहे भारताची शान .......एका खेळीयाने !!

2 comments:

  1. Nehmipramanne apratim............vasttavdarshi...........marvalous!

    ReplyDelete