Sunday 21 October 2012

दादा खायाला....



                             असाच कोणता एक पुण्यातील रविवार .... वेळ असेल साधारण रात्री ९.३० ची .... जे .एम . रस्त्यावर गप्पा मारत  आईस्क्रीम चा आस्वाद घेत उभा होतो ... समोरील रस्त्यावरून वाहणारी तरुणाई पहात होतो आणि गर्दीत कोणी लक्षवेधी दिसले तर नजरेने टिपत होतो ..गप्पांचा  ओघ , आईस्क्रीम ची चव  आणि लक्षवेधी दिसण्याची  सरासरी परमोच्च बिंदूवर  असताना रस्त्यावर नेहमीप्रमाणे  बेशिस्तीने लावलेल्या  गाड्यातून वाट काढत एक साधारण १० -12 वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला . कोपराला अलगद स्पर्श करून चेहेऱ्यावरचे  दीनवाणे भाव  , डोळ्यात लाचारीने किंवा सवईने  आलेले पाणी दाखवत  खोल  आवाजात म्हणाला " दादा खायाला " ....हा माझा भाऊ  ?? कोण लागून गेला हा माझा ? काम करायला नको नुसते हात पसरायला हवेत आणि म्हणे खायाला ... मला काय पैसे वर आले आहेत का वाटायला  ? प्रत्येक चौकात २-४ भेटतात, प्रत्येकाला वाटत बसलो  तर माझ्यावर  पण अशीच वेळ येईल "साहेब खायाला " त्यावेळी मला कोणी देणार आहेका  ?? शी ....मी अन असा ?? अरेरे  ...विचार डिलीट .. ! असे सामान्य माणसांप्रमाणे अनेक भावनांचे तरंग माझ्या तात्पुरत्या असंवेदनशील मनावर उमटून गेले आणि तोंडातून  बाण बाहेर पडावेत तसे शब्द बाहेर पडले " मार खाशील पुढे जा ... " कदाचित "खाशील " या शब्दात त्याला कोण आशावाद दिसला असावा म्हणून डोळ्यातून पाणी आणून ,दोऱ्याने  बांधलेली  चड्डी  एका हातानी पुन्हा जागेवर  नेऊन म्हणाला " दादा खायाला ..... " त्याची पावले पुढे पडत होती पण एकसारखा तो मग वळून पहात होता जणू त्याची नजर आता बोलायला लागली होती " दादा खायाला .... "

Saturday 13 October 2012

फेसबुक दुखरी बाजू .....


मानवी आयुष्यात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर जितकी क्रांती झाली त्याहून काकणभर अधिक क्रांती तरुणांच्या आयुष्यात "सोशल नेटवर्किंग साईट्स " च्या आगमनाने झाली असे म्हणायला हरकत नाही ... पूर्वी एखाद्या व्यक्तीची प्रसिद्धी, त्यांचे कर्तुत्व , त्यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येनुसार मोजली जायची ... " बुंद से गई वो हौद से नही आती " या विचारसरणीचा डोक्यावर पगडा असल्याने प्रसिद्ध होणारे बहुतेक लेख , साहित्य , विचार आणि त्या अनुशंघाने होणारा आचार यात सुसूत्रता, वैचारिक- तात्विक चौकट आणि संस्कारांची बैठक दिसून यायची .. आपल्याला उपलब्ध झालेले व्यासपीठ हे शाश्वत नाही याची जाण होती त्यामुळे आपले महत्व , विद्वत्ता आणि पांडित्य सिद्ध करण्यासाठी सतत लेखन -वाचन -मनन आणि चिंतन करण्यात  तरुणाई व्यस्त असायची ... पण आयुष्यात सोशल साईट्स च्या आगमनाने हे सारे संकेत जणू मोडून पडण्यास सुरुवात झालेली आहे ... एखादी व्यक्ती किती लोकप्रिय  ? जितका  त्या व्यक्तीचा सोशल मित्रपरिवार असेल तितकी ... एखादी व्यक्ती किती प्रसिद्ध ? जितके या व्यक्तीच्या एखाद्या पोस्ट ला लाइक्स असेल तितकी .... त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकदा इतरांचे विचार थोडेफार बदलून आपलेच म्हणून मांडले जातात आणि येथेच संपते नवनिर्मितीची आस ..... अशा प्रसिद्धीची इतकी सवय लागते की अनेकदा आपले खाजगी आयुष्य आपण किती सामाजिक करत आहोत याची जाण रहात नाही .....

Sunday 7 October 2012

चीप बॉस

तुमचा स्वभाव तापट आहे ? लहान सहान कारणावरून तुम्ही आदळा आपट करू शकता ? २४ x  ७ तुम्ही कोणाचे "बौद्धिक " घेऊ शकता ? तुमचा काही "काळा" भूतकाळ आहे ? तुमच्या एकांतातील कोणता एम .एम .एस फुटला आहे ? बाकी डोके शून्य  असले  तरी  दिसायला   तुम्ही सुंदर  आहात ?? स्विमिंग पूल मध्ये "जलक्रीडा " करायची तुमची तयारी आहे ? सर्व जगासमोर अंगाला "क्रीम " कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक दाखवू शकता ? भांडी घासणे -घरातली कामे करणे याचे नाटक तुम्ही करू शकता ? २४ तास तुमच्यावर केमेरा रोखला आहे हे सहन करू शकता ? जेथे केमेरा पोहोचत नाही तेथे ज्या कारणासाठी आपण (कु)प्रसिद्ध आहोत अशा लीला करण्याचे चातुर्य अंगी आहे ? अधूनमधून उगाचच भावनांचे उमाळे काढत रडायची सवय आहे ? ??? हो ?? तर वेळ दडवू नका .... बिग बॉस तुमचीच वाट पहात आहे ....