Saturday 13 October 2012

फेसबुक दुखरी बाजू .....


मानवी आयुष्यात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर जितकी क्रांती झाली त्याहून काकणभर अधिक क्रांती तरुणांच्या आयुष्यात "सोशल नेटवर्किंग साईट्स " च्या आगमनाने झाली असे म्हणायला हरकत नाही ... पूर्वी एखाद्या व्यक्तीची प्रसिद्धी, त्यांचे कर्तुत्व , त्यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येनुसार मोजली जायची ... " बुंद से गई वो हौद से नही आती " या विचारसरणीचा डोक्यावर पगडा असल्याने प्रसिद्ध होणारे बहुतेक लेख , साहित्य , विचार आणि त्या अनुशंघाने होणारा आचार यात सुसूत्रता, वैचारिक- तात्विक चौकट आणि संस्कारांची बैठक दिसून यायची .. आपल्याला उपलब्ध झालेले व्यासपीठ हे शाश्वत नाही याची जाण होती त्यामुळे आपले महत्व , विद्वत्ता आणि पांडित्य सिद्ध करण्यासाठी सतत लेखन -वाचन -मनन आणि चिंतन करण्यात  तरुणाई व्यस्त असायची ... पण आयुष्यात सोशल साईट्स च्या आगमनाने हे सारे संकेत जणू मोडून पडण्यास सुरुवात झालेली आहे ... एखादी व्यक्ती किती लोकप्रिय  ? जितका  त्या व्यक्तीचा सोशल मित्रपरिवार असेल तितकी ... एखादी व्यक्ती किती प्रसिद्ध ? जितके या व्यक्तीच्या एखाद्या पोस्ट ला लाइक्स असेल तितकी .... त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकदा इतरांचे विचार थोडेफार बदलून आपलेच म्हणून मांडले जातात आणि येथेच संपते नवनिर्मितीची आस ..... अशा प्रसिद्धीची इतकी सवय लागते की अनेकदा आपले खाजगी आयुष्य आपण किती सामाजिक करत आहोत याची जाण रहात नाही .....

                                     केवळ नामसाधर्म्यामुळे फेसबुक आणि बुक (पुस्तक ) याची तुलना करायची म्हटली तर पुस्तक वाचताना नेहमी मनास काही प्रश्न पडतात .... कस कोणी इतक प्रतिभाशाली असू शकत , कस कोणी इतक सुंदर लिहू शकत की डोळ्याच्या पापणीला बंद व्हायची परवानगी नाकारत वाचकाला पुस्तकाशी बांधून ठेवत , कधी प्रसंगांच्या निवडीने तर कधी लेखनाच्या शैलीने आपल्याला हसवत , रडवत , औत्सुक्याच्या शिखरावरून लोटून देऊन अनिश्चीततेच्या वाऱ्यासोबत झुलवत आणि अखेर निखील आनंदसह वास्तवाच्या भूमीवर  अलगद  ठेवत , कधी शृंगाराने भिजवत तर कधी विद्रोहाने पेटवत कस कोणी इतक संपन्न असू शकत ?? अशा भावना कधी फेसबुक वाचताना मनात येतात का ? वाचत असताना एखादी ओळ - एखादा परिच्छेद  टिपून ठेवावा ,असे वाटते का ?  " मी आज स्वयपाक करणार आहे " किंवा " आज अंघोळ करायचा मूड नाही " अशा पोस्टवर अर्धा शेकडा लाइक्स आणि १-२ शेकडा सल्ले असतात असे लेखन प्रसिद्ध आणि लेखक प्रतिभाशाली मानायचा का ?? तर आजच्या तरुणाईसाठी फेसबुक ही एक व्यक्त होण्याची जागा आहे ... व .पु . म्हणतातच " परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसांपेक्षा चार तासांच्या प्रवासात अनोळखी माणसांजवळ समोरची व्यक्ती अधिक व्यक्त होते " .... आपल्या आयुष्यात काय चालू आहे हे लोकांना सांगणे आणि लोकांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेणे हा मानवी स्वभावाचा एक (कु ) गुण आहे ... या एकमेकांच्या गरजा पूर्ण करत , मी जे करत आहे किंवा करणार आहे ते माझ्या अ.ब.क. मित्र- मैत्रीणीना समजलेच पाहिजे अशा समान मानसिकतेच्या लोकांनी फेसबुक ला " अब्जत्व " बहाल केले आहे ...मिळालेले व्यासपीठ हे शाश्वत आहे याची जाण असल्याने परंतु  आपल्या लेखनाने समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याबाबत अजाण असल्याने ..
                                    मालिनी मुर्मू या आई.आई .एम .बी . मध्ये शिकत असलेल्या तरुणीला आत्महत्या करावी लागली .... प्रियकराने आपल्याला सोडले ही बातमी फेसबुक वरून समजल्यानंतर तिने आत्महत्या करावी का ? याहून कोणी आपले खाजगी आयुष्य इतके सार्वजनिक करावे का ? हा विचार करायचा मुद्दा आहे ...कोण्या एका साईट मध्ये काही वर्ग इतका  गुंततो की एखाद्या पोस्ट /फोटो ला नेहमी सारखे लाइक्स मिळाले नाहीत तर अपमान वाटतो , एखाद्या व्यक्तीचे सार्वजनिक आयुष्य उध्वस्त करायचे असेल तर या साईट्सचा वापर करण्यात येतो  आणि त्यामुळे रक्षा सारखी १८ वर्षीय तरुणी आत्महत्या करते , आसामची दंगल भडकावण्यात या साईट्स चा हातभार असतो ...फेसबुक च्या अनिर्बंध वापरामुळे आपण काय लिहितो याहून किती लिहितो यास महत्व आलेले आहे .. कागदोपत्री निर्बंध असले तरी त्याचा क्वचित वापर होत असल्याने तरुणाई मोकाट सुटली आहे ... फोर्ब्स मासिकानुसार अमेरिकेनंतर भारतात फेसबुकचे सदस्य सर्वाधिक आहेत ही बातमी आपण नवीन तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करतो या अनुशंघाने आनंददायी असली तरी तिचा वापर कसा करायचा हे आपल्यावर आहे ... काही लोक प्रसिद्धीसाठी , काही राजकारणासाठी , काही चिल्लर /रेव्ह पार्टी च्या आयोजनासाठी , काही दुहीची बीजे पेरण्यासाठी तर काही हितसंबंध जुळवणे -टिकवणे आणि मोडण्यासाठी याचा वापर करतात ... अर्थात कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे निराशेच्या अथांग समुद्रात प्रकाशाची काही बेटे असतात , त्या समुद्रात भरकटलेला खलाशी व्हायचे आहे की प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणांची शेती करणारा शेतकरी व्हायचे आहे ..निर्णय तुमचा ....

No comments:

Post a Comment