Sunday 21 October 2012

दादा खायाला....



                             असाच कोणता एक पुण्यातील रविवार .... वेळ असेल साधारण रात्री ९.३० ची .... जे .एम . रस्त्यावर गप्पा मारत  आईस्क्रीम चा आस्वाद घेत उभा होतो ... समोरील रस्त्यावरून वाहणारी तरुणाई पहात होतो आणि गर्दीत कोणी लक्षवेधी दिसले तर नजरेने टिपत होतो ..गप्पांचा  ओघ , आईस्क्रीम ची चव  आणि लक्षवेधी दिसण्याची  सरासरी परमोच्च बिंदूवर  असताना रस्त्यावर नेहमीप्रमाणे  बेशिस्तीने लावलेल्या  गाड्यातून वाट काढत एक साधारण १० -12 वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला . कोपराला अलगद स्पर्श करून चेहेऱ्यावरचे  दीनवाणे भाव  , डोळ्यात लाचारीने किंवा सवईने  आलेले पाणी दाखवत  खोल  आवाजात म्हणाला " दादा खायाला " ....हा माझा भाऊ  ?? कोण लागून गेला हा माझा ? काम करायला नको नुसते हात पसरायला हवेत आणि म्हणे खायाला ... मला काय पैसे वर आले आहेत का वाटायला  ? प्रत्येक चौकात २-४ भेटतात, प्रत्येकाला वाटत बसलो  तर माझ्यावर  पण अशीच वेळ येईल "साहेब खायाला " त्यावेळी मला कोणी देणार आहेका  ?? शी ....मी अन असा ?? अरेरे  ...विचार डिलीट .. ! असे सामान्य माणसांप्रमाणे अनेक भावनांचे तरंग माझ्या तात्पुरत्या असंवेदनशील मनावर उमटून गेले आणि तोंडातून  बाण बाहेर पडावेत तसे शब्द बाहेर पडले " मार खाशील पुढे जा ... " कदाचित "खाशील " या शब्दात त्याला कोण आशावाद दिसला असावा म्हणून डोळ्यातून पाणी आणून ,दोऱ्याने  बांधलेली  चड्डी  एका हातानी पुन्हा जागेवर  नेऊन म्हणाला " दादा खायाला ..... " त्याची पावले पुढे पडत होती पण एकसारखा तो मग वळून पहात होता जणू त्याची नजर आता बोलायला लागली होती " दादा खायाला .... "
                            गप्पांचा ओघ तात्पुरता थांबवला ,आईस्क्रीमहि संपले ,१० वाजून गेल्याने लक्षवेधी पण आता तुरळक दिसायला लागले त्यामुळे रस्त्यावरून घरी जायचा निर्णय घेतला ... गाडी सुरु करून आवडते  " titanium " ऐकत भन्नाट वेगाने गाडी चालवत एका सिग्नल पाशी येऊन थांबलो ( पुण्यात इतके सिग्नल का असतात ?? असो ) समोरून एक मुलगा प्रत्येक चालकाकडे " साहेब .... " म्हणून हात पसरत होता .... म्हणजे मागच्या चौकात जो दादा होता तो या चौकात साहेब झाला ... काय डोके असते साल्यांचे ....Stone hard, machine gun Fired at the ones who run Stone hard, as bulletproof glass i am titanium ....पुन्हा एकदा माझ्यासमोर तोच प्रसंग " साहेब .... "  मी सहज चेष्टेत म्हणालो "अरे मागच्या चौकात तुझ्या भावाला दिलेत भरपूर घे त्याच्याकडून "  सिग्नल पडला होता ... रावणाला लाजवेल असे विकट हास्य करत गर्दीत माझी गाडी दामटली ... काही अंतर गेल्यावर अचानक गाडीचा वेग कमी झाला , मनात अपराधीपणाची भावना यायला लागली , डोळ्यांच्या कडा पाणावायला लागल्या  ...... रस्त्याच्या कोपऱ्यात कोणीतरी  निम्मे खाऊन  टाकलेल्या पुड्क्यातून काहीतरी हुडकत २ मुले काहीतरी खात होती ... आपण काय खातोय याहून आपण काहीतरी खातोय याचा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावरून ओसंडून वहात होता ....आणि नजरेसमोर उभा राहिला " तो " ...... मिळाले असेल त्याला काहीतरी ? का सगळेच असतील निष्ठुर माझ्यासारखे ? मिळालेल्या पैशातून एखादा वडापाव खात असेल का कोणी वडा खाऊन टाकलेल्या पावाचे तुकडे खात कोणत्यातरी दुकानाच्या पायरीवर बसला असेल ? का अजूनही निदान आजतरी पोटभर खायला मिळेल या आशेवर  " दादा ,काका ,मामा " असे सर्वाना  आपलेसे करत कोणी पोटाची खळगी भागवतो का याची वाट पहात असेल ? का  इतके कमी पैसे मिळाले म्हणून कोणत्या तरी दादा चा मार खात असेल ? काय करत काय असेल तो ? काही मिनिटापूर्वी माझा कोणीच नसलेला तो आता मला आपलासा वाटू लागला होता , तो जिवंत राहतोय कि मारतोय याची काहीच काळजी त्याला पुढे जा म्हणताना वाटली न्हवती पण आता त्याच्या काळजीने मन व्याकूळ झाले होते .... का ?? का परत पाठवले मी त्याला .....काही रुपयांनी असा मला काय फरक पडणार होता ? हेच का शिकवले मला ......
                          अं ? काय बरे शिकवले होते मला ..... ? " असेल हरी तर देईल खाटल्यावरी " या मनोवृत्तीच्या माणसांचा कधीही विकास होत नाही , लाचारीचे १०० वर्षाचे आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानाचे १० वर्षाचे आयुष्य जगावे , एकदा हात पसरल्याने काही मिळाले कि आयुष्यभर हात पसरायची सवय लागते  , मागून खाण्यापेक्षा मिळवून खावे ....असेच शिकलो होतो का मी ?? २४ मधली २० वर्षे शिक्षणात गेली ... हेच शिकवले का मला ?? शाळेचे सोडा ... माझ्या आई -बाबांचे संस्कार  ? घरी आलेल्या अनोळखी माणसालाही चहा देऊन पाठवणाऱ्या माउलीचे संस्कार कमी पडले का ? की झालेल्या संस्कारांचा अर्थ काढण्यात मी कमी पडलो .... काय झाले नक्की ? अनेक प्रश्न पण उत्तर सापडत न्हवते .... कदाचित यालाच " प्रज्ञापराध " म्हणत असावेत .... मला समजत होते की मी चुकीचे वागत आहे पण त्या क्षणी चूक सुधारण्याची सुबुद्धी झाली नाही ... अखेर रज-तमाने  सत्वाचा पाडाव केला ... त्या प्रसंगापुरता मी , माझे संस्कार , माझी तत्वे , माझे विचार हरले ... याला भविष्यात कोणापुढे हात पसरायची सवय लागू नये म्हणून केलेल्या प्रयत्नात तो वर्तमानात उपाशी आहे हे वास्तव मी विसरलो ... आयुष्यच ते मनाला खंत लाऊनच धडे शिकवणार ... अनेक दिवस मी त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मला कधी तो दिसलाच नाही ... कदाचित त्या रस्त्यावर सगळेच " अंकुर देशपांडे " मनोवृत्तीचे त्याला भेटले असतील म्हणून त्याने रस्ता बदलला असेल ... पण अजूनही जेव्हा मी त्या रस्त्यावरून जातो तेव्हा मेक .डी. समोरच्या झाडाखाली तो उभा असल्याचा मला भास होतो आणि तो नजरेने बोलत असतो ... " दादा खायाला "......

1 comment:

  1. mastach lihilay ....
    aani hi same situation i think sagalyan samor rojach yete karan ektar bhikari khup wadhlet..roj ektari paise magato..ashya velela sanskarana japave ki thoda nirlajj pana karun bhikaryana palvun lavave te suchat nahi...aani asehi aahe ki hech bhkari aapan dilelya paishyane pot nahi bharat tar gutakha/tambhakh khatat..sad!

    ReplyDelete