Sunday 7 October 2012

चीप बॉस

तुमचा स्वभाव तापट आहे ? लहान सहान कारणावरून तुम्ही आदळा आपट करू शकता ? २४ x  ७ तुम्ही कोणाचे "बौद्धिक " घेऊ शकता ? तुमचा काही "काळा" भूतकाळ आहे ? तुमच्या एकांतातील कोणता एम .एम .एस फुटला आहे ? बाकी डोके शून्य  असले  तरी  दिसायला   तुम्ही सुंदर  आहात ?? स्विमिंग पूल मध्ये "जलक्रीडा " करायची तुमची तयारी आहे ? सर्व जगासमोर अंगाला "क्रीम " कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक दाखवू शकता ? भांडी घासणे -घरातली कामे करणे याचे नाटक तुम्ही करू शकता ? २४ तास तुमच्यावर केमेरा रोखला आहे हे सहन करू शकता ? जेथे केमेरा पोहोचत नाही तेथे ज्या कारणासाठी आपण (कु)प्रसिद्ध आहोत अशा लीला करण्याचे चातुर्य अंगी आहे ? अधूनमधून उगाचच भावनांचे उमाळे काढत रडायची सवय आहे ? ??? हो ?? तर वेळ दडवू नका .... बिग बॉस तुमचीच वाट पहात आहे ....

                                     प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात ,कसे राहतात हे पाहण्याची आणि जाणून घ्यायची सामान्य माणसाला फारच उत्सुक ता असते ... त्यांचे आपापल्या आर्थिक कुवतीनुसार अंधानुकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ... आणि हा देश जर भारत असेल तर तेथे सिनेतारक -तारकांना देवासमान पूजले जाते ... "आप्त वाक्यं प्रमाणं " सारखे " ** वाक्यं प्रमाणं " असे मानून अनेक कलाकारांचे मोठे चाहतावर्ग तयार होतो आणि ज्यांच्या नशिबी हे नसते , ज्यांना अजून "कलाकार " म्हणून कोणी गृहीतच धरत नसते , ज्यांचे करियर सुरु होण्या आधीच संपण्याच्या मार्गावर आलेले असते , किंवा करियर सुरु करण्यासाठी "तुमच्यासाठी कायपण " म्हणायची तयारी असते अशा हवशा -नवश्या -गवश्या "वादग्रस्त " लोकांचे पंचतारांकित घर म्हणजे "बिग बॉस "..... उचलेगिरीतून सुरु झालेला हा कार्यक्रम सहावे पर्व आज आणतो आहे म्हणजे नक्कीच निर्मात्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे .... येणाऱ्या पैशाचा ओघ आणि वाद निर्माण करू शकणाऱ्या व्यक्ती यांची सांगड घातली कि प्रेक्षकाला किती वैताग आला आहे हे समजण्यापलीकडे निर्माता जाऊन पोहोचतो ... 
                                    एखादा कार्यक्रम यशस्वी   होण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करू नये ते बिग बॉस मधून शिकावे ....कोणत्या तरी पर्वात त्या सारा का कोणत्या खान चे " हनिमून " प्रसंग पडद्यावर दाखवले नाहीत म्हणून दुसर्या दिवशी मी गणपतीला ११ रुपये आणि एक पेढा ठेऊन आलो ...अश्मित पटेल आणि वीणा मलिक यांचे चाळे मी वीना तक्रार सहन केले , सनी लिओन ने महेश भट प्रमाणेच मलाही भुरळ घातली ( वारांगानेलाही तिचे वैयक्तिक आयुष्य असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले ) , जुही परमार हिचे अचाट आणि अशक्य " बौद्धिक " ऐकून हि बाई " माता जुही " असा मठ का काढत नाही असा मला प्रश्न पडला ....राहुल महाजन यास जलचर प्राणी म्हणून घोषित करावे किंवा त्याने आपल्या मालकीचा " मसाज सेंटर " चालू करावे अशा सूचना द्यायचा मोह मला झाला  ..देशात ममता बेनेर्जी हिला कोणी टक्कर देऊ शकते का ? याचे कैक वर्षापासून न सापडत असलेले उत्तर साक्षात "डॉली बिंद्रा " च्या रूपाने सापडले .... असे अनेक महान " उपद्रव मूल्य " असणारे प्राणी एका पिंजऱ्यात कोंडले कि त्यांच्यातील सुप्त पशुत्व कसे जागे होते आणि मानवी रूपातील कोंबड्याच्या  झुंझी कशा चालू होतात त्याचे ९० दिवसाचे प्रात्यक्षिक म्हणजे बिग बॉस .... वर उल्लेख केलेले प्रसंग भारतीय प्रेक्षक पाहू शकत नाही का ? नक्कीच पाहू शकतो ..जे लपून लपून पाहावे लागते ते रात्री ९ लाच पाहायला मिळाले तर कोणाला नको आहे ? काही प्रकार सहन झालेच नाहीत तर त्या दिवसापुरता पराकोटीचा राग व्यक्त करायचा आणि पुन्हा काही "सनसनी " होणार आहे अशी जाहिरात पाहिली कि चेनेल लावायचा ...पण ...
                                  इतर सर्व मालिका पाहिल्यानंतर जो प्रश्न मला पडतो तोच प्रश्न हि मालिकाही पाहून पडतो कि यातून निर्मात्याला प्रेक्षकांना द्यायचे काय आणि प्रेक्षकांनी यातून घ्यायचे काय ? मोनिका बेदी ,सनी लिओन ,मेहेक  आदि ललनांचे सौंदर्य पाहून घायाळ व्हायचे कि शक्ती कपूर ,राजा ,कमाल खान यांचा दंगा  पाहायचा ,कि काही टीनपाट लोकांचे बौद्धिक उगाचच सहन करायचे ? नक्की काय करायचे ? आपण काय पहात आहोत याचे भान नाही आपण काय प्रसारित करत आहोत याची कोणाला जाण नाही त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे ... अर्थात हे आक्षेप केवळ याच मालिकेबाबत असायचे कारण काय ? इतर सास-बहु मालिका काय फार उत्तम चालू आहेत का ? किंवा   त्याकाही फार चांगला सामाजिक संदेश देत आहेत का ? तर निश्चितच नाही ....जे बिग बॉस ९० दिवसात करतो तेच या मालिका ९ वर्षात करतात .... केवळ भावनिक प्रसंग ,कुटुंब ,मर्यादा अशा (कुचकामी ) चौकटीतून करतात आणि बिग बॉस ची चौकटच मुळात वादग्रस्त आहे म्हणूनच तो बरेचदा मला "चीप बॉस " वाटतो ....

No comments:

Post a Comment