Saturday 10 November 2012

एकांत

राजे रजवाडे यांचा काळ लोटून जरी काळ झाला असला  त्यांचे आयुष्य  मालिका - चित्रपट  यातून पाहता  येते .. अनेक योजने पसरलेला विस्तीर्ण प्रासादा मधील रुप्या चे छत असलेला महाल , सोन्याच्या सिंहासनावर रुबाबात बसलेला राजा ,समोर चालू असलेले अप्सरांचे कलादर्शन , एका हाती हातभार दूर ठेवलेले खड्ग तर दुसऱ्या हाती कोणत्यातरी पेयाने भरलेला प्याला .... सर्व काही उत्तम सुरु असताना अचानक एक दूत राजाच्या कानात काहीतरी बोलतो ...चेहेऱ्यावर काहीसे चिंतेचे भाव आणून मिशांवर जमा झालेले  पेयाचे थेंब आपल्या रेशमी वस्त्राने अलगद पुसतो ...काही क्षण विचार करून "  एकांत किंवा तख्लीयत " असे म्हणताच भरलेला सारा महाल काही क्षणात रिकामा होतो आणि शिल्लक राहतो राजा आणि त्याला हवा असलेला एकांत ... !! इतका सुखाचा एकांत आपल्या नशिबात नसला तरी राजाच्या नशिबात असलेला दूत आपल्याही नशिबात आहे .. मग तो व्यक्ती असो व काही प्रसंगाची आठवण , आपले कार्य चोख पार पाडतो !!                              विस्तीर्ण पसरलेल्या जंगलाला काही क्षणात भस्मसात करणारा वणवा अधिक धोकादायक कि आग विझल्या नंतर कोणत्यातरी जळक्या ओंडक्या खाली धुगधुगत असलेली एखादी ज्वाला अधिक धोकादायक यावर व्यक्तिपरत्वे मत मतांतरे असू शकतात परंतु माहित असलेल्या चिंता -भय किंवा काळजी ने मनास होणाऱ्या यातनेपेक्षा गतस्मृतींच्या पेटाऱ्यात , मुद्दाम  विसरलेल्या काही घटना -आठवणींच्या अस्तित्वाची खूण म्हणून वास करणारी स्मृती हि अधिक धोकादायक असते यावर कदाचित कोणाचेही मतमतांतर असणार नाही !! भावनावेग असो वा शोकाकुल स्थिती काही काळानंतर वेग हा कमी होतोच पण जसे नदीचा पूर ओसरल्यावर मुळ नदीतीरावर त्याच्या खुणा शिल्लक राहतात तश्याच मनावरही असतात .... ना धड वाळलेल्या ना धड वाहत्या ! अचानक बहुत प्रयत्नाने घातलेले कच्चे टाके उसवतात आणि अनामिक निराशेने आयुष्य व्यापून जाते ... नक्की कोणत्या आठवणीने आपण अस्वस्थ आहोत हे हुडकण्यासाठी सर्व गतस्मृतींची पुन्हा उजळणी होते आणि रोग बरा पण इलाज नको अशा निष्कर्षाप्रत आपण येऊन पोहोचतो ...असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले ...

                                                          मित्रांच्या गराड्यात मजा करत असताना मी कोठेतरी हरवलो होतो .... गुडलक चा आवडीचा मस्का बन आस्वाद घेता नुसताच पोटात ढकलत होतो , आवडीची गाणी नेहमीसारखी आनंद देत न्हवती , फेसबुकचाही कंटाळा आला होता , तासाला बसत होतो पण लक्ष कोठेच लागत न्हवते ...अनेकांच्या " असा का वागतो आहेस ? " या प्रश्नाचे माझ्याकडेही उत्तर न्हवते ...कारण तेच उत्तर हुडकत असताना मी निराशेच्या गर्तेत जात होतो ... तोच रस्ता , तेच मित्र मैत्रिणी , तेच कॅन्टीन ,तीच कॉफी , त्याच चर्चा , नवनवीन विषय , दिवाळीच्या खरेदीचे नियोजन , अंगभूत आगाऊपणा , होणारे विनोद सर्वकाही तेच होते मग  आधीसारखी मजा त्यात का न्हवती ? काय हवे होते मला ? एकांत ...... नको हे सगळे ..एकटे राहावे ...कोणी काही विचारायलाही नको आणि मी काही सांगावे अशी अपेक्षाही करायला नको . कारण " तू बदलला आहेस  / अरे काय झालय ? /असा का वागतो आहेस ? " असे प्रश्न चिडी पेक्षा आधीच गोंधळलेल्या  मनस्थितीस  अधिकच  गोंधळून टाकतात आणि कोडे सोडवायच्या हेतूने आलेले सुटत आलेले कोडे अधिकच जटील  करून " बघ बाबा काय करतोस , शेवटी  तुझा प्रश्न " असे बौद्धिक देऊन निघून जातात ... त्यामुळे पाण्यात राहूनही अळूचे पण जसे कोरडे राहते तश्या कोरडेपणाने आयुष्य व्यापून टाकले होते ..कोणाची सहानुभूतीही नको आणि गर्दीतील एकटेपणाचा अधिक अनुभवही नको ... त्यापेक्षा एकांत बरा ...
                               एकांत ..... अनेकांचा गैरसमज असतो कि " माणूसघाण्या / आत्मकेंद्री " लोकांना एकांत प्रिय असतो . कोणाशी बोलायला नको ,कोणात मिसळायला नको किंवा आपल्या मतांचे खंडन करून अहंकारी मनास  दुखवायला नको म्हणून म्हणून आपलेच विश्व आपण तयार करायचे ज्यातले राजेही आपण ,नियमही आपलेच आणि जगाकडे पहायची दृष्टीही आपलीच .... धनंजय या कादंबरीत काही सुंदर ओळी वाचल्या होत्या " आपण जसे आहोत तसाच समाज असला पाहिजे अशा स्वप्नरंजनात माणूस दंग झालेला असतो .जालातल्या माशाला वाटते जग जलमय आहे ,विकारी राजाला वाटते जग विकारी आहे .प्रत्येकजण आपल्याभोवती कोष  बनवत असतो आणि त्यातून जगाकडे पहात असतो .शेवटचा माणूस कसा जगेल याची त्यांना कोणतीही जाण  नसते तमा नसते " त्यामुळे आपल्याच जगात आपल्या सोयीचा कोष तयार करून जगाला वेडे ठरवण्यासाठी एकांत गरजेचाच असतो कारण एकांतातून बाहेर आले जगात मिसळले कि आपले संकुचित जग आणि वास्तवातले अगण्य जग यात किती अंतर आहे याची जाणीव होते आणि ती करून घ्यायचीच नसते म्हणून एकांत हवा असतो .. (अगण्य जग म्हणण्या मागचा हेतू असा कि भौगोलिक दृष्ट्या जग एकच मानले तरी प्रत्येक व्यक्तीचे वैचारिक ,तात्विक आणि स्वप्नातील जग हे वेगळेच असते .. त्यामुळे एका भौगोलिक जगात किती जग आहेत ते अगण्य आहे ) पण माझे तसे होते का ?? 
                       नक्कीच नाही ... कोणी अस्वस्थ केले  हुडकायचा  प्रयत्न करत नाही पण केले होते हे मात्र खरे ...  जवळपास २  आठवडे  एकांतात  राहून मी नक्की  काय मिळवले  हे  शब्दात  सांगणे ,सांगितला तरी तो पटणे  या कठीण गोष्टी आहेत ..कारण एकांत अनुभवावा लागतो .   गुणदोषांचे  त्रयस्थपणे निरीक्षण करून त्यात बदल -सुधारणा करण्यासाठी एकांतासारखे उत्तम साधन नाही ...आपणच आपल्याला जाणून घेण्यात किती सुख असते आणि  आपलेच  दोष आपणच  मान्य  करणे किती जड जाते या दोहोचाही अनुभव एकांतात येतो ... अधिक  बौद्धिक न देता इतके सांगू शकतो कि एकांत आपल्याला समाजापासून दूर नेत नाही तर आपल्याला आपल्याजवळ आणि  समाजाजवळ आणतो ..संवेदना जाग्या करतो .. त्यामुळे एकदा तरी एकांत अनुभवावा ...जगासाठी वेळ देत असताना स्वतःसाठी काही वेळ मुद्दाम काढणे म्हणजे " एकांत :....
  

2 comments:

  1. hmm...I got.......!
    tu lihitos tar farach sahi..aani patat te kimbahuna mahiti hi asat te pan tuzya sarakhe mandata yet nahi..
    over n all awesome!

    ReplyDelete