Saturday 17 November 2012

बाळासाहेब ..पुनरागमनाय च !!

उस दर आंदोलनाने पेटलेल्या दिवाळीत अनेक जण  बस -उस - टायरी   जाळून   उरलेल्या  वेळेत फटाके उडवून  आणि फराळ खाऊन दिवाळी  साजरी करत होते . आंदोलन रोज चीघळत होते कोणी कोणाची जात काढत होते तर कोणी कोणाचा बाप काढत होते . शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष जाळपोळीतून व्यक्त होत होता ,सामन्यांच्या दिवाळी चे दिवाळे निघाले होते ,२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने "सुतक " दिवाळी भेट म्हणुन दिले होते . जाणता राजा  काही करत न्हवता पण या सर्व परिस्थितीत सर्वांचे लक्ष लागले होते "मातोश्रीकडे "...... गेल्या  ४० वर्षात महाराष्ट्रात -देशात घडलेल्या कोणत्याही घटनेवर "बाळासाहेब " प्रतिक्रिया देत नाहीत तोपर्यंत ती घटना पूर्णच झाली नाही असे मानणारा जो मोठा वर्ग आहे त्यातील मी एक सामान्य माणूस ... बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने , स्वभावाने आणि वक्तृत्वाने भारावलेला ...

                    माझ्या छोटेखानी आयुष्याचा विचार करताना अनेकदा मला असे वाटते कि मी १०-२० वर्षे आधी जन्माला यायला हवा होतो ...आज तर हे प्रकर्षाने जाणवत आहे . मी बाळासाहेब पहिले ते नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्या पक्षत्यागा नंतर खचलेले , वार्धक्याकडे झुकलेले आणि राज यांनी मातोश्री सोडल्याचे दुक्ख सहन करत असलेले बाळासाहेब .. ! अनेकदा त्यांच्या भाषणात आणि लेखनात मी "घराणेशाही लादली नाही " हा गाभा आणि त्या अनुशंघाने ठाकरी टोलेबाजी ऐकायला मिळाली .परंतु बाळासाहेब ज्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आग्रही होते ते विचार त्यांच्याच समृद्ध वक्तृत्वातून क्वचितच ऐकायला मिळाले . माझी आजी म्हणजे बाळासाहेबांची कट्टर समर्थक ... इतर वेळी राखून ठेवलेला आवाज बाळासाहेब यांच्याविषयी बोलताना कसा स्पष्ट आणि धारधार होतो हे आजही मला न उलगडलेले कोडे आहे . बाळासाहेबांनी "माता आणि भगिनी " यांच्या मनात आपल्याविषयी इतका आदर निर्माण केला आहे कि जेव्हा मी निबंध -वक्तृत्व स्पर्धा जिंकून आजीला नमस्कार करायला जातो तेव्हा ती हमखास म्हणते "लिहायचे किंवा बोलायचे असेल तर ठाकरे सारखे बोल ...काय आवाज ,काय नजर ,काय अभ्यास .... " त्यामुळे लहानपणापासून ठाकरे या नावाचे वलय आणि संस्कार मनावर झालेत . म्हणूनच कायम खंत वाटते कि मी बालासाहेबना "मराठी मुद्दा ,मराठी माणसाचा प्रश्न ,मराठी पाट्या इत्यादी सर्वप्रथम मी उपस्थित केला " असे म्हणताना ऐकले आहे पण तो प्रश्न त्यांनी जेव्हा उपस्थित केला तेव्हा मी न्हवतो .... दुर्दैवाने आमच्या पिढीला चांगले राजकीय वक्ते अनुभायालाच मिळाले नाहीत .  सभेची मैदाने "भरवणे " आणि सभेची मैदाने "भरणे " यातील अंतर ते काय आमच्या पिढीस ठाऊकच नाही . म्हणूनच मला नेहमी वाटते  घड्याळ  उलटे फिरवावे आणि १०-२० वर्षे मागे जावे ...बाळासाहेबांचे विचार त्यांची आक्रमकता ,ठाकरी शैली आणि टीकेत असणारी आग पहिल्या रांगेत बसून ऐकावी ,अनुभवावी .  
                       चकोर च्या मागे उभे असलेले बाळासाहेब , अंगावरील त्यांची शाल ,रुद्राक्षाच्या माळा , काळा चेश्मा  , चौफेर  वेध घेत असलेली नजर आणि तुफानी फटकेबाजीत मंत्रमुग्ध होत असलेले कार्यकर्ते  देही याची  पाहण्याचे भाग्य मला कधीच लाभले नाही . मार्मिक मधून बाळासाहेबांचे फटकारे पहिले कि त्या नेत्यांचा हेवा वाटतो  ज्यांच्यावर बाळासाहेबांनी टीका केली . कारण बाळासाहेबांचा शब्द "मिळवावा " लागतो .  एक नेता एक विचार आणि एक मैदान आज  संपले आहे . आता सिंहासनावर  बसलेला वाघ , त्यांचे अप्रतिम वक्तृत्व ,प्रचंड अभ्यास आणि खर्जाच्या आवाजातून गरजलेला माता आणि भगिनी हा शब्द पुन्हा कधीच ऐकू येणार नाही .. शिवाजी पार्क पुन्हा कधीच भरणार नाही डेसिबल च्या मर्यादेत वाघाची डरकाळी कधीच अडकणार नाही कारण  मी काय गमावले हे शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला तर ते शब्दानाही आवडणार नाही .. कारण  शब्दांचा स्वामी आज पंचातात्वात विलीन झाला आहे ... आज रामुदेत शब्दानाही आठवणीत ,  तोडूदेत भावनांचे बंध  शिवाजी पर्कालाही , अनुभवूदेत  पोरकेपण  मातोश्रीलाही ...आजचा दिवस व्यक्त होण्याचा नाहीच आजचा दिवस आहे तो आठवणींचा ... त्यामुळे आठवणी आणि प्रत्येक  आठवणींसोबत  ओघळत असलेले अश्रू यांना बांध  न घालता इतकेच म्हणेन .... बाळासाहेब ..पुनरागमनाय च !!

1 comment:

  1. Mitra.. agadi todalas.. dolyatun pani ananara lekh ahe.. thanks.. RIP Balasaheb.. Maharashtra porkha zala ahe aaj..

    ReplyDelete