Wednesday 29 February 2012

खुदा जाने के......


चित्रपट आणि मानवी स्वभाव यात एक अतूट ऋणानुबंध असतो...आपले आयुष्य .आयुष्यात घडणाऱ्या घटना ,काल्पनिक विश्व प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आणि स्वप्नसुंदरी /स्वप्न कुमार याला पाहण्याचे पूर्ण झालेले स्वप्न ! चित्रपट हा मानवी विचारांचा ,जीवनाचा ,कल्पनाविश्वाचा आणि वास्तविकतेचा एक आरसा असतो ...जो आपलेच प्रतिबिंब दाखवत असतो.. आणि समाधान देत असतो... ७० एम एम चा पडदा ,प्रदर्शित व्हायच्या आधी झालेली हवा ,आमी ना "तो " सिनेमा पाहायला जातोय म्हणून केलेला गाजावाजा , गर्दीतून तीकीट हातात पडल्यावर जणू "ऑस्कर " हातात पडलाय असा झालेला आनंद ,स्वप्नातील राजकुमार/राजकुमारी याला प्रत्यक्ष आयुष्यातील कुमार/कुमारी सोबत पाहताना झालेली निराशा ( काय स्वप्ने पाहिलेली अन काय पदरात पडलंय -एक डोळा स्क्रीन वर आणि एक जोडीदारावर .असो पदरात पडलं अन पवित्र झाल असे म्हणून मनाची मनाची घातलेली समजूत ) ,घातलेले पैसे वसूल होतील ना याची काळजी ,आमी सिनेमा पाहायला आलोय म्हंटल्यावर घरी सासू सासरे काय काथ्याकुट करत असतील याची चिंता ...लग्न झाले नसेल तर आपल्या जागेपासून समोरच्या ३-४ रांगात "कोणी आहे का ?"पाहण्यासाठी चाललेली धडपड ...आणि युगुलांचा "कॉर्नर सीट" मिळावी म्हणून चाललेला खटाटोप ....आणि इतका सगळा "ड्रामा " चालू असताना "विकतचा ड्रामा " पाहण्याची उत्सुकता ........पुढचे २-३ तास प्रेक्षकाला हे सगळं विसरायला लाऊन सिनेमाच्या विषयाशी "बांधून " ठेवणे कि कला आहे ....ती ज्याला जमते तोच सगळ्यात यशस्वी दिग्दर्शक असतो....
                             आपली चित्रपट सुष्टी हि संगीताच्या कोंदणात बसवली आहे ..संगीत हा आपला प्राण आहे...तानसेन हि आपलाच आणि कानसेनही आपलाच....संगीत हि अशी भाषा आहे जिला भाषेची गरज नसते ... संगीत ,कविता आणि प्रेम या तिन्ही गोष्टी समान धाग्यात गुंफल्या आहेत ...कारण या फ़क़्त ऐकायच्या /करायच्या नसतात तर "समजून "घ्यायच्या असतात ...संगीत हि अशी भाषा आहे जी भिन्न मनांना जोडते ,जोडलेल्या मनांना बांधून ठेवते आणि तुटलेल्या मनांना सावरते ....म्हणूनच कधी काळी आपल्या देशात "संगीत नाटके " "संगीत प्रधान " चित्रपट असायचे ....चित्रपटात कोण आहे यापेक्षा कोण गातंय याला महत्व असायचे ....कारण कितीही सुंदर लिहिले तरी तितक्याच समर्थपणे ते "व्यक्त " करता आले नाही तर काय उपयोग ? काळ बदलला ...पिढी बदलली ...धोतरातला नायक प्यांटीत आणि साडीतली नायिका....असो आली त्यामुळे ऐकण्यापेक्षा बघण्याचा पायंडा पडू लागला ! "युग " निर्माण करू शकतील असे संगीतकार /गायक दुर्दैवाने "आताच्या पिढीत " झाले नाहीत त्यामुळे आत्मिक समाधानासाठी अजूनही आमाला लता ,आशा,सुरैया,तलत,मुकेश ,किशोर ,आर .डी., रफी ,नौशाद यांच्या मंदिरात जाऊन नतमस्तक व्हाव लागत ...तरीही मधेच अशी काही गाणी येतात कि जी मनावर गारुड करतात ...
    लिहिलेले अन्विता गुप्ता यांनी लिहिलेले ,वीशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेले ,के.के .,शिल्पा राव यांनी गायलेले ,रणबीर-दीपिका यावर चित्रित झालेले "खुदा जाने के ...." माझ्या मनावर गेली ३-४ वर्षे अधिराज्य गाजवत आहे....काही गाणी इतकी सहज आणि सुंदर असतात ..माणसाचे मन,मनात उमटणाऱ्या भावना ,त्याच भावना शब्दात जोडण्याची कला आणि या सर्वाला वास्तविकतेची साथ यामुळे  ती मनापासून.....मनापर्यंत पोहोचतात ...तरुण जोडपे ,नुकतेच प्रेमात पडलेले ,नवीन नाते ,नवीन भावना ,एकमेकाची ओढ पण ती कशी व्यक्त करायची यासाठी होत असलेली घुसमट ,एकमेकावरचा विश्वास , आणि कधीही न संपणारे प्रेम योग्य शब्दात व्यक्त करणारे हे गाणे ...पहिल्यांदा ऐकल्यापासून ते आजपर्यंत "कंटाळा आलाय बस आता " अशी भावना कधीच आली नाही..." सजदे मै युही झुकता हु तुमपे हि आके रूकता हु ..." पासून सुरु झालेला शाब्दिक आणि मानसिक प्रवास एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो... हे गाणे मनास भावते ते यातील नैसर्गिक शब्दांमुळे आणि भावनांमुळे ... प्रेमात मी तुझ्यासाठी चंद्रावर घर बांधीन .स्विमिंग पूल म्हणून अरबी समुद्र आणीन आणि बल्ब म्हणून सूर्य लावीन असा "रजनीकांत " प्रकारातला प्रणय कोणासही अपेक्षित नसतो....अपेक्षित असते ते नैसर्गिक प्रेम,ओढ,समजूतदार पणा आणि आपलेपणा ....
                             प्रेमात मन गुंतल्या पासून मनात एक अनामिक भीती असते ..." ती/तो सोडून गेला तर ?" कारण प्रेमात विचार करत आणि स्वप्ने रंगवत माणूस इतका पुढे गेलेला असतो कि "जे न देखे रवी ते देखी कवी अन जे न कल्पि कवी ते कल्पि प्रेमी " अशी स्थिती असते ...त्याच्या /तिच्या सवई,दैनंदिनी ,हसणे ,रुसणे .आवाज .आवड -निवड ,भेट ,विश्व हे आपलेच झालेले असते .... स्वताचे काहीतरी होते याचा विसर पडलेला असतो म्हणू मिर्झा गालिब म्हणतात -"हम भी थे काम के....." इतक्या पुढे गेल्यावर पुन्हा शून्यापासून आरंभ करणे हे कठीण असते ...म्हणूनच तो म्हणतो "दिल कहे के आज तो छुपालो तुम पनाहो मै के डर है तुमको खो दुंगा...दिल कहे कि संभल जरा ख़ुशी को न नजर लगा के डर है मै तो रो दुंगा ..." प्रियकराची काळजीवजा तक्रार ऐकल्यानंतर "तुझा माझ्यावर विश्वासच नाही " म्हणून फुगणाऱ्या प्रेयासिपेक्षा "करती हू सौ वादे तुमसे बांधे दिलके धागे तुमसे ये तुम्हे न जाने क्या हुवा ..." म्हणून त्याची समजूत घालणारी ,तीसुद्धा नात्यात किती गुंतली आहे पटवून देणारी प्रेयसी किती भावना प्रधान वाटते ... "विश्वास " हीच एक गोष्ट असते जी नाते बांधून ठेवते ....आणि तो विश्वास जपत आणि वाढवत असतो तो निकोप आणि नैसर्गिक संवाद......

                            खरच या गाण्यात प्रेम आहे , मला फ़क़्त तुझ्याशी देणे घेणे आहे जगाचे मला काय ? अशी तरुणाईची मानसिकता आहे , एकमेकांवरील विश्वास आहे ,शेवट पर्यंत साथ द्यायची इच्छा आहे , जोडीदाराला दिलेले महत्व आहे .....आपलेसे करणारे शब्द आहेत ...कानाला तृप्त करणारे संगीत आहे ....हाव भावाने ते शब्द आणि संगीत पडद्यावर जिवंत करणारे प्रेमी युगुल आहे ....अजून काय हवे ? पाडगावकर म्हणतात " प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत " प्रेम जरी सेम असल तरी ते व्यक्त करायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात ....मन हे लढून किंवा भांडून जिंकता येत नसत तर ते मनातल्या भावना व्यक्त करून जिंकाव लागत ...आणि जिंकल्याच्या धुंदीत न राहता ते कायम टिकवाव लागत ....कितीही फिल्मी वाटला तरी शाहरुख चा "हम जीतेभी १ बार है......ये सब दोबारा नही होता " हा संवाद मनास स्पर्शून जातो....प्रेम सर्वांनाच मिळते पण नशीबवान ते असतात ज्यांना ते योग्यवेळी "समजते ".....असे हे पवित्र प्रेमा विषयी बोलायचे म्हंटले कि स्मृतीवरचा पडदा दूर होतो.....कानात संगीत वाजू लागते ..अपोआप तोंडातून शब्द बाहेर पडतात ...... "खुदा जाने के मै फिदा हु खुदा जाने मै मिट गया खुदा जाने ये क्यू हुवा है के बन गये हो तुम मेरे खुदा............                          

No comments:

Post a Comment