Saturday 12 April 2014

हतबल युवराज !!

२१ बॉल मै ११ रन बनानेवालो . . जनता माफ नही करेगी 

१४ करोड मै मुझे खरीदनेवालो . . जनता माफ नही करेगी 

चषक उंचावण्यास आसुसलेले २२ हात . त्या हाताना आपल्या तालावर नाचवणारी २२ यार्डाची खेळपट्टी . चुकणारे ठोके . वाढणारा जल्लोष . लंकन वाघांनी ठिकठिकाणी ओरबाडल्या , चावल्या , नखे मारल्यामुळे अंगातून वाहणारा 'ब्लीड ब्लू ' . लंका दहन  व्हावे  म्हणून नेहमीप्रमाणे नवस बोलणारे कोट्यावधी भारतीय . भारतीयांचा नवस पूर्ण न होता 'अबकी बार . . हारना मत यार ' म्हणून प्रती नवस बोलणारे लंकन . चेंडूगणिक सामन्याचे स्पष्ट होत चाललेले चित्र . चेहेर्यावरून उडत चाललेले अन चेहेर्यावर जमा होत असलेले रंग . प्रत्येक रंगाचे एक वेगळेच समाधान ,दुक्ख अन गोष्ट . कही बजे शेहनाई तो कही मातम का माहोल . . . या सर्व चित्रात कोठेही न दिसणारा . . न जाणवणारा एकच खेळाडू . . जिंकलो तरी मार हरलो तर डबल मार या जाणीवेने कोठेतरी हरवलेला . . अन सर्व काही हरून , पुढचा काही काळ पाठ न सोडणारी टीका पाठीवर घेऊन  मैदानातून बाहेर पडणारा . . . . . ''हतबल युवराज '' . . . . 


             
युवराज सिंग . . या नावात प्रतिभा , कला , जिगरा , माज , स्वच्छंदी पणा , बेदरकारपणा , जिद्द , मेहनत आणि दुर्दैव सर्व काही सापडते . अर्थात शोधले तरच . अंगातील गुणांनी सौरव गांगुलीच्या जवळपास जाणारे तर अवगुणांनी विनोद कांबळी च्या भोवती पिंगा घालून पुन्हा मार्गावर अन संघात यायचा प्रामाणिक प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व . . युवराज हा मुळातच अन मुळापासून वेगळाच आहे . झोकून देणे हा भारतीय संघात अभावाने दिसणारा अन दिसलाच तर प्रचंड कौतुकास्पद प्रकार मानला जाणारा प्रकार युवराज ने संघात 'नियमित ' केला . नाही धावा करणे अन धावा देणे यात भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही . कितीही धावा केल्या तरी त्या 'वाचवता ' न आल्यामुळे किंवा कितीही धावा असल्या तरी 'बिनीचे ' फलंदाज बाद झाल्यावर 'पाठलाग ' करायचा जिगरा पेवेलिअन मधेच ठेऊन मैदानावर उतरणे हा 'सवयी ' संघास नवीन नाहीत . एकदिवसीय सामन्यात सचिन बाद झाला अन कसोटीत एकदा राहुल नामक भिंत पडली की भारतातील टीव्ही बंद व्हायचे . . . कारण 'फिनिशर ' नावाची जागा जरी संघात असली तरी त्या जागेस न्याय देणारा खेळाडू भारतास गवसायचा होता . . युवराज ने ही जागा घेतलीच  पण भारताचा जोन्ति ऱ्होडस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोबिन सिंग याची जागाही भरून काढली . . . एरवी बोटाला चाटून जाणारे चेंडू बोटात अलगद स्थिरावू लागले . . मागच्यास हात न करता चेंडू पर्यंत धावत जायची वृत्ती संघात बळावू लागली . . पाठलाग करूनही सामना जिंकता येतो हा विश्वास संघात जोम धरू लागला या 'बदलास ' गांगुलीचे नेतृत्व जितके जबाबदार आहे तितकेच युवराज चे कर्तृत्वही कोठेतरी कारणीभूत आहेच . . . 

            नेटवेस्ट मालिकेतील सामना अजूनही मला स्पष्ट आठवतो . . युवराज अन मोहमद यांनी खेचून आणलेल्या विजयाचा कैफ चढल्याने लोर्द्स वर टीशर्ट काढून दादागिरी करणारा दादा . . लाजेने खाली बघणारा फ्लीन्तोफ आणि अक्खा इंग्लिश संघ . . चौकातल्या माजोरड्या दादाला एकाने सगळ्या जनतेसमोर मुस्कटात हाणल्या तर तो ज्या कावर्या बावर्या अन भेदरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहतो त्याच नजरेने सीमेपार जाणारे चेंडू भेदरलेल्या नजरेने पाहणारा स्तुअर्त ब्रोड , त्याच्या ८४ धावांकडे बावचळून बघणारे गिलेस्पी ,मेग्रा , ली , २००७ सालचा अन २०११ सालच्या विश्वचषकातील त्याच्या खेळी , त्याने उध्वस्त केलेल्या दांड्या अन त्याच्या उध्वस्त झालेल्या दांड्या , जरा आठवून बघा . . . . चक दे इंडिया मधला शाहरुख खान एका पराभवाने 'गद्दार ' ठरवला जातो तसे युवराजला ठरवून काय साध्य होणार आहे ?? एकहाती सामना फिरवायची क्षमता ज्या मोजक्या खेळाडूत आहे त्यात युवराज चे नाव 'जागतिक ' यादीत अग्रक्रमावर येईल यात कोणाचेही दुमत असायचे कारण नाही . केवळ तो दिवस त्याचा हवा . . . 

         
स्फोटक -विस्फोटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजांचे हेच तर शल्य असते . . बसला तर सिक्स नाहीतर कट्टा फिक्स . . अगदी कोणीही फलंदाज उचला . . सेहवाग ,युवराज ,रैना , ख्रिस गेल , ब्रेंडन मेक्लाम , शाहीद आफ्रिदी , डेवीड वार्नर , फिंच , बेल , बोपारा , पोलार्ड इत्यादी . . या खेळाडूंची तुलना तुम्ही राहुल , लक्ष्मण , अमला , हसी , संगकारा , बेवन , चंदरपोल , यासारख्या 'क्लासि ' खेळाडूंशी तुलना करूच शकत नाही . कारण त्यांचे 'रोल ' अन संघाच्या -चाहत्यांच्या त्यांच्याकडून असलेल्या 'अपेक्षा ' वेगळ्या आहेत . 'हिटर ' दीर्घ काळापर्यंत फोर्म मध्ये राहिला आहे असे माझ्या तरी ऐकिवात नाही . कारण खेळपट्टीवर स्थिरावणे हा त्यांचा रोल नसतो . गोलंदाजाचा संयम ढासळून त्याने लूज बॉल टाके पर्यंत संयम दाखवण्याची त्यांना परवानगी नसते . आलेला प्रत्येक बॉल उचललाच पाहिजे हा या २० २० खेळाचा अलिखित नियम आहे . . तो सर्वांनाच पाळायला लागतो . . त्यामुळे या नियमात कूर्मगतीने खेळणारा युवराज अजूनच 'उठून ' दिसतो . . . त्याने स्वतःस सचिन , विराट , रिचर्डस , सनी , हेडन , गिलख्रिस्त , जयवर्धने , जयसूर्या यांच्या  संघाची गरज ओळखून दोन्ही शैलीत खेळ करणाऱ्या पंक्तीत बसवले असते तर बरे झाले असते पण आता वेळ निघून गेली . . . 

       

 क्रिकेटचा युवराज सध्या ३२ वर्षाचा आहे . . त्याचा सेहवाग ,हरभजन ,गंभीर , गांगुली झाला नाही तर तो अजून फारतर ३ वर्षे 'सलग ' खेळू शकेल . त्यात कसोटीत स्थान मिळणे अशक्यप्राय तर येत्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धे नंतर संघात स्थान टिकवून ठेवणे फारच भव्य स्वप्न . . . अनेक सक्षम पर्याय तयार असताना जुन्या घोड्याला आणखी एक संधी देऊन जुगार खेळण्याचे काम जुगारी बीसीसीआय फारकाळ करेल असे सध्याच्या लक्षणांवरून तरी दिसत नाही . . त्यामुळे जितका वेळ उपलब्ध आहे तितक्या वेळात आपण 'गमावलेले ' काहीतरी सव्याज वसूल करणे हेच युवराज च्या हातात आहे . . . कारण भारतात खेळात 'स्वेच्छा ' निवृत्तीचे भाग्य मिळायला युवराज काही सचिन नाही अन काहीच कर्तुत्व नसताना केवळ (कोणीतरी ठेवलेले ) नाव युवराज आहे म्हणून सदा सर्वदा आघाडीवर राहायला युवराज काही राहुल गांधी नाही . . सर्वच बाबतीत तो हतबल आहे . . . 

   
     अर्थात आमची पिढी ही युवराजांची हतबलता पाहणारीच आहे . . मग तो शुमाकर असो , स्मिथ असो , धावांसाठी झगडणारा सचिन असो , ग्रेंद सलेम साठी व्याकूळ झालेला फेडरर असो , विजेतेपदा साठी वेटिंग लिस्ट मध्ये असलेला टायगर वूड्स असो किंवा याही वयात काहीतरी भरीव कामगिरी करून निवृत्तीत आनंद गवसावा म्हणून झटणारा विश्वनाथ असो . . . . युवराजांची हतबलता चाहत्यांना हेलावून टाकते !!  

No comments:

Post a Comment