Saturday 18 August 2012

लोकपाल : एक फसलेले आंदोलन


 सिमेंट च्या जंगलात , श्वापदासामान मनोवृत्ती असलेल्या माणसांच्या गर्दीत , मोबाईल- गाड्यांचे हॉर्न याच्या गजबजाटात , पैशामागून येणाऱ्या सुखाच्या सहवासात रमताना अचानक "नैतिकतेचा "सूर्य ढळल्याचे लक्षात येते ... चिंताक्रांत मनस्थितीत सर्वत्र पसरलेल्या अंधकारात यातून आपल्याला कोण बाहेर काढेल याचा युद्धपातळीवर शोध सुरु होतो सवयीनुसार देवासही वेठीस धरण्यात येते ... प्रचंड जनसमुदाय परिस्थितीने हतबल झाला आहे याची खात्री पटली की एक व्यक्ती खिशातून काडी बाहेर काढून पेटवते ..अंधकारात ती प्रकाशाची तिरीप महत्वाची वाटते आणि ती देणारा माणूस देवासमान भासू लागतो .... त्या काडीच्या उजेडात सर्वांची वाटचाल सुरु होते मध्यंतरी अनेक भाट त्या व्यक्तीची स्तुतिसुमने उधळून कौतुक करू लागतात , लोकही त्याला कधी महात्मा तर कधी देव मानू लागतात अगदी गणपतीच्या मूर्त्याही त्या व्यक्तीच्या चेहेर्यातून बनू लागतात आणि या सर्व पोषक वातावरणात त्या व्यक्तीच्या मनातील "अहं " जागृत होतो ... या जगात केवळ मीच अनादी व शाश्वत आहे व इतर सर्व पामर आहेत अशी कुचकामी धारणा होते , बोलण्यात -वागण्यात अहंकार जाणवू लागतो आणि त्या अहंकाराने उन्मत्त होऊन लोकांचे काय होईल याचा विचार न करता काडी विझवण्यात येते ... पुन्हा सर्वत्र अंधकार झाल्याने अनेकांचा कपाळमोक्ष होतो व ते लोक एकमेकांना विचारू लागतात .... या महात्म्याने आपला विश्वासघात करून काय साधले ?? असाच प्रश्न अण्णा हजारे यांचेबाबत सर्वत्र विचारला जात आहे .......
                      भारताला आणि भारतीय जनतेला महात्मा गांधी यांचे आणि त्यांच्या विचारांचे कायमच आकर्षण राहिले आहे ...त्यांच्या अहिंसा -सत्याग्रह -उपोषण या सकारात्मक विचारधारेचा खूप खोलवर परिणाम भारतीय मानसिकतेवर झालेला आहे ... त्यामुळे कोणी उपोषण करायला बसले की त्यास हमखास सहानुभूती आणि पाठींबा प्राप्त होतो .. हीच भारतीयांची मानसिकता आणि भ्रष्टाचारामधून  मुक्त करण्यासाठी हवी असलेली मसीहा ची गरज ओळखून श्री .अण्णा हजारे यांनी भारताच्या राजकारणावर एक नवा डाव टाकला .... अण्णा हजारे यांनी आधी अनेक उपोषणे केली असली तरी यंदा त्यांना मिळालेला प्रतिसाद अत्यंत अविश्वसनीय होता ...उन्मत्त झालेल्या राजकीय सत्तेला उलथवून टाकण्यासाठी सामान्य जनता  जसे कोण्या एका सेनानी च्या नेतृत्वाखाली एकवटते तशी तमाम भारतीय जनता अण्णा हजारे यांच्या सोबत कॉंग्रेस च्या विरोधात एकवटली होती .... १५ /०८/२०११ या दिवशी त्यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता ...एखाद्या मुद्द्यावर आपले वैचारिक -धार्मिक-जातीय -आर्थिक -भौगोलिक -पाक्षिक मतभेद टाळून एकत्र येण्याची घटना आमच्या पिढीने प्रथमच पहिली ( जयप्रकाश यांचे आंदोलन दुर्दैवाने आमच्या पिढीस पाहायला मिळाले नाही ) ..सोशल मिडिया चा केलेला प्रभावी वापर , तरुणांच्या मनात असलेला असंतोष , प्रसारमाध्यामानी अखंड केलेले प्रक्षेपण , मै अण्णा असा संदेश लिहिलेल्या टोप्या घालून फिरणारे कार्यकर्ते, अण्णा हजारे यांनी सुरु केलेले उपोषण यामुळे संपूर्ण देश अण्णामय झालेला होता ... अण्णा हजारे म्हणजे लोकपालरुपी व्याघ्रावर विराजमान होऊन  हाती त्रिशूळ घेऊन भ्रष्टाचाररुपी  दानवाचा संहार करणार आहेत ( मग अहिंसेचे काय ? अशी विचारायची सोय तेव्हा नवती ) आणि जो कोणी त्यांची उपासना करणार नाही तो मानव नसून दानवच आहे इथपर्यंत त्यांचा प्रभाव वाढला होता पण १५-८-२०११ ते १५-०८-२०१२ या एका वर्षात असे काय घडले कि ज्याने अण्णा यांना संपूर्णपणे माघार घेऊन ज्या मार्गाला नावे ठेवली त्याच मार्गावर चालणे भाग पडले ?
                         स्वतःस प्रती गांधी म्हणवून घेणाऱ्या अण्णा हजारे व त्यांच्या कार्यकर्त्यांना गांधी विचारसरणीतील "संयम " कायमच वर्ज्य होता आणि आहे ....ज्या लोकशाहीत आपण वाढलो ज्याचा आपण स्वीकार केला त्यास सतत नावे ठेवणे , राज्यकर्त्यांना दुषणे देणे आणि राजकारणी लोकांच्या धोरणाला वैतागलेल्या लोकांकडून टाळ्या मिळवणे हे टीम अण्णा ला सवयीचे झालेले आहे ...ज्या बुद्धीजीवी वर्गाच्या पाठींब्याने हि चळवळ आकारास आली त्यास अतिरंजित - भपकेबाज व्यक्तव्यांची शिसारी येऊ लागली आणि तिथेच टीम अण्णा ची किंमत घसरू लागली ... शरद पवार यांच्या हल्ल्यावेळी "एकही मारा ... " असो ,लालू प्रसाद यांना शिकवलेले   ब्रह्मचर्याचे धडे   असो वा केजरीवाल यांचे गाजलेले " संसदेत १६३ सदस्यांवर बलात्कार,खून ,दरोडे यांचे आरोप आहेत " असो भूषण यांचे "काश्मीर प्रश्नात  सार्वमत घ्या असो... नजीकच्या भूतकाळातील मनमोहन सिंग यांचे आरोप असो किंवा " बलात्काराला महत्व दिले जाते पण लोकपालाला दिले जात नाही " असे बेदी यांचे वैचारिक क्षुद्र व्यक्तव्य असो ..या साऱ्यातून यश माणसाला किती अंध बनवते याचे दर्शन घडते ...याच कारणाने लोकांचा अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठींबा कमी होऊ लागला ..उत्तर प्रदेश निवडणुकात आलेले अपयश ,मुंबई उपोषणाचा फ्लोप शो , मुंबई -नाशिक -पुणे महानगरपालीकात असलेली अनुपस्थिती सध्या जंतर मंतर वरची रोडावलेली संख्या हा ओहोटीला लागलेल्या प्रभावाचा पुरावा आहे ....
                      यंदाचे आंदोलन हे आंदोलन होते का यावर शंका घेण्यास जागा आहे ... कारण आंदोलनाच्या मुद्द्यावरून अगदी आदल्या दिवशी पर्यंत टीम अण्णा व अण्णा हजारे यांच्यात मतभेद होते ...सदर आंदोलन हे केवळ राजकीय पक्ष स्थापन करण्यास केलेले होते यात शंकाच नाही कारण केवळ एका रात्रीत कोणी राजकीय पक्ष स्थापण्याचा निर्णय घेऊ शकत नाही .. टीम अण्णा बरखास्त करून राजकीय पक्ष स्थापन  करण्याचा निर्णय चांगलाच भपकेबाज आहे ... ज्या संसदेला नावे ठेवली त्याचाच पुळका यायचे कारण काय ? सत्तेची उब सर्वांनाच हवी असते .... अण्णा हजारे यांचे वागले नेहमीच दुटप्पी असते याचे प्रत्यंतर राजू परुळेकर ब्लोग प्रकरण ,शरद पवार हल्ला ,मनमोहन सिंग वाद यावरून स्पष्ट झालेच आहे ... जोपर्यंत तुम्ही त्याची स्तुती करता तोपर्यंत ते खुश असतात .... लोकांची कमी झालेली सहानुभूती वाढायची वाट पाहून नव्या राजकीय पक्षाचा बेदी  आणि संतोष हेगडे यांच्या अनुपस्थितीत शुभारंभ करण्यात येईल ....२०१४ च्या निवडणूक लढवल्या जातील ....जसे लोकपाल संमत झाले नाही म्हणून कॉंग्रेस आरोपी ,यंदा प्रसारमाध्यामानी अपेक्षित प्रसिद्धी दिली नाही म्हणून ते "कुत्रा " तसेच निवडणुकीत यश मिळाले नाही तर भारतीय जनता भ्रष्टाचारी ठरवायलाही टीम अण्णा कमी करणार नाही ... 

No comments:

Post a Comment