Thursday 23 August 2012

गिरणी ......विचारांची आणि मानसिकतेची




                जुन्या चाळीची साक्ष देणारी चौकट , अरुंद बोळाला आणखी अरुंद करण्यासाठी लावलेल्या सायकल आणि स्कूटर , चाळीचे जुनाट लाकडी बांधकाम प्रथमदर्शनी दिसूच नयेत म्हणून त्यावर वाळत घातलेले लाकडाच्या तुलनेत नवे कपडे , आताच्या घरकुलात क्वचितच सापडणारे प्रशस्त अंगण , या सर्वाना सामाऊन घेत लाकडी जिन्यावरून आवाज न करता वर सरकणारा कॅमेरा .....मुलांच्या गलक्यातसुद्धा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि कथेतील नायकाच्या विश्वाची ओळख करून देण्यासाठी  "कर्र कर्र " आवाज करत उघडणारा दरवाजा ... पतीनिधनाच्या आघाताला मागे सारून पक्षाघाताने आजारी असलेल्या सासऱ्याला औषध देणारी नायकाची आई आणि नायकाचे हे विश्व बदलून टाकण्यासाठी येणार असलेली ..... " गिरणी " 
                उमेश कुलकर्णी यांनी त्यांच्या "गिरणी " या लघुपटात एका यंत्रामुळे किंवा मानवाच्या यांत्रिकीकारणामुळे एका लहान मुलाच्या विचारांवर -मानसिकतेवर आणि भाव विश्वावर किती सखोल परिणाम होतो याचे अत्यंत प्रभावीपणे चित्रण केले आहे .... .....संवादांपेक्षा कथेतील बाल नायकाच्या हाव भावाकडे अधिक लक्ष दिल्याने ती कथा मनास अधिकच भिडते ...वडिलांच्या निधना नंतर घरातील चरितार्थासाठी गिरणी आणायचा निर्णय त्याची आई -मामा घेत असताना त्याच्या चेहेऱ्यावर उमटलेले अजाणतेपणाचे भाव , गिरणी आणायच्या आदल्या दिवशी रात्र जागून काढतानाचे उत्सुकतेचे भाव , गिरणी घरी आणतानाचे आनंदाचे भाव , गिरणी जिन्यातून वर घेऊन जात असताना त्याच्याच मित्राने हात लावल्यावर " ए हात लाऊ नको आमची गिरणी आहे " म्हणताना उमटलेले संरक्षणात्मक भाव , " काकू पेढा घ्या ....आमच्या घरी गिरणी आणली आहे आता दळण आमच्या कडे द्यायचे " अशी मौखिक प्रसिद्धी करतानाचे प्रसंग ,इतर मुले खेळत आहेत आणि आपण दळत आहोत याची जाणीव झाल्यावरचे उदास भाव , स्वप्नात अंगावर पीठ पडत आहे / गिरणी तोडताना चेहेऱ्यावर /अविर्भावातून व्यक्त केलेल्या रागीट भावना या सर्व मानवी छातंचे प्रभावी चित्रण दिग्दर्शकाने केले आहे ...
                  हा लघुपट आहे एका मुलाचा आणि त्याचे विश्व बदलणाऱ्या गिरणीचा ...अनेकदा आर्थिक विवंचनेमुळे लहान मुलांना आपल्या बालपणात प्रौढासारखे वागावे लागते पण प्रौढ असणे आणि तसे वागणे यात किती अंतर असते ते हा लघुपट स्पष्ट करतो ... आपल्याला काम करायचे आहे आणि गिरणीचे हप्ते फेडायचे आहेत म्हणून खेळ /अभ्यास /शाळा सोडून झपाट्याने काम करणारा समीर ( बाल नायक) आणि हप्ता संपला म्हणून आई समाधानाने घरी परत येत असताना तीच गिरणी तोडून भिंतीशी अपराधी भावनेने उभा असलेला समीर पाहिल्यावर  मनात प्रश्न उपस्थित होतो की नक्की अपराधी कोण ?? बालपणी त्यास पितृवियोगाचे दुक्ख देणारी नियती ? परिस्थिती पुढे हतबल झालेली त्याची आई ? गिरणीची संकल्पना मांडणारा त्याचा मामा (गिरीश कुलकर्णी ) ? गिरणीत गुंतलेला समीर  ? त्याच्या दप्तरातून पीठ पडले म्हणून चिडवणारी- गिरणी चालवतो म्हणून त्यास "शेठ " म्हणून चिडवणारी मुले ? लहानपणाची जाणीव झाल्यावर लहानासारखे वागता यावे म्हणून दळणाचे डबे सांडणारा , मोठ्याने पाढे म्हणणारा आणि अंती रागाने घरी येऊन त्याच्या bat ने तोडफोड करून संपूर्ण ,ताकदीने कधीकाळी त्याचे विश्व असलेली गिरणी खिडकीतून लोटून देणारा समीर ? त्यास तसे करण्यास थांबवायचा असमर्थ प्रयत्न करणारे पक्षाघाती आजोबा (चंद्रकांत गोखले ) की आपल्या आवाजाने समीर ला बाकीचे सर्व आवाज विसरायला लावणारी , आपल्या जात्यासारखे समीर ला गोल गोल फिरत आहोत किंवा त्याच्या अंगावर पिठाचा पाऊस पडत आहे अशी स्वप्ने दाखवणारी ........ " गिरणी " ..... ??
                    अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण करून हा लघुपट संपतो .... दिवे जाऊन पुन्हा लागायच्या दरम्यानच्या अंधकारात डोळ्यासमोरून हॉटेल /चहा च्या टपरीवर काम करणारा असाच एक समीर , सिग्नल वर पैसे द्या म्हणून येणारा समीर , ढोलाच्या तालावर दोरीवरून कसरती करणारा समीर , बूट पोलिश करणारा समीर , दुध /पेपर टाकणारा समीर आणि आतापर्यंत भेटलेले अनेक समीर डोळ्यासमोरून झर झर सरकू लागतात आणि मन त्यांच्या भावविश्वाचा अंदाज घ्यायचा अयशस्वी प्रयत्न करू लागते ... लहान सहन गोष्टी एखाद्याच्या आयुष्यावर इतका खोलवर परिणाम करू शकतात हे वास्तव अस्वस्थ करते ...कथेतील नायक त्याच्या खोलीतून गिरणी खाली टाकून अपराधी भावनेने हप्ते संपल्याच्या आनंदाने घरी येत असलेल्या आईच्या प्रतीक्षेत थांबतो पण खिडकीतून खाली पडलेली गिरणी आपल्या विचारचक्राला नवी गती देते आणि सुरु होते गिरणी ....विचारांची आणि बदललेल्या मानसिकतेची 

         ( गिरणी हा लघुचित्रपट नुकताच RANADE INSTITUTE OF COMMUNICATION & JOURNALISM येथे पहिला )

1 comment: