Sunday 10 February 2013

तहाचे राजकारण ......

चित्र सौजन्य -चित्रलेखा 
प्रस्थापित राज्यशक्ती ,राज्यकर्त्यांची प्रतिकूल धोरणे ,समाजात खदखदत असलेला असंतोष ,रुंदावत चाललेली विषमतेची दरी ,आणि जनमानसात असलेली बदलाची अपेक्षा .अशा परिस्थितीत उन्मत्त राज्याशाक्तीला पर्याय ,देणारे राज्यकर्त्यांना भानावर आणणारे , जनमानसाच्या समस्या सोडवणारे एक नेतृत्व आकाराला येते . व्यक्तीपुजेची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या देशात भाटाना  पुन्हा सुगीचे दिवस येतात . नेतृत्वाच्या स्तुतीत मश्गुल झालेल्या अनेक पिढ्या नेतृत्वाकडून "तव तेजाचा अंश न मागता " जमीनदारी ,वतनदारी आणि आताच्या जमान्यात सहकार ,टेंडर मागून आपल्या येणाऱ्या पिढ्यांची सोय करून ठेवतात .त्या व्यक्तीचे गुण न घेतल्याने नेतृत्वाच्या पश्चात वारसापुढे प्रश्न उपस्थित होतो कि हे प्रचंड  साम्राज्य सांभाळायचे कसे ? आपल्या लोकांच्या उफाळून आलेल्या महत्वाकांक्षा , संभाव्य बंड , आणि प्रबळ झालेला शत्रू या परिस्थितीत साम्राज्य वाढवणे सोडाच आहे ते सांभाळणे इतकेच हाती राहते . आणि सुरु होते "तहाचे " राजकारण .... हि परंपरा शिवशाही ते शिवसेना व्हाया लोकशाही अखंड सुरूच आहे . म्हणूनच उद्धव यांनी स्वराज स्थापन करण्यासाठी राज यांच्याशी तह केला तर आश्चर्य वाटायचे कारण नाही ...

          मराठी ,भाषा मराठी माणूस आणि गिरणी कामगार यांच्या प्रश्नासाठी १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली .८०% समाजकारण आणि २०% राजकारण या स्थापनेच्या उद्दिष्टाशी सेना कित्पण एकनिष्ठ राहिली हा वेगळ्या लेखाचा विषय .पण महाराष्ट्राने ठाकरेंना ठाकरी भाषा आणि शैलीसः .स्वीकारले एक नेता एक मैदान एक विचार या अभूतपूर्व संकल्पनेतून अनेक पिढ्यांनी वैचारिक सीमोल्लंघन केले .मताच्या पेटीतून क्वचित दिसलेले प्रेम रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते आणि  शिवाजी पार्कवर  जमलेल्या  गर्दीच्या संख्येवरून मात्र  दिसत आणि वाढत गेले . सेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून यु टर्न मारल्यावर आता आपण पोरके झालो हि खंत आणि पोकळी मराठी माणसाच्या मनात होतीच . हीच पोकळी बाळासाहेबांच्या तालमीत आणि ठाकरी शैलीत वाढलेल्या  राज ठाकरे यांनी २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून भरून काढली .

राज यांचे टायमिंग 

क्रिकेट आणि राजकारण यात टायमिंग ला प्रचंड महत्व  आहे . राज यांनी अचूक टायमिंग साधत मराठी भाषा ,मराठी पाट्या ,टोल  नाके ,परप्रांतीय यांच्याविरुद्ध खळ फटाक अशा सेना पद्धतीने आंदोलन सुरु केले . " आता उरलो केवळ व्हेलेंटाइन डे विरोधापुर्ता "अशी खंत मनी असणार्या कार्यकर्त्यात नवनिर्मितीचे वारे भरले . मराठीच्या मुद्द्यावरून अबू आझमी ,रामविलास ,पासवान कृपाशंकर सिंह ,अमिताभ -जया  बच्चन , नितीशकुमार , -हिंदी इंग्रजी प्रसारमाध्यमे यांना अंगावर घेत जनतेकडून मराठी हृदयसम्राट असे बिरुद मिळवले .विधानसभा निवडणुकीत १२ आमदार निवडून आणत तर दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून सेनेला जय महाराष्ट्र करत आता तहाशिवाय पर्याय नाही असा संदेश ठळकपणे दिला . वयोवृद्ध सेनाप्रमुख आणि सेनेच्या कार्यपद्धतीशी मिळते जुळते नसलेले कार्याध्यक्ष अशा अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत राज यांनी जुनेच मुद्दे नव्याने किंवा अधिक प्रभावीपणे जनतेसमोर आणत शिवसेनेचे अपयश अधोरेखित केले . राजकारणाच्या गरजेसाठी बाळासाहेब ठाकरी शैलीत टीका करत असताना स्वतः मात्र मौन राखत बाळासाहेबांचा आदर राखला ( गोपीनाथ -धनंजय मुंढे यांच्यातील जाहीर वाद ठाऊक आहेच आपल्याला ) . त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादी यांना सत्तेवरून खेचून महाराष्ट्रात नवनिर्माण करायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तह करण्यावाचून पर्याय नाही हे अधोरेखीत करण्यात राज यांना यश आले .

तहाचे प्रयत्न 

राज आणि उद्धव यांच्या तहाचे प्रयत्न खुद्द बाळासाहेब यांचेपासून ,  गोपीनाथ मुंढे ,वैद्य मामा यांच्यापासून दोन्ही सेनेचे नेते कार्यकर्ते यांनी केले . बाळासाहेबांनी तर " या चिमण्यानो .... " अशी भावनिक साद घातली पण बाळासाहेबंसाठी १०० पावले पुढे यायला तयार असलेले राज इतरासंसाठी मात्र २ पावले पुढे आले नाहीत . राज यांची मातोश्री भेट , उद्धव यांच्या शस्त्रक्रियेवेळी दिसलेली कौटुंबिक जवळीक ,ठाणे व काही पालिका यात शिवसेनेला दिलेला बाहेरून पाठींबा यामुळे आलेली राजकीय जवळीक तहासाठी पुरेशी ठरली नाही . बाळासाहेब यांच्या निधनानंतर सेना भवना पासून अंतर राखलेले राज कृतीतून बरेच काही बोलून गेले .

तहाची गरज .....

बाळासाहेब हयात असेपर्यंत सेनेला क्रमांक २ ते १० याची गरज कधी भासलीच नाही . सत्ता कधी स्वतः उपभोगली नसली तरी सत्तेचा रिमोट बाळासाहेबांच्या हाती होता . उमेदीतल्या सर्व निवडणुका किंवा अगदी गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुका यात पक्षाला बाळासाहेबांची गरज भासलीच . प्रत्यक्षात यायला जमले नाही तर तंत्रज्ञानाचा वापर करत बाळासाहेबांनी मतदारांशी संपर्क .साधला काही क्षणात जमलेल्या जनसमुदायाला आपलेसे करायची कला आणि खासियत बाळासाहेब यांच्या अंगी होती .त्याची उणीव आता सेनेला भासणार आहे . गेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी " मी घराणेशाही लादली नाही आणि उद्धव -आदित्य यांना सांभाळून घ्या " असे  भावनिक आवाहन करत सेनेसमोरिल संभाव्य चिंताची जाणीव करून दिली .घराणेशाही हा डाग पुसून टाकायचा असेल तर तह करणे हा एकमेव पर्याय उद्धव यांच्या समोर आहे . राजकारणाचा विचार केला तर मराठी मतांचे होणारे विभाजन हा चिंतेचा मुद्दा आहे . बाळासाहेबयांचे नंतर शिवसेनेला मराठीचा मुद्दा आणि मराठी मतदार कितपत सांभाळता येईल हे समजायला काही काळ जायला हवा पण घालवायला काळ हाती आहे कोठे ? २०१४ साली येणाऱ्या निवडणुकात "रिस्क " घ्यायची कोणाचीही तयारी नाही . बाळासाहेबांचे विधानभवनावर भगवा लावायचे स्वप्न , मिळत असलेली सहानुभूती याचे मतात परिवर्तन करायचे असेल तर तसा नेता आपल्या गटात हवा . बाळासाहेब यांच्यानंतर मैदानी वक्तृत्व असलेला नेता म्हणून राज यांचेच नाव समोर येते .सेनेचे दुसऱ्या फळीतील नेते आता भिष्मचार्याच्या भूमिकेत आहेत तर आदित्य याचे नेतृत्व सिद्ध व्हायला अजून २ विधानसभा निवडणुका जाव्या लागतील . अशा परिस्थितीत शिवसेनेला तहशिवाय पर्याय नाही .
                 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर नवनिर्माण करायचे असेल तर सत्तेत येण्याशिवाय पर्याय नाही . हे सध्यातरी स्वबळावर जमणे शक्य नाही . भरधाव दौडणाऱ्या रेल्वे इंजिनाला युतीच्या इंधनाची गरज आहेच .राज यांचा करिष्मा शहरात दिसत असला तरी तो अजून ग्रामीण भागात म्हणावा तितका समोर आला नाही . त्यामुळे विधानसभेतील आमदार वाढवून लोकसभेत काही उमेदवार पाठवायचे असतील तर तळागाळात पसरलेल्या शिवसेनेच्या पक्ष संघटनेचा निश्चित उपयोग होऊ शकतो .त्यामुळे तहाची गरज दोघानाही समान आहे 

तहातील मेख 

तह हा गरजेचा असला तरी कोण  कोणता मुद्दा स्वाहा करणार यात खरी मेख आहे . राष्ट्रीय भाजप बरोबर असलेली शिवसेना प्रमाणाबाहेर परप्रांतीयांना विरोध करू शकत नाही आणि मनसे केवळ महाराष्ट्रा पुरती मर्यादित  असल्याने (मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा यावरून तरी असेच प्रतीत होते ) राष्ट्रीय राजकारणाशी तिला काही देणे घेणे नाही . त्यामुळे कोण कोणती भूमिका सोडतो आणि नवी स्वीकारतो हे पाहणे मनोरंजक आहे . तसेच मुंबई --पुणे -नाशिक आणि इतर महानगरातील जागावाटप हा महायुतीतील सर्वच पक्षांना चिंतेचा मुद्दा आहे .

राष्ट्रीय भारतीय जनता पक्ष , तळागाळात पसरलेली आणि भाजप च्या राष्ट्रीय भूमिकेसोबत आपली राज्य भूमिका फरपटत नेणारी शिवसेना , शहरात आणि तरुणात प्रभाव असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सत्तेसाठी तळ्यात मळ्यात करणारी रिपाई (आठवले गट ) यांच्यात तह कसा आणि कोणत्या मुद्द्यावरून होतो हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकते . त्यामुळे उद्धव यांनी टाकलेल्या चेंडू टायमिंग साधण्यात माहीर असलेल राज खेळून काढतात कि त्यावर षटकार मारतात हे समजेपर्यंत जर तर चे  "तहाचे राजकारण " सुरूच राहील !! 

No comments:

Post a Comment