Sunday 26 May 2013

असा राहुल होणे नाही !!

यश -अपयश कोणाच्या हाती नसते स्पर्धा म्हटले की ती निकोप असलीच पाहिजे असा आपला 'अट्टाहास ' असतो . तो असलाच पाहिजे . पण स्पर्धा हि विजयापेक्षा पैशासाठी खेळली जाते तेव्हा मैदानाचे नियम मागे पडतात आणि व्यवसायाचे नियम लागू होतात . नफा आणि तोट्याच्या गणितात 'खेळ ' मागेच रहातो पण 'स्पर्धा ' मात्र सुरूच राहते . यश -अपयश कोणाच्या हाती नसते आपण केवळ प्रयत्न करायचे हे कैक पिढ्यांनी वापरलेले वाक्य आताच्या पिढीने बदलले आहे .आयुष्य जगायला 'अर्थ ' लागतो त्यामुळे आयुष्यात अधिकाधिक 'अर्थ ' मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायचे बाकी यश -अपयश कोणाच्या हाती नसतेच  . बैलांच्या शर्यती , कोंबड्यांच्या झुन्झी बंद झाल्याने श्रीमंतांनी मन आणि पैसा गुंतवायचा कोठे ? या प्रश्नाला धनाढ्य बी.सी . सी . आय ने उत्तर दिले आणि क्रिकेट चा ३ तासांचा 'सिनेमा ' सुरु केला . गावच्या जत्रेत जसे  ट्रकवरच्या तमाशाचे फड असतात तसे प्रत्येक गावात आपले कलाकार ( मैदानापेक्षा जाहिरातीत जास्ती दिसणाऱ्या लोकांना काय म्हणावे ? ) आणि नृत्यांगना घेऊन धनिक हिंडत आहेत . 
         
 ख्रिस गेल च्या वादळाने गाजलेली आय . पि. एल . ६ आता स्पॉट फिक्सिंगच्या तडाख्याने (कदाचित ) लाजत आहे . गेल्या एक आठवड्या पासून श्रीशांत ,चंडीला ,विंदू , एक मराठी अभिनेत्री , श्रीनिवासन , मायाप्पन यांच्या नावाभोवती चर्चेचे फड रंगत आहेत . गल्ला भरण्यासाठीच जन्माला घातलेल्या स्पर्धेत नैतिकता असावी कि नसावी यावर राष्ट्रीय चिंतन सुरु आहे . सट्टा नियमित करावा यासाठी तमाम सट्टेबाज देव पैशात बुडवून बसले आहेत . श्रीनिवासन आयतेच अडकल्याने आपली डाळ शिजवण्यासाठी दालमिया सह सर्व मिया तयार होत आहेत असे वृत्त आहे . सट्टेबाजी विरोधात कायदा करण्यासाठी हालचाली सुरु आहेत . हे सगळे कशासाठी ? खेळात सभ्यता , नैतिकता राहावी म्हणूनच न ? पण जेव्हा क्रिकेट च्या मैदानावरील सभ्यता ,नैतिकता निवृत्ती घेते त्याची साधी दखलही कोणाला घ्यावी वाटत नाही हे खेळाचे दुर्दैव . कालच राहुल द्रविडने निवृत्ती जाहीर केली आणि आय पी एल मधला फ़ेअर प्ले संपला . राहुलच्या निवृत्तीची 'बातमी ' झालीच नाही . तो आय पी एल च्या मैदानावरुनही 'उपरा ' म्हणूनच बाहेर पडला . . . . 
         
  राहुल द्रविड . . . सचिन जर क्रिकेट ला पडलेले स्वप्न असेल तर राहुल ' तंत्रशुद्ध फलंदाजी 'चे दिसणारे वास्तव आहे . कसोटी खेळाडू म्हणून शिक्का बसलेला राहुल , एकदिवसीय क्रिकेट मध्ये तळपला आणि आयपीएल मध्ये बरसला . सोबतीचे गांगुली , कुंबळे , लक्ष्मण निवृत्ती घेऊन प्रशिक्षकाच्या भूमिकेत वावरत असताना , देव आपले देवपण टिकवण्याचे अयशस्वी प्रयत्न करत असताना वाद आणि प्रसिद्धी यापासून दूर रहात राहुल आपले खणखणीत नाणे वाजवत आहे . होता . आजच्या प्रेक्षकांची आवड फारच वाह्यात झाली आहे . पांचट झाली आहे . जसे उत्तम कथा असलेला  इंग्लिश सिनेमा बघायला गेल्यावर ' खळबळ ' नसेल तर हिंदी सिनेमातील फटाकड्याचे महत्व अचानक वाढते . कथेपेक्षा प्रदर्शनाला महत्व दिले जाते आणि आपली मानसिकता प्रदर्शनाचे दर्शन करण्यापुरती मर्यादित राहते . तसेच क्रिकेटचे झाले आहे . धावा 'कशा ' करतो याहून 'किती ' करतो यास महत्व आहे आहे . तंत्रा पेक्षा ताकदीला महत्व आले आहे . बसला तर सिक्स नाहीतर कट्टा फिकस आतातर सामनाच फिक्स हि मानसिकता जोर धरत आहे . प्रेक्षकाला हवे मनोरंजन , मालकाला हवा पैसा , खेळाडूना हवी अधिकाधिक बोली मग यात खेळ आला कोठे ? तंत्र तर फार दूरची गोष्ट . . . मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात स्मिथ ने मारलेल्या ६० -६२ धावांपेक्षा त्याने पायावर बसून चौकार मारलेला सणसणीत कवर ड्राइव मला जास्ती आनंद देऊन गेला . कारण त्या कवर ड्राईव ला खुद्द राहुल द्रविड ने दाद दिली होती . काय मारायचा आणि मारतो राहुल . अप्रतिम . . . मनगटाचा वापर किती सुरेख होऊ शकतो आणि एक मनगट काय करू शकते याचा प्रत्यय दोनच वेळी येतो . एक मराठ्यांचा  लढाऊ इतिहास वाचताना आणि दोन अझर ,लक्ष्मण , राहुल यांची फलंदाजी पाहताना . खांद्याची ताकद पाहायला गर्दी करणार्यांना मनगटाच्या शक्तीचे मर्म समजणे केवळ अशक्य . कारण सिनेमा असो वा सामना प्रेक्षकांना हवी ' खळबळ ' कथा आणि तंत्र दुर्लक्षित तर कथाकार -तंत्रशुद्ध ' उपरे ' . . राहुल पुढेच गेला पण प्रेक्षक मागे पडला . . अजूनही मागे पडेल . . 
                         
मन्ना डे यांच्या अनेक गाण्या पैकी आज ' लागा चुनरी मै दाग  '' गाणे वारंवार आठवतंय . . राहुलसाठी ! राहुलच्या कारकीर्दीच्या भक्कम भिंतीस स्पॉट फिक्सिंग चे गालबोट लागणे दुर्दैव . यात राहुलचा सहभाग नाही . . पण कोणाच्या कप्तानीत हा प्रकार घडला असा ' आजचा सवाल ' भविष्यात उपस्थित होईल तेव्हा दुर्दैवाने राहुलचे नाव निघेल . स्वतः इतके स्वच्छ चारित्र्याचे असताना संघातील गैरप्रकार राहुल रोखू शकला नाही म्हणून त्यास किंचित दोषी सुद्धा मानण्यात येईल . समस्त क्रिकेट आणि राहुल प्रेमीना 'साक्षी ' ठेऊन लिहितो ' कुछ तो लोग कहेंगे . . . लोगोंका काम है केहना ' .. ८९ सामने २८. ३ च्या सरासरीने २१७४ धावा  , ११ अर्धशतके ,२६९ चौकार आणि २८ षटकारांची आतषबाजी करून राहुलने मैदान सोडले. आयपीएल मधील सभ्यता निवृत्त झाली . आता राहुलच्या bat बरोबर मध्ये चेंडू बसून येणारा गंधर्व आवाज ऐकू येणार नाही ,सुखद मनगटी फटके दिसणार नाहीत . . ऐकू येईल ते झम्पंग झपांग . . गिली गिली धूम , ठोको ताली -खटेक आणि दिसेल ते केवळ ताकदीचे प्रदर्शन . . .champions trophy  नंतर राहुल मैदानात उतरणार नाही . . प्रचंड गुणवत्ता , दर्जा असूनही राहुलची कारकीर्द प्रसिद्धीच्या बाबतीत उपरी राहिली . . . .तशीच  त्याची निवृत्तीही !! पैशासाठी आयपीएल नामक फड रंगत राहतील , श्रीमंतांचे गल्ले आणि बेकारांचे खिसे भरत राहतील , कधीतरी खेळ आपल्या 'अस्तित्वासाठी ' मैदानात उतरेल , सत्ता आणि सट्टा हातात हात घालून मैदानावर येतील , आताचा देव निवृत्त झाल्यावर नवीन शिळेला शेंदूर फासून देवत्व बहाल करण्यात येईल . . . पण . . आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असा राहुल होणे नाही !! कारण देवत्व बहाल केले जाते पण द्रविडत्व  ( नवा शब्द ) कमवावे लागते . . कष्ट करून , दर्ज्याच्या व्याख्या बदलून . . कायम दुर्लक्षित राहून !! 
......................................................................................................

राहुल द्रविड एक दुर्लक्षित राजपुत्र !! Rahul Dravid 

No comments:

Post a Comment