Tuesday 17 September 2013

एक लोहपुरूष . .

एक लोहपुरूष नरमल्याने
शरमले लोहत्व लोहातले
दुखावले पुरुषत्व पुरुषातले !

लावलेले बीज
पालकत्व नाकारू लागले
मागून आलेले द्विज
जेष्ठत्व अव्हेरु लागले
भिडले ओठ आपल्याच
दातांशी
जुंपले युद्ध आपल्याच
आप्तांशी
झाली करमणूक लोकांची
लोहपुरूष नरमल्याने !


उठल्या चर्चा
उभे ठाकले प्रश्न
त्याच्या अस्तित्वाचे . .
निघाली जळमटे
झटकला धुरळा
अडगळीच्या खोलीचा
झाली तयारी पूर्ण
विस्मृतीत टाकण्याची
एक लोहपुरूष अडल्याने !

वयाचा अन अहंकाराचा
गंज काढू पाहतो आहे
घड्याळाचे काटे उलटे
फिरवू पाहतो आहे
अपेक्षित डाव पडायला
शकुनीचे फासे हुडकतो आहे
एक लोहपुरूष
 अहं मधल्या अहं शी
झुंजतो आहे !

डाव काही साधेना
कमळ काही फुलेना
लोह्पुरुशाचे लोहत्व सिद्ध होईना
लोह्पुरुषाला काळाचा महिमा पटेना


फुलवलेल्या कमळात
फुरंगटून बसायची वेळ आली
आपल्याच व्युहात आपणच
अडकायची पाळी आली
व्यर्थ गेले कर्तुत्व अन
फुकाचे ठरले संचित
वाटी आली ती केवळ
सहानुभूती
एक लोहपुरूष नरमल्याने !

आघाडीचा मान
पक्षाची शान
जनमानसातले स्थान
गमावून साधले काय ?
एका लोहपुरुषाने

No comments:

Post a Comment