Sunday 29 September 2013

निर्णय

'' Dad it's final . . . you are shifting to hydrabad ''

सहा खोल्यांच्या ऐसपैस घरातील एका कोपऱ्यात सकाळपासून भांड्याला भांडी आपटत होती . लढत होती . पोचे येउन बाजूला पडत होती पण तरीही लढत होती . साठीपार झालेले माधवराव , संधीवाताने वेग मंदावल्याने साठीकडे हळू हळू वाटचाल करणारी मीना
आणि त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल यांच्यात राहत्या जागेवरून सुरु असलेला वाद . . .

' अरे कष्टाने घेतली हि जागा या जागेला काहीच किंमत नाही ? मी आयुष्यभर केलेल्या कष्टाचे प्रतिक आहे हे घर आणि ते सोडून जायचे ?? ' माधव
' oh come on dad , be practical . . काय हे प्रतिक वगिरे घेऊन बसलाय ? लोल  अहो तुमच्या प्रतीकाच्या रंगाचे पोपडे निघालेत , भिंतीना चिरा पडल्यात ''


जमिनीत पुरलेला वास्तुपुरुष आणि लाकडी खुर्चीत बसलेला कर्तापुरुष कान देऊन ऐकत होते . वाटले होते राहुलला घराची किंमत असेल पण त्याला दिसले ते केवळ रंगाचे  पोपडे आणि भिंतीच्या चिरा . . खरच बोलतोय का राहुल ? माधवरावांनी घराकडे एकदा राहुलच्या नजरेने पाहिले . त्याही परिस्थितीत आपला मुलगा किती समजूतदार आहे याचे कौतुक वाटले . राहुलने सांगितल्या पेक्षा परिस्थिती भयाण होती . कधीकाळी घराला लावलेला पांढरा रंग आता केवळ कोपऱ्यात दिसत होता . माती , मुलाने लहानपणी काढलेल्या रेघोट्या , रंगाचे लावलेले हात , ओलीने धरलेली बुरशी आणि कोपऱ्यात आपले साम्राज्य स्थापन करून झाडू लावलास तर याद राख या गुर्मीने बघणारे कोळी याने भिंतीचा रंग उडवून टाकला होता . गावभर रंग खेळून आलेल्या मुलाला कितीही धुतले तरी याचा मुळचा रंग कोणता असा प्रश्न पडतोच .तेच घराचे झाले होते .  . भिंतीवर आपुलकीने हात फिरवत असताना मुलाचे पुढचे शब्द आदळले

' काय ठेवलंय या जुनाट घरात अन मागास गावात ? सगळीकडे धूळ अन शेण . . याक्स . . माझी गाडी दिवसातून ३ वेळा धुतली तरी घाणच राहते '

देशी रस्त्यावर उभ्या असलेल्या विदेशी गाडीकडे बघत राहुल गरजला . . .

'मागास गाव ? म्हणजे मागास गावात अमी राहतोय म्हणजे आम्हालाही मागास समजतोस काय ? '

'वेल . . आय वोन्ट कमेंट ऑन देट . . . यु आर इनफ मेचुअर टू इंटरप्रीटेट . . . आय हेव अ कॉल . . एक्सक्युस मी '

कानावर फोन लावला की चेहेरा दिसू नये अशा धूर्तपणे तयार केलेला फोन मुलाच्या चेहेऱ्यावरील भावना लपवत निघून गेला . . . पण कानात शब्द घुमत होते . . . 'मागास ' . . . . दोन अश्रू  नुकत्याच येऊ घातलेल्या सुरकुत्यात अडकून गालाच्या वर कुठेतरी अडकले . . . इतकावेळ बघ्याच्या भूमिकेत असलेली मीना नवऱ्याकडे सरकली . .

'अहो . . का त्रास करून घेता स्वतःला  ? '

' मीने . . मला एकट्यालाच होतो का ग त्रास ?? बरोबर आहे . . . पुरुषांचे अश्रू अन भावना पदराआड लपत नाहीत . त्यांना ते लपवताही येत नाहीत , म्हणूनच ते दिसतात . . तुझ्या शब्दांना तुझे सुजलेले डोळे साथ देत नाहीत मीने ''

अनेक वर्षे धरणाची दारे न उघडल्याने साचलेले पाणी , लहानशा पावसानेही धरणावरून ओसंडून वाहू लागते तसेच झाले होते . . मनाने अश्रूंना घातलेला बांध आता फुटला होता . . .

' मागास ? आपण . . . या मागास पणाच्या व्याख्या तरी काय ग ? जीन्स न घालता सफारी घालणे हा मागासपणा ? इंग्लिश साहित्य -सिनेमे यात न रमता मराठीत आकंठ बुडणे हा मागासपणा ? घरासमोर विहीर असताना 'टब ' बसवायचा आचरटपणा न करणे हा मागासपणा ? आपली संस्कृती संस्कार जपणे हा मागासपणा ? का दारू न ढोसणे हा मागासपणा ? ''

'अहो . . प्रत्येक पिढीचा गुण आहे हा . . तीर्थारुपांचे बाप होण्याची खुमखुमी प्रत्येकात असते . तुम्ही अपवाद होता का याला ? '

' खरं आहे . . . परंपरेच्या आणि रुढीच्या चीरेबंदी वाड्यात बदलांचे वारे वहायला हवे . . दहा फुटांवरचे सुद्धा चेश्म्यातून दिसेनासे झाले की सुकाणू सोडायला हवा , सत्तावीस रुपये बिल झाल्यावर पाचशे मधले किती परत घ्यायचे हे समजेनासे झाले की आर्थिक व्यवहार पुढच्या पिढी कडे सोपवावे . . आपले वर्तमान जिवंत ठेवण्यासाठी मुलांच्या भाविश्यासह चालावे , फरपटावे हे मलाही समजते ग . . दोन पिढ्यातील वैचारिक संघर्ष प्रत्येक घराने अनुभवला आहे . . पण . . पुढच्या पिढीला मागच्या पिढीची लाज वाटत असेल तर . . . . '

' काहीतरीच ह तुमचे . . अहो त्याला लाज कोठे वाटते आपली. . फक्त घर बदलून त्याच्या  सोबत नेतोय   . . आपले घर जुनं आहेच पण आठवणीमुळे आपल्याला ते नवे वाटते . . तसे राहुल ला वाटायलाच हवे का ? जुन्या गोष्टी बदलण्याचा निर्णय कधीतरी घ्ययला नको का ? ''

' जुने . . . प्रत्येक जुनी गोष्ट बदलायची असेल तर तो आपल्याला कोठे बदलेल ?? अजून सात आठ वर्षांनी आपण जुने होऊ . . मग ? शरीर तर आताच भंगारात घालण्या सारखे झाले आहे पण मनाच्या नावीन्यावर तग धरून आहोत . . एकदा का ही उमेद संपली की  घराचा उडालेला रंग , भिंतीचे उखडलेले पोपडे , गळणारे छत आणि आपण यात काही फरक राहणार आहे का ?? त्याच्या पंचतारांकित घरात दोन निखळलेले तारे किती दिवस सांभाळणार तो ? '

'खरं आहे तुमचं . . . त्या एसी च्या हवेत माझाही श्वास गुदमरतो . . . भल्या मोठ्या घरात वावरताना सुखाचा अन संवादाचा कोपरा हुडकण्यात माझा सगळा वेळ जातो . . पण नाही सापडत ''

दार जोरात ढकलून राहुल आत आला . . .

'बाबा तुमचा 'निर्णय ' काय ? आय हेव टू लिव बाय ५ . . बी फास्ट . . . '

' निर्णय फास्ट घेतलाय . . पण जरा स्लोली सांगतो . . मी अन तुझी आई . . मातीत उगवलेली अन मातीत रमलेली माणसं . . शक्य असूनही कधी आकाशात उडलो नाही म्हणून तुझ्या पंखाना बळ दिले . आकाशात उडायला शिकवले . पण तू आकाशातच रमलास . . कधी खाली आलाच नाहीस . तुझ्या पंधराव्या मजल्यावरील घरातून आम्हाला आकाश दिसते पण माती नाही . . एखादा पक्षी दिसतो पण फुलपाखरू नाही . . समोरची इमारत अवाढव्य दिसते पण इमारतीतील अन रस्त्यावरची माणसे ठिपक्यासारखी दिसतात . . कधीही एकत्र न येणारी . . तुमच्या इमारतींच्या आणि स्वप्नांच्या उंच्या वाढल्या पण मनाची खोली कमी झाली . . बोलल्याशिवाय आमचे भागात नाही ,तुम्हाला बोलायला वेळच नाही . . चार माणसाना घरी आणून चहा पाजायची आमची सवय अन स्वतःच्या वडिलांशीही चार हात लांबून बोलायचे तुमचे सोपस्कार कसा मेळ घालायचा यात ? अरे या वयात झेपणार  का तुमचे 'एटीकेटस ' ? आई वडिलांना मागास ठरवून तू आयुष्यभर सुखाने जगू शकतोस पण त्याचं मागासले पण आयुष्यभर वागवू शकत नाहीस . . तुझे मन आणि मान तितके मोठे नाही . . . आम्ही इथेच राहणार . . या मागास गावात , जुनाट घरात , धुळीच्या साम्राज्यात अन आठवणींच्या राज्यात . . . कारण इथे 'आम्हाला ' महत्व आहे . . आमच्या जीवनशैलीला नाही .  कमीपणा वाटणार नसेल तर येत जा भेटायला . . . पण या वडाला जमिनीतून उपटण्याचा प्रयत्न कधी करू नकोस . . . '' बायकोचा हात हातात घेऊन पुढे म्हणाले . . . . '' हा सायलीचा वेल एकटा पडेल '' 

No comments:

Post a Comment