Saturday 26 October 2013

दाभोलकर खून - माझ्या मना बन दगड !



कविता करणे किंवा कवितेच्या प्रांतात रमण्याची माझी प्रकृती नाही . किंबहुना ते माझ्या किंवा वाचणाऱ्याच्या प्रकृतीला मानवत नाही . तरीही मी नेटाने कविता लिहितो . आवडीने कविता वाचतो . या वाचनात मला विंदा करंदीकरांच्या कविता मनापासून आवडतात . पटतात . आजूबाजूच्या परिस्थितीला साजेशा वाटतात . डॉ . नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला लवकरच तीन महिने पूर्ण होतील . दिवाळी साजरी करायच्या नादात तपासाचे निघालेले दिवाळे आपल्याला कोणीतरी 'सवाल ' उपस्थित करेपर्यंत समजणार नाही . हे सवालही महिन्यातून एकदाच उपस्थित होतात . वीस ते वीस असा त्यांचा प्रवास असतो . असो . . या पार्श्वभूमीवर मला विंदांच्या  माझ्या मना दगड हो
 या कवितेतल्या काही ओळी लिहाव्याश्या वाटतात . .

'हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो! '



दगड . . . सध्या खाणकाम 'ठप्प ' असल्याने दगड फुटायचे काम थांबले आहे पण कधीकाळी मऊ मेणासारख्या गेलाबाजार माती सारख्या असणाऱ्या मनांची दगडे होत आहे त्याचे काय करायचे ? त्यांना कोणी फोडायचे ?

डॉ . दाभोलकर यांच्या खुनाला २० तारखेला २ महिने पूर्ण झाले . अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य , साधनेच्या साधनेची जबाबदारी याचा खांदेपालट झाला . काळाला जे काही करणे शक्य होते ते दाभोलकर काळ झाल्यावर काळाने केले . आता दाभोलकरांना विस्मृतीत टाकण्याचे कार्यही काळ शांतपणे करत आहे . तनाने दाभोलकर गेले पण ते अजून मनात आहेत या घोषणा आता हवेत विरल्यात . . निषेधासाठी बाहेर पडलेल्या मेणबत्त्या आता दिवाळी आणि नंतर येणाऱ्या ख्रिस्मस साठी मुठीतून नक्षीदार स्टेन्ड वर विराजमान झाल्यात . . महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा खून झाला म्हणून उर बडवणारे आता विषय टाळत आहेत . . इत्यादी . . एकूणच काय समाज 'दगड ' बनला आहे . म्हणूनच मला हल्ली प्रश्न पडतो दाभोलकर गेल्याने महाराष्ट्रात क्रांतीची नवी ज्योत पेटेल म्हणून फुरफुरणाऱ्या कोड्ग्यानी पुढे काय केले ? माझा सवाल दाभोलकरांचे कार्य पुढे नेणाऱ्या , त्यांच्या विचारांचा प्रसार -प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नाही . . माझा आक्षेप अभिनय करणाऱ्या तद्दन नाटकी राजकारणी आणि मिडिया चे सूत्रसंचालक यांच्यावर आहे . . . आपण काय करणार दाभोलकर यांच्यासाठी ?

           शासनाचे एक बरे असते . . मेलेल्या माणसाच्या आत्म्याला गोंजारायला . आपले नागवेपण झाकायला , लोकांच्या तात्कालिक भडकलेल्या भावना शमवायला , त्या व्यक्तीच्या अनुयायांना थोपवायला काहीतरी संमत करून टाकायचे . मग ती एखादी मागणी असो , विधेयक असो , त्या व्यक्तीच्या जन्मभूमीत /कर्मभूमीत एखाद्या स्मारकाचा प्रस्ताव असो , एखादा पुरस्कार असो किंवा भूखंड असो . . तितके केले कि शासनाची जबाबदारी संपते . मारेकऱ्याला शासन द्यायचे काम शासनाचे नसते . एकदा विषय न्यायालयात गेला की शासन /राजकारणी गांधारीची भूमिका स्वीकारतात . कधीकाळी प्रती स्कॉटलंड यार्ड म्हणून फ़ेमस असलेल्या मुंबई ला साधा पोलिस आयुक्त मिळायला विविध हितांना लागेबंधाना  ओलिस ठेवायला लागते . मधूनच तपास सीबीआय कडे द्या ,ह्याव कडे द्या त्याव कडे द्या म्हणून विरोधक उगाच आरडाओरड करतात . जसे कोणताही घोटाळा झाला कि एसआयटी नेमा म्हणून बोंबाबोंब केली की उत्तरदायित्व संपते तसे कोणताही गुन्हा घडला की सीबीआय कडे तपास सोपवा म्हंटले की जबाबदारी संपते . एकीकडे सीबीआय ला सर्वोच्च न्यायालय चोपते , विरोधी पक्ष बडवतात , सत्ताधारी पोसतात , आयबी दुर्लक्षितात अशा आपणच 'पांगळ्या ' करून ठेवलेली  तपास यंत्रणा कुठवर मजल मारेल अशी आपली अपेक्षा आहे ? समज न भूतो न भविष्यती मजल मारलीच तर त्यांनी दिलेला संपूर्ण अहवाल आपल्या समोर येणार आहे काय ? प्रत्येक सत्ताधार्यात एक विरोधक असतो अन प्रत्येक विरोधकात एक सत्ताधारी असतो . . लोकांसाठीच्या राजकारणात विरोधात उभे ठाकणारे आपल्या विरोधातील गोष्टीत कसे निर्लज्जपणे एकत्र येतात ते राहुल बेबी ने फाडलेल्या विधेयकाचा पाया रचताना आपण पहिलेच आहे . . देशातील प[प्रत्येक गुन्ह्याला धर्माचा रंग चढवायची काय हौस असते हे मला न उलगडलेले कोडे आहे . . दाभोलकर यांच्या खुना नंतर ते अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे . . . लोकांची मने आणि डोकी दगडे झाल्याने देशात काहीही झाले ,कसेही झाले तरी त्याला पाझर फुटणार नाही . . म्हणून सर्वत्र निराशेचे वातावरण आहे का ?

माझ्या मते नाही . . . असंतोष आणि अविश्वास यांचा अतिप्रमाणात संचय झाला की क्रांतीचे आणि बदलाचे बीज येणाऱ्या पिढ्यांच्या मनात रुजते . अंकुरते . . षंढ पणाचा कंटाळा येउन एकदिवस कोणीतरी स्तिमित करणारे कार्य करून जातो . . पण त्याला वेळ लागतो . . म्हणूनच विंदा कवितेच्या अखेरीस म्हणतात

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड  


 कवितेच्या ओळी इथून कोपी केल्या आहेत http://marathisahitya.blogspot.in/2006/01/blog-post_08.html
 

No comments:

Post a Comment