Saturday 14 December 2013

भय इथले संपत नाही

Now, should we treat women as independent agents, responsible for themselves? Of course. But being responsible has nothing to do with being raped. Women don’t get raped because they were drinking or took drugs. Women do not get raped because they weren’t careful enough. Women get raped because someone raped them.
Jessica Valenti

काही घटना या केवळ घटना नसतात . तर त्या जखमा असतात . एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अन संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर , दांभिकतेवर , नैतिकतेवर अन मुल्यांवर पडलेल्या . . . जखमा !! कालांतराने या जखमांचीही प्रतीके होतात , अस्मिता जन्माला येतात , भगभगणाऱ्या वेदना अन ठसठसणाऱ्या संवेदना शांत होतात . . व्यक्ती सावरते . . समाज विसरतो . . पण या जखमांची सुद्धा एक वेगळीच वेदना असते . . ज्या दिवशी त्या घडल्या त्याच दिवशी लोकांना अचानक स्मरण होते . . " अरे बरोबर अमुक वर्षापूर्वी तमुक घडले होते '' पुनश्च आठवणी ताज्या होतात . 'त्या ' दिवसापासून ते 'या ' दिवसापर्यंत काय घडले याचा वार्षिक आढावा घेण्यात येतो . इतर देशांपेक्षा भारत किती उदासीन आहे याबाबत चूकचूक पचपच होते . कालांतराने तीही नाहीशी होते . . हे असेच अनेक वर्षे सुरु आहे . . अव्याहत . . मग ती फाळणी असो , भारत -पाकिस्तान  भारत -चीन युद्धे असो , बाबरी मशीद असो , कारगिल युद्ध असो , संसद भवन हल्ला असो , २६ /११ चा दहशतवादी हल्ला असो वा . . . १६ डिसेंबर २०१२ असो . . . घटना घडल्यावर नजीकच्या भविष्य काळा बद्दल प्रत्येक भयभीत होतो . . कालांतराने आश्वस्त किंवा निर्भय होतो . . पण . . ' भय इथले संपत नाही ' . . येणारा प्रत्येक 'उद्या ' एका नवीन प्रश्नाला जन्म देतो . . नव्या जखमांसह समाजाला रुजा देतो , माणसातले माणूसपण खच्ची करतो अन समस्त मानवजातीला प्रश्न विचारतो . . 'मानसा मानसा कधी होशील रे माणूस ?''


            १६ डिसेंबर २०१२ . अघोरी , पाशवी , निर्दयी , पाषाणहृदयी यासारख्या शब्दांना नवे उदाहरण देणारा दिवस . . काळ्या का कोणत्याशा रंगाचा . ती घटना कशी घडली याचे 'वर्णन ' मी करणार नाही . 'का ' घडली त्याचे विश्लेषण सुद्धा करायचा मोह टाळणार आहे . माझ्यासाठी ती घटना 'घडली ' इतकेच पुरेसे आहे . कोणत्यातरी व्याख्यानात मी एक गोष्ट ऐकली होती ,' त्रेतायुग संपून कली युगाची सुरुवात होण्यासाठी कली उत्पन्न झाला . त्याला पाहून समस्त देवगण , ऋषी , सत्वगुणी पुण्यात्मे यांच्यात गदारोळ माजला . प्रचंड मोठे वृषण अन खांद्यावर टाकलेले शिश्न सावरत तो म्हणाला ,माझे युग वासनेचे आहे . रज -तमाचे आहे . विषयसुख घेण्याचे आहे . उपभोग घेण्याचे आहे . सत्वाचा पराभव करून , विवेकाला तुडवून मनुष्य केवळ पशुवत उपभोग घेईल . '' हे असेच घडले असेल का हे सिद्ध करायला माझ्याकडे कोणताही शास्त्राधार नाही . पण वास्तवाचे शस्त्र निश्चितच आहे . वासनांध झालेले काही लोक एका स्त्रीवर किती निर्घुणपणे बलात्कार करू शकतात याचे उदाहरण म्हणे १६ डिसेंबर २०१२ . . . तो बलात्कार 'तिचा ' काहीच दोष नसताना सहन करणारी एक असहाय्य मुलगी . . . दामिनी ,निर्भया वगैरे . .
         
बलात्कार . . . हा अत्याचार (व्यभिचार ?) माणसाला नवा नाही . कायदा निर्माण व्हायच्या आधीपासून ते कडक कायदा अस्तित्वात आल्या नंतरही होणारी घटना . . वर्चस्वाचे प्रतिक , काहीतरी मिळवल्याची मर्दुमकी . . . सर्वस्व गमावल्याची जन्मभराची खंत . हे बलात्कार कुठे ,किती , कोणत्या महिन्यात किती , गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी चढ की झड , कोणत्या वयोगटातील स्त्रियांवर सर्वाधिक बलात्कार होतात इत्यादी 'आकडे ' आपल्याला सहज उपलब्ध होतात . नात्यातल्या व्यक्तीने बलात्कार केला की जवळच्या , शेजाऱ्याने केला की अनोळखी व्यक्तीने केला , शिक्षकाने केला की डॉक्टरने , एकूण बलात्काराच्या नोंदी मध्ये यांचे प्रमाण किती 'टक्के ' हे देखील सहज उपलब्ध होते . सहज मिळत नाही तो बलात्कारी अन सहज उपलब्ध होत नाहीत ते 'बलात्कारी ' . . . . ' उघड ' घटनांच्यात काहीशी गढूळता सोडली तर बरीचशी पारदर्शकता असते (असे म्हणायला हरकत नाही ) पण मुळातच जीवाच्या , घराच्या , मानाच्या , नोकरीच्या , पगाराच्या , रोजंदारीच्या , रोजगाराच्या भीतीने 'दाबून ' ठेवलेल्या बलात्कारांचे काय ?? कोण लावणार त्यांच्यासाठी मेणबत्त्या ? कोण काढणार त्यांच्यासाठी मोर्चे ? कुठून मिळणार त्यांना न्याय . . . ?? कारण . . . ' शेण ' ही नेहमीच 'स्त्री ' खाते अन शेण खाल्लेल्या बाईला पेज ३ वगळता समाजाच्या कोणत्याही सभ्य पानावर कधीच  स्थान नसते . .

  The funny part about Islam is; even if you rape a woman, it would be considered as her fault.
― M.F. Moonzajer

हाच नियम प्रत्येक धर्मात ,जातीत , पंथात , देशात ,राज्यात ,समूहात ,समाजात 'सरसकट ' लावला'च ' जातो . इथे ९ जुलै  २०१२  ला गुवाहाटी  येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे . रात्री पब मधून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर अंदाजे ३ ० मुलांनी विनयभंगाचा प्रयत्न केला . त्याचे व्हिदिओ ,चित्रे नंतर सर्वत्र प्रसारित झाली . मूळ घटना सोडून ,  हे काय पब मध्ये जायचे वय आहे का ? , तोकडे कपडे घातल्यावर मुले उद्दीपित होणारच , रात्री भटकायची ही वेळ आहे का ? स्वातंत्र्य हवे तर त्याची किंमत चुकवायला नको का ? अशा आशयाच्या नैतिक डोसानी वातावरण गढूळ झाले होते . कोणत्याही स्त्रीवर जेव्हा विनयभंग , बलात्कार होतो तेव्हा आरोपी क्रमांक एक ती स्त्री स्वतः असते . खरे आरोपी क्रमांक दोन पासून सुरु होतात . ती एकटी बाहेर का गेली ? , तिचे कपडे , तिचे दिसणे , तिचे वागणे , तिचे फिरणे , तिचे हसणे , तिचे पाहणे सर्वकही कारणीभूत असते तिचा बलात्कार होण्यासाठी . . . ? म्हणूनच लेखाची सुरुवात मी एका कोट पासून केली आहे ''Women get raped because someone raped them. '' . . . पुरुषप्रधान संस्कृती अन पुरुषसत्ताक मानसिकतेचे नागवेपण झाकायला निर्माण केलेली ही लक्तरे आहेत . . अगदी निर्भयाच्या बाबतीत सुद्धा महिला आयोग अध्यक्षांपासून ते स्वयंघोषित कामगुरु पर्यंत सर्वांनी तोंडसुख घेतले आहे . . हा प्रकार थांबायलाच  हवा !

                दोन दिवसांनी अनेकांना निर्भया पुन्हा आठवेल . तिचे लढवय्ये , झुंजणारे , प्रतीकात्मक इत्यादी रूप अनेकांना दिसेल . पण बलात्कार झाल्यावर नग्नावस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असहाय्य मुलीचे रूप कोणालाही दिसणार नाही . कारण हे रूप दिसले तर आरोपीच्या पिंजऱ्यात अक्ख्खा 'समाज ' उभा राहतो . ते समाजाला मान्य नसते . निर्भया गेल्यावर काही कायदे आले , काही उपकरणे वाहत्या प्रवाहात फायदा करून घ्यायला जन्माला घातली , स्त्री सक्षमीकरण इत्यादी नावाखाली कसले कसले वर्ग सुरु करणायत आले , शासनाने १००० कोटी खर्च करून कसलीशी बेंक जन्माला घातली , कितेक मेणबत्त्या अन काळे झेंडे खपले , बिनकामाचा अन असंवेदनशील म्हणून विनाकारण ठपका ठेवल्या गेलेल्या 'तरुण मनगटाची ' ताकद दिसून आली , मिडिया ने प्रकरण लाऊन धरले , बलात्कारी यो यो सर्व ठिकाणी लुंगी डान्स करू लागला ,आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली बाकीच्यांना शासन झाले , बालगुन्हेगार हा विषय चर्चेत आला , केस्त्रेशन चर्चेत आले . . . हे होता होता एक वर्ष जाहले . . काही प्रश्नांची  उत्तरे  अजूनही नाहीत  . 
.
                 इतके सर्व होऊन /करून स्त्री सुरक्षित आहे ?? तिला हव्या त्या वेळी , हव्या त्या ठिकाणी , हव्या त्या कपड्यात ती फिरू शकते ?? मध्यरात्री किंवा अगदी दिवसासुद्धा ती बस ,टेक्सी ,केब , रेल्वे याने 'सुरक्षित ' प्रवास करू शकते ? बलात्कार झालेल्या स्त्रीला स्वीकारण्याइतकी आपली मानसिक वाढ झाली आहे ? एखाद्या स्त्रीचे अस्तित्व , पावित्र्य , आयुष्य शरीराच्या एका छोट्या भागावर मर्यादित असते ?जो भाग बलात्काराने कोणीही मिळवू शकतो ? अगदीच सोप्पा प्रश्न म्हणजे आज स्त्री सुरक्षित आहे का ?? जागा कोणतीही असो , वय काहीही असो , कपडे कसेही असोत स्त्री सुरक्षित नाही हे वास्तव आहे . काहीजण लग्नाचे लांबत चाललेले वय , स्त्री -पुरुष प्रमाणात पडत चाललेला फरक , दाबून ठेवलेल्या भावनांचा (वासनांचा ?) स्फोट असले काहीतरी लेबल लावतील पण या लेबलाहून ' बलात्कार झालेली स्त्री ' हे लेबल फारच ताप अन त्रासदायक असते . . यातून मार्ग काय ??
               
बलात्कार थांबवणे हे भ्रष्टाचार संपवण्या इतके सोप्पे आहे . कारण याची सुरुवात अन शेवट 'आपल्या ' पासूनच होतो . . जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की हे थांबले पाहिजे तोपर्यंत अगदी पुरुषाचे लिंग कापून टाकण्याचा कायदा जरी आणला तरी बलात्कार थांबणार नाहीत . कारण इथे सूत्रधार लिंग नसते तर मानसिकता असते . . पोर्न बहुतेक सर्वच पाहतात , वासनेचे थैमान जवळपास प्रत्येकाच्या मनात विचारात सुरु असते , एखादी स्त्री हवी हवीशी प्रत्येकाला वाटत असते पण काहीच जण बलात्कार करतात कारण ' त्यांना तो करायचा असतो ' ! वासना अन विवेक यातील नाते तुटलेले असते . . . . निर्भायाला आदरांजली वगैरे वाहताना प्रत्येक पुरुषाने एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा . . . ' माझ्यामुळे समाज सुरक्षित आहे ?? ' . . अशा अनेक मी चा समूह बनतो अन अशा अनेक समूहांचा समाज . . याने बलात्कार खरच थांबतील ,कमी होतील माहित नाही पण स्त्रियांच्या मनात आधाराची भावना निश्चित तयार होईल . अर्थात स्त्रियांना पुरुषांच्या आधाराची गरज असतेच असे मी म्हणणार नाही . कारण स्त्रिया सक्षम आहेत . पण समाजाला स्त्री अन पुरुष या दोघांच्या आधाराची गरज असते . स्त्री अन पुरुष यांच्या नात्याला विश्वासाच्या टेकूची गरज असते . असेच बलात्कार सुरु राहिले तर प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषाकडे अविश्वासाने अन पुरुष स्त्रीकडे वासनेने पाहेल अन एक निर्भया जाऊनही . . . भय इथले संपत नाही परिस्थिती कायम राहील !! 

No comments:

Post a Comment