Sunday 15 December 2013

लक्षात राहिलेला . . लक्ष्या !!

आयुष्यातल्या जिंदगीत कधी महेश कोठारे यांच्याशी 'ग्रेट भेट ' झाली तर त्यांना एक प्रश्न विचारणार आहे . महेश सर तुम्हाला कधी 'महेश महेश ' अशी हाक मारून बोलावतंय असा भास होतो का हो ?? याचे उत्तर कदाचित होयच असेल . . . याच 'महेश ' ने अन नेहमी अडचणीत सापडणाऱ्या लक्षाने आम्हाला हसायला शिकवले . . आज लक्षाचा स्मृतीदिवस . . अगदी विस्मृतीत गेलेला . 'अरे यार ,आज लक्षा असता तर . . . ' असे म्हणत अनेक कट्टे भावनांनी अन आठवणीनी ओलसर केले . त्याचेच संवाद कसेबसे त्याच्याच स्टाइलने फेकायचे केविलवाणे प्रयत्न करत हास्याचे कारंजे उडवले . तो बनवाबनवी करत असताना स्वतःला बनवून घेतले . तात्या विंचू म्हणजेच तो गोष्टीतला बागुलबुवा समजून लहान वयात माहित असलेल्या सगळ्या देवांचे स्मरण केले . . पण तो आपल्यातून कधी गेला हा दिवस मात्र सपशेल विसरलो . . हा दिवस रंगभूमीला अन चित्रपटसृष्टीला आठवणीत असेल पण प्रेक्षकांना आठवण करून दिली तरी पटणार नाही . . कारण लक्षा गेलाय हे कोणाला पटणारच नाही . . तो इथेच कुठेतरी आहे . . जवळपास . . अजूनही हसवतोय . . चौकोनी चेहेरे हलवतोय . . चेहेऱ्यावर रंग लाऊन आयुष्याचे रंग बदलतोय . . तो जाणे शक्यच नाही . . याच 'भावनेला अन भासाला ' आज ९ वर्षे पूर्ण झाली . . . 

                    कधी कोणी अस्वलाच्या मिठीत शिरलंय ?? धिप्पाड ,काळ्या केसांचे जंगल , टोकदार नखे , छातीवर पांढरा पट्टा असलेले जंगली (सध्या प्राणी संग्रहालयात दिसणारे ) अस्वल ? ते म्हणे माणसाला मिठी मारते अन गुदगुल्या करते . . हसवून हसवून मारते म्हणे . . नसेल कधी अस्वलमिठी मिळाली तर लक्षाला पहा . . बारक्या चणीचा , केसांची झुडपे डोळ्यावर तोऱ्यात रुळवणारा , विनोदाची नखे खुपसून प्रचंड हास्य वेदना देणारा , त्याला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत हसवणारा , गडाबडा लोळवणारा . . . . लक्षा  ! अनेक वर्षे मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतोय पुढेही करत राहील . . . त्याच्या नावाची अन कामाची मोहिनीच इतकी जबरदस्त आहे की प्रेक्षकांनी त्याला आपले मानले . . झपाटलेला २ चित्रपटाचा सुरुवातीला जेव्हा लक्षाचा भिंतीवर फोटो दिसतो तेव्हा उत्स्फुर्तपणे बाहेर पडलेले अनेक हुंदके अन उसासे मी स्वतः ऐकले आहेत . . अनुभवले आहेत . यातच कलाकाराचे यश आहे . . . मैफिल कधी सुनी होत नाही असे म्हणतात . . द शो मस्ट गो ऑन असेही म्हणतात . . पण हे नियम लक्षाच्या बाबतीत अपवाद ठरले आहेत . . लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीच्या विनोदाच्या मैफिलीत जो 'रितेपणा ' निर्माण झाला आहे . . तो अजूनही रीताच आहे . शो अनेक होतात पण ते ऑन वाटत नाहीत . . कान शोकडे असतात पण डोळे कुठेतरी लक्षाला हुडकत असतात . . अजूनही . . 
                   
लक्षाच्या सिनेमांची यादी मला काढायची नाही . ती सर्वाना पाठ आहे . . त्याच्या सिनेमातला कवट्या महांकाळ , गंगुराम , यई यई यई , तात्या विंचू , बाबा चमत्कार इत्यादी सर्वांच्या अजूनही लक्षात आहेत . . हे यश दिग्दर्शकाचे , कथालेखकाचे , संवादलेखकाचे , त्या कलाकारांचे का सर्वाना आपल्यासह घेऊन जाणाऱ्या वन एंड ओन्ली लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ?? उत्तर कठीण आहे . . . पण लक्षाचे काम एक जोडणारे किंवा सांधणारे होते याबाबत कोणालाही शंका नसावी . . तळवलकर , अशोक सराफ , सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करूनही लक्ष्मीकांत यांचे वेगळेपण डोळ्यात भरते . मनात उतरते . . लहानसे ,इतरवेळी टाकाऊ वाक्य त्याच्या तोंडातून बाहेर पडले की हास्यबाण होऊन घुसते . . इतके अचूक टायमिंग त्याने अवगत केले होते . सध्या विनोद म्हणजे कमरेखालचे असा नसता प्रघात पडत चालला आहे . उगाच चिंगम खाल्ल्या सारखे वळवळायचे , बटबटीत तोंडं करायची , पचपचीत भावना चेहेऱ्यावर आणून काहीतरी पांचट वाक्य आचरट पद्धतीने फेकायचे ही विनोदाची हिडीस व्याख्या झाली आहे . मोजके काही सोडले तर बाकीचे याच प्रवाहातले . . विनोदाची सर्कस मांडणारे . विनोद कसा फुलवायचा अन विनोद म्हणजे काय हे ज्याला शिकायचे किंवा जाणून घ्यायचे असेल त्याने बेर्डे चे सिनेमे आवर्जून पाहावेत . इथे तुम्हाला मेहमूद , दादा कोंडके , कादरखान सर्व दिसतील पण या सर्वातून लक्षाचे वेगळेपण अधोरेखित होईल यात शंकाच नाही . . विनोद करायचा त्याचा एक अलग अंदाज होता , अलग पोत होता त्याच्या या अलगद विनोद करायच्या क्लुप्तीनेच सर्वत्र 'धूमधडाका ' झाला . . कोणीही आला की त्याला बडवायला महेश अन हसवून 'दे दणा दण उडवायला लक्षा ' . . अशोक सराफ 'धनंजय माने ' बनून कितीही तुफान फलंदाजी करत असला तरी ' अरे परशुराम तू कधी आलास ?? ' यावर ' हे काय आत्ताच आलो ' या सध्या वाक्याने 'झपाटून ' टाकणारा लक्षाच , 
                       पण लक्षा शेवटी शेवटी तुझा कादरखान झाला रे . . . तुझ्या विनोदातली मार्मिकता अन अभिनयातली सहजता कोठेतरी हरपली होती . . अगदी 'एक होता विदुषक ' म्हणायची वेळ आली . . पछाडलेला मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे दिसला पण आमचा ;लक्ष्या कोठे भेटलाच नाही . . अनेकदा मी 'तुला ' म्हणून पाहायला जायचो पण 'तू ' कुठे दिसायचाच नाहीस . . केवळ तुझे नाव अन वावर दिसायचा . . एक सामर्थ्यवान विनोदी साम्राज्याला भगदाडे पडताना मी पाहिली आहेत . . त्याच काळात मी तुझ्यापासून दूर गेलो . . जेव्हा जवळ यायचा प्रयत्न केला . . लक्षा कम बेक करेल म्हणून तुझ्या सिनेमाची वाट पहिली तेव्हा तूच पेक अप केलेस .  मुकेश चे जुने गाणे आठवतंय . . ( थोडं बदललं आहे ) 

' तेरी याद दिलसे मिटाने चला था 
के खुदकी हस्ती अपनी हस्ती मिटाने चाला था 
कभी जिस जगह पर ख्वाब देखे थे मैने 
वही खांक अपने उडाने चला था ' . . . 

सॉरी लक्षा . . . मिस यु ! 

No comments:

Post a Comment