Saturday 1 February 2014

आप का क्या होगा ??

 ''एक माणूस होता. तरुणाईत त्यानं ठरविलं की, आपण पूर्ण विश्वामध्ये बदल घडवायला पाहिजेत. तरुणाईचा उत्साह आणि आत्मविश्वासामुळेच त्याला वाटलं की, आपण हे शिवधनुष्य पेलू शकू. दिवस सरले. तो गृहस्थ रानात शिरला. तेव्हा वाटलं विश्वाच्या बाबतीत हे करणं अवघड आहे, पण देशामध्ये मात्र नक्कीच काही तरी आमूलाग्र बदल करता येऊ शकतो. तो कामाला लागला. पन्नाशीत जाणवलं की, अवघड आहे, राज्यावर फोकस करावं, देश फार मोठा आहे. मग साठीमध्ये कळलं की, राज्यातही काही करू शकलो नाही. मग जिल्हा स्तरावर काही करावं असं त्यानं ठरवलं. सत्तरीमध्ये लक्षात आलं की, काही झालेलं नाही. आता सत्तरीत होता तो. गात्रं गलित झाली. मग लक्षात आलं की, आपण गावामध्येच काही केलं असतं तर बरं झालं असतं, काही तरी व्यवस्थित बदल करू शकलो असतो. तसंच काही प्रशासनाचं आहे. '' अनेक वर्षांचा संचित कचरा एकाच खेपेत साफ करण्याचा झाडू उचललेले अरविंद केजरीवाल यांची सुरुवात जरी दणक्यात झाली असली तरी यापुढचा त्यांचा मार्ग 'आम' राजकीय पक्षासारखा असणार आहे . . . 

             सामान्य माणसास असामान्य व्हायची सुप्त इच्छा असते . या इच्छेला जर बदल अन परिवर्तनाची जोड मिळाली तर त्या इच्छांच्या महत्वाकांक्षा होतात . सामाजिक स्तरावर प्रचंड असंतोष खदखदत असतो . जे काही साधक बाधक सुरु आहे ते अयोग्यच आहे अशी भावना पसरते /पसरवली जाते . तरुणांच्या टोळक्यात ' ये मादर* क्या करेंगे . . . खुद्कि जेब कभी भरती है क्या *** ' , मध्यमवयीन / नोकरदार वर्गात ' विकास झाला पाहिजे . . काय म्हणतोय मी ? समोरचा -विकास झाला पाहिजे . .  ' पेज थ्री का काय जमातीत - ' व्हेर इज डेमोक्रसी ? व्हेर इस ग्रोव्थ एन प्रोग्रेस ? यु नो , लास्ट विक आय हेड बिन टू युएस एंड आय . . . . '' असे संवाद निन्म स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत गाजू ,गरजू अन घुमू लागतात . अशा परिस्थितीत सर्वांपासून वेगळा असलेल्या पक्षाची गरज निर्माण होते . लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या देशात अशा 'उद्विग्न ' मानसिकतेचे भांडवल करण्यासाठी नवीन पक्षाचा जन्म होतो . मग तो महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो वा दिल्लीत आम आदमी पार्टी असो . . 

            आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे आपणच ठरवून टाकले की काही प्रश्न मिटतात अन काही आव्हानांचा उदय होतो . आपले वेगळेपण टिकवण्यासाठी हरकाही हरएक करायची गडबड या पक्षात सुरु होते . .काही दिवसांचा शो ऑफ उतरला की 'धोपट मार्गा सोडू नको ' याची आठवण होते अन कालचे बरे पण आजचे नको असे समाजाला वाटायला लागते . तेच आप बाबत झाले आहे . लोकशाही अन लोकशाही बळकट करणाऱ्या प्रत्येक घटकाला फटकरण्याचे काम आप कडून जोरात सुरु आहे . राजकारणी भ्रष्ट , प्रशासकीय अधिकारी सुस्त , न्यायव्यवस्था निद्रिस्त , पोलिस खाते कामचुकार , पत्रकार विकलेले ,उद्योगपती माजलेले इत्यादी . असे प्रत्येकावर दोषारोप करून भारतीय लोकशाही अत्यंत नीच लोकांच्या हातात आहे असा प्रचार अन प्रसार करून देशात 'अराजक ' निर्माण होईल आणि त्या अराजकाचे नेतृत्व मफलर आडून करता यावे या प्रयत्नात केजरीवाल अन त्यांचे भूषण वाटावे असे सहकारी करत आहेत . . 

             केजरीवाल सत्तेत आल्यावर सामान्य माणसास आपणच दिल्लीच्या खुर्चीची 'उब ' बुडाखाली जाणवायला लागली . 'बघा . . काय करू शकतो सामान्य माणूस आणि तुम्ही बसलाय झोपा काढत ' असे टोमणे गल्लीतल्या किमान ३ खिडक्यातून बाहेर पडायला लागले . आता देशात परिवर्तन होणार ,आता भारत महासत्ता बनणार इत्यादी प्रचंड आशावादी स्वप्नात आम आदमी रंगला होता . पण हाय रे कर्म . . . केजरीवाल यांनी आपल्याच कर्माने आम आदमीला मान खाली घालायला लावली . मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना रिक्षा वगैरे यातून येण्याची केलेली उठाठेव नंतर शासकीय गाडीचा केलेला स्वीकार , आम्हाला सरकारी काहीही नको असे म्हणतच सरकारी गृहात केलेला गृहप्रवेश , सामान्य जनतेचे जीवन वेठीस धरून रेल भवनासमोर केलेला हौदोस , कोन्ग्रेस सोबत जाणार नाही म्हणत केलेली हात मिळवणी , अनिल कपूरच्या 'नायक ' सिनेमाहून अधिक वेगवान अन बालिश अशा सोमनाथ भारतीकृत कारवाया ,मतांचा जोगवा मागायला मुस्लिम वस्तीत केलेला मुजरा , दिल्लीतील वल्मीक समाज डोळ्यासमोर ठेऊन हातात धरलेला झाडू , 'जनता दरबार ' .लुक्कड सभा ला दिलेला डच्चू , अशा अनेक 'घुमजाव ' करामतींमुळे लोकांचा या पक्षावरील विश्वास उडत चाललेला आहे . नाही म्हणायला सुरुवातीपासून आजपर्यंत तो मफलर काय तो कायम आहे . . झाडता झाडता तोही गळून पडला तर तेही एक परिवर्तनाच म्हणायला हवे . .

               केजरीवाल यांच्या विजयाने राजकीय पक्षांसमोर एक आव्हान निर्माण केले अन मिडिया काय करू शकते याचा प्रत्यय आला . माननीय अण्णा हजारे यांचे प्रथम आंदोलन ते केजरीवाल यांचा दिल्ली मधील विजय या दोन मुद्द्यात समांतर रेष ओढली तर अनेक यशाच्या शिखरे मिडीयाच्या 'ट्रायपोड 'वर उभारली असल्याचे दिसून येते .आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीच्या आधी उगवणारी तिसरी आघाडी न उगवता तिसरा पर्याय उगवला आहे . त्यांनी घेतलेल्या वीज दर आणि पाणी दर कपातीच्या निर्णयामुळे तर अनेक राज्य धास्तावली आहेत . आजच्या बातमीनुसार दिल्ली मधील वीजपुरवठा येत्या दोन दिवसात किमान १० तासांसाठी खंडित होऊ शकतो हा भाग अलाहिदा . केवळ केजरीवाल यांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून खिशात काय आहे हे न पाहता सवलती अन अनुदानांचा वर्षाव केला जात आहे . . चेतन भगत यांच्या मतानुसार आप हि राजकारणातील 'आयटम गर्ल ' आहे . जिचे अस्तित्व नाकारता येत नाही अन प्रभावाचा अंदाज बांधता येत नाही . . 

                 बदल हा एका दिवसात ,एकाच वेळी ,एकाच खेपेत होत नसतो . मुळात काय बदलायचे आहे यावर एकमत हवे . बदलायचे म्हणून सगळ्याच भिंती पाडून ठेवल्या , फरशा उकरून ठेवल्या , समान मोडून टाकले अन आता आम्ही नव्याने बांधकाम करतो असे म्हणणे घराच्या बाबतीत शक्य आहे पण लोकशाहीच्या बाबतीत अशक्य आहे . लोकशाहीत बदल हे लोकशाही आणि संसदीय मार्गानेच झाले पाहिजेत . आपले कोणी आईक्ले नाही कि घे पत्रकार परिषद अन कर तक्रार असल्या झटपट उपायांनी समाजाचे मनोरंजन होऊ शकते पण बदल होऊ शकत नाहीत . लोकशाहीला आव्हान देणारे कोणी असेल तर त्यास आम अद्मीने आपल्या परीने विरोध केला पाहिजे . एका राज्याच्या सत्तेत आल्यावर जर त्या पक्षाचे प्रवक्ते ' वो सीएम है , राज्य उनका है वो जहा चाहे अनशन कर सकते है ' अशी हुकुमशाही वकव्ये करत असेल तर आम अद्मीने जागे होण्याची वेळ आली आहे . . . आप चे काय व्हायचे हे होउदे पण आम आदमी मात्र सुखरूप राहिला पाहिजे . . 

No comments:

Post a Comment