Monday 24 February 2014

मला दिसलेला फॅन्ड्री

फॅन्ड्री हा एक प्रयत्न आहे . वाद घडवून न आणता वादग्रस्त  विषय हाताळण्याचा . काहीही प्रोजेक्ट अन प्रमोट न करण्याचा . समाजातील एका वर्गाचे दुक्ख मांडत असताना इतर समाजाला न दुखावता विचारमग्न करणारा . शिवाशिव किती बेगडी अन सोयीची असते यावर मार्मिक भाष्य करणारा . परंपरागत व्यवसायापासून नवी पिढी का अन कोणत्या न्युनगंडामुळे फारकत घेत आहे ते स्पष्ट करणारा . अजूनही 'हुंडा ' अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण करणारा . . समाजाला पडलेला प्रश्न म्हणजे बापाला -कुटुंबाला दिले गेलेले एक आव्हान असते याचा प्रत्यय देणारा . स्वप्न बघायला जात शिक्षण रंग रूप लागत नाही याची वास्तविक जाणीव करून देणारा . वंचित घटकांना कोणत्या गोष्टीचे 'अप्रूप ' असते ते चितारणारा . दोन जीवांनी असमान जात ,धर्म ,सामाजिक -आर्थिक -शैक्षणिक स्तरास न जुमानता फुलवलेला  'टाइम पास ' न घडवता झुरणारे मन दाखवून अस्वस्थ करणारा . . . माणसाला डुक्कर  ही बोचरी उपाधी देऊन त्या फॅन्ड्रीने समाजाला मारलेल्या दगडाने मनाला बऱ्याच जखमा करणारा . . . . फॅन्ड्री हा एक स्तुत्य प्रयत्न आहे ! 


                    या सिनेमाची कथा कोणत्या गावात घडते हे महत्वाचे नाही . ती कोठेतरी 'अजूनही ' घडत आहे हे लाजिरवाणे आहे . गावात माजलेली डुकरे 'त्यांनी ' काढायची ,शोधायची अन मारायची अन 'यांनी ' ती धडपड ,धावाधाव ,खटपट ,संघर्ष मनोरंजन म्हणून बघत बसायचे हे अस्वस्थ करणारे आहे . फॅन्ड्री सिनेमाच्या शेवटच्या काही सीन मध्ये डुक्कर सापडल्यावर सगळे पांगतात . गर्दी विरळ झाल्यावर दिसणारा पेप्सी कोलाचा डबा जब्या सोबत मलाही अस्वस्थ करून गेला . एखाद्याचे जगणे ,असणे अन जगण्यासाठी काहीतरी कसेतरी कसलेतरी काम करणे हा 'चेष्टेचा ' विषय ठरत असेल , तर 'समतेचे अन समानतेचे ' धडे बुकातच राहीले . ते डोस्क्यात कधी शिरलेच नाहीत . अशा प्रसंगात फुले -शाहू -आंबेडकर -गाडगेबाबा यांच्या फोटोचा केलेला वापर न बोलता बरेच काही बोलून जातो . . आपल्या असण्याची लाज अन त्यांच्या असण्याची कीव मनास देऊन जातो . या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे उल्लेखाने वा अनुल्लेखाने कोणत्याही 'सवर्ण ' वर्गावर टीका केली नाही . हे आहे हे असे आहे .कोणामुळे आहे ते मी बोलणार नाही पण  हे तुमच्यामुळे आहे . माझ्या अन माझ्या कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीस नक्की कोण जबाबदार आहे ते तुमचे तुम्ही ठरवा असा संदेश हा सिनेमा देतो . अर्थात सवर्णांवर प्रत्यक्ष टीका नाही त्यामुळे माझा अहं सुखावला अन मला सिनेमा आवडला यातला भाग नाही . . पण टीका जेव्हा टोकाची होते तेव्हा कलेच्या पडद्याला राजकारणाच्या गुंड्या दिसायला लागतात अन सिनेमातला संदेश बाजूला राहून कोणाच्या आदेशाने असा सिनेमा निघाला यावरच चर्चा अधिक होते . म्हणूनच मी पहिल्या परिच्छेदात म्हंटले की हा सिनेमा काही प्रोजेक्ट अन प्रमोट करत नाही . हा फक्त वास्तव मांडतो . . अंगावर न येणारे पण अंगावर शहारे आणणारे ! 

               
  फॅन्ड्री हा सिनेमा म्हणजे केवळ संवेदनशील मनांच्या संवेदना जपणारा सिनेमा आहे का ?? निश्चित नाही ! कारण संवेदना या दाखवायच्या नसतात तर त्या जगायच्या अन जपायच्या असतात . केवळ फॅन्ड्री सिनेमा बघून ,त्याच्यावर रसभरीत लेखन अन प्रतिवाद करून आम्ही किती संवेदनशील आहोत अन हा सिनेमा न बघणारे किंवा बघूनही त्याची वारेमाप स्तुती न करणारे असंवेदनाशील ,कोडगे किंवा तत्सम आहेत असे उतावळे निष्कर्ष काढण्यात काहीच हशील नाही . कारण फॅन्ड्री  ही स्टेटस म्हणून मिरवायची गोष्ट नवे . ते एक दुक्ख आहे . . आपणच आपल्याला दिलेले . . ते कोणी मान्य करेल ,कोणी करणार नाही हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे . अन अभिव्यक्ती कोणी कोणावर लादू शकत नाही अन कोणी कोणाची उसनी घेऊ शकत नाही . त्यामुळे माझ्या शेजारी ,मागे ,आजूबाजूला सिनेमा सुरु असताना मोबाईल वर गेम खेळणारे ,पोपकोर्न चा मचाक मचाक आवाज करणारे ,फोनवर गप्पा मारणारे , आयला ते 'इंचू डसला ' गाणे लाव भे ** म्हणणारे सर्वच 'संवेदनाहीन ' आहेत का ? अन जर ते तसे असते तर ते इकडे आले असते का ?? याचे कारण म्हणजे फॅन्ड्री  ला आपण दिलेले 'स्टेटस ' . . आहे सिनेमा उत्तम आहे यात वाद नाही पण ज्याने सिनेमा पाहिला नाही तो फॅन्ड्री  नक्कीच नाही !
               
 हा सिनेमा मुळात बघण्यासाठी नाहीच आहे . हा सिनेमा समजून घेण्यासाठी अन सामाऊन घेण्यासाठी आहे . या दोन्ही वर्गात ज्यांची मानसिकता 'उस डोंगा पर रस नाही डोंगा ' ही संत चोखामेळ्याची कवीता शिकते त्यांनीच हा सिनेमा बघावा . . तरच त्याचा अर्थ लागेल अन जब्याला न घावलेली काळी चिमनी तुम्हाला घावेल . . मराठी सिनेमा प्रगल्भ अन परिपक्व आहे पण मराठी प्रेक्षक कधी प्रगल्भ अन परिपक्व होणार याचीच चिंता आहे . . कारण 'गाणे ' ऐकायला आलेले लोक अखंड 'सिनेमात ते गाणेच ' शोधत राहतात . . . समोरचे धडधडते अन धगधगते वास्तव तुडवून कोठेतरी लुप्त होतात . . म्हणूनच फॅन्ड्री अन अशा आशयाचे सिनेमे बघण्यासाठी कधीच नसतात . ते आपल्या विचारांना ,समजुतीला ,समाजाला ,तत्वांना ,आपण पाहिलेल्या अन आपण आपल्यापुरत्या निर्मिलेल्या जगाला समानतेच्या अन पुरोगामित्वाच्या मुळापासून हलवतात अन आपल्याला जागे करायचा प्रयत्न करतात . अशावेळी शाळेत कधीतरी पाठ केलेल्या संस्कृत सुभाषिताचा अर्थ आठवतो , झोपलेल्याला जागे करता येते पण झोपल्याचे सोंग घेतलेल्याला कोण जागे करणार ?? 

                 जब्या ने शेवटी मारलेला दगड नक्की कोणासाठी मारला अन तो कोणाला लागला याच्या शब्दबंबाळ चर्चा सुरु आहेत . अनेक जण घायाळ होऊनही याचे उत्तर कोणास सापडलेले दिसत नाही . का मारला जब्याने दगड ? केवळ त्या पाटलाच्या उनाड पोराने त्याच्या बहिणीची चेष्टा केली म्हणून ? का पाच ची वड ही चेष्टा असह्य झाली म्हणून ? मनात असूनही आपला बा जीनची प्यांट न देता १०० -१५० चा सदरा देतो म्हणून ? का बहिणीच्या लग्नाला आपलाच जातवाला २० हजार हुंडा मागतो म्हणून ? शालू त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून का त्याच्या कुटुंबाचा फॅन्ड्री पकडण्याचा प्रवास सगळे गाव बघते म्हणून ? परंपरागत व्यवसायासाठी शाळा चुकली म्हणून ? का शाळा शिकूनही उद्या हाच व्यवसाय करावा लागेल ही भीती मनात बसली असेल म्हणून ? काळी चिमनी सापडली नाही म्हणून ? का त्याच्या संपूर्ण कुटुंबाला फॅन्ड्री नाव पाडले म्हणून ? का आणखी काही प्रश्न ? का अन कुणाला मारला जब्याने दगड या मूळ प्रश्नाला अधिक जटील करणारे ?? 
               
 दिसला अन रुतला असेल दगड सगळ्यांना पण मला दिसला तो डोक्यावर बत्ती तेवत असताना खाली जळणारा जब्या . . . अंगाला फॅन्ड्री शिवलं म्हणून अंघोळ करणारी कोणी मुलगी . . जीन प्यान्ट वर शर्ट शोभल का टी शर्ट या कल्पनेत रमलेला जब्या अन पिऱ्या , एका कुटुंबाची धडपड फेसबुक वर टाकणारा कोणी उत्साही कार्यकर्ता , हुंड्यासाठी पै पै गोळा करणारा एक असहाय्य बाप , भिंतीवरून हतबलतेने बघणारे आंबेडकर -शाहू -फुले . . . . . मला दिसला माझ्यातील एक जब्या . . समाजाने या ना त्या कारणाने नाकारलेला . . सोसलेला . . भोगलेला . . पडलेला अन पुन्हा नव्या उमेदीने उभारलेला . . . एक जब्या


©अंकुर देशपांडे 

1 comment: