Saturday 22 February 2014

याद आ रही है

तो जाऊन आज दोन महिने झाले . दोन ? का दीड ? का सव्वाच ?? आठवत नाहीये . . नाही ' द आउटसायडर ' सारखे 'माझी आई बहुतेक काल गेली ' अशी सुरुवात करून वाचकाच्या मनात झिणझिण्या आणायच्या नाहीत मला . पण खरच आठवत नाही तो कधी गेला . . त्याचे जाणे मी अजून स्वीकारले नाही का जाऊनही त्याचे कुठेतरी थोडेसे ,माझ्यापुरते असणे मला भ्रमित करत आहे ?? ठाऊक नाही . . . काही गोष्टी कधीच उलगडत नाहीत . उलगडायचा धसमुसळे पणा केला की एकतर नासधूस होते अन गुंता होतो तो वेगळाच . . . बरेच दिवस मनाशी पक्के ठरवतोय की आता तो नाही . . कुठेच नाही . . मी कितीही प्रेमाने हाक मारली तरी तो येणार नाही . . हाकेच्या अंतराच्या पलीकडे गेलाय तो . . मला अलीकडे सोडून . . .

               मार्च २००४ . गुढी पाडवा . मी बहुतेक दहावीत होतो . ( आपल्याकडे दहावी नववी पासून सुरु होते म्हणजे मी साडे नववीत असेन ) . तसा अल्लड . तसा लहान . तसा निरागस . तसा 'स्वप्नाळू ' . . 'माझी ' आई ,'माझे ' बाबा , ' माझे ' घर , 'माझी 'शाळा याहून काहीतरी वेगळे 'माझे ' असे असले पाहिजे याची नवीनच जाणीव होऊ लागलेला . . पण माझे असे काहीच नवते . . 'जे आमचे आहे ते तुझेच आहे ' या न्यायाने सर्वाचा मालक पण तुमचे आहे म्हणून माझे आहे . . त्यात माझे काय आहे ?? असे काहीसे जटील / आडमुठे प्रश्न घेऊन फिरणारा मी . . यंदाचा पाडवा मात्र वेगळा होता . घरी 'माझे ' असे काहीतरी -कोणीतरी येणार होते . . गुढी वगैरे लवकर आटपून 'त्याला ' आणायला आम्ही बाहेर पडलो . . बाबा तो कसा असेल ? मला बघितल्यावर काय करेल ? त्याच नाव काय ठेवायचं ? त्यान शी केली तर कोणी काढायची ? त्याला खायला काय घालायचं ? त्याला कुठ झोपवायचं ? तो मोठ्ठा कधी होणार ? अशा अनेक प्रश्नांनी डोके भंडावून सोडत आम्ही त्याच्या घरी पोहोचलो . . .

                 एका लहानशा पाटीत ठेवले होते त्याला . . इवलुसा काळा सोनेरी पट्ट्यांचा जीव नवीन माणसांची चाहूल घेत होता . बाहेर यायचा प्रयत्न करत होता . कापलेली शेपटी लुडूलुडू हलवत होता . . बाबांनी त्याला उचलले अन माझ्या हातात ठेऊन म्हणाले हा घे ' तुझा कुत्रा ' . . . आयुष्यात पहिल्यांदाच माझे फक्त माझे असे काहीतरी मला मिळाले होते . . तेव्हा मला मिळालेले माझेपण काही महिन्यांपूर्वी हरवले . . साखळीने घट्ट बांधलेला असूनही तो निघून गेला . . माझं न ऐकता . . मला न चाटता . .

                  शेगि ! अस्सल 'डॉबर मेन ' नर . . . दोन हात उंच . .  छातीवरचे रुंद सोनेरी पट्टे , नजरेत रग पण वागण्यात प्रेम , सदा टवकारलेले पडीव कान . . . हलकी झाम्ब्री तुटकी शेपटी . . या साल्यावर मी जेवढे प्रेम केले अन याने माझ्यावर जितके प्रेम केले तितके क्वचितच मी कोणावर अन माझ्यावर कोणी केले असेल . . भावना समजायला भाषा लागत नाही . अनेकदा मी त्याच्यासोबत हसलो , गळ्यात पडून रडलो , त्याला हिंडवताना मीही हिंडलो , घरात कोणाला माहित नसलेल्या 'सिक्रेट ' गोष्टी बोलता झालो . . जगावरचा राग त्याच्यावर काढून मोकळा झालो . . मारले ,बडवले . . पण कधी दुरावा नाही आला आमच्यात . . कारण 'आपल्या माणसातल आपलेपण एकदा सापडलं की हरवण्या सारख बाकी काही उरत नाही ' . . . तो माझ्या मांडीवर झोपायचा मी त्याच्या पोटावर डोकं टेकाय्चो . . मी घरात नसताना तो कावरा बावरा व्हायचा . . आता तो घरात नाहीये तर मी कसा नूसा होतोय . .

                  जनावर ,कुत्रा वगैरे काहीही कितीही तुसडी नावे  ठेवली तरी त्यांच्या अस्तित्वात अन सहज वावरत एक आपलेपणा असतो खास . . लळा लावणे हा शब्द जितका लहान मुलांच्या बाबतीत तंतोतंत पटतो तितकाच तंतोतंत तो प्राणी पक्षी यांच्या बाबतीतही वाटतो . यामागचे कारण म्हणजे आपण त्यांच्यावर निरागसपणे केलेले प्रेम अन त्यांनी आपल्याला भाबडेपणे दिलेला प्रतिसाद हे असावे . . केवळ एखाद्याकडे बघून किती समाधान वाटावे , अंगावर हात फिरवून सुख मिळावे , उबदार जिभेने आपला तळवा चाटून घेत असताना रमावे , त्यांचे आजारपण आपणही जागून काढावे अन आपल्या आजारपणात त्यांनीही काळजीने आपल्याला हुंगून जावे या अन यासम अनेक भावनांचा ,बंधनांचा अनुभव घेण्यासाठी आयुष्यात एकदातरी एखादेतरी जनावर पाळायलाच हवे . शाळेत कोणत्याश्या इयत्तेत शिकलेल्या भूतदया या शब्दा आड असलेले संस्कार आपसूक घडायला लागतात . . . 

           
अजूनही घरात कधीतरी 'शेगि ' म्हणून हाक तोंडातून बाहेर पडते . . समोरून धावत येणारा चतुष्पाद नजरेत येत नाही . . नजर पाणावते . . भरलेलं घर मोकळ वाटायला लागत . . 'काळ अन निसर्ग ' या दोन गोष्टींचा भयंकर राग यायला लागतो . . त्याच जागेवर मला आजही तो दिसतो . . माझी वाट बघणारा . . माझ्यासोबत वाढलेला . . जगलेला . . ! आठवण येते बाबा तुझी . . . . कारण तू 'माझा ' होतास . . . 

No comments:

Post a Comment