Friday 27 July 2012

अनुभवलेला कारगिल विजय दिवस

२६/०७/२०१२ वेळ दुपारी २.४५ ..पुण्याची प्रचंड गर्दी , गर्दीच्या मानाने नेहमीच  छोटे वाटणारे रस्ते ....मुंगी सुद्धा ओवर टेक करून जाईल इतक्या संथ गतीने पुढे सरकणारी वाहतूक ...अभ्राच्छादित आकाश आणि किरणांचा चालू असणारा खेळ ...मधूनच अंगावर पडणारा एखादा नटखट पावसाचा थेंब आणि दुरून कोठूनतरी येणारा चहा चा वास आणि शेजारून जाणाऱ्या...असो .... हे सर्व सृष्टीसौंदर्य उपभोगत असताना " ए टरका आहेस का ? पुढे बघ ...." असे ऐकवूनच पुढे जाणारा पुणेकर..  जायला  वेळ होणार हे निश्चित झाल्यावर वेळ पाहणे सोडून दिले तेव्हा कोठे पुण्याची वाहतूक आणि माणसे मला "आपलीशी " वाटू लागली   ...या सर्व नैसर्गिक आणि मानव निर्मित घडामोडींचा आस्वाद घेत "स्वरूप वर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राकडे " मी हळू हळू सरकत होतो ... औचित्य होते " कारगिल विजय दिवस साजरा "करायचे ...प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून त्यांचे अनुभव ऐकायचे ... ३ च्या कार्यक्रमास मी भारतीय वेळेनुसार ३.३० ला पोहोचलो तेव्हा वक्त्याच्या मागे असणारा कारगिल विजय दिवसाचा फोटो ,तिरंग्याने व्यापलेल्या भित्ती , असंख्य तरुणांच्या अस्तित्वाने सुशोभित झालेल्या खुर्चा ,वातावरणास साजेशी शांतता , वक्त्याची बोलायची पद्धत ,आणि त्यास मिळत असलेला दिलखुलास प्रतिसाद पाहून मन भारावून गेले ... बसायला जागा न्हवती परंतु गळ्यातील ओळखपत्र हातातील नोट पॅड -पेन पाहून तेथील कार्यकर्ता आदबीने हातास धरून पुढे घेऊन गेला आणि स्थानापन्न झालेल्या दुसऱ्या कार्यकर्त्यास म्हणाला " अरे पत्रकारांना जागा दे " हा आदर ( प्रथमच ) अनुभवताना अगदी "गदगदून " आले ....पण मनातील भावनेची जागा former chief  military intelligence शेकटकर यांच्या शब्दांनी घेतली आणि अश्रूच ते काय ओघळायचे राहून गेले .....

                   भारतातील तरुणाई या विषयावर बोलत असताना शेकटकर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष california येथे ओबामा अमेरिकेतील तरुणांना उद्देशून काय म्हणाले त्याचा दाखला दिला " तुम्ही अभ्यास चांगला करा ..कार्य उत्तम करा जर नाही केले तर लक्षात ठेवा भारतीय तरुण येत आहेत " प्रचंड टाळ्या स्वीकारल्यावर नरेंद्र जाधव ,रघुनाथ माशेलकर यांची उदाहरणे देऊन शिक्षण केवळ पैशाने मिळते असे नसून ते इच्छाशक्ती आणि जिद्द याच्या जोरावर मिळते असा संस्कार तरुणाईच्या मनावर केला ....विसावे शतक हे पैशाच्या बळाचे होते तर एकविसावे शतक हे बौद्धिक बळाचे आहे हे स्पष्ट करताना युद्धात बुद्धीचा वापर करून मानसिक बल कसे खच्ची करण्यात येते सांगताना पुन्हा कारगिल च्या युद्धात घेऊन गेले .... परवेज मुशरफ यांच्याशी चर्चा करण्याचे काम शेकटकर यांचेकडे होते ..एके दिवशी मुशरफ सहज त्यांना म्हणाले " भारतावर एखादे अण्वस्त्र पडले तर काय होईल ?" यावरचे उत्तर खूप स्फूर्तीदायक होते " कदाचित १-२ शहरांचे नुकसान होईल पण त्यानंतर पाकिस्तानवर किती अण्वस्त्रे पडतील यावर कोणत्याही देशाचे नियंत्रण नसेल " याचा आधार म्हणून भारताने आपण कोणावरही आपण होऊन अण्वस्त्र हल्ला करणार नाही पण झाला तर सहन करणार नाही अशी आंतरराष्ट्रीय लेखी कबुलीही समोर ठेवली .....आसाम मध्ये स्त्रियांच्या पाणी भरायच्या जागी काही गोंधळ झाल्याने १९ जवानांना स्त्रियांनी मारून टाकले कारण शिवाजी राजे व होशी बिन यांचे तत्व जवान विसरले होते हे सांगून प्राचीन नियम कधीच प्राचीन होत नसतात हे दाखवून दिले ... सध्याच्या आसाम प्रश्नावर जिना -झुल्फिकार भुट्टो आणि चीन यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करून कडक पावले उचलली नाहीत तर २०१८ साली पुन्हा फाळणी होऊ शकते असे भाकीत व्यक्त केले ...सतत अपमान सहन केला तर मानसिक गुलामी प्राप्त होते आणि अस्थाविहीन व्यक्ती अस्थाविहीन समाज निर्माण करतो अशा आशयाने आपले बोलणे संपवून ...टाळ्यांचा विनम्र स्वीकार करून आपले मनोगत संपवले आणि पुढचा वक्ता मनाचा ताबा घेण्यास सज्ज झाला ..
                 वीरचक्र प्राप्त कर्नल गौतम खोत " my memories of kargil war " या विषयावर बोलताना म्हणाले कि टायगर हिल वरचा विजय म्हणजे भारताचा विजय हे चित्र खरेतर मिडिया ने रंगवले आहे ... तोलोलिंग वरचा विजय हा खरे भारतीय सैन्याचा , आधीच्या पराभवाने किंचित खच्ची झालेल्या मानसिकतेचा आणि पुढच्या सपशेल विजयाचा पाया आहे ....तोलोलिंग हे ठिकाण एल .ओ .सी पासून १० किलोमीटर वर आहे आणि या टेकडी वरून national highway 1 alpha केवळ ५-६ किलोमीटर अंतरावर आहे ..त्यामुळे या मार्गावर पराभूत प्रश्तापित करून चोर बाटला येथे जाणारा विंटर स्टोक थांबवणे ,याद्वारे सियाचीन मधून भारतीय लष्करास संख्या कमी करण्यास भाग पाडणे व हल्ला करणे असा कुटील हेतू होता ..त्यासाठी त्यांनी निवडलेली जागा , त्यांची तयारी ,घुसखोरी , सहभागी भारतीय बटालीअन ची प्रभावी कामगिरी ,त्यांची शस्त्रे, मोक्याच्या जागा , त्यांच्याजवळ सापडलेली कागदपत्र असे उल्लेख देऊन ओघवत्या शैलीत सर्वाना कारगिल मध्ये नेऊन ठेवले .... अंती एका जवानाने लिहिलेले पत्र पेश केले .... " जेव्हा तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी स्वर्गात अप्सरांचा पाहुणचार स्वीकारत असेन " या वाक्याने अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या तर काही अस्फुट  हुंदके ऐकू आले ... 
                  भारावलेले वातावरण , पाकिस्तान विषयी ऐकायला मिळणाऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया , वंदे मातरम च्या जयघोषाने स्फुरण पावलेले बाहू, अनुभवाचे बोल ऐकल्याचा आनंद, आणि होत असलेली  भुकेची  जाणीव  , अशा संमिश्र भावना घेऊन सभागृह सोडले ..पण डोळ्यासमोर खोत यांनी दाखवलेली लॉर्ड आल्फ्रेड तेनिसोन यांची कविता होती ...cannons to the left of them ..cannons to the right of them ...cannons to the forward of them ...theirs not to reason why theirs but DO OR DIE ".... या सर्वांची टिप्पणी माझ्या नोट पॅड मध्ये आहे का नाही याची खात्री  केली आणि विचार चक्र थांबवले कारण पुण्याची वाहतूक माझी वाट पहात होती ....

2 comments:

  1. धन्यवाद हे शेयर केल्याबद्दल.....्मला कामामुळे रविवार असूनहि आमच्या येथील कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाला जाता आलं नव्हतं....ती उणीव आज इलेक्ट्रॉनिकली का होईना, पूर्ण झाली.... :)

    ReplyDelete
  2. आपण छान लिहिता.भावनांचा परिपोष उत्तम असतो. पण आज तुम्हाला जे आणि जितके लिहायचे असावे तितकेसे उतरले नसावे असेच सतत वाटते आहे. तरीही डोळ्यांच्या कडा ओलाव्ल्याच.
    निवृत्त लेफ्टनन्ट जनरल दत्तात्रय शेकटकर यांचे भाषण आणि लेखनाची मीहि चाहती आहे. आपले शेजारी , एकूण युद्धे आणि आपली युद्धसामग्री ह्यावर ते नेहमीच कळकळीने बोलतात. -जयश्री जोशी.

    ReplyDelete