Sunday 22 July 2012

ठाकरे बंधू आणि राजकारण ...


दिनांक १७/०७/२०१२ .... वेळ ..मध्यान्यापासून पुढे .... वाजणाऱ्या 2 गोष्टी ... मोबाईल आणि न्यूज चेनेल... फेसबुक वर पोस्ट करणारे असंख्य हात ... " भडक मथळ्यानि सजवलेले सहचीत्र " अनेक विचार ... तयार झालेले अनेक आजचे सवाल ... आणि हे नाट्य सुरुवातीस उत्साहाने आणि नंतर बळजबरीने ( कारण अशी तगडी "कास्ट" असताना प्रसारमाध्यमांना इतर काही " टेली कास्ट " करायचे भानच नवते ) पाहत असलेला मी ... १७-२१ हाच प्रकार रोज चालू आहे ...पवार साहेबांनी वार केल्याने आणि माध्यमांचे लक्ष मुंबईतून दिल्ली कडे सरकल्याने मराठी माणूससुद्धा आपल्या विचारांची लोकल काही काळ थांबवून " राजधानी /झेलम " मधून नवीन काय येतय याची वाट पाहू लागला ... आणि फोकस " ठाकरे घराण्याच्या " इतिहासावरून " पवारांच्या नव्या राजकीय खेळीकडे " वळाल्याने /वळवल्याने माझा "अहं " थोडा सुखावला ...१७ /०७/२०१२ पासून बाळासाहेब -राज -उद्धव यांचेवर आधारित बातम्यांचा प्रसारमाध्यामानी नेहमीच्या सवयीने इतका भडीमार केला की एरवी मी मराठी आहे हे हिंदी /इंग्रजीतून सांगणारा मराठी माणूस अचानक जागा झाला आणि एकमुखाने बोलू लागला ..... " आता एकत्र या ..." अनेकांना उद्धवाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या राज मध्ये कृष्ण दिसू लागला , उद्धवाच्या डोळ्यात राज विषयी अचानक भरताचे प्रेम दिसू लागले .... राज यांनी "मातोश्रीवर " कॉफी घेतली याची ब्रेकिंग न्यूज झाली ...सेना -मनसे- भाजप यांच्यातील आमदार -खासदार आता यांनी एकत्र यावे असे उघडपणे बोलू लागले ..... कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याचे व्यंग चित्र वेगाने "शेअर " होऊ लागले ... टपरी पासून फेरारी पर्यंत यावर रोखठोक मत व्यक्त होऊ लागले ...आणि उभा महाराष्ट्र पुन्हा एक स्वप्न पाहू लागला ...


                   सामान्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पलीकडे जो पाहू शकतो तोच यशस्वी ठरतो ... राज ठाकरे शिवसेनेतून का व कसे बाहेर पडले या इतिहासाची आपण वर्तमानात उजळणी केलीच पाहिजे असे नाही ... परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदयास आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका नवीन पक्षाची भर पडण्या पलीकडे काहीतरी घडले .... अतिशयोक्ती वजा केली तर बाळासाहेबांचे तरुणपण पाहायला न मिळालेल्या माझ्या अभागी पिढीला "काही अंशी " ठाकरी घराण्याचा "ठसका " पाहायला ,ऐकायला ,अनुभवायला मिळाला ...याच्याशीही जे असहमत आहेत त्यांना पुढील मतास सहमती द्यावी लागेल की शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या काही काळानंतर कमी /दुर्लक्षित झालेले मराठी माणसाचे अस्तित्व पुन्हा एकदा उजेडात आले ... मराठी माणूस हा मुद्दा सेनेचा का मनसेचा हा मुद्दा आपल्यासाठी गौण आहे कारण सामान्य माणूस राजकारणापासून दूर राहिला तरच तो "सामान्य " राहतो ...अन्यथा तो "कार्यकर्ता " होतो ....तसेच राज ठाकरे यांचेवर गेल्या ६ वर्षापासून "मराठी मते " फोडल्याचा नेहमीच आरोप होतो आणि शिवसेना -भाजप पराभवाची कारणमीमांसा करत असताना तो अधिकच प्रखर आणि तीव्र होतो .. या मराठी माणसास आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी २०१२ च्या "महानगरपालिका " निवडणुकीत किती हीन शाब्दिक राजकारण झाले ते ज्ञात आहेच ...त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अस्तित्वामुळे मराठी माणसाचे अस्तित्व सुद्धा अधोरेखित झाले आहे हे सत्य नाकारता येत नाही ....


                  दोहोंचे लक्ष एकच असेल तर मार्ग वेगळे का ? कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेतृत्व हे परिपूर्ण कधीच नसते ...तसेच ते नेहमीच  सर्वमान्यही नसते ...आल इज वेल च्या गोंडस आवरणाखाली बरेच काही धुमसत असते आणि एकाने वाचा फोडली कि धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा स्फोट होतो आणि काळ सोकावतो ... छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्या पक्षात्यागा (कोणी पक्षातून हाकलल्या नंतर असेही म्हणू शकते ) नंतर महाराष्टातील सामान्य जनता ,राजकीय कार्यकर्ते आणि नेते एक सक्षम पर्याय हुडकत होते ... अर्थात राजकीय कार्यकर्ते आणि नेते हे सागरात संचार करणाऱ्या नौकेच्या शीडा सारखे वारा वाहील तिकडे तोंड करणारे असले तरी स्थापनेच्या मूळ उद्दिष्टापासून सेना दूर गेल्याचे शल्य अनेकांच्या मनी होते ....आणि हेच शल्य दूर करण्यासाठी मनसे ची निर्मिती झाली असे मनापासून वाटते .. मराठी माणसास आणि मराठी मुद्द्यास एक सक्षम पर्याय द्यायचा जेणेकरून असहाय्य मराठी मते अपरिहार्यतेने कॉंग्रेस -राष्ट्रवादी कडे जाऊ नयेत ती सेनेतच रहावीत हे वेगळा सवतासुभा करण्यामागचे मुख्य कारण असू शकते ...त्यामुळे मराठी मते आणि मराठी माणूस दोन्ही भवानी वाटून घेतला आहे असे म्हणावयास हरकत नाही ... आताच्या राजकारणात अक्खा रुपया मिळवायची हिकमत कोणतही नाही त्यामुळे १०-२०-५० पैशानाही महत्व येते याच कारणाने कोणाशीही खुली किंवा छुपी युती करणे राजकारणात वर्ज्य नाही ....

               पक्ष आणि संघटना वेगळ्या असल्या तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि दोन्ही भावांनी एकमेकाच्या कार्यात कधी टोकाचा हस्तक्षेप केला नाही ... राज यांचा मराठी भाषा ,मराठी पाट्या ,बिहारी मुद्दा ,टोल नाका यासारख्या मुद्द्यांवर हा आमचाच मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण देण्यापलीकडे सेनेने विरोध केला नाही ..उलट आपलेही काही कार्यकर्ते यात उतरवून श्रेय लाटायचा प्रयत्न केला ....कोणी किती लाटले याहून मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही एकत्र आले हे कमी नाही का ?? शिवसेनेने नजीकच्या भूतकाळात कोणते मुद्दे उपस्थित केले आहेत आणि ते लाऊन धरले आहेत असे माझ्या तरी स्मरणात नाही पण मुंबई महानगरपालिकेत "करून दाखवून " हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे ... त्यामुळे राज -उद्धव एकत्रित आले तर काय साधणार आहे ? राज यांना मत म्हणजे शिवसेनेला मत अशी मानसिकता होऊन (किंवा उलटपक्षी ) दोहोंना मिळणारी मते कमी होण्याचा संभव आहे किंवा एकत्र राहून एकमेकावर कुरघोडी करण्याचे राजकारणही फोफावू शकते  ( जसे सध्या कॉंग्रेस राष्ट्रवादी मध्ये चालू आहे )... तसेच मुंबई -पुणे -नाशिक हा सधन त्रिकोण सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात ( निकाल आणि कार्य पाहता ) राज यांची पक्ष संघटना फारशी मजबूत आहे असे दिसत नाही त्यामुळे कोणत्यातरी मोठ्या आणि स्थिर राजकीय पक्षाचा पाठींबा घेणे हे राज यांच्यासाठी गरजेचे आहे ... परंतु सध्या बाहेरून पाठींबा देऊन नवी समीकरणे उदयास आणण्याचा राज यांचा प्रयत्न स्तुत्य आहे .. लोकांच्या अपेक्षेनुसार राज-उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रातील लोकसभा -विधानसभा -इतर निवडणुकीतील जागा "शिवसेना -महाराष्ट्र नवनिर्माण सेना -भारतीय जनता पक्ष -आर .आई.पी " यांच्यात विषम प्रमाणात विभागल्या जातील आणि यातून फार फायदा होईल असे मला तरी वाटत नाही ...त्यामुळे युतीबाहेर राहून / जेथे यशाची १००% खात्री आहे अशा ठिकाणी उमेदवार उभा न करून व निवडणुकी पश्चात एकत्र येऊन हित साधता येईल ... 
              
 राजकारणात कधी काय कसे करावे यास प्रचंड महत्व असते ...अगदी त्रयस्थ दृष्टीने विचार करायचा झाला तर राज यांची उद्धव भेट हे देखील एक राजकारणच होते ....उद्धव रुग्णालयात दाखल असताना राज यांनी त्याची साधी दखलही घेतली नाही या बातमीचा राज यांच्या प्रतिमेवर प्रचंड परिणाम झाला असता .... त्यामुळे उद्धव यांची काळजी घेऊन राज यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर या काळात राज्य केले असे ठामपणे म्हणू शकतो ...बंधुप्रेम पुन्हा होईल अशी अटकळ गेल्या अर्ध्या दशकात अनेकदा बांधली गेली ..मग तो पुस्तके परत द्यायचा प्रसंग असो ,बाळासाहेबांच्या भेटीचा प्रसंग असो , या चिमण्यानो सारखे भावनिक आवाहन असो किंवा त्यास तुम्ही १ पाऊल पुढे टाका मी १०० टाकीन असे उत्तर असो ..परंतु या शाब्दिक आणि राजकीय खेळातून लोकांना अपेक्षित असे उद्दिष्ट साध्य झाले नाही ...भिन्न स्वभावाच्या ,कार्यपद्धतीच्या दोघांनी एकत्र येऊन कार्यभाग साध्य होत नाही म्हणून पुन्हा दूर होण्यापेक्षा समान मुद्द्यावर भिन्न पद्धतीने कार्य करावे .... यात कोणाचा किती राजकीय लाभ होईल सांगता येत नाहीत ..पण ज्या "मराठी माणसासाठी " हे चालू आहे त्याचा मात्र लाभार्थ्यांच्या यादीत वरचा क्रमांक असेल ....

1 comment: