Friday 11 January 2013

बापूंच्या देशा ....श्वानांच्या देशा ....

मला काहीतरी कळतंय हे जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि कदाचित ती अतृप्तच राहील अशी चिन्हे दिसत असल्याने " काकस्पर्श " होणे कठीणच आहे .... त्यामुळे मित्रानो अशावेळी माझ्या पिंडाजवळ जाऊन म्हणा " अरे तुझी इच्छा पूर्ण झाली , आपल्या देशातील सर्व अण्णा ,बाबा आणि बापू आपापल्या कार्यक्षेत्रा पुरतेच मर्यादित रहात आहेत " अखेर आपला आत्मा म्हणजे पण श्वानच ( श्वानास सभ्य भाषेत  कुत्रा म्हणतात )....आशेचे बिस्कीट दाखवल्यावर सारासारविवेक बुद्धी बाजूला सारून हुरळून जाईल आणि अखेर मला मुक्ती मिळेल ...आता आणखी काही वर्षांनी जश्या चिमण्या गायब झाल्या तसेच कावळे देखील गायब होतील मग कसे ? असा टारगट प्रश्न विचारायला परवानगी नाही ...कारण भारत ( इंडिया म्हणायचीही परवानगी आहे ) आशावादी लोकांचा देश आहे .... वाईटातून देखील चांगले हुडकायचे आपल्यावर संस्कार आहेत , लोकांच्या भावना भडकावणे आणि भडकलेल्या भावनांशी खेळणे ही आपल्या आदर्शांची नीती आहे ,बिरबल कथे प्रमाणे (आपल्या स्वार्थाची )  हंडी उंच बांधून त्यातील सुप्त उद्दिष्टांची अळ्या विरहित खिचडी ( कारण खिचडीतील अळ्या केवळ शालेय पोषण आहार योजनेत सापडतात ) शिजत नाही तोपर्यंत पेटलेल्या आगीचा आपल्या वक्तव्यांनी  वणवा करणे ही परंपरा आहे आणि तोंडघशी पडल्यावर मिडिया ला जबाबदार धरणे ही मानसिकता आहे .... या सर्व प्रकारात आपली भूमिका असते ती श्वानाची ... जिकडे हाडूक किंवा बिस्कीट दिसते तिकडे गोंडा घोळायचा  ,काही मिळाले नाही तर डेसिबल ची मर्यादा न मोडता  उगाच गुरगुरल्याचा आवाज काढायचा आणि काहीतरी मिळेल या आशावादावर किंवा काहीतरी मिळाले या समाधानावर उपाशी पोटाला ,अतृप्त इच्छाना "सत्संगाची " जोड देऊन पुष्पक विमानाची वाट पहात बसायचे ....

                                 ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे आणि ज्यांचा आपल्या स्मरणशक्तीवर विश्वास आहे त्यांनी आपले बालपण आठवून पाहावे ...आपले आवडते प्राणी दोनच ...एक माऊ आणि दुसरे भूभू ( कुत्रा )...माऊ असते लबाड आणि भूभू असते " इमानदार " आठवले .... ? जगात श्वानांच्या अंदाजे ३४ जाती आहेत आणि २००१ च्या मोजणी नुसार जगात 400 million श्वान  आहेत ( संदर्भ विकिपीडिया ) . ३४ जाती आणि लाखो श्वान यात समान गुण कोणते ?? इमानदारी , स्वामिभक्ती आणि स्वामीनिष्ठा ... एकदा आपला स्वामी ठरला की सुरु होते गुलामगिरी आणि लाचारी ,स्वामीपुरतेच जग मर्यादित होते आणि स्वामीवर कोणी शाब्दिक किंवा शारीरिक प्रहार केले की सुरु होते भुंकणे ....असेच काही आपले होत नाही का ? शारीरिक दृष्ट्या जरी आपण स्वतंत्र असलो तरी मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या कोत्यातरी व्यक्तीचे ,राजकीय नेतृत्वाचे ,धर्माचे ,विचारधारेचे आणि कधीकधी अविचाराचेही गुलाम असतो ... आपला नेता एकदा ठरवून टाकला की महत्वाकांक्षा लोप पावतात ,सारासारविवेकबुद्धी लुप्त होते , संवेदना बोथट होतात आणि तयार होतो अनुयायी ....आपली मते नसणारा , मालकाच्या  मतावर मान (श्वानांच्या बाबतीत शेपूट ) हलवणारा आणि मालकाच्या विरोधका विरुद्ध निदर्शने करणारा आणि गुरगुरणारा श्वान !! आपला मालक कधी चूक करूच शकत नाही हा विश्वास सत्याचे आणि वास्तवाचे पानिपत करून  टाकतो . त्यामुळे प्रत्येक अण्णा ,बाबा ,बापू ,दादा ,तात्या ,भाऊ यांना श्वानांची पलटण लागतेच ... कारण माऊ लबाड असते आणि भूभू ..... "इमानदार ".....
                                बेकायदा जमीन हडपल्याचा आरोप असलेले (साल २०००), एका स्त्री सोबत तांत्रिक पूजा करत असताना आपत्तीजनक स्थितीत पहिल्याची कबुली दिलेले राजू चांडक याच्या खुनाचा आरोप असलेले (सन २००९), अभिषेक -दिपेश वाघेला या अनुक्रमे १०,११ वर्षांच्या बालकांच्या मृत्यू ने कलंकित झालेले ,अनेक अनुयायांच्या देवाने म्हणजे श्री .आसाराम बापू यांनी दिल्ली सामुहिक बलात्कारातील तरुणी तिच्यावर झालेल्या बलात्कारास अंशतः जबाबदार आहे अशी दिव्यावाणी केली . तिने जर त्या सहा तरुणांचा हात पकडून किंवा त्यांच्या समोर हात पसरून विनवणी केली असती त्यांना "भाऊराया " म्हणाली असती तर ती वाचली असती म्हणे ...आता सिनेमा पासून ते प्रत्यक्षात " भगवान के लिये मुझे  छोड दो " म्हणून विनवणी करणाऱ्या किती तरुणी किंवा स्त्रिया वाचल्या ? आली कोणाला कणव ? सत्संगाचे धडे शिकवणाऱ्या गुरूला याचा कदाचित विसर पडला असावा की काम हा षडरिपु मधील घटक आहे . . सत्वाचा ऱ्हास होऊन रज -तमाचे बुद्धीवर आवरण चढते तेव्हा पुन्हा सत्व गुण जागृत करणे हे तपस्वी ऋषींना जमले नाही ते सत्व म्हणजे काय हे माहीतच नसलेल्या तरुणाईला काय जमणार ?अर्थात परस्त्रीला भगिनीचा दर्जा देऊन साडी -चोळी देणारे शिवाजी महाराज आपल्यातलेच आणि स्वतःच्या बहिणी -मुलीवरची साडी चोळी ओरबाडणारे महाभाग देखील आपलेच ...श्वानाच्या गुणाचे ...जन्माला आल्यावर श्वान कोठे नाती जाणतो ,पाळतो ? तो केवळ निसर्ग जाणतो .....तसेच आपल्यातील काही लोकांचे आहे . कामवेग अनावर झाला की समोरील स्त्रीवर अत्याचार करण्याची नालायक मानसिकता असणाऱ्यांना काय समजणार नाती ? म्हणूनच आपल्या देशात वडिलांचा मुलीवर ,भावाचा बहिणीवर , शिक्षकांचा विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस येतात . आपण रक्ताच्या नात्याला जागत नाही , नात्यातले पावित्र्य जपत नाही  कारण आपल्यातही एक "श्वान " आहेच ... डोक्याचे नाही तर निसर्गाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणारा ....
                                    बापू मिडिया ला कुत्रा म्हणाले हे चांगलच आहे ...श्वानाचे  चे काम काय ?? संकटाची चाहूल लागल्यावर मालकाला जागे करणे .... त्यामुळे त्याचे काम तो करतच राहणार ...आणि तो गेली कैक वर्षे करत आहे . त्याच्या आहारी कितपत जायचे हे आपल्या हाती आहे ... कारण बातमी आणि बातमीचे विश्लेषण यात अंतर आहे . राजकीय  संबंध किंवा मालकी , पूर्वग्रहदुशितता आणि टी .आर .पी .ची गणिते यामुळे कधी कधी "विश्लेषण " चुकू किंवा एकांगी वाटू शकते पण बातमी आपल्या सोयीनुसार बदलता येत नाही ...तथ्य असल्या शिवाय त्यात बदलही करता येत नाही .पण बातमीही दाखवायची आणि त्याचे विश्लेषणसुद्धा करायची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर टाकून आपण केवळ चेनेल बदलत राहिलो तर श्वानांचा आणखी एक वर्ग तयार होतो ...ठराविक प्रसारमाध्यमाला "प्रमाण " मानणारा , त्याचे अनुकरण करणारा , between the lines वाचायचा आणि समजून घ्यायचा प्रयत्नही न करणारा ,माध्यमांचे मत आपले मत मानणारा . स्वतंत्र विचार करणारी माध्यमे आणि २० वृत्तपत्र वाचून १०-१५ वृत्तवाहिन्या पाहूनही स्वतंत्र विचार करणारी जनता याची चणचण देशाला जाणवत आहे . म्हणूनच वारंवार आरोप होतात " माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला " मान्य काही वेळा असे होते पण प्रत्येक वेळा नाही .... पण हे समजून कोण घेणार ? एकदा आपला नेता बोलला की सहमतीने आपण मान डोलावणार किंवा माध्यमांसमोर मान तुकवणार , विरोधासाठी काही काळ गुरगुरणार आणि फायद्यासाठी पुन्हा त्यांच्याच दारी जाऊन उभे राहणार ....आपल्या देशात न बापू (किंवा कोणत्याही क्षेत्रातील नेतृत्व करणारी व्यक्ती ) न त्यांच्या कुत्र्यांची ( श्वानांची ) ........




(आपल्याला किंवा मानवजातीला कोणी श्वानाची उपमा देत आहे ते रुचले पटले किंवा झेपले नाही तर विरोध करायचा हक्क आहे आणि त्याचा मला पूर्णपणे आदर आहे ...काही कार्यकर्ते .जनता केवळ पर्याय नाही म्हणून प्रश्तापित शक्ती समोर मान तुकवतात याची मला जाण आहे .. पण पटो वा न पटो सत्याची कास सोडणे योग्य नाही ..तुकाराम महाराज म्हणतातच " सत्य आम्हा वसे मनी न्हवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे ) 

1 comment:

  1. तुमचे म्हणणे मान्य आहे .जाणारा जीवानिशी जातो पण काही स्वयंघोषित (इथे काहीही म्हणा समाजसेवक ,धर्मरक्षक ........) इत्यादी मंडळी बेताल विधाने करून उरलेल्यांना जीवंत पणी यातना भोगायला लावत असतात तरी पण........................एक सांगावेसे वाटते सत्यमेव जयते या कार्यक्रमात अमीर खान अशीच अर्धवट विधाने समाजासमोर ठेवत होतात त्याचे मात्र कौतुक होत होते ...........?

    ReplyDelete